मराठी

मराठी (राज)भाषा दिन

शब्दीप्ता eMagazine

“माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा” असं अंतरिक आवाहन करणाऱ्या विष्णू वामन शिरवाडकरांचा म्हणजेच कुसुमाग्रजांचा आज जन्मदिवस.. त्यांचं मराठी साहित्यामधील, ज्ञानपीठ.. साहित्य अकादमी.. पद्मभूषण.. पुरस्कारांपर्यंतचं योगदान लक्षात घेता त्यांचा आणि मराठी भाषेचा हा परस्पर सन्मान..

मराठी भाषा हि जगात १३व्या तर भारतात तिसऱ्या क्रमांकावर बोलली जाणारी भाषा आहे.. मराठी भाषेसोबतच इतरही १२० भाषा देवनागरीत लिहिल्या जातात.. पण संस्कृतच्या जवळ जाणारी आणि अनेक संस्कृत शब्द प्रचलित भाषेत वापरणारी भाषा म्हणून मराठी कडे पाहिलं जात असल्याने.. आणि त्यातील क्लिष्ट शब्दांमुळे तशी काहीशी अवघड असणारी हि भाषा..

पाडगांवकर, खांडेकर, दवणे, मतकरी यांसारख्या अनेक व्यक्तींनी आप-आपल्या वैविध्यपूर्ण लेखन शैलींनी निर्मिलेल्या अगाध अश्या साहित्यकृती मराठी भाषेला वेळोवेळी समृद्धच करत आल्या आहेत.. आणि आज त्याचाच परिपाक म्हणून नवीन फळीतील लेखकांना त्यांच्या स्वतःच्या अश्या शैलीतून लिखाण करण्याची मुभा मिळते आहे.. मराठी साहित्याचा इतिहास पहिला तर लक्षात येतं, कि तत्कालीन साहित्यिकांनी निर्मिलेल्या साहित्यकृतींमुळे मजल दरमजल करत अंतिमतः भाषा समृद्धच होत आली आहे.. आणि त्यामुळेच आज कविता, कथा, कादंबरी, नाटक अश्या साहित्याच्या सगळ्याच प्रांतात मराठी भाषा राज्य करताना दिसते आहे..

परंतू मराठीत आज तयार होणाऱ्या काही गीतांमध्ये काहीश्या प्रमाणात सवंगता येत असलेली आपल्याला पाहायला मिळते.. तसं पाहायला गेलं तर ते सुद्धा एक प्रकारचं साहित्यच कि.. पण ज्या भाषेत, जगण्याच्या तत्वज्ञानाचं सार म्हणून, माझ्या तुकोबांनी गाथा, अन् ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरी लिहिली.. ज्या भाषेच्या मदतीने सावित्रीने माझ्या आया-बहिणींना शिक्षणाचं महत्व पटवून दिलं.. अन् लिहायला वाचायला शिकवलं.. त्याच मराठीत आज हे साहित्य होताना पाहिलं कि कीव करावीशी वाटते त्या तुकोबा-ज्ञानोबांची.. मराठी सारख्या राजभाषेचा दर्जा असलेल्या भाषेची हि अवस्था तर.. इतरांच्या बाबतीत तर बोलणेच खुंटले.!!

आजच्या या मराठी भाषा दिनी आपण संकल्प करूयात, अश्या मराठीला दीन करणाऱ्या साहित्याची गळचेपी करून जे भाषेच्या विकासासाठी अन् उद्धारासाठी योग्य तेच साहित्यात सामावून घेऊयात.. अन मराठी भाषेला दीन होण्यापासून रोखुयात..

मराठी (राज)भाषा दिनाच्या शुभेच्छा..

-तुषार प्रशांत पवार

Comment here