शब्दीप्ता May’2016

संपादकीय..!!!

Feel The Content… But Ask For More..!!! हे ब्रीद वाक्य घेऊन, अनेक आघाडीच्या दैनिक, पाक्षिक, तसेच मासिकांच्या स्पर्धेत… आम्ही आपल्या सेवेत हजर झालो आहोत; शब्दीप्ता Magazine च्या माध्यमातून… शब्दीप्ता म्हणजेच… शब्दांना दीप्त करणे.. स्वत:च्या लेखणीने शब्दांना दीप्त करुन साहित्य निर्मिती करणा-या अवलियांचा सन्मान करणे; हा आमचा प्रमुख उद्देश, आणि याच उद्देशास सफल करण्यात आमची साथ देत आहेत… महाराष्ट्रातील तरुण लेखक-लेखिका…

शब्दीप्ता हे एक eMagazine आहे… यात मराठी आणि English अश्या द्विभाषी साहित्याचा समावेश असेल… दर महिन्यातील संकष्टी चतुर्थी च्या दिवशी नवीन अंक प्रकाशित केला जाईल… ज्यात असेल, तुमच्या विचारांना प्रगल्भ करण्याच्या दृष्टिने उपयोगी खाद्य, विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या मुलाखती, आणि विविध विषयांवरील चिंतनात्मक लेखन, तरुण लेखक-लेखिकांच्या नजरेतून…

      पदार्पणातंच आम्ही आपल्या इच्छा, अपेक्षांची पुर्ती करण्याचं उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून आहोत.. पदार्पणातल्या पहिल्या आठवड्यातंच आम्ही तब्बल ७५० हून अधिक लोकांच्या पसंतीस उतरलो आहोत.. मी याचं श्रेय; मला वेळोवेळी मदत करणाऱ्या आणि माझ्यावर विश्वास दाखवलेल्या आपणा सर्व वाचकांना देऊ इच्छितो..

असंख्य दिग्गज लेखक-कवींनी मराठी भाषा आणि आपणा रसिकांच्या दरम्यान सेतू बांधण्याचं मोलाचं काम केलं आहे आणि याच कार्यात आम्हीही अगदी खारीचा वाटा उचलण्याचं व्रत घेऊन आहोत.. प्रतिभावान लेखक-कवीचं साहित्य वाचून, अनुभवून आमच्या शब्दांना उजळवून आपणासमोर सादर करीत आहोत..

या magazine कडे आज युवकांचा सहभाग असणारं.. दर्जेदार साहित्याचा नजराणा असणारं.. आणि वाजवी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारं एक महत्वपूर्ण magazine म्हणून पाहिलं जातं.. आणि ज्याचा मला अभिमान वाटतो..

त्यामुळेच प्रत्येक अंकागणिक आम्ही काही सदरांचा अंतर्भाव नव्याने करीत आहोत.. या अंकात देखील असंच एक नवीन सदर सुरु करीत आहोत.. “चार पावसाळे अधिक..” संपादकापासून ते स्तंभ लेखकांपर्यंत आणि वेबसाईट डीझाईनर पासून ते संकालकापर्यंत सर्वजण २२ ते ३२ या वयोगटातलेच आहेत.. तेव्हा आपल्यापेक्षा चार पावसाळे अधिक पाहिलेल्या काही लेखक-लेखिकांना या लेखन प्रक्रियेत समाविष्ट करूयात असा विचार आला आणि तो प्रत्यक्षातही साकार झाला.. आम्हा युवा लेखक-लेखिकांच्या बरोबरीनेच अधिक अनुभवी लेखक या अंकापासून शब्दीप्ता साठी लिहितील..  त्याचबरोबर संतसाहित्याचा अविरत आभ्यास करणाऱ्या रोहानजी उपळेकरांच्या नितीन कळंबेने घेतलेल्या खास मुलाखतीचा उर्वरित भाग.. मागच्या महिन्यात नागराज मंजुळे चा सैराट चित्रपट रिलीज झाला.. आणि सगळीकडे एकंच वारं सुरु झालं.. सगळं वातावरणच सैराटमय झालं.. रिंकू, आकाश, आणि परिणामी नागराज मंजुळेच्या सर्व टीम चा सैराट performance पाहून इम्तियाज मालदार या हौशी लेखकाने त्याच्या भावना फेसबुक च्या माध्यमातून व्यक्त केल्या.. त्याचं तेच लिखाण full content मध्ये खास शब्दीप्ता Magazineच्या वाचकांसाठी या अंकात समाविष्ट करीत आहोत.. त्याचबरोबर नीट या वैद्यकीय शाखेच्या प्रवेश परीक्षेबद्दल झालेला निर्णय.. त्याचे पडलेले पडसाद.. या काही विशेष लेखांचा अंतर्भाव करीत आहोत..

आपल्या गूढ कथांमधून जीवनाचे आणि मानवी मनाचे खोल, अर्थपूर्ण आणि समृध्द दर्शन घडवून मराठी साहित्यामध्ये आपली मोलाची भर टाकणाऱ्या श्री. रत्नाकर रामकृष्ण मतकरी यांच्या बद्दल या अंकात.. शब्दिप्ता of the issue या सदरात वाचायला मिळेल..

आपल्या प्रतिक्रिया आम्हाला अजून समृध्द होण्यासाठी मदत करीत आहेत.. तेव्हा मुक्त हस्ताने आम्हाला प्रतिक्रिया लिहून पाठवत जा..!!

shubdeepta.comया website वर टाकण्यात आलेला प्रत्येक लेख तुम्हाला इथे एका Pdf fileच्या स्वरुपात देखिल उपलब्ध करुन देण्यात येईल… तुम्हाला फक्त इथे sign up करावं लागेल; चला तर मग, shubdeepta.com वर नि:शुल्क आपलं खातं काढा, आणि साहित्याच्या या नि:पक्षपाती झऱ्याचं अमृत प्राशन करुन तृप्ततेचा अनुभव घेण्यास तयार व्हा…!!!

२५ एप्रिल.. संकष्टी चैत्र, २०१६ रोजी प्रकाशित केलेला शब्दीप्ता Magazineचा तिसरा अंक त्यातल्या काही खास सदरांमुळे विशेष गाजला.. याही अंकामधे काही नवीन मासिक सदरं समाविष्ट करीत आहोत.. या अंकामध्ये आपण तिसरा अंक वाचून दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिक्रियांचा देखील समावेश करीत आहोत..

२५ मे.. संकष्टी वैशाख, २०१६ रोजी प्रकाशित होणारा शब्दीप्ता Magazine चा हा चौथा अंक.. श्री महालक्ष्मी चरणी समर्पित करीत आहोत..