सारंगनिल या टोपण नावाने साहित्य निर्मिती करणारे आम्ही गदिमांचे वारसदार मृत्युंजय काव्य पुरस्कार आदि पुरस्कारांनी गौरवण्यात आलेले आकाशवाणी.. सह्याद्री वाहिनी आदिंवर ज्यांचे साहित्य प्रकाशित झाले आहे असे प्रतिथयश कवि.. साहित्यिक.. अनिल वसंत दीक्षित यांनी १०वी १२वी च्या निकालांच्या पार्श्वभूमिवर लिहिलेली हि कविता खास शब्दीप्ताच्या वाचकांसाठी..

निकाल

आज माझ्या मुलाच्या
निकालाचा दिवस खास
मेरीटमध्ये येणारच
एवढा त्याला आत्मविश्वास

तो निकाल घेऊन आला
पण हिरमुसला होऊन
हमसून हमसून रडू लागला
माझ्या कुशीत शिरून

बघा ना बाबा काय झालं ?
मेरीट बिरीट गेलं
एका क्षणात मी पाहिलेलं
स्वप्न उद्ध्वस्त झालं

सगळे कॉपी करत होते
सुपरवायझरही पुरवायचा
मलाही म्हटला ‘कर कॉपी’
पण तुमचा चेहरा दिसायचा

त्याचे डोळे पुसून म्हणालो
‘रडू नकोस दोस्ता
अपयश पचवता आलं पाहिजे
तेही हसता हसता’

तू कॉपी केली नाहीस
तुझा सच्चेपणा दिसला
निकाल काही असो
माझ्या दृष्टीने तुच पहिला

अरे, पेढे वाट आनंदाने
मीही वाटेन अभिमानाने
माझ्या मुलासारखं कोण
सुरेल गातो गाणे ?

मला सांग तुझ्यासारखं
कोण लयीत नाचतो ?
ब्रशच्या सहज फटका-याने
सुंदर चित्र काढतो ?

एक कविता लिहिण्यासाठी
भले भले व्याकूळ होतात
तुझ्या हातून प्राजक्तासारखे
कवितांचे सडे पडतात

दु:खाने जो हळवा होतो
आणि आनंदाने मोहोरतो
तोच खरा आयुष्याचा
पुरेपूर आस्वाद घेतो

कागदावर जे अव्वल ठरतात
मिळवून पैकीच्या पैकी गुण
पैशांपाठी हरवून बसतात
आयुष्याची सुरेल धून

खोटा तोच मोठा होतो
सध्याच्या या तत्वाला भुलू नकोस
खरा तोच हिरा ठरतो
यशाचा हा पैलू विसरू नकोस

दुस-यांच्या कुबड्यांचा आधार घेऊन
कधीच नसतं जगायचं
गरूडासारखं स्वत:च्या पंखांनीच
आभाळाला असतं चिरायचं

कवी अनिल वसंत दीक्षित

(सारंगनिल)९९२२६१३३७

NO COMMENTS

LEAVE A REPLY