स्वाती शुक्ल
स्वाती प्रकाश कदम अर्थात स्वाती शुक्ल

कशी आहेस? दरवेळी ठरवतो, मोबाइलवर Save केलेला तुझा नंबर dial करून विचारावं तुला. पण पुढल्याच क्षणी माघार घेतो आणि मनातल्या मनात तुला आठवत राहतो..

मे महिना होता बहुतेक.. आमच्या शेजारच्या घरी साफ -सफाई चालू होती. नवीन बिऱ्हाड रहायला येणार आहे असं राधा काकू आईला सांगताना ऐकलं होत मी. नवीन शेजार म्हणजे खेळायला नवीन मित्र.. कसा असेल तो? जमेल का माझं आणि त्याचं? की भांडत राहू आम्ही? अरे बाप रे..! किती प्रश्न पडलेत आपल्याला. अजून दिल्ली दूर आहे.. घराची साफ सफाई झाली की मग सामान येईल. मग ते बिऱ्हाड रहायला येईल. मग लगेच तर काही ओळख होणार नाही. आणि नसेल आवडत त्यांना शेजाऱ्यांशी बोलायला. मग? छे ! आपण उगाच खूप विचार करतोय असं म्हणत मी विहिरीवर गेलो. पाणी कमी झालं होतं तसं पण पोहायचो आम्ही मुलं. आज विहिरीवर पण तीच चर्चा चालू होती. नवीन शेजार मिळणार आहे मला. म्हणजे नवीन मित्र मिळेल. पोहायला येत असेल का त्याला? आणि नाही आलं तर आपण शिकवू की त्यात काय? इथवर येऊन सगळं बोलणं थांबलं. मी घरी यायला निघालो तर वाटेत मला टेम्पो दिसला. अरे अजून तर घर पूर्ण साफही नसेल झालं आणि इतक्या लवकर हे लोक आले रहायला?
काही का असेना, आपल्याला काय त्याचं असं म्हणत मी धावतच घरी आलो. टेम्पोच्या पुढे येणं शक्य नव्हतं तरीही जितक्या लवकर घरी पोचता येईल तितक्या लवकर पोहचायचं होतं मला.

घरी आलो तेंव्हा सामान उतरवलं जात होतं टेम्पोमधून. आई स्वयंपाकघरात होती. मी दरवाज्याच्या जिन्यात बसून पाहत होतो. तसं मला फार काही स्वारस्य आहे असं दाखवायचं नव्हतं नवीन शेजाऱ्यांना म्हणून उगाचच चेंडू भिंतीवर आपटून झेलत बसलो होतो. पण खरं म्हणजे माझं सगळं लक्ष त्या नवीन येणाऱ्या शेजाऱ्यांवर होतं. कोण कोण असेल घरी. किती माणसं असतील? मन काही शांत बसत नव्हतं.. इतक्यात आईने हाक मारली, “सुध्या, जरा शेजारी डोकावून ये बरं, काही मदत हवी असेल तर करावी रे आपण.
मला तसंही कारण हवंच होतं. आईने ते आयतं दिल्यामुळे मी खूप खुश होतो. म्हणूनच माझ्या ‘सुधीर’ चा सुध्या केलं म्हणून यावेळी ना रागावता मी गपचूप गेलो..
“काका, मी सुधीर, तुमच्या शेजारीच राहतो. आईने पाठवलंय, काही मदत हवी का पाहून ये म्हणाली.”
“अरे, होतंच आलंय सामान उतरवून. गडी माणसं आहेतच की मदतीला आणि काही लागलं तर नक्की हाक मरेन मी.”
इतक्यात आई चहाचा ट्रे घेऊनच आली, “प्रवासात दगदग झाली असेल ना? चहा घ्या थोडा थोडा मग कामं होतंच राहतील. वहिनींना सांगा स्वयंपाकाचं आज मी बघते, तुम्ही फक्त सामान लावून घ्या.”
“वहिनी, तुम्ही का त्रास घेताय? अहो लावेल की ही खिचडी पटकन. कितीसा वेळ लागेल? तुम्ही नका त्रास घेऊ..
“अहो, त्रास कसला? शेजारधर्म आहे हा.. उद्या आम्हाला गरज लागली तर तुम्हीच धावून याल ना?”
“तुम्ही काही ऐकत नाही बुवा. बरं येऊ आम्ही जेवायला.”
“किती माणसांचा स्वयंपाक करायचा आहे?”
“आम्ही तिघंच असतो, बाकीची मंडळी मागाहून येतायंत, ही गडी माणसं जातील सामान उतरवून.”
“बरं, येते मी, स्वयंपाक होत आला की सुध्याला पाठवते बोलवायला”

आईचा स्वयंपाक होत आला होता, तिने मला काका-काकूंना बोलावून आण म्हणून सांगितलं. मी धावतच गेलो आणि पळत आलो, “येतायत गं आई ते पाच मिनिटात.”

आईने ताटं, वाट्या काढून तयारी केली जेवणाची, मी मधल्या जिन्यावर बसून होतो, इतक्यात ते शेजारचे काका आले, सोबत काकू होती, आणि एक मुलगी. बाकी कुणीच नाही. अरे ,म्हणजे आपल्या कामाचं काहीच नाही इथे, चला उठा म्हणत मी माडीवर जाऊन बसलो. मुलींशी बोलण्यात मला काही रस नव्हता. मुली फार नखरे करतात. म्हणून आता मी चिडायला लागलो होतो तिच्यावर.. काहीही कारण नसताना.
जून महिना सुरू झाला. शाळा सुरू झाली. किशोरी आमच्याच शाळेत होती, सहावीला.. लहान आहे म्हणून तिला शाळेत जाताना आणि येताना सोबत घेऊन यायचं ही जबाबदारी आईने माझ्याच खांद्यावर टाकली. मी आठवीला होतो, सतत त्रास देत असे किशोरीला. कधी येताना तिची रिबीन ओढ, कधी वेणीच सोड, तर कधी मुद्दाम तिच्यासमोर चिंच खात असे.. तसं चिंच खाणं मला कधी आवडलं नाही. पण तिला रडू यायचं मी चिंच खाताना पाहून. ती बाबांना नाव सांगायची माझं. मग मला धपाटे बसायचे, मग मी आणखी चिडत असे. तिला आणखी त्रास देत असे.
वर्ष गेली अशी दंगा मस्ती करत. मी दहावीत होतो. शाळेचं शेवटचं वर्ष. आणि तू आठवीत होतीस. का कोण जाणे ,पण आता तू बदलल्यासारखी वाटायला लागली होतीस. तू बदलली होतीस की मी बदलत होतो आठवत नाही नक्की. पण तुला त्रास द्यायला जीवावर यायचं. मला कारण नव्हतं कळत, म्हणून मग जाणून बुजून तुला त्रास द्यायला लागलो होतो. तुझ्याशी कारण नसताना भांडत होतो. तू रुसून बसायचीस.. कट्टी, आता बोलणारच नाही म्हणायचीस.. मनात म्हणायचो, बरंच होईल.. नको बोलूस.. माडीवर अभ्यास करत बसायचो, आणि अभ्यासात लक्षच लागायचं नाही.. तू खाली स्वयंपाकघरात आलीस ना की मी मुद्दाम पाणी हवंय म्हणून खाली उतरून यायचो.. माहीत होतं तू बोलशील..
एकदा शाळेतून परत येताना सहज मस्करी करत तुझ्या हातातलं चाॅकलेट हिसकावून घेतलं होतं. तू भोकांड पसरलंस, “माझं चाॅकलेट..! माझं चाॅकलेट..! “बाबांकडनं मार खाल्ला त्या खोडीसाठी पण तुझा राग नाही आला. तेंव्हाच पहिल्यांदा कळलं मला, मी तुला रडताना नाही पाहू शकत..!
मी खूप विचार करायला लागलो होतो तुझा. तुला चिडवल्यावर मला बाबा आधीही ओरडत होते, चिडून मी तुला आणखी त्रास द्यायचो. आता तर मारही खाल्ला होता, पण त्याही पेक्षा वाईट वाटलं होतं ते तुझ्या डोळ्यातलं पाणी पाहून.. मला नक्की काय झालंय? अंगणातलं गुलाब तोडून न्यायचीस तेंव्हा आईसोबत भांडायचो मी. मला देवळात देवाला वाहायचं होतं म्हणून खोटं सांगायचो. पण आज माडीवरच्या खोलीच्या खिडकीतून तुला पाहत बसलोय. तो गुलाब तू मला चिडवून तोडून नेतेस. मी मुद्दाम खोटं खोटं भांडतोय, तुला संशय येऊ नये म्हणून.. पण मनातून वाटतंय तो गुलाब तुझ्याच वेणीत छान दिसतोय गं..! आता खोटं भांडायला लागलो होतो मी तुझ्याशी पण मनात ठरवलं जे जे तुला हवं आहे ते ते सगळं तुला द्यायचं..

दहावीला होतीस तेंव्हा. कसलंतरी पुस्तक हवं होतं तुला. काका म्हणाले होते, मुंबईहून मागवलंय, पण तुला धीर कसला?एवढंसं तोंड करून बसली होतीस. मी माळ्यावरून माझी सगळी जुनी पुस्तकं काढून शोधून ठेवलं होतं ते पुस्तक. धूळ साफ करून मग माझ्या पुस्तकात मधेच ठेऊन दिलं होतं. माहीत होतं.. काहीतरी कारण काढून तू माझी पुस्तकं हातात घेशील. इकडची तिकडे करताना तुला ते सापडेल. तसं सापडलंही तुला ते. वेडी होतीस तू. माझा हात हातात धरून थँक यू म्हणालीस, मग नंतर नाही आठवत काय काय बोलत होतीस.. मी मात्र तुझा तो स्पर्श जपून ठेवू पाहत होतो. वहीच्या पानात तू माळलेल्या गुलाबाच्या पाकळ्या ठेवल्या होत्या तुझ्या नकळत.. पण हा स्पर्श कुठे ठेऊ गं? मला ठेवायचा होता जपून.. का? नाही माहीत..

मुसळधार पावसात फ्राॅकच्या टोकाला दोन बोटांच्या चिमटीत पकडून म्हणालीस, ” चल पाऊस झेलू.”
वेडी व्हायचीस पाऊस पडल्यावर आणि पाऊसही व्हायचा बहुतेक. कारण त्याचा जोर इतका वाढला होता, की खरंच एक छोटुसं तळ तयार झालं होतं तुझ्या फ्राॅकमधे.. तुझ्यासाठी सायलीची फुलं आणली होती.. ती ओंजळभर फुलं तू रिती करायला लावली होतीस त्या इवल्याश्या तळ्यात आणि मुग्ध होऊन पहात राहिलीस.. दरवळत राहिलीस..!!

एकदा संध्याकाळी म्हणालीस, “लग्न करायचंय.. बाबा स्थळं बघतायत..”
मी म्हटलं, “मग मी काय वाईट आहे?”
तू हसलीस, म्हणालीस, “जा,जा! तोंड बघ आरशात..”
तुला नेहमीप्रमाणेच मस्करी वाटली ती. पण मलाही कळेना तुला नेमक्या कोणत्या शब्दात सांगावं. आईकडे विषय काढणार होतो, पण त्या आधी मला तुझा होकार हवा होता. तुला थेट विचारण्याची हिम्मत होतं नव्हती. तुझा नकार कदाचित पचवता नसता आला मला. आडून आडून बऱ्याचदा विचारलं तुला आणि मस्करी समजून तू उडवूनही लावलंस..

मग दिन्या आला. दिनकर..! तुझा नवरा..! काय पाहिलं होतंस त्याच्यात? मी खूपदा विचार केला या गोष्टीचा. कधी पाहिलंही नव्हतंस त्याला. कोण्या तरी नातेवाईकाचा कोणीतरी लागत होता तो म्हणून स्थळ आलं होतं तुला. आईसुद्धा किती लगबगीने तयारी करून देत होती. तुला साडीत पाहिलं मी त्या दिवशी. वाटलं सरळ यावं घरी, काकांना सांगावं माझ्याशी करून द्या लग्न. बाजूलाच राहील, तुमच्या शेजारी. आणि मी ही सुखात ठेवेन तिला.. माडीवरच्या खोलीतच होतो दिवसभर. बऱ्याच वर्षांनी पहिल्यांदा रडलो त्या दिवशी.
तुझ्यामुळे रात्र आवडायला लागली होती मला. एकदा म्हणाली होतीस, ही लांबच लांब पसरलेली रात्र आणि त्यावर हा टिकलीएवढा चंद्र. ही रात्रच अंगभर लपेटून घ्यायला हवी म्हणजे हा चंद्र आपोआप कुशीत येईल..”
माझा चंद्र कुशीत घ्यायला मी काय करायला हवं होतं गं ?

वर्ष दोन वर्ष गेली असतील.. जगरहाटीप्रमाणे लग्न केलं मी. सुधा स्वभावाने खूप साधी होती, वाटलं होतं तिला सांगून टाकावं, मग विचार केला, काय सांगणार होतो मी? पाऊस पडतो.. आवडतो.. रात्र होते.. आकाशात चंद्र येतो.. आवडतो.. तशीच कधीतरी तू आली होतीस आयुष्यात.. आवडलीस.. त्या पुढे काय? मग काय सांगू सुधाला? तिला फक्त इतकंच कळत होतं, नवऱ्याला रात्री गरम जेवण आवडतं.. बाकी डब्यात काहीही दिलं तरी न कुरकुरता तो खातो.. बाकी इतरही  माझ्या आवडी निवडी असू शकतात हे तिच्या गावीही नव्हतं.. खोटं काहीच बोललो नव्हतो, आणि खरं सांगून तिला दुखवायचंही नव्हतं.. बाकी बायको म्हणून जे कर्तव्य होतं ते ती इमाने इतबारे पाळतही होती.
म्हणायला आयुष्य चारचौघांसारखं सुरळीत चालू होतं. सुधा मुळे दिवसही आवडायला लागला होता.
तरीही दिवासाकडून रात्रीकडे जायला मन खूप आतुर असायचं, आणि या दोघांना जोडणारा संध्याकाळचा काठ ओलांडणं मात्र मला खूप कठीण जाऊ लागलं होतं..
अशातच एक दिवस कळलं दिनूची, तुझ्या नवऱ्याची आपल्याच गावातल्या शाळेत बदली झाली आहे.. तू परत गावात आलीस.
दिनकर मला कधीच आवडला नाही. तसं त्याचं आणि माझं काही वैर नव्हतं पण नाही आवडला तो, कदाचित माझ्यापासून तुला त्याने हिरावून घेतलं ही सुप्त सल कुठेतरी टोचत होती मनाला. आणि मी फक्त तुला पाहता यावं, भेटता यावं म्हणून दिन्याशी मैत्री केली.. माझ्या बायकोला कधी खटकलं नाही माझं तुझ्या घरी येणं की दिन्यालाही..
तसं खटकेल असं वागलोही नाही इतरांच्या दृष्टीने..!!

रोज ठरवायचो आज तडक घरी जायचं, पण पायाखालचा रस्ता वाट चुकवून तुझ्या घरीच आणायचा. मला बघून तू चहाचं आधण ठेवायला स्वयंपाकघरात जायचीस आणि मी बाहेर बसून आवाज ऐकत तुझ्या हालचाली टिपायचो. तू गुणगुणायचीस.. बकुळीच्या शुभ्र कळ्या.. आणि मला आठवायचं तुझ्या फ्राॅकमधलं ते इवलंस तळं..!

दिन्या गेला..! मी तिथेच होतो.. वाटलं होतं आता तू आकांत करशील, मला ऐकवला जाणार नाही, पण त्या दिवशी तू रडलीच नाहिस आणि मी हादरून गेलो..! बायकांनी कितीतरी खटाटोप केला तुला रडवायचा.
नंतर कधीतरी रडलीस.. पण माझ्या मनात कायम अपराधीपणाची जाणिव राहिली.

सुशांत, तुझा लेक तुला मुंबईला घेऊन गेला.. मी आलो नाही तुला निरोपही द्यायला.. वाटलं होतं आता हळूहळू विसरून जाईन मी आणि कमी होईल ही अपराधीपणाची भावना.

तुझ्या लेकाचा निरोप येत असतो, “काका, आईला भेटायला येत जा अधून मधून.. फारच शांत झालीय ती. जगणं विसरल्यासारखी जगतेय.”
तडक तुझ्याकडे यावं असं वाटत राहतं आणि परत अपराधी वाटून मी तसाच बसून राहतो.

तू आठवतेस म्हणजे नेमकं काय याचा शोध घेत.. तू की तुझं शरीर? जर तुझं शरीर आठवतंय तर त्या शरीराचा मोह का नाही झाला कधी? नाही नाही एकच मिनीट..! मोह नाही झाला असं नाही, झाला होता मोह.. त्या शरीराचाही मोह व्हायचा पण ओंजळीतल्या फुलांचा दुरून गंध येत असला तरीही ती नाकाजवळ घेऊन हुंगावीशी वाटतात ना? स्वाभाविक होतं ते..!!

याच विचारात चहाचं आधण ठेवलं जातं गॅसवर.. उकळणा-या चहाचा सुगंध भिनत जातो शरीरभर आणि तू.. तू एनलार्ज होत जातेस मनाच्या कोप-यातून! मी पुन्हा मिटून ठेऊ पाहतो तुला पण कुठूनशी येते मंद वा-याची झुळूक आणि उधळून लावते माझा विचार..! मी उतरवून काढू पाहतो तुला शब्दातून पानापानावर.. पावसाची सर भिजवून टाकते तुला..! मी पुन्हा बेभान होतो आणि पुन्हा एक इच्छा अनावर होते..

तुझ्या सुरकुतलेल्या चेह-यावरून पाऊस निथळताना पहायचाय..!!

– स्वाती शुक्ल.

NO COMMENTS

LEAVE A REPLY