शापित देवदूत – कुस्तीपटू खाशाबा जाधव..!!

0
37

ऑलिम्पिकवीर, कुस्तीगिरांचे दैवत, अष्टपैलू खेळाडू, सर्वोत्कृष्ट धावपटू, शिस्तप्रिय विद्यार्थी, आदर्श क्रीडाशिक्षक, उत्कृष्ट पोलिस अधिकारी, सच्चा देशभक्त, आदर्श नागरिक, नम्र – अजातशत्रू व्यक्ती, क्रीडा क्षेत्रातील स्फूर्तिस्थान, आदरणीय वंदनीय व्यक्तिमत्व, कुस्तीपटू खाशाबा जाधव..!!

जागतिक मैदानात भारताचे नाव उज्ज्वल करणारे खेळाडू कोण असे विचारल्यास गावसकर, तेंडुलकर पासू न कोहली पर्यंत, पेस पासून सिंधू पर्यंत, आनंद पासून साक्षी पर्यंत बरीच नावे डोळ्यांसमोर येतील परंतु एक नाव नेहमी विस्मृतीत जाते.. अत्यंत प्रतिकूल परिस्थिती वर मात करून अन्यायाची, अडथळ्यांची शर्यत पार करून अत्यंत कष्टाने, जिद्दीने ऑलिम्पिक या जागतिक क्रीडा स्पर्धेत प्रथम वैयक्तिक पदक मिळवण्याचा इतिहास ज्यांनी घडवला ते.. कुस्तीगीर के. डी. जाधव उर्फ खाशाबा जाधव.. या भागात त्यांचा जीवनप्रवास जाणून घेऊयात..!!

सातारा जिल्ह्यातील कराड जवळच्या गोळेश्वर या छोट्याशा गावात दादासाहेब व पुतळाबाई यांच्या पोटी १५ जानेवारी १९२५ रोजी खाशाबांचा जन्म झाला. प्रतिकूल आर्थिक परिस्थितीत छोट्या झोपडीवजा घरात सात भावंडासह ते राहत.. आजोबा आणि वडील यांच्या कुस्तीप्रेमामुळे या मुलांना कुस्तीचे धडे लहानपणापासूनच मिळाले.. वयाच्या ५ व्या वर्षांपासून खाशाबा तालमीत जात, जोर बैठका काढत.. बालवयातच लाल मातीशी त्यांचे नाते जुळले होते..  दररोज न चुकता व्यायामामुळे त्यांचे शरीर पिळदार आणि चपळ होत होते.. कोणत्याही खुराकाशिवाय घरातील चटणी भाकर खाऊन वडिलांच्या मार्गदर्शनाखाली खाशाबा आणि त्यांचे बंधू  आखाडे गाजवत होते. वयाच्या ८ व्या वर्षी जत्रेतील पहिली कुस्ती जिंकून, वडिलांच्या चेहऱ्यावरील आनंद बक्षीस रूपाने त्यांनी मिळवला होता.. आपल्या मुलातील कौशल्य ओळखून लहानपणापासूनच योग्य पद्धतीने त्यांस घडविल्यास अशी मुले उज्वल यश संपादन करू शकतात. अगदी याच पद्धतीने दादासाहेबांनी खाशाबांचे कुस्ती कौशल्य ओळखून त्यांस प्रोत्साहन दिले याचमुळे ते जागतिक कीर्तीचे यश संपादन करू शकले.. व्यायामाप्रमाणे त्यांच्या शिक्षणातही खंड पडला नाही.. प्राथमिक शिक्षण गावात घेऊन ते कराडच्या हायस्कुल मध्ये शिकू लागले.. तेथे त्यांना बेलापुरे नावाचे क्रीडा प्रशिक्षक आणि मुख्याध्यापकांचे प्रोत्साहन लाभले.. ऊन पावसाची तमा न बाळगता कराडहुन गावी ते रोज पळत येत जात.. सकाळ संध्याकाळ कुस्तीचा सराव आणि दिवसभर शिक्षण अशी कष्टमय साधना चालू होती.. शालेय स्तरावर त्यांनी सर्व स्पर्धा जिंकत अफाट यश मिळवले होते.. एकाच वेळी कुस्ती, मल्लखांब, पोहणे, गोळाफेक, वेटलिफ्टिंग अशा विविध खेळात प्रथम येत ते शालेय आणि महाविद्यालयीन स्तरावर नेहमीच नेत्रदीपक यश मिळवत राहिले होते.. ‘सर्व हि तपसा साध्यम’ हे खाशाबांनी प्रत्यक्ष आपल्या कृतीत उतरवले होते..

१९४०च्या काळात क्रीडाविषयक मूलभूत सुविधा नसताना देखील खाशाबा एक यशस्वी खेळाडू म्हणून उदयास आले. यासाठीच शालेय आणि महाविद्यालयीन स्तरावर विद्यार्थ्यांना खेळाविषयी विशेष प्रोत्साहन देणे गरजेचे वाटते..

मल्ल विद्येचे प्राविण्य मिळवण्यासाठी ते पुढे कुस्ती पंढरीस.. कोल्हापुरास गेले.. करवीरनगरीत त्यांनी कुस्ती मध्ये सर्वोच्च शिखर गाठले.. ज्या आखाड्यात ते उतरत तेथे ते निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करत.. कुस्तीवर त्यांचे जीवापाड प्रेम होते. एव्हाना कुस्ती हा त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला होता.. देशासाठी पदक मिळावे म्हणून ते अविरत कष्ट करत होते. प्रतिकूल आर्थिक परिस्थिती मध्ये सुद्धा मित्रजनांच्या मदतीमूळेच ते लंडन ऑलिम्पिकला पोहचले.. मातीच्या कुस्तीची सवय असणाऱ्या खाशाबानी, ऐन वेळेस नियम माहिती झाल्याने खूप अल्प दिवसात मॅट च्या कुस्तीचा सराव केला आणि लंडन ऑलिम्पिक मध्ये ६वे स्थान मिळवले.. पदक मिळवण्यात अपयश आले तरीही दोन संघर्षपूर्ण विजयाची सोनेरी किनार होती आणि प्रेक्षकांची प्रचंड दाद सुद्धा.. त्यांनतर कुस्तीचा जोरदार सराव, नियम समजून घेण्यासाठी इंग्रजी वर प्रभुत्व.. या तयारीनिशी ते १९५२ च्या हेलसिंकी ऑलिम्पिकला उतरले.. भारतासाठी कुस्त्या जिंकून त्यांनी कांस्यपदक मिळवले.. भारतीय क्रीडा इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते घडले.. एका भारतीय खेळाडूने ऑलिम्पिक च्या वैयक्तिक पदकावर नाव कोरले.. प्रयत्नांची पराकाष्ठा आणि देशाभिमान असेल तर भारत पदक विजेता बनू शकतो याचा आदर्श खाशाबांनी निर्माण केला. गुडघ्याच्या दुखापतीमुळे ते पुढील ऑलिम्पिक मध्ये सहभागी होऊ शकले नाहीत त्यामुळे सुवर्ण पदकाचे स्वप्न अपुरे राहिले.. क्रीडा क्षेत्रातील अमूल्य कामगिरीमुळे पोलीस दलात नोकरी मिळाली.. तिथे हि त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला.. क्रीडाप्रशिक्षक म्हणून ते अविरत कार्यरत राहिले.. “स्वाभिमानाने जगा.. स्वाभिमान विकू नका..” असे ते नेहमी सांगत. नम्र, अजातशत्रू, निरपेक्ष असे के. डी. जाधव यांचे व्यक्तिमत्व होते..

१४ ऑगस्ट १९८४ रोजी त्यांचे रस्ते अपघातात दुर्दैवी निधन झाले.. त्यांच्या आकस्मिक निधनाने सर्वत्र शोककळा पसरली.. क्रीडाक्षेत्राचे मोठे नुकसान झाले.. ‘जया अंगी मोठेपण तया यातना कठीण..!’ याचा प्रत्यय खाशाबांच्या जीवनात पदोपदी आला.. कोणतीही अपेक्षा न करता ते काम करत राहिले अगदी शेवटच्या क्षणापर्यंत..!! क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च मानले जाणारे शिवछत्रपती व अर्जुन पुरस्कार त्यांना मरणोत्तर देण्यात आले.. खाशाबा जिवंत असताना त्यांना जे मिळायला हवे होते ते आर्थिक साह्य शासनाकडून, खाशाबांच्या मरणोत्तर त्यांच्या कुटुंबास मिळाले..

प्रतिकूल परिस्थितीवर मात करून, कष्ट आणि जिद्दीच्या जोरावर माणसाला किती उंच जाता येते, हेच खाशाबांनी सिद्ध करून दाखविले.. हाच आदर्श आजच्या तरुणाईने अंगिकारल्यास भारताची वाटचाल ऑलिम्पिक सुवर्णपदकांकडे वेगाने होताना दिसेल..!!

NO COMMENTS

LEAVE A REPLY