कर्मयोगी- डॉ. नितू मांडके

0
258

डॉ. नितू मांडके यांचा जन्म.. प्रसिध्द गणिततज्ञ मांडके यांच्या घरचा.. मोठं एकत्र कुटूंब.. कडक शिस्तीचे वडील.. मायाळू आई.. नेहमीच सोबती असणारी भावंडं.. कर्तुत्ववान सहचारिणी.. आणि गुणसंपन्न मुलं.. असा सगळा गोतावळा.. हे त्याचं कुटूंब.. पण ते एवढ्याच वैयक्तिक कुटुंबाचा  भाग नव्हते.. तर कित्येक हृदयरोग्यांना जीवनदान देऊन त्यांच्याही कुटुंबांचा अविभाज्य घटक बनले.. जनसामान्यांचा आधार बनले..

असामान्य बुद्धीमत्ता लाभलेले डॉ. नितू, लहानपणापासूनच स्वावलंबनातून शिक्षण घेत असत.. स्वतःच्या बुद्धीकौशल्यावर त्यांनी बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे एम. बी. बी. एस. तर मुंबईला शल्यविशारद ही पदवी घेतली.. तीव्र महत्वाकांक्षा असणारी माणसं कधीही थांबत नाहीत.. मांडके पण नाही थांबले.. वयाच्या २५व्या वर्षी त्यांनी जगप्रसिध्द हृदयशल्यविशारद होण्याचे स्वप्न पहिले.. आणि बुद्धीमत्ता आणि अपर मेहनत यांच्या जोरावर ते स्वप्न सत्यात देखील उतरवले.. यामागे त्यांची जिद्द, कष्ट आणि अजोड शल्यकौशल्य होते.. विविध देशांत जाऊन तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी शस्त्रक्रियांचे ज्ञान आत्मसात केले.. आणि स्वतःला एक परिपूर्ण हृदयशल्यविशारद बनवले.. जागतिक पातळीवर विविध विषयांवर शोधनिबंध प्रसिध्द केले.. अंशुमन जरीवाला या लहान मुलावर तर अतिशय क्लिष्ट अशी हृदय-शस्त्रक्रिया करून अनेक जगद्विख्यात  आणि परदेशी डॉक्टरांनाही चकित करून सोडलं होतं..

क्रिकेटपटू मिलिंद रेगे, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांसारख्या जागतिक पातळीवर महत्वाच्या असणाऱ्या व्यक्तींची सुद्धा शस्त्रक्रिया करताना ते कधी डगमगले नाहीत.. त्यांच्या ३२ वर्षांच्या कारकीर्दीमध्ये तब्बल १२,००० हृदयरोग्यांना नवसंजीवनी देऊन ते Miruaculous Mandake ठरले..

डॉ. नितू त्यांच्या महत्वाकांक्षी, बिनधास्त, आणि तरीही संवेदनशील असणाऱ्या व्यक्तिमत्वामुळे सर्वांनाच हवेहवेसे वाटायचे.. त्यांच्या व्यक्तिमत्वाला अनेक कंगोरे होते.. कुशल विनोदबुद्धी, साधेपणा, सृजनशीलता, प्रामाणिकपणा, बंडखोरी, अश्या अनेक अंगांनी त्यांचं व्यक्तिमत्व बहरलं होतं.. निसर्गात रमायला त्यांना फार आवडायचं.. त्यांनी लिहिलेली निसर्ग-वर्णनं फार अप्रतिम आहेत.. त्यांची पत्र लिहिण्याची शैली सुद्धा वेगळीच होती.. ते अतिशय परखड, स्पष्टवक्तेपणे आणि विशेष म्हणजे अगदी  मोजक्या शब्दांमध्ये सवाल करायचे.. ते म्हणायचे.. “समाजाला कलंक असणाऱ्या काही मुठभर व्यक्तींमुळे आपण आपली जीवनशैली.. आपली मुल्ये का बदलावीत..?”

परदेशात राहूनही ते हजारो डॉलर्स कमवू शकले असते.. पण आपल्या ज्ञानाचा आणि कौशल्याचा उपयोग आपल्या देश-बांधवांना व्हावा म्हणून ते भारतात परत आले.. आणि स्वदेशाभिमानाचं व्रत जोपासलं.. ते म्हणत.. “स्वतःच्या स्वार्थाचा विचार न करता देश सुधारण्याची जबाबदारी प्रत्येकाने अंशतः जरी उचलली तरी भारताचं भवितव्य उज्वल होईल..”

भारतात आल्यानंतरही सर्जन म्हणून पाय रोवण्यापासून ते मेडीकल फौंडेशनचे भव्य स्वप्न साकारण्यापर्यंत त्यांना अनेक संघर्षांना सामोरे जावे लागले.. पण मांडके अपयशांनी खचून जाणारे नव्हते.. ते जिद्दीने आणि चिकाटीने सगळ्याला सामोरे गेले.. अनेकांचे जीवनदाते.. आधारस्तंभ बनले.. सर्वसामान्यांना हृदयरोगाचे उपचार माफक दरात मिळावेत म्हणून या समाजव्रती डॉक्टरने उभारलेल्या स्वप्नपूर्तीसाठी त्यांची पत्नी डॉ. अलका आणि त्यांची मुलं आजही अखंड कार्यरत आहेत..

कुणाचा जीव वाचवला की डॉ. मांडके म्हणायचे, “या सर्वाला मी निमित्तमात्र आहे.. सर्व करवून घेतो तो परमेश्वर..!!” परंतु परमेश्वराने मात्र या शापित देवदूताला.. अगदी अनपेक्षितरीत्या आपलसं केलं..!! अनेकांना मृत्यूच्या दाढेतून ओढून काढणारे जगद्विख्यात हृदयशल्यविशारद स्वतःच्या हृदयाचे रक्षण करण्यात असमर्थ ठरले.. सामाजिक जाणिवेचे यथायोग्य भान असणाऱ्या एका हृदयशल्यविशारदाचा शेवट हृदयविकाराच्या झटक्यानेच व्हावा..!!

एका अस्सल, प्रामाणिक, अन् कार्यकुशल डॉक्टर कलावंताची.. त्याच्या जिद्दीची, महत्वाकांक्षेची, प्रयासांची.. अकाली सांगता झाली.. एका सर्वसामान्य मराठी कुटुंबातून आलेल्या माणसाची गरुडझेप घेण्याची इच्छा.. आणि तिच्या पूर्णत्वासाठी केलेले भगीरथ प्रयत्न हे सर्वांनाच प्रेरणादायी ठरतील.. आणि आपल्या कर्मयोगातून अनेकांच्या हृदयात ते नित्य जागते राहतील यात तिळमात्रही शंका नाही..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here