Home इतर अवीट आचमन ३..!!

अवीट आचमन ३..!!

अवीट आचमन ३..!!

स्वरसागर सांस्कृतिक महोत्सव


अर्घ्य तीसरे

क्षितिजाच्या ओढीने सुरु झालेला हा स्वरसागराचा प्रवास.. अनेक स्थित्यन्तरं.. दूरदूर पर्यंत फक्त खळाळतं पाणी.. जसजसं आत जाल तसतसं खोलवर पोहोचलेलं.. निळ्याशार पाण्याचा डोह.. तसं पाहायला गेलं तर.. आयुष्याचं पण असंच काहीसं असतं नाही.. ओढ.. स्थित्यन्तरं.. खळाळता डोह.. सगळं तसंच.. पण विचार केला तरंच बरं का.. कारण त्या अथांगतेकडे नुसतं बघायला सुद्धा आपल्या आतल्या पाण्याची पातळी समतल असावी लागते.. नाहीतर मग भरती ओहोटी आलीच म्हणून समजा..

ताल वाद्य कचेरी


सुरंजन खंडाळकर या नव्या दमाच्या गायकाने गायलेल्या श्रीकृष्ण वंदनेवर शितल कोलवालकर यांनी कथ्थक सादर करून कार्यक्रमाला दमदार सुरुवात झाली.. पारंपरिक ताल वाद्य कचेरीला जुगलबंदीने सादर होणाऱ्या मृदुंगम् , तबला, कथ्थक अशा Melodic Rhythm ची फोडणी देऊन हा कार्यक्रम सादर केला जातो.. तबला हे साथिचं वाद्य असल्याने विजयजीं नी अनेक दिग्गज कलाकारांसोबत साथ संगत केली आहे.. आणि त्यातूनच समोर आली Melodic Rhythm ताल वाद्य कचेरी या कार्यक्रमाची संकल्पना.. ताल वाद्यांवर ज्यांचं विशेष प्रभुत्व आहे असे पद्मश्री विजयजी घाटे, दाक्षिणात्य धाटणीतल्या मृदुंगम् ला बोलकं करणारे पं. श्रीधरजी पार्थसारथी, हार्मोनियम च्या सुरावटींनी मैफलित जान आणनारे मिलिंदजी कुलकर्णी, पढंत सादर करणारे सागर पटोकार, युवा गायक सुरंजन खंडाळकर, आणि सुप्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना शीतल कोलवालकर.. अशा ताकदीच्या कलाकारांनी सजलेला हा कार्यक्रम उठान, पढंत, थाट, आमद, परण, पर्णश्रृंखला आणि कथ्थकचं भूषण पदन्यास असा कथा कहे सो कथक चा हा गोफ त्रितालात उत्तम रितीने बांधण्यात आलेला दिसत होता.. सागर पटोकारांच्या पढंतच्या बोलांवर थिरकणारी शितलजींची पाऊलं त्यांच्या प्रतिभेची ग्वाहीच देत होते.. श्रीमती शमा ताई भाटेंच्या सुरुवातीच्या फळीतल्या शिष्य गणांपैकी असलेल्या शितलजीं नी सुरंजनच्या स्वरांवर सादर केलेल्या बाजे रे मुरलिया या भैरवीने शेवटच्या टप्प्यात आलेला कार्यक्रम तबला मृदुंगम् आणि कथ्थक यांच्या जुगलबंदीने पूर्णत्वाला गेला..

स्वर ध्यास


मैफल होती सजलेली ती.. मोहर तू लावलीस महेशा.. सुरसंहार करीत गायलास तू.. म्हणूनी, सूर माझा सखा.!! तीन दिवस उगाचच घुटमळणाऱ्या सुरांना आज मिळाली मुभा.. चंद्र होण्याची.. आणि मग ते बरसत राहिले चांदणचुरा होऊन.. मैफलभर.. महोत्सवाच्या शेवटच्या सत्रात या महोत्सवाचे प्रमुख सल्लागार, श्री महेश काळे यांनी गायन सेवा सादर केली.. महेशजी मारुबिहाग नावाच्या अनवट प्रदेशात शास्त्रीय संगिताशी संपूर्णपणे अनभिज्ञ असलेल्या हर एक पांथस्थाला ‘गाऊ गुणन कैसो तुमरु’ असं म्हणत सुरामृत पाजत होते.. श्रुति भावेंच्या व्हायोलिन साथीने तर मैफिलीला एक वेगळाच रंग चढला होता.. ललित कलांमधली तरलता व्हायोलिन या वाद्यामधे ओतप्रोत भरलेली पाहायला मिळते.. इतर साथ संगतीला होते; राजीव तांबे, हार्मोनियम.. निखिल फाटक, तबला.. जेम्बे आणि पखावज, प्रसाद जोशी.. ड्रम्स, अभिजीत भदे.. किबोर्ड, अनय गाडगीळ.. आणि कार्यक्रमाचं खास आकर्षण ठरलेल्या गिटारवर, रितेश ओहोळ.. मंडळी, आजकाल रंगानुसार प्रत्येक फुलाचा वार आणि देव ठरलेला असतो.. खरंतर कोणतं फुल कोणाच्या चरणांवर वाहिलं जावं याला कसली आलियेत बंधनं.. ईश्वराची हर एक कलाकृती अंतिमतः त्याच्याच पायी समर्पण्यासाठी आसुसलेली असते.. तसंच काहीसं संगीता बद्दलही आहे.. उत्तम असणारी कोणतीही संगीत कलाकृती, अंतिमतः ईश्वराच्याच पायी समर्पण्यासाठी जन्म घेत असते.. आणि महेशजीं च्या Infusion या अभिजात संगीत अभिनवाच्या सोबतीने पोहोचवण्याच्या प्रयोगाने हेच साध्य केल्याचं दिसून येतं.. घेई छंद या शास्त्रीयच्या धाटणीत गायलेल्या नाट्यगीतानंतर साश्रू नयनांनी झालेला टाळ्यांचा गुंजाराव.. आणि हळू हळू एकेका वाद्याचं infusion झाल्यानंतर we will rock you म्हणत निनादून गेलेला आसमंत.. दोन्ही नोंदणीयच.. Infusion हा एक आगळा वेगळा प्रयोग.. हिन्दुस्तानी अभिजात शास्त्रीय संगीतात वापरल्या जाणाऱ्या वाद्यांचा, काहिश्या पाश्चात्य बनावटीच्या वाद्यांशी झालेला सुंदर मिलाफ यामध्ये अनुभवयला मिळतो.. महेशजीं च्या कार्यक्रमाची खासियत म्हणजे त्यांचं प्रेक्षकांना गाण्यात प्रत्यक्ष सामावून घेणं.. शास्त्रीयची सुरावट अतिशय तन्मयतेने गाणारे रसिक प्रेक्षक त्या नंतरच्या fusion मधे देखील ताल मिसळताना दिसत होते.. स्वरगंगेच्या काठावर ‘स्व’ अर्पण करून.. देहभान विसरून गाणारी महेशजीं ची मूर्ती पाहिली की त्यांचे गुरू पं अभिषेकी बुवांची आठवण आल्याशिवाय राहत नाही.. मन्मग्न.. ध्यानस्थ.. स्थितप्रज्ञ.. जिणे गंगौघाचे पाणी हे ज्यांनी पुरतं ओळखलं होतं असे अभिषेकी बुवा.. प्रकाश किंवा तिमीर असुदे.. वाट दिसो अथवा न दिसू दे.. गात पुढे मज जाणे.. इतक्या साध्या तत्त्वज्ञानाने चालणारे असे अभिषेकी बुवा.. “सुखाच्या क्षणात, व्यथांच्या घनात.. उभा पाठीशी एक अदृश्य हात..” महेशजीं च्या गाण्यातून पं. अभिषेकी बुवांचा तो अदृश्य हात.. तो वरदहस्त.. जाणवत होता.. महेश जी आज ज्या काही शिखरावर आहेत त्याचा पाया बुवांनी त्यांच्याकडून पक्का करवून घेतला आणि आज हा त्याचाच परिपाक.. तसं पाहायला गेलं तर त्यांना कुठेच पोहोचायचं नाहीये.. त्यांना आपलं हे अभिजात संगीत लोकांपर्यंत पोहोचवायचंय.. मंडळी, स्वरसागराच्या या प्रवासात मी तुमच्या पर्यंत काय पोहोचवू शकलो माहित नाही.. पण मला मात्र बरंच काही गवसलं.. निसटून चाललेलं असं.. सोडवून घेत असलेलं असं.. सुटलेलं असं.. स्वरसागरातल्या एकूण प्रवासातला हा विसावा महोत्सव खऱ्या अर्थी विसावा देऊन गेला.. महेश काळेंच्या सूर ध्यासाने तर हर एक रज-तमाचा रखवाला शुद्ध सत्वाच्या ओढीने गाठीशी असलेल्या अभिनवाच्या सोबतच पुन्हा एकदा शास्त्रीयच्या, अभिजात संगिताच्या शोधात निघेल यात शंकाच नाही.. पंडित भवानी शंकरजींनी मनाला प्राप्त करून दिलेली दोलायनं, आज खरंतर शांत होणं अपेक्षित होती.. पण महेश काळेंनी त्या गतीत थोडी भर टाकून ती दोलायमान अवस्था किमान पुढच्या स्वरसागर रपेटी पर्यंत टिकून राहिल याची काळजी घेतली.. आपण पुन्हा भेटुयात पुढच्या महोत्सवात अश्याच एखाद्या संगीत-स्वरसागरात मनसोक्त डुंबायला अथवा काही शिंतोडे उडवून घ्यायला.. तोपर्यंत ही दोलायनं टिकवून ठेवा.. अभिजात शास्त्रीय संगिताची कास सोडू नका.. आणि संगितावर असंच अखंड प्रेम करत रहा.. -डॉ. तुषार
Previous article अवीट आचमन २..!!
Next article स्वरसागर सांस्कृतिक महोत्सव २०२०
Crammed of Spirituality... Loved to be surrounded by Positive Vibes... पाडगावकर, खांडेकर, दवणे, मतकरी, पुलं, वपु, चंगो; आणि अजून कित्येक... या व्यक्तिंनी जे दर्जेदार लिहिलं.. ते साहित्य वाचून, अनुभवून झपाटून गेला; 'शुभॠष्' या टोपण नावाने लिहीणारा एक स्वैर-लेखक... डॉ. तुषार प्रशांत पवार आणि जेव्हा त्याच्या सोबतीनं, त्याच्याच सारखे साहित्यवेडे जमले तेव्हा प्रत्यक्षात आली 'शब्दीप्ता Magazine' ची संकल्पना...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version