स्वातंत्र्य पूर्वीच्या काळात ७ मार्च १९१३ या दिवशी सुमतिताईंचा जन्म झाला.. एका सर्वसामान्य कुटुंबात ज्या प्रमाणे एका मुलीला वाढवलं जातं त्याच प्रमाणे त्यांना वाढवलं गेलं.. त्यांच्या घरी कधीच मुलगा-मुलगी असा भेदभाव केला गेला नाही आणि त्यामुळेच कदाचित अतिशय चुणचुणीत अशी हि सुमति वैद्यकीय शिक्षण घेऊ शकली होती..
त्यांच्या कडे येणाऱ्या रुग्णांची रडगाणी ऐकून त्यांना बऱ्याचदा त्याचा त्रास व्हायचा.. पण मग त्यांच्या क्लिनिक मध्ये येणाऱ्या अनेकविध संस्कृतीच्या.. परंपरांच्या.. लोकांच्या चालण्या-बोलण्याच्या पद्धती.. त्यांचे काही घरगुती प्रॉब्लेम्स.. या सगळ्या गोष्टींचं भांडवल त्यांना या कथा कादंबऱ्या लिहिण्यासाठी पुरायचं.. असं त्या अगदी प्रांजळपणे कबुल करतात..
सुमतिताईंनी त्यांच्या प्रत्येक साहित्यामध्ये स्त्रीच्या मनाचे तरल भाव हळुवार पणे उलगडले आहेत.. मग ती एका कोडाच्या डागामुळे पतीकडून अव्हेरल्या गेलेल्या सुधाची कहाणी, महाश्वेता असो.. कि मुक्ताईच्या आयुष्यावर बेतलेली वादळवीज.. “दुसऱ्यासाठी जगणे हा स्त्रीचा नैसर्गिक पिंड आहे” असं म्हणणारी युगंधरा असो.. कि हिमालयाच्या कुशीत वसलेल्या विदेह देशाच्या राजधानी मिथिला नगरीच्या राजकुमारीची कहाणी, मैथिली..
त्यांची युगंधरा हि कादंबरी तर थेट अंतःकरणाला स्पर्श करून जाते.. या युगंधरेच्या माध्यमातून साऱ्या स्त्री जातीच्या मनीची भावना त्यांनी स्पष्ट केली असल्याचं जाणवतं.. हि युगंधरा खऱ्या अर्थाने सुशिक्षित आणि सुसंस्कृत आहे.. ती फुलाहून कोमल आहे आणि प्रसंगी वज्राहून कठीण देखील.. तिच्या आयुष्यात येणाऱ्या वादळांनी डगमगून न जाता ती धीराने त्यांचा सामना करते.. आयुष्यभर आपल्या हृदयात सात्विक अन् एकनिष्ठ मूक प्रीती जपणाऱ्या या युगंधरेची नानाविध रूपं यात दाखवली गेली आहेत..
त्यांची अत्यंत गाजलेली कादंबरी म्हणजे.. महाश्वेता.. लग्नानंतर शरीरावर आलेल्या कोडाच्या एका डागामुळे तिचा पती तिला दूर लोटतो.. आधीचं असलेलं ते निख्खळ प्रेम त्या एका दर्शनी भागात नसलेल्या डागाने कमी होतं.. आणि सुधा – माधवचा भरला संसार उध्वस्त होतो.. हे कथानक आपल्या रोजच्या आयुष्यात आढळणं तसं दुर्मिळच पण सुमतिताईंना त्यांच्या क्लिनिक मध्ये आलेल्या एका मुलीमुळे हि कथा लिहावीशी वाटली..
इनामदारांच्या धाकट्या सुनेला कोड झाल्याची माहिती सर्वदूर पसरते आणि मग हि सुधा घरातून चालू पडते आणि वाराणसीला जाऊन राहते.. काही काळ लोटल्यानंतर ती कायमचं तिथेच राहण्याचा निर्णय घेते.. आणि तश्यातच सुरेश तिला भेटतो.. मानवी मनाच्या चंचलतेचे नेमके वर्णन त्या करतात.. तिची ती भिरभिरी वृत्ती आणि कर्तव्य कि सुखविलास यातली द्विधा याचं वर्णन ताई अतिशय चोख करतात..
त्यांच्या याच विषयाशी साधर्म्य असणारी कादंबरी कन्नड मध्ये सुधा मूर्तींनी देखील लिहिली आहे.. मांडण्याचा विषय जरी एकाच असला.. तरी पद्धती दोघींचीही वेगवेगळी आहे..
सुमतिताईंनी अनेक साहित्य पुष्पं साकारली.. पण त्या तुलनेत त्यांना तितकीशी प्रसिद्धी मिळाली नाही.. प्रसिद्धीची हव त्यांना कधी नसायचीच मुळी.. त्या त्यांच्या लिखाणात व्यग्र असायच्या.. आपलं काम आपण नेहमी चोख करत राहायला पाहिजे.. मग त्याचं फळ हे उत्तम मिळ्तंच.. असं त्या नेहमी म्हणायच्या..
आपल्या वैद्यकीय व्यवसायातून सलग काही दिवस सुट्टी काढून लिहायला घेणं त्यांना जमत नसे.. किंबहुना त्यांचे रुग्ण त्यांना तसं करून देत नसत.. त्यानुळे जसा वेळ मिळेल तसं लिहायला बसणं हा एकमेव पर्याय त्यांच्या कडे असायचा.. आणि बऱ्याचदा त्या याच पर्यायाचा अवलंब करत असल्याचं जाणवायचं..
सुमतिताईंना काळाच्या पडद्याआड जाऊन आज’ कितीतरी वर्ष झाली.. पण त्यांनी निर्मिलेया या कलाकृतींच्या माध्यमातून त्या आजही जनसामान्यांच्या प्रश्नांना हाक घालतात..
-टिम शब्दीप्ता