Home मराठी शब्दीप्ता of the issue- कवी ग्रेस

शब्दीप्ता of the issue- कवी ग्रेस

शब्दीप्ता of the issue- कवी ग्रेस
तार्कीकाच्या हातात सहजासहजी गवसत नाही म्हणूनच तर कवितेचे अवगुंठन अधिक अनवट असते.. अलवार असते.. आणि ते हळुवार जपले की इवल्या बीजाएवढे शब्द विस्तीर्ण पसरलेल्या वटवृक्षाएवढे संदर्भ उधळून देतात.. ज्याला जी हवी ती पारंबी धरावी आणि स्वैर झुलावे.. कवीचे संदर्भ तर सरळ सरळ त्या इवल्या बीजातच दडलेले असतात.. मन आणि जगाचा सततचा अंतर्बाह्य संघर्षच त्याच्या आयुष्याच्या संदर्भांची कालपरत्वे उगवण करीत असतो.. ग्रेस यांच्या कविता मला काळोख्या निद्रिस्त आकाशात मंदपिवळ्या, आळसावलेल्या लुकलुकणाऱ्या ताऱ्यासारख्या वाटतात.. जडशीळ भूमीवर अंग पसरून अगदी कुणालाही त्या लुकलुकणाऱ्या कवितांकडे एकटक पाहत रहावसं वाटेल.. कित्येक प्रकाशवर्ष दूर असलेल्या आपणाला त्या ताऱ्याची भव्यता, तेजस्विता मात्र पूर्णांशाने कधीच कळणार नाही.. तो तारा प्रकाशमान आहे एवढे कळेल पण त्याचा प्रकाश कदाचित आपल्याला मिळणारच नाही.. त्याच्या प्रकाशी असण्याचे सुख मिळेल पण त्याच्या प्रकाशाचे सुख मात्र मिळणार नाही.. मानवी मन अस्वस्थ करायला एवढी गोष्ट पुरेशी आहे.. नाही का..? माणसाच्या आयुष्यात संधिप्रकाशाला फार महत्व आहे. पहाटेच्या संधिप्रकाशावर प्रकाशाचा प्रभाव जास्त असल्याकारणाने दिवस उजाडतो तर संध्याकाळच्या संधिप्रकाशावर अंधाराचा प्रभाव असल्याने रात्र होते.. ग्रेस यांच्या कविता या संधिप्रकाशातीलच आहेत मात्र हा संधिप्रकाश पारलौकीकाच्या पहाटेचा आणि लौकिकाच्या संध्येचा दोन्हींचाही आहे.. जोपर्यंत मानवी इंद्रिये आणि संवेदना एका विशिष्ट परिघाच्या मर्यादेत विहार करतात तोपर्यंत दुर्बोधतेचा शिक्का कुणावरही मारण्यात काहीही हाशील नसते.. फक्त इंद्रियगोचर जगच खरे मानायचे झाल्यास सौंदर्याला शारिरी अस्तित्वाचा आसरा घेऊन अमुर्तापासून दूर पळावे लागेल.. तेव्हा संत एकनाथांचा पुस्तक वाचणारा खोकड, कणिक कांडणारा सरडा आणि बाभळीच्या खोडात कोटे करणारा मासा ह्या उपमा हास्यास्पद ठरतील.. नाथांची शिंगी व्यालेली मुंगी किंवा मुक्ताबाईंची घार व्यालेली माशी या लाक्षणिक उपमा वैद्यकीय ठोकताळ्यांच्या आधाराने पाहू गेल्यास हास्यास्पद ठरतील.. वास्तविक कवी आणि त्याची कविता एकमेकांपासून कणसूरही वेगळे नसतात. शब्दांना कधी फुटले कोंब तेज फाकले आगळे कवी अन् त्याच्या भावना कणसूर नाही वेगळे.. यानुसार; तसेच अलौकिक नवोन्मेषशाली प्रतिभेचे संतकवी श्री ज्ञानेश्वर माउली ज्याप्रमाणे शब्दांचे व्यापकपण असाधारण आहे हे सत्य अधोरेखित करतात त्याप्रमाणे कवितेचे आकलन हे रसिकांना आपल्या बुद्धीप्रमाणेच होत असते हे खरे आहे.. म्हणून जोपर्यंत ही बुद्धी कवीच्या बौद्धिक प्रतिभेशी मिलन करीत नाही तोपर्यंत कवीला अभिप्रेत असणारा कवितेचा जन्म समजून येत नाही. अशक्य असूनसुद्धा समजा कवितेचा जन्म समजला, तरीसुद्धा तिचे पूर्णांशाने रसग्रहण करणे शक्य नाही.. कवितेचा जन्म समजणे म्हणजे मानवी शरीररचना समजणे असे मी मानतो.. अमुक एका व्यक्तीची शरीररचना समजून घ्यायला मी त्याची चिरफाड केली तर मला त्याची शरीररचना कळेल पण ती व्यक्ती माणूस म्हणून कशी आहे हे मला कधीही समजणार नाही.. कवितेचेही तसेच आहे. कविता हृदयानेच समजून घ्यावी आणि हृदयातच सामावून घ्यावी. भले कवीची मूळ अभिव्यक्ती आपल्याला कळणार नाही पण आपल्याला कविता भावल्याचे समाधान तरी नक्की मिळेल.. ग्रेस यांची कविता कुठल्या “काळा”शी सुसंगत असेल तर ती संध्याकाळाशी..!! मानवी आयुष्याची सकाळ जगण्याशी तर संध्याकाळ जीवनाशी हितगुज करते.. संध्याकाळी पूर्ण काळोखही झालेला नसतो आणि  बाहेरचे जगही अस्फुटसे दिसत असते. आत्मप्रौढी आणि आत्मपरीक्षण यामधल्या धूसर रेषा हळुवार फुंकर घालून सांभाळताना कवीमन या दोन मर्यादांच्या हिंदोळ्यांवर स्वैर झुलायचा प्रयत्न करते तेव्हा अशा शब्दकळेचा भावगंधी मोहर सांजेला साज चढवायचा प्रयत्न करतो.. या शब्दकळेचे संदर्भ; कवीचा आयुष्याशी असणारा संघर्ष समजून घेतला तर पुरेसे बोलके ठरतात.. मात्र ज्या कवीला आयुष्याचाच संदर्भ शोधायचा असतो त्यांचे काव्य मात्र कुठल्याच विशिष्ट ठोकताळ्यात स्वत:ला सामावून घेत नाही तर प्रगल्भ होत जाणाऱ्या जीवननिष्ठेसोबत ते काव्यच संदर्भाला पूर्णत्व देत असते.. -नितीन कळंबे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version