Home Featured गीत माझ्या मनातले- येणार साजण माझा

गीत माझ्या मनातले- येणार साजण माझा

0
गीत माझ्या मनातले- येणार साजण माझा
ती आज खिडकीमध्ये बसली होती.. कसल्याशा विचारात मग्न होती.. तिच्या आयुष्यात मागे काही अशा घटना घडून गेल्या होत्या की लोक म्हणतील आयुष्य आहे की सिनेमा.. तिच्या डोळ्यासमोरून मागील काही दिवसात तिच्या बाबतीत घडलेला घटनाक्रम गेला..

तीन महिन्यांपूर्वी

सगळीकडे आनंदी आनंद होता.. नववधूच्या पेहरावात मानसी अगदी खुलून दिसत होती.. तिच्या चेहऱ्यावरूनच तिचा आनंद झळकत होता.. आनंद व्हायला पण का नको? आज तिचं लग्न होतं ते पण तिच्या बालपणापासूनच्या best friend कार्तिक बरोबर.. कार्तिक आणि ती लहानपणापासून शेजारी राहत होते.. अगदी एकमेकांचे जिवलग मित्र.. सगळ्यांना असं वाटायचं की यांचं एकमेकांवर प्रेम आहे त्यामुळे घरच्यांनी लगेच लग्नाचा तगादा लावला आणि त्यांचं लग्न जमलंसुद्धा.. मानसी चे आईबाबा खूप खुश होते. एकुलत्या एक मुलीचं लग्न होतं त्यामुळे आनंदी तर असणारच.. कार्तिकच्या घरी कार्तिक , त्याचे आईबाबा आणि करण, त्याचा लहान भाऊ राहत होता. त्याच्या वडिलांचा हॉटेल व्यवसाय होता पण कार्तिक ला आर्किटेक्चर मध्ये आवड असल्याने त्याने त्याचं प्रशिक्षण घेऊन नोकरी करायचं ठरवलं.. करण मात्र  जरा लाजराच होता त्यामुळे तो फारसा बोलायचा नाही.. तो वडिलांच्या मर्जीबाहेर नव्हता ते सांगायचे तसा तो वागायचा त्यांचा एकही शब्द तो खाली पडू द्यायचा नाही.. शेवटी तो management मध्ये पुढील शिक्षण घेण्यासाठी परदेशात गेला आणि परत येऊन वडिलांचा व्यवसाय सांभाळेन असं त्यांना वचन दिलं.. आज कार्तिक खास आपल्या भावाचं लग्न म्हणून परत आला होता. तश्या त्याच्या परीक्षा झाल्या होत्या पण निकाल अजून बाकी होता. शेवटी व्हायला नको तेच झालं. ऐन लग्नाच्या मुहूर्तावर कार्तिक कोणालाच सापडेना. सगळीकडे शेवटी शोधाशोध सुरू झाली. कार्तिक कुठेच सापडला नाही. शेवटी करणला त्याच्या खोलीत चिट्ठी मिळाली. तो जिथे नोकरी करत होता तिथल्या एका सहकारिणीवर त्याचं प्रेम होतं पण वडिलांनी थेट लग्न ठरवल्यामुळे तो काही बोलू शकला नाही आणि वडिलांच्या धाकामुळे घाबरला होता. खरंतर कार्तिक ने केला तो प्रचंड मूर्खपणा होता. त्याच्या वडिलांनी मानसी च्या घरच्यांची माफी मागितली. मानसी तर अगदी खिन्न होऊन बसली होती. मानसीचे वडील पण जागीच पडले. मानसीच्या आईनेसुद्धा हंबरडा फोडला. हा सगळा प्रकार चालू होता एका बंद खोलीत. बाहेर आलेल्या नातेवाईकांना हा काहीच प्रकार माहीत नव्हता. आता हे लग्न मोडलं तर सगळ्यांची प्रचंड नाचक्की होईल. शेवटी कार्तिकचे बाबा म्हणाले , “ हे बघा कार्तिक असा वागेल असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं पण आता जे झालं ते आपण बदलू शकत नाही यावर मला एक तोडगा दिसतोय.” सगळे त्यांच्याकडे आशेने पाहू लागले ,ते पुन्हा म्हणाले “ करण करेल मानसी सोबत लग्न. जर तुमची परवानगी असेल तर ” या वाक्यावर करण आणि मानसी तर एकदम अवाकच झाले कारण करण ने कधी असा विचारच केला नव्हता. तिच्याच काय कोणाच्याच बाबतीत. आपल्या लाजऱ्या स्वभावामुळे त्याच्या आयुष्यात जोडीदाराबद्दल संकल्पनाच नव्हत्या. पण मानसीच्या मनात संकल्पना होत्या पण त्या कार्तिक सोबत. अचानक आपल्या स्वप्नात येणारा चेहरा बदलावा. हा बदल कसा काय स्वीकारणार होती ती. शेवटी सगळ्या मोठ्यांनी या विचाराला सहमती दाखवली त्यामुळे नाईलाजाने का होईना पण बाबांना होणाऱ्या मनस्तापाचा विचार करून तिनेही होकार कळवला. मानसीने होकार कळवला पण करणचं तर म्हणणं पण ऐकलं गेलं नाही.. तसाही तो काही वडिलांच्या आज्ञेबाहेर नव्हता. शेवटी त्यांचं लग्न पार पडलं. शेवटी नको ते प्रश्न विचारले जाऊ लागलेच. मग करण पुढे येऊन म्हणाला आमचं प्रेम होतं म्हणून आमचं लग्न होत आहे. कार्तिक दादालासुद्धा हे मान्य आहे. पण त्याला काही emergency आल्यामुळे जावं लागलं. सगळी उत्तर देऊन थकलेला करण त्याच्या खोलीत आला आणि नेहमीप्रमाणे वावरू लागला. त्याने त्याचे कपडे काढायला सुरुवात केली कारण त्याला शेरवानीमध्ये खूप अवघडल्यासारखं झालं होतं. त्याला कल्पनाच नव्हती की मानसी असेल. थकल्यामुळे मानसीचा डोळा लागला होता पण खडबड जाणवल्यामुळे तिने डोळे उघडले. समोर करणला अशा अवस्थेत पाहून तिचा गैरसमज झाला. ती जवळजवळ ओरडलीच, “ करण हे बघ आपलं लग्न झालं म्हणजे लगेच तुला हक्क नाही मिळाला. तू जरा तरी माझ्या मनाचा विचार कर. तू असा माझ्यावर जबरदस्ती करू शकत नाहीस.मला नात स्वीकारायला वेळ लागेल.” करणला तर काहीच कळत नव्हतं. काय बोलावं तेच कळत नव्हतं. शेवटी कसतरी आवंढा गिळत तो म्हणाला, “ सॉरी …… मला कल्पना नव्हती तुम्ही इथे असाल याची …” कसबसं एवढं बोलून त्याने कपाटातून त्याचे कपडे घेतले आणि बदलून समोरच्या सोफ्यावर झोपला. मानसीला तर कळलंच नाही काय झालं ते. करणने आता वडिलांचा व्यवसायात लक्ष घातले. त्याचा निकाल यायला अजून वेळ होता. तो वडिलांचा व्यवसाय अगदी नीट सांभाळत होता. लहानपणापासूनच करण फार कमी बोलायचा पण त्यामुळे त्याचे कोणी फार मित्रही नव्हते. तो, त्याचा अभ्यास एवढंच काय ते जग त्या व्यक्तिरिक्त त्याला वाचायला खूप आवडायचं. त्याला जबाबदारीने काम करताना पाहून वडिलांना खूप आनंद व्हायचा. ते मायेने त्याच्या डोक्यावरून हात फिरवायचे. त्यांनासुद्धा कळत होतं की नुकतंच शिक्षण पूर्ण झालेलं करणचं आणि आपण त्याच्यावर दोन दोन जबाबदाऱ्या टाकल्या आणि दोन्ही तो समजूतदारपणे पार करत आहे. इकडे मानसीसुद्धा घरात रुळली होती. तसं ते घर तिच्यासाठी नवीन नव्हतंच. पण आता थोडेफार बदल झाले होते. पण ती व्यवस्थित सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळायची. करणच्या आईबाबांची खूप काळजी घ्यायची. घरातली सगळी कामे अगदी मन लावून करायची आणि कधी निवांत वेळ मिळाला की करणच कपाट भरलेलंच होतं पुस्तकांनी. करणला मात्र अजून तिने नीट स्वीकारलं नव्हतं. ती त्याच्याशी तुटकपणेच वागायची. करण तिची खूप काळजी घ्यायचा. तिला हवं नको ते सगळं पहायचा. तिला काय आवडतं काय नाही हे तो कधीकधी तिच्या आईवडिलांना विचारायचा. त्यामुळे दोन गोष्टी व्हायच्या, एकतर आपल्या मुलीचा संसार सुखाचा चालल्याचे समाधान त्यांना मिळायचे आणि दुसरं म्हणजे करणला मानसीला आनंदी पाहता यायचे. मानसीला ice-cream प्रचंड आवडायचं. तिला कधीही ice-creamची आठवण आली की तिला ते लागायचं म्हणून तिचे बाबा कायम ते ठेवायचं. करणसुद्धा तेव्हापासून फ्रीझ मध्ये ice-cream ठेवू लागला. पण नेमकं एकदिवशी ते संपलं. करणने पाहिलं की मानसी फ्रीज उघडून तसाच बंद करून हिरमुसलेला चेहरा घेऊन गेली. तो तेवढ्या रात्री बाहेर गेला आणि ice-cream घेऊन आला. गुपचूप जाऊन त्याने बेडजवळ ठेवलं. ती किचन मधील सगळं आवरून झोपयला आली आणि ice-cream पाहून खूप खुश झाली तिने अगदी लहान मुलासारखं ते संपवलं. नंतर तिच्या लक्षात आलं की हे त्यानेच आणलं असेल. म्हणून त्याच्याकडे पाहिलं तर तो सोफ्यावर अगदी निरागसपणे झोपला होता. पहिल्यांदा त्याच्याकडे पाहून ती विचार करू लागली. जशी या सगळ्यात आपली चूक नाहीये तशी याचीसुद्धा यात काहीच चूक नाही पण तरीही आपल्याला आनंदी ठेवण्यासाठी हा खूप काही करतो पण आपण साधी विचारपूसही करत नाही त्याची. ते काही नाही आतापासून आपण याच्याशी नीट वागायचं. निदान मैत्री करायला काय हरकत आहे. दुसऱ्या दिवशी ती सकाळी उठली आणि तिचं आवरून स्वयंपाकघरात जायला निघाली होती. तिने पाहिलं तर हा अजूनही झोपला होता. झोपेत तो खूप निरागस दिसत होता. एरव्ही रोज तो तिच्या आधी उठून जॉगिंग आणि व्यायाम करायला जायचा.. तीचं आवरून तिने नाश्ता बनवला की करण देखील नाश्त्याला हजर. मग महाशय नाश्ता करून कामावर हजर. पण आज हा एवढा वेळ कसा झोपला आहे. ती त्याला डिस्टर्ब न करता नाश्ता बनवायला गेली. नाश्ता झाल्यावर त्याला उठवावे म्हणून ती खोलीत गेली तर महाशय उठलेले होते आणि त्यांनी बॅग भरायला घेतलेली. “ हे काय , आज कामावर नाही जायचं का आणि बॅग का ? कुठे चालला आहेस तू ? ” मानसी ने विचारलं “ ते … ते… मी यु.एस. ला चाललोय तीनचार दिवसांसाठी …” करण म्हणाला “ काय ? का ? मला काही बोलला नाहीस तू ? ” तो यावर गप्पच झाला नंतर म्हणाला, “ ते माझा रिजल्ट लागला ना काल तर ते convocation आहे दोन दिवसांनी ” “ बरं मी तुझी बॅग भरते, तु जा नाश्ता करून घे आधी ” दुपारच्या विमानाने करण गेला. सगळी कामं आवरून मानसी जेव्हा खोलीत आली तेव्हा तिला खूप कसंतरी व्हायला लागलं होतं. आज तिला काहीतरी चुकल्या चुकल्यासारखं वाटत होतं. तिला झोपच लागत नव्हती शेवटी तिने पुस्तक वाचायचं ठरवलं. तिने एक पुस्तक काढलं अचानक त्यातून एक चावी पडली. तिने ती उचलली आणि परत ठेवताना तिला लक्षात आलं.. त्याच्या कपाटातल्या लॉकर ची चावी असणार हि.. तिने उत्सुकता म्हणून तो उघडला तर त्यात एक डायरी पाहिली. तिला आता राहवलं नाही. तिने ती वाचायला सुरुवात केली, जसजशी वाचत होती तसतसं तिच्या डोळ्यात पाणी येत होतं. ती डायरी करणची होती. त्यात त्याने लहानपणापासून मनात साठलेलं सर्वकाही लिहिलं होतं. लहानपणापासून करणच्या लाजऱ्या स्वभावामुळे तो फार बोलायचा नाही त्यामुळे त्याच्याशी कोणी मैत्री करत नसे. म्हणून मग तो एकटा पडत गेला. हळूहळू त्याला वाचनाची आवड निर्माण झाली. मग पुस्तकंच त्याचे मित्र झाले. त्याच्या दादाचे मित्रमैत्रिणी घरी यायचे तेव्हा यालाही असं वाटायचं की आपलेही मित्र यावेत पण त्याच्या वर्गातली मूलं चमू म्हणून त्याच्याशी कधी बोलायची नाहीत. याला कारण होतं त्याचं राहणीमान. त्याला fashionable राहता येत नव्हतं. तो अगदी चापूनचोपून तेल लावून नीट केसांचा भांग पाडायचा. साधेसुधे कपडे घालायचा आणि डोळ्यावर चष्मा असा साधा अवतार त्यामुळे कोणी मित्रच कधी झाले नाही त्याचे. मग त्यानेही तसंच राहणं पसंत केलं. तिने त्यांच्या लग्नाच्या दिवशीच पान काढलं , “ आज मला कार्तिक दादाचा खूप राग आलाय तो असा कसा वागू शकतो. आधी सांगितलं असत तर काय बिघडलं असतं. एका मुलीचं आयुष्य असं कसं टांगणीला तो लावू शकतो. त्यात घरच्यांनी कहर केला लगेच तिचं लग्न माझ्याशी ठरवलं? मला साधं विचारलंही नाही? तिने होकार दिला पण मला माहित आहे तिने मनापासून नाही म्हंटलय ते. एवढे दिवस त्याच्यासोबत संसाराची स्वप्न पहायची अचानक त्याच्या जागी दुसरंच कोणीतरी असेल ही कल्पनासुद्धा किती विचित्र आहे. पण माझं काय..? माझ्या तर कल्पना पण नाहीत संसाराबाबत ? कधी तशी वेळच आली नाही.. असो पण माझ्या मताला आधीपासून फार कोणी विचारात घेतलं नाहीच म्हणा.. त्यामुळे आता तिच्या कल्पना पूर्ण करण्याचा प्रयत्न करूयात.. लग्नाच्या दिवशी जेवण आटोपल्यावर सगळ्यांच्या नजरा चुकवून तो कोपऱ्यात बसून तो काहीतरी लिहत असल्याचं तिच्या मैत्रिणींनी तिला सांगितलेलं ते हेच असावं असं तिला वाटलं. तिची नजर पुढच्या पानावर गेली , “ अरे बापरे …! हे काय घडलं ! सकाळपासून लग्नाची दगदग भावाचं लग्न म्हणून सगळी कामं मीच केली अन ऐन मुहूर्तावर मलाच बोहोल्यावर चढवलं गेलं..!! दमलेलो त्यात ह्या कपड्यांमध्ये अवडघडलेपण म्हणून तडक खोलीत निघून गेलो आणि आधी कपडे काढायला सुरुवात केली. मला काय माहीत त्या तिथे असतील. त्यांचा गैरसमज झाला माझ्या बाबतीत. करण तू पण ना एक नंबरचा मूर्ख आहेस. मुलगी समोर आली की बोबडी वळते तुझी. त्यांच्यासमोर पण तेच झालं. किती गैरसमज झाला असेल त्यांचा. काय बोलल्या ऐकलंस ना ? त्यांना समजवायला हवं होतं तू की हे लग्न म्हणजे तुझ्यासाठी पण अनपेक्षित धक्का आहे. जसं त्यांना हे नातं स्वीकारायला वेळ हवाय तसं तुलाही वेळ लागेल. ” तिच्या डोळ्यांत नकळत पाणी तरळलं.. किती चुकीचा समज करून घेतला होता आपण त्याच्याबद्दल, पण पुढच्याच वाक्यावर तिच्या चेहऱ्यावर हसू आलं, “असो प्रकरण अवघड दिसतंय, सांभाळून रहा बाबा करण आता आयुष्यभर झेलायचं आहे” तशी ती मनातच म्हणाली, “आयुष्यभर नाही पुढील सात जन्म ” शेवटी पुढे ती वाचत गेली तसं तिला कळायला लागलं की करण तिच्या प्रेमात पडत गेला होता पण  स्वभावामुळे सांगायला घाबरत होता. तो कसं तिच्या बाबांकडे तिच्या आवडीबद्दल चौकशी करायचा आणि त्या गोष्टी करून तिला आनंदी करायचा हे सगळं वाचून तिला हसू येत होतं. पहाट झाली तेव्हा ती शेवटच्या पानावर येऊन पोहोचली , “ आज माझा निकाल लागला. कोणाला सांगू काही कळतच नव्हतं.. आई असती तर मायेने गोंजारून मला दहीसाखर भरवत डोक्यावर हात ठेवून म्हणाली असती असाच मोठा हो..! पण तीही गेली आहे तीर्थयात्रेला. बाबांना तर काय माझ्या अभ्यासातल्या प्रगतीबद्दल फार कौतुक नाहीये. दादाला तर काय त्याला वाटायचं की मी हुशार आहे तर सायन्स घेऊन काहीतरी करावं पण मी कॉमर्स घेतल्यापासून तोही माझ्या रिजल्ट बद्दल कधी उत्सुकता दाखवायचा नाही त्याला कॉमर्स तुच्छतेच वाटायचं. माझी आवड कधी त्याला कळलीच नाही. आणि आता तर तो सांगायला इथे आहे तरी कुठे ? मानसीला सांगायला आमच्यात संवाद होतो तरी कुठे होतो.? तिला तसही माझ्या कोणत्याच गोष्टीत रस नाही..! पण जाऊदे नकळत का होईना आपण आनंद साजरा तर केला. नेमकी आजच मानसीला ice-cream खायची इच्छा झाली पण ते संपलं होतं. त्यामुळे मीही निकालाची पार्टी म्हणून ते आणायला बाहेर पडलो. खूप शोधावं लागलं पण मिळालंच शेवटी. तिला खरंतर सांगायचं होतं की मला उद्याच जायचं आहे पण नको ती आता दमून येईल पुन्हा माझी पॅकिंग करायला घेईल. आपल्या कर्तव्यात कुठे कसूर ठेवत नाही त्यामुळे उगाच तिला त्रास नको, उद्या सकाळी आवरेन मी तेव्हा सांगेन तिला” तिच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहायला लागले होते. एवढे दिवस नकळतपणे त्याने सगळ्या गोष्टी समजून घेतल्या होत्या. पण स्वतःच्या एकटेपणाबद्दल एकदाही तक्रार केली नव्हती.. हसत सगळ्या गोष्टींचा स्वीकार केला होता.. काहीही न बोलता. एकही शब्द न बोलता आपल्या वागण्यातून त्याने त्याचं प्रेम व्यक्त केलं होतं…! खरंतर आपणच ते समजायला कुठेतरी कमी पडलो अस तिला वाटू लागलं. आता तिला एक क्षणही त्याच्यापासून दुरावा सहन होत नव्हता कधी एकदा तो येतो असं झालं होतं.

आजचा दिवस..

आज तो परत येणार होता..! ती खिडकीत बसली होती.. सगळा घटनाक्रम आठवून झाला होता. तिचे डोळे त्याच्या वाटेकडे लागलेले. या डोळ्यांमध्ये याआधी इतकी आतुरता कधीही आणि कोणासाठीही नव्हती. मागे रेडिओवरचं गाणं तिच्या मनातली अवस्था अगदी यथोचित शब्दात मांडत होतं.. वाट पाहते मी ग.. येणार साजण माझा..!! -सार्थक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version