शब्दीप्ता Aug’2016

संपादकीय..!!!

Feel The Content… But Ask For More..!!! हे ब्रीद वाक्य घेऊन, अनेक आघाडीच्या दैनिक, पाक्षिक, तसेच मासिकांच्या स्पर्धेत… आम्ही आपल्या सेवेत हजर झालो आहोत; शब्दीप्ता Magazine च्या माध्यमातून… शब्दीप्ता म्हणजेच… शब्दांना दीप्त करणे.. स्वत:च्या लेखणीने शब्दांना दीप्त करुन साहित्य निर्मिती करणा-या अवलियांचा सन्मान करणे; हा आमचा प्रमुख उद्देश, आणि याच उद्देशास सफल करण्यात आमची साथ देत आहेत.. महाराष्ट्रातील तरुण लेखक-लेखिका..

शब्दीप्ता हे एक eMagazine आहे… यात मराठी आणि English अश्या द्विभाषी साहित्याचा समावेश असेल… दर महिन्यातील संकष्टी चतुर्थी च्या दिवशी नवीन अंक प्रकाशित केला जाईल… ज्यात असेल, तुमच्या विचारांना प्रगल्भ करण्याच्या दृष्टिने उपयोगी खाद्य, विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या मुलाखती, आणि विविध विषयांवरील चिंतनात्मक लेखन, तरुण लेखक-लेखिकांच्या नजरेतून..

पदार्पणातंच आम्ही आपल्या इच्छा, अपेक्षांची पुर्ती करण्याचं उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून आहोत.. या सहा महिन्यांच्या कालावधीमध्ये आम्ही सरासरी २५०० हून अधिक लोकांच्या पसंतीस उतरलो आहोत.. मी याचं श्रेय; मला वेळोवेळी मदत करणाऱ्या आणि माझ्यावर विश्वास दाखवलेल्या आपणा सर्व वाचकांना देऊ इच्छितो..

असंख्य दिग्गज लेखक-कवींनी मराठी भाषा आणि आपणा रसिकांच्या दरम्यान सेतू बांधण्याचं मोलाचं काम केलं आहे आणि याच कार्यात आम्हीही अगदी खारीचा वाटा उचलण्याचं व्रत घेऊन आहोत.. प्रतिभावान लेखक-कवीचं साहित्य वाचून, अनुभवून आमच्या शब्दांना उजळवून आपणासमोर सादर करीत आहोत..

प्रत्येक अंकागणिक आम्ही काही सदरांचा अंतर्भाव नव्याने करीत असतो.. या अंकात देखील अमृता पाटील या माझ्या गुणी मैत्रिणीचं एक नवं कोरं सदर “खाण्यासाठी जन्म आपूला..” सुरु करीत आहोत.. मागल्या अंकात तुमच्या मनात याबद्दलची पार्श्वभूमी तर तयार झालीच असेल.. बघा वाचून.. जुळतायत का संदर्भ..

अश्यातच नव्याने अंतर्भूत केलेलं “चार पावसाळे अधिक..” हे सदर आपल्या पसंतीस उतरल्याचं आपण कळवत आहात.. या अंकात देखील विचार करायला लावणारा एक साधा.. पण महत्वपूर्ण विषय हाताळलाय.. शब्दीप्ताच्या टीम मध्ये आम्हा युवा लेखक-लेखिकांच्या बरोबरीनेच अधिक अनुभवी लेखकांना समाविष्ट करण्यामागचा उद्देश सफल होताना दिसतोय..

संतसाहित्याचा अविरत अभ्यास करणाऱ्या रोहन उपळेकर याने स्मरण या सदरासाठी केलेलं चिंतनात्मक लेखन या अंकात देत आहोत.. आपल्याला मिळालेलं स्वतंत्र्य हा अनेक बलीदानांचा परिपाक आहे.. आणि ते टिकवून ठेवणं हे आपलं कर्तव्य.. या गोष्टी नेहमीच ध्यानात घायला हव्यात असं तो म्हणतो..

कोट्यावधी जनतेच्या मनातली वर्षानुवर्षे चिकटलेली अंधश्रद्धेची वटवाघुळं दूर करत ज्ञान, विज्ञान, आणि विवेकाचा उजेड पसरवून विवेकी जाणिवा समृद्ध करणारा विज्ञाननिष्ठ विवेकवादी.. पुरोगामित्वाचं समर्पित नेतृत्व.. आणि समाजाच्या समता, मानवतेसाठी अंधश्रद्धेविरुद्ध उभा ठाकलेल्या या शापित देवदूताला या अंकात श्रद्धांजली वाहण्यात आली आहे..

तसेच अमेय नाडकर्णी आणि त्याच्या काही मित्रांनी ‘ONE’या नावाची एक सेवाभावी संस्था स्थापन करून अनेकविध सामाजिक उपक्रम त्याद्वारे घेतले आहेत.. त्याच बद्दल शब्दीप्ता च्या टीम ने त्यांच्याशी केलेली बातचीत.. आणि त्यांच्या या ‘Organization for Nature and Elderly’ बरोबर त्यांच्या कार्यात समाविष्ट होण्यासाठी त्यांचा संपर्क क्रमांक ही देत आहोत..

उर्दूतलं प्रचंड शब्दभांडार ज्यांच्या प्रतिभेने आपल्या सारख्या सामान्य जणांसाठी खुलं झालं त्या गुलजार साहेबांची प्रगल्भता आणि अल्प शब्दांमधून गहन अर्थ सांगण्याची अनोखी शैलीच त्यांच्या कवितांची शान आहे.. खरंतर त्यांच्या लेखन साहित्याला कुठलंही विशेषण देणं मूर्खपणाचं ठरेल.. पण ‘अद्भुत’ हा शब्द वापरून हा मूर्खपणा मी करू इच्छितो..!! अतिशय प्रतिभासंपन्न लेखणी.. ‘पेना’ला असणारी ‘शीला’ची जोड.. आणि खर्जात लागणारा आवाज या स्वर्गानुभूतीच्या ईश्वरीय देणग्या लाभलेला एक कविमनाचा माणूस गुलजार जी.. यांच्याबद्दल या अंकात; शब्दिप्ता of the issue या सदरात वाचायला मिळेल..

तसंच आपली नेहमीची सदरं आहेतच.. सुरेल वाटचाल या सदरामध्ये गायक रोहित राऊत याची घेतलेली मुलाखत आहे.. त्याच बरोबर झेंडा.. क्लासमेट्स.. online-binline.. या चित्रपटांतून आपल्या भेटीला आलेला.. अभिनेता सिद्धार्थ चांदेकर याची घेतलेली खास मुलाखत अभिनिवेश या सदरामध्ये.. वाटेकर्स या सदरामध्ये वाशाहीर या गाण्याच्या संगीतामागच्या भावना मांडण्यात आल्या आहेत..

या अंकाच्या coverpage साठी छायाचित्रकार आणि माझा मित्र अभिषेक साटम याने काम पाहिलं आहे.. बाप्पाच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर आधारित असणाऱ्या या अंकाचं coverpageहि तसंच असावं या हट्टापायी साकारलेलं हे छायाचित्र खूप काही सांगून जातं.. नेहमी आपल्याला स्मरणात राहा असं सांगणारा हा बाप्पा.. स्वतःही स्मरणात असल्याची ग्वाही देतो..

अगदी अश्यातच.. १३ ऑगस्ट ला जागतिक अवयवदान दिन झाला.. अवयवदानाबद्दल असणाऱ्या शंका-कुशंका.. आणि जागरुकतेसाठी केला गेलेला शब्द-जागर या अंकात मांडत आहोत..

२३ जुलै.. संकष्टी आषाढ, २०१६ रोजी प्रकाशित केलेला शब्दीप्ता Magazineचा सहावा अंक त्यातल्या काही खास सदरांमुळे विशेष गाजला.. या अंकामध्ये गायक संगीतकार हर्ष वावरे याने अंक वाचून दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिक्रियेचा देखील समावेश करीत आहोत..

२१ ऑगस्ट.. संकष्टी श्रावण, २०१६ रोजी प्रकाशित होणारा शब्दीप्ता Magazineचा हा सातवा अंक.. डॉ. नरेंद्र अच्युत दाभोळकर या संयमी लढवय्याच्या स्मृतीचरणांवर समर्पित करीत आहोत..