कर्मयोगी- डॉ. बाबा आमटे

0
272

माणसाचं भलं व्हावं ही ईश्वराची इच्छा.. आणि त्यासाठीच तो आपले काही दूत पृथ्वीवर पाठवतो.. जे मानवधर्माची पताका खांद्यावर घेऊन माणूसपण जागवतात.. आणि त्यांचं कार्य झालं कि देह ठेऊन  पंचत्वात विलीन होतात.. आदरणीय डॉ. बाबा आमटे हे त्यांपैकीच एक.. समाजाने दूर लोटलेल्या कुष्ठरोग्यांवर प्रेमाची पाखर घालणारे.. त्यांच्यातला आत्मसन्मान जागवून, जगण्याची नवी उमेद निर्माण करणारे.. बाबा म्हणजेच मुरलीधर देविदास आमटे.. वर्धा जिल्ह्यातल्या हिंगणघाट मधे १९१४च्या २६ डिसेंबर चा जन्म.. घरी जमीनदारी, आणि एकूणच सुबत्ता असल्याने बालपण सुखात गेलं.. त्यांना लहानपणी शिकारीची.. आणि रेसर कार चालवण्याची आवड होती..

लहानपणी ते सर्व स्तरांतील मुलांमध्ये खेळायचे.. त्यांची समाजात समरस होण्याची हीच वृत्ती आपल्याला पुढेही अनुभवायला मिळाली.. आपण स्वतः डॉक्टर व्हावं आणि समाजाची सेवा करावी असं बाबांना वाटे.. पण वडिलांच्या आग्रहाखातर ते B.A. L.L.B. झाले.. काही दिवस वकिली सुद्धा केली.. (ती सुद्धा हरीजन आणि गरीब लोकांसाठीच) त्याकाळात कुष्ठ हा महाभयंकर रोग समजून कुष्ठरोग्यांना मरणापेक्षा भयाण व अस्पृश्यतेची वागणूक दिली जात असे.. अश्या रुग्णांची सेवा करण्याचे महाकठीण काम बाबांनी लीलया पेलले.. कारण त्यांच्याकडे असाध्य वाटणाऱ्या गोष्टींना सामोरे जाण्याची.. आव्हाने पेलण्याची शक्ती होती..

महारोगी सेवा समितीच्या माध्यमातून त्यांनी समाजातील सर्व स्तरातील व जाती-धर्मातील कुष्ठरोग्यांसाठी उपचार, प्रशिक्षण आणि पुनर्वसन याकरिता रुग्णालये व अन्य प्रकल्पांची स्थापना केली.. प्रचंड पाऊस.. दळणवळणाच्या साधनांची कमतरता.. जंगली श्वापदांचा सुळसुळाट.. मुलभूत गरजांचा अभाव.. आदिवासींचे अज्ञान-अंधश्रद्धा.. अश्या प्रतिकुल परिस्थितीतूनही धाडस, बुद्धीमत्ता, प्रचंड कष्ट करण्याची शारीरिक व मानसिक तयारी, संघटन कौशल्य, प्रेरणासातत्य, निश्चयी वृत्ती या सर्व गुणांच्या आधारावर बाबांनी आपले सर्व प्रकल्प यशस्वी केले.. या प्रकल्पांची पाहणी केली असता बोरकरांच्या पंक्ती आठवल्याशिवाय राहत नाहीत..

“देखणे ते हात.. ज्यांना निर्मितीचे डोहाळे..”

बाबांनी या पाच हजारांहून अधिक कुष्ठरोग्यांच्या निवासाला नाव दिले.. “आनंदवन” समाजाच्या उद्याच्या आनंदासाठी स्वतः मरण-यातना भोगून कुष्ठरोग्यांच्या आयुष्यात आनंदाचे माले त्यांनी फुलवले.. ते म्हणत.. “शृंखला पायी असुदे, मी गतीचे गीत गाई.. दुःख उधळायास आता आसवांना वेळ नाही..”

शांततेचा पावा घेऊन समतेचा सूर आळविणारे महात्मा गांधी.. त्यांच्या विचारांनी प्रभावित होऊन बाबांनी स्वातंत्र्य-प्राप्तीच्या चळवळीत स्वतःला झोकून दिले.. इ. स. १९४३ मधे ‘वंदे मातरम’ ची घोषणा दिल्याबद्दल त्यांना २१ दिवस तुरुंगवास सुद्धा झाला होता.. महात्मा गांधींच्या सत्य, नीती, अन् निर्भयतेवर आधारलेल्या विचारसरणीने प्रभावित होऊन दीन-दलितांच्या सेवेसाठी काम करायचा वसा त्यांनी घेतला..

१९४२ च्या सुमारास घडलेली घटना.. बाबा रेल्वेने निघाले होते.. रेल्वेत काही तरुण इंग्रज शिपाई एका नवविवाहितेची छेड काढताना दिसले.. तेव्हा बाबा पुढे आले आणि त्यांनी पुढचा-मागचा विचार न करता त्या शिपायाला मारण्यास सुरुवात केली.. आपापसांत कलह झाला.. तोपर्यंत रेल्वे वर्धा स्टेशनात आली होती.. खूप लोक जमा झाले होते.. शेवटी एका इंग्रज अधिकाऱ्याने चौकशीचे आदेश दिले.. तेव्हा त्या शिपायाला लोकांनी सोडलं.. धाडसी वृत्तीने एका स्त्री च्या चारित्र्य रक्षणासाठी केलेली ती धडपड गांधीजींना समजली तेव्हा त्यांनी बाबांना न्यायासाठी लढा देणारा निर्भीड योद्धा ‘अभय साधक’ असं संबोधलं.

प्रत्येक माणसाच्या आयुष्यात असा एखादा प्रसंग घडतो कि त्यामुळे त्याचं पूर्ण आयुष्यच बदलून जातं.. बाबांच्याही आयुष्यात तो क्षण आला..

रस्त्याच्या कडेला पावसात कुडकुडत भिजणारा एक कुष्ठरोगी त्यांना दिसला.. अन् बाबांचं मन हेलावलं.. समाजाच्या वेदना जाणण्यासाठी काळजात प्रेमाचा ओलावा असावा लागतो.. समोरच्याचं दुःख बघून स्वतःला सहृदयतेचा पाझर फुटावा लागतो.. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक संवेदनशील मन असावं लागतं.. बाबांकडं हे सगळं होतं.. म्हणूनच समाजाच्या वेदनेशी जवळीक साधून त्यांनी मानवतेशी मैत्री जोडली.. याच अर्थाने बाबा आमटे यांना ‘आधुनिक भारताचे संत’ म्हणून संबोधलं जातं..

बाबा राष्ट्रीय एकात्मतेचे कट्टर पुरस्कर्ते होते.. त्यांनी ‘भारत जोडो’ आंदोलनात आणि ‘नर्मदा बचाव’ आंदोलनात सक्रीय सहभाग घेतला होता.. बाबांना त्यांच्या अतुल्यनीय कार्य बद्दल त्यांना आजतागायत आंतरराष्ट्रीय ‘रॅमन मॅगसेसे’ पुरस्कार, संयुक्त राष्ट्राचा मानवी हक्क पुरस्कार, ग्लोबल ५०० पुरस्कार तसेच भारतीय पद्मविभूषण, पद्मश्री, गांधी शांतता पुरस्कार, महाराष्ट्र भूषण पुरस्कार अश्या अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे.. विश्वभारती तसेच नागपूर व पुणे विद्यापीठाने त्यांना डॉक्टरेट देऊन सन्मानित केलं आहे.. बाबा हे उत्तम कवि-साहित्यिक होते हे त्यांच्या ‘ज्वाला आणि फुले’ आणि उज्वल उद्यासाठी’ या काव्यसंग्रहांतून प्रतीत होतंच..

संपूर्ण आमटे कुटुंबातच समाजसेवेचं बीज दडलेलं होतं.. त्याला परिस्थितीने खत-पाणी घातलं आणि मग त्याचा वटवृक्ष होण्यासाठी त्यांच्या पत्नी साधनाताईंनी त्यांना नेहमीच मोलाची साथ दिली.. मुलगा डॉ. प्रकाश बाबा आमटे आणि स्नुषा डॉ. मंदाकिनी यांनी हेमलकसा लोकबिरादरी प्रकल्प यशस्वीपणे चालवला.. तर डॉ. विकास आणि डॉ. भारती आमटे यांनी आनंदवनाची जबाबदारी समर्थपणे पेलली.. बाबांची तिसरी पिढी सुद्धा हा दैवी वारसा पुढे नेण्यास सज्ज झाली आहे..

आमटे कुटुंबीयांनी मागास, अशिक्षित, शोषित आणि समाजाने दुर्लक्षिलेल्या घटकांना मुख्य प्रवाहात आणून त्यांच्या हाती स्ववलंबनाचं अस्त्र देऊन एक सामाजिक व्रत जोपासलं आहे.. या सर्वांना त्रिवार अभिवादन.

तपस्व्याप्रमाणे सेवा करूनही बाबांमध्ये अहंकाराचा लवलेशही नव्हता.. “साधी राहणी, उच्च विचारसरणी” या आदर्शाचे ते प्रतिक होते.. तुकोबा बुवा म्हणतात.. “ज्याचा अभिमान गेला, तो देव झाला” या अर्थाने ते देवस्वरूप होते..

काळ कुणासाठी थांबत नाही.. पण काळाच्या छाताडावर पाय देऊन कणखरपणे ताठ मानेने कसं जगायचं हे शिकवणारे बाबा कर्करोगाने ग्रस्त असल्याने ९फ़ेब्रुवारी २००८ ला कालवश झाले.. पण त्यांनी जागवलेला सामाजिक सेवेचा नंदादीप सोज्वळ प्रकाशाने व उज्वल विकासाने मानवी जीवन उजळवतो आहे.. आणि सेवा कार्यातून मानवधर्माचा संदेश देतो आहे.. आपण सर्वांनी संवेदनांचे शर आपापल्या भात्यात घालून समाजसेवेसाठी कृतीशील व्हावे.. हीच या कर्मयोगी महामानवास आदरांजली ठरेल

-डॉ. वर्षा खोत



LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here