Home Featured साधना विवेकाची

साधना विवेकाची

साधना विवेकाची
आयुष्य जगत असताना काही वेळा अपयश येते, चुका घडतात, पश्चाताप होतो, दुःख होते , हे सर्व घडून गेले नंतर, त्यांची जेव्हा आपण कारणीमीमांसा  करायला लागतो , तेव्हा आपण यांमध्ये काय चुकीचे घडले, काय बरोबर होते, असे केले असते तर बरे झाले असते, तसे न केल्याने चुकले असे तर्क मांडतो. आयुष्यात जेव्हा आपण यश मिळवतो, त्यांनतर सिंहावलोकन केल्यास लक्षात येते की, हे काम आपण  योग्य मार्गाने, मेहनतीने, प्रामाणिकपणाने, किंवा आणखी काही कारणांनी केल्याने यशस्वी झाले. हा जो आपण योग्य-अयोग्य, बरोबर-चूक, सत्य-असत्य, श्रेष्ठ- कनिष्ठ, कायमस्वरूपी-तात्पुरता याचा सारासार विचार करतो, त्यांस विवेक असे म्हटले आहे. याच विवेकरूपी शिडेवर आरूढ होऊन यश-अपयशाच्या  लाटांना सामोरे गेले पाहिजे. विवेक शब्दाचा अर्थ आहे, वेगळे करणे किंवा पृथ्थकरण करणे. बुद्धी निश्चय करणारी असते, तिच्याकडे निश्चिती करण्याचे जे विलक्षण सामर्थ्य असते त्यास विवेक म्हटले आहे. म्हणूनच ज्ञान मिळवण्याचे व त्याद्वारे आचरण करण्याचे महत्वाचे साधन विवेक हेच होय. अध्यात्म शास्त्रात आत्मज्ञान प्राप्तीसाठी सांगितलेल्या साधन चतुष्टय संपत्ति मध्ये विवेक अग्र्यस्थानी आहे.
मी अविवेकाची काजळी। फेडोनि विवेकदीप उजळी।

तै योगियां पाहे दिवाळी। निरंतर।।
लोकांच्या ज्ञानावर आलेल्या अविवेकाची, अविचारांची काजळी दूर करून, विवेकी विचारांचा दीप प्रज्वलित करणे, हे ईश्वरीय अवताराचे एक महत्वाचे कार्य असल्याचे श्री ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. लहानपणापासून आपण ज्या वातावरणात – संस्कारात वाढतो, ज्यांचे सोबत राहतो, विशेषत्वाने त्या पद्धतीने आपली विचार करण्याची पद्धती तयार होत जाते. आई-वडील, शिक्षक, गुरू, हितचिंतक, मित्र परिवार यांच्या विचारांचा, वागण्याचा बराच प्रभाव आपल्यावर होतो. टेलिव्हिजन, सोशल मीडिया, पुस्तके यांचा सान्निध्याचा परिणाम आपल्या विचार प्रक्रियेवर होतो.समाजात वावरत असताना विविध व्यक्तींचा संबंध येतो, वेगवेगळ्या चांगल्या – वाईट प्रसंगांना सामोरे जावे लागते. या सर्वांच्या अनुभवातून आपण आपले विचार किंवा मते तयार करण्याचा प्रयत्न करीत असतो. या विचारांतून, अनुभवांतून आपली जगण्याची पद्धती ठरवत असतो. हीच ती वेळ असते जेव्हा आपल्या विवेकबुद्धी ची कसोटी लागते. आयुष्यात आलेले अहितकर व्यक्तीविचार व घटना  आपणास अयोग्य काय ते शिकवतात आणि हितकर व्यक्तिविचार व घटना योग्य काय ते शिकवत असतात. यांपैकी योग्य ते अंगिकरण्याचे व अयोग्य ते नाकारण्याचे धैर्य आपल्या ठायी आणल्यास आपण विवेकाने वागायला लागू. कोणतीही एखादी गोष्ट पिढ्यानपिढ्या चालत आली आहे किंवा कोणी वडीलधाऱ्या व्यक्तीने सांगितली आहे म्हणून ती आहे तशी , कोणतीही चिकित्सा न करता  अंधत्वाने  स्वीकारणे चुकीचे ठरेल. डोळस विवेकाने – स्व बुद्धीने तपासून नंतरच अंमलात आणायला हवी. वर्षानुवर्षे नळीवर बसल्यामुळे आपणांस पंख आहेत हेच विसरणाऱ्या पोपटासारखी आपली अवस्था व्हायला नको. आपल्यात स्वभावतःच असणाऱ्या सद्गुण व दुर्गुणांची ओळख स्वतः करून घ्यायला हवी. सत्य, प्रेम, संयम, सेवा, दया, शांती, क्षमा, दानत, ऋजुता, आर्जव, माणुसकी, इतरांचे चांगले करणे – चिंतने, अहिंसा असे सर्व सद्गुण. अहंकार, दंभ, लोभ, मोह, मत्सर, राग,तिरस्कार, शंका असे सर्व दुर्गुण. आपण एखादा विचार किंवा कृती करतो त्यावेळी या गुणांपैकी कोणी ना कोणी आपले सोबत असते. पण याची जाणीव प्रत्यक्ष त्यावेळी होईल च असे नाही. याच ठिकाणी आपला विवेक जागृत ठेवून या सर्व सदगुणांचा जाणीव पूर्वक अवलंब व दुर्गुणांचा निःसंग करता यायला हवा.
"सारासार विचार करा उठाऊठी।"
असे जगद्गुरू संत तुकोबाराय म्हणतात. सतत सावधपणे विवेकबुद्धी जागृत ठेवल्यास आपल्याकडून योग्य, सत्य, कायमस्वरूपी टिकणारे असेच कर्म घडू शकेल. ज्यामुळे चुकांपासून बव्हंशी दूर राहता येईल. नकारात्मकता दूर ठेवून स्वतः ला अधिकाधिक उन्नत करता येईल. विवेकी वृत्ती ही आयुष्य आनंदाने जगायला शिकवणारी आहे. ती प्रत्येक क्षणी आपल्या सोबत आहे. सातत्याने विवेकशील राहता आले तर स्वतः ला व इतरांना आनंदी ठेवणे शक्य आहे. नीर-क्षीर वेगळे करण्याचे सामर्थ्य राजहंसामध्ये असते, शुद्ध सोने पारखण्यासाठी त्यातील किडाळ दूर करावे लागते. त्याचप्रमाणे आपल्यातील दुर्गुण- वाईट प्रवृत्ती टाकून दिल्या तर सद्गुणांवर प्रकाश पडेल व सद्गुण- सत्कर्म अंगिकारले तर दुर्गुण आपोआप नष्ट होतील. आपल्यामध्ये आणि सभोवताली असणाऱ्या सत-दुः कर्मगुण, विधीत-निषेधित, श्रेयस- प्रेयस यांना ओळखून ते वेगळे करण्याऱ्या आणि सत ते रुजवणाऱ्या विवेकरूपी औषधी चे सेवन करण्याचे सामर्थ्य प्रत्येकामध्ये येऊ दे, विवेकाच्या साधनेने हा मोहाचा महारोग फिटु दे. शास्त्राभ्यास, ग्रंथ, गुरूवचन, संतपुरुषांच्या मार्गावर मार्गस्थ राहून प्रत्येकास विवेकदृष्टी प्राप्त होऊ दे. प्रत्येकाच्या हृदयात विवेक ज्ञानाचा उदय होऊन सर्वाना आनंद प्राप्ती होऊ दे हीच पांडुरंग चरणी प्रार्थना!! रोजच्या आयुष्यात अनेक लहान मोठे प्रसंग घडतात, सुख- दुःख येतात, अशावेळी विवेकाची साधना करून जगणे आनंदी कसे करता येईल, यासंबंधित विचारविमर्श आपण या स्तंभात करणार आहोत.
दया-स्नेह-मानवतादी अंगीकारावे

लोभ-मोह-अहंतादी सांडावे

सत-दुः कर्मगुणांचा भेद जाणावे

नीर-क्षीर ते राजहंसी निवडावे

साधनेने विवेकाच्या

हे जग आनंदी भरावे।।
-वर्षा खोत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version