अवीट आचमन २..!!

3
2609

स्वरसागर सांस्कृतिक महोत्सव


अर्घ्य दूसरे

“आठवणींच्या गावी जाता,

अस्फुटसा तो हुंदका निमाला..

गाळलीस जी आसवे तू,

त्याचाच आज शेर झाला..”

आज पुन्हा एकदा कागद कोराच राहिला, बहुतांशी.. हातात पेन अन् कागदांचं भलं मोठं गुंडाळं असताना देखील.. मनात अनेकानेक विचार रुंजी घालत असतानाही काहीच का उतरत नाही माहितीये.. आपण आळवणी केलेली नसते शब्दांची आर्ततेने.. आजही तेच झालं.. निमित्त होतं.. मराठी गझलचा बेभान थरार अनुभवण्याचं..


सोबतीचा करार


स्वरसागर सांस्कृतिक महोत्सवाचा आजचा हा दुसरा दिवस.. कवि-गीतकार वैभव जोशी, संगीतकार आशिष मुजूमदार आणि गायक दत्तप्रसाद रानडे या त्रिवेणी संगमावर विसावून सोबतीचा करार चं १०३वं आचमन घेण्याचा आज उद्यमनगरीत छान योग जमून आला होता.. पुलवामा हल्ल्याचा उल्लेख करत, भारत भारत घोकले की भारतीय होतो आम्ही असं म्हणत वैभवजीं नी त्यांची राष्ट्रगीत ही कविता सादर करून कार्यक्रमाला सुरुवात केली..

वैभवजींच्या लेखणीतून उतरलेल्या शब्दांना आशिष मुजूमदारांनी अतिशय चपखल रितीने स्वरसुमनांच्या मालेत गुंफलेलं पहायला मिळतं.. आणि त्यावरील स्वरसाज म्हणजे दत्तप्रसाद रानडेंचा स्वर.. गझल, अभंग, कविता, मिसरा, शेर अश्या अनेकानेक रचना प्रकारांच्या सोबतीने उलगडणारा हा करार, उत्तरोत्तर अवीट होतच राहिला..

“आयुष्याला घाबरण्याचा स्वभाव नाही आई,

तुझ्या विना पण जगावयाचा सराव नाही आई..”

अशी आईला घातलेली आर्त साद.. आणि “ठाई ठाई विठाई..” च्या जयघोषाने.. साथीदारांच्या सोबतीने आणि रसिकांच्या साक्षीने या करारावर अंतिम स्वाक्षऱ्या झाल्या आणि मग तो करार रसिकांचाच होऊन गेला..

मंडळी, रंगमंचाच्या अंगा-अंगातून आज गझल अक्षरशः झिरपत होती.. त्याचेच काही थेंब तळहातावर घेऊन केलेलं आजचं हे एक आचमन..


शब्द सुरांचे सोबती


तीन दिशांना उगम पावले तीन अलौकिक ओघ

सरस्वतीने त्यांच्या भाळी लिहिले राजयोग

ललित कलांच्या महासंगमी योग्य जाहली पूर्ती

शतक उमटले दिगंत राहो अशीच त्यांची किर्ती..

मंडळी पु. ल. देशपांडे, ग. दि. माडगुळकर आणि सुधीर फडके या त्रयींचं हे जन्म शताब्दी वर्ष.. त्याचंच औचित्य साधून आयोजित केला गेलेला शब्द सुरांच्या भेटीचा एक सुरेल कार्यक्रम.. शब्द सुरांचे सोबती..

पुलं चे पुतणे, जयंत देशपांडे आणि त्यांच्या पत्नी दीपा देशपांडे यांनी भाईंच्या गत स्मृतिंना उजाळा देत दुसऱ्या सत्राची सुरुवात केली.. फक्त खाजगीतच माहित असतील अश्याच, काहिश्या मिश्किल अश्या आठवणींची पोतडी या निमित्ताने पहिल्यांदाच लोकांसमोर उलगडली गेली.. पहिल्या पावसानंतर येणाऱ्या मृदगंधाइतकाच हा स्मृतीगंधही खुळावून टाकणारा होता..

आणि त्यानंतर सुरू झाला.. शब्द सुरांचा खरा प्रवास.. ज्याचे सारथ्य करत होते श्रीधरजी फडके आणि आनंदजी माडगुळकर.. आज जुळून आलेला हा दृकश्राव्य अमृतयोग कानांना तृप्त करणारा होता..

लहानपणापासून जी गाणी ऐकतच आपण मोठे झालो आहोत, अशी बाबुजींची गाणी श्रीधरजी सादर करत होते.. एक से एक बहारदार गाण्यांनी मैफल अधिकाधिक खुलत होती.. आनंदजी माडगुळकर, गदिमांनी लिहिलेल्या काही गाण्यांच्या निर्मिती मागच्या कथा सांगत होते..

आजच्या कार्यक्रमात सादर झालेल्या गाण्यांमधे, एका बाजूला “चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे, तुझे गीत गाण्यासाठी सूर लागू दे रे..” इतकं निरागस निवेदन होतं.. तर दुसरीकडे “गीत ये न ते जुळून भंगल्या सुरांतुनी.. तोच चंद्रमा नभात..” अश्या शब्दांत दिलेला नम्र कबुली जबाब देखील होता..

मंडळी.. “देव चोरुन नेईल अशी कोणाची पुण्याई, देव देव्हाऱ्यात नाही..” असं म्हणत सुरू झालेला हा शब्द सुरांचा प्रवास.. वेदांनाही ज्याचा अंत कळला नाही अश्या पंढरीच्या कानड्या राजाचं निर्विकार रूप मूर्तात प्रकट होत होत पूर्णत्वास गेला..

उद्या भेटुयात..

या स्वरसागरातलं शेवटचं आचमन घ्यायला..

येताय ना..!

-डॉ. तुषार

Previous articleअवीट आचमन १..!!
Next articleअवीट आचमन ३..!!
Crammed of Spirituality... Loved to be surrounded by Positive Vibes... पाडगावकर, खांडेकर, दवणे, मतकरी, पुलं, वपु, चंगो; आणि अजून कित्येक... या व्यक्तिंनी जे दर्जेदार लिहिलं.. ते साहित्य वाचून, अनुभवून झपाटून गेला; 'शुभॠष्' या टोपण नावाने लिहीणारा एक स्वैर-लेखक... डॉ. तुषार प्रशांत पवार आणि जेव्हा त्याच्या सोबतीनं, त्याच्याच सारखे साहित्यवेडे जमले तेव्हा प्रत्यक्षात आली 'शब्दीप्ता Magazine' ची संकल्पना...

3 COMMENTS

  1. वाह! काय सुंदर मांडणी केली आहेस रे! खूपच छान. प्रत्यक्ष तिथे असूनही, तुझं वर्णन जास्त रुचतंय!

    • जिभेवर रेंगाळणाऱ्या रसापेक्षा.. नंतरचा अनुरस हेच खरं औषध..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here