Home Featured शाश्वत-अटळ, – जन्म

शाश्वत-अटळ, – जन्म

शाश्वत-अटळ, – जन्म

जन्म

प्रवास, हा एकच शब्द किती अन कित्येक गोष्टी डोळ्यासमोर उभ्या करून जातो. त्या दिशेने प्रवास करणाऱ्या म्हणजे आपल्या एका ठराविक ठिकाणाकडे, ध्येयाकडे घेऊन जाणारी वाट, आपल्याला खूप गोष्टींशी, अनुभवांशी, विभिन्न क्षणांची एकमेकांसोबत भेट घालून देते. हीच वाट कधी त्या भूतकाळातल्या आठवणींशी अन् भविष्यातल्या “वर्तमानाची” कुठे ना कुठे तरी सांगड घालून देत असते. या अशा प्रवासातून आपण शिकतो, सावरतो, आत्मसात करतो अन निरंतर चालत राहतो.
हा प्रवास फक्त काही ठिकाणांसाठी किंवा कुठल्या ध्येयासाठी सिमीत नाही, तर हा प्रवास आहे प्रत्येक अवस्थेचा; शरीराच्या, मनाच्या आस्थेचा, आत्मज्ञानाचा, विचारांच्या कलेचा, जगण्याच्या कलाचा.. प्रवास आहे स्वप्नांचा, आकांक्षांचा, सत्याचा, कटुपणाचा, अध्यात्माचा.. हा प्रवास आहे चिरंतर आत्म्याचा.
“जीवन” किती साधा अन सोपा शब्द आहे .याचा प्रवास सुरू होतो एका जिवाच्या जन्मापासून. “जन्म” त्या प्रेमाची फुटलेली नवी पालवी. या पालवीचं अस्तित्व अस्तित्वात येतं, त्या निखळ प्रेमामुळे.. तर हा जन्म चालत राहतो या वाटेवर जिथे हा जन्म, नव्याने जन्म घेत राहतो मनाच्या अवस्थेत, डोळ्यांतल्या स्वप्नांत, घडणाऱ्या विचारांत.. जन्माचं पहिलं पाऊल असतं ते रम्य बालपण..
ते निरागस, निखळ हसू अगदी सगळ्यांना हसवतं.. ते निश्चल प्रेम सगळ्यांना भिजवतं. ना कालचा भूतकाळ मनात जिवंत असतो ना भविष्याची लकेर कुठे असते. जगणं असतं ते फक्त वर्तमानात. त्या बालपणात कसलाच स्वार्थ नसतो; असतो तो आनंद छोट्या-छोट्या गोष्टींत लपलेला. तो पाहिलेला चंद्र मनात घर करतो पण निस्वार्थ.! हे बालपण त्याला पकडण्यात कधीच मग्न नसतं, ते तर केवळ निर्मोह हसत राहतं त्या चंद्राला बघून.. हे बालपण बघतं त्या क्षितिजाकडे, त्या सूर्याकडे, ती किरणं अंगावर घेतं अन् डोळे मिचकावतं निःसंदेह.. त्याला नसते उद्याची फिकीर.. हे बालपण त्या घडणाऱ्या मनाची अवस्था असतं, अहंकारविरहीत आस्था असतं. हे बालपण पाऊल असतं त्या नव्या दिशेने, जिथे कुठल्या दिशेला जायचं हे माहिती नसतं पण मुक्त हिंडणं, बागडणं या बालपणाला सहज जमतं. ते बालपण जिथे कधी अपेक्षांचं ओझं नसतं, तर कधी पडल्यावर डोळ्यात हलकेच तरळणारे अश्रू सुध्दा एका फुंकरीने विरून जातात अगदी हसत हसत. ते रम्य बालपण कधीच तक्रार करत नाही कुठल्याच वाईट परिस्थितीची. जगत राहत, पुढे बघत राहतं, त्या वेळेत डोकं वर काढून वेळेसोबत चालत राहतं अगदी वेंधळसं हसू ओठांवर ठेऊन.
हेच बालपण पाऊल टाकतं खऱ्या अर्थाने येणाऱ्या पुढच्या आयुष्यात, की त्या बालपणात त्या भविष्याची काळजी नसते, बेफिकीर असतं मन त्या दवबिंदू सारखं त्या आळवाच्या पानावर थांबलेलं, लख्ख प्रकाशाने प्रकाशमान झालेलं. त्या पानावरुन घरंगळण्याचं ना त्याला भय असतं ना दुःख.! स्वतः आनंदी असतं आपल्याच जगात.. निस्सीम प्रेमात.. जसं स्वतः खुश असतं तसंच दुसऱ्याला आनंद देतं भरभरून.. हे बालपण कडी असत त्या नव्या वाटेच्या दाराची, जिथे हे बालपण आपले इवले इवले हाथ लावून दार उघडतं त्या प्रवासाच्या दिशेने निरंतर चालण्यासाठी, पळण्यासाठी, पडण्यासाठी, तर परत हिंमतीने उठण्यासाठी.. हेच बालपण मूळ असतं आपण कसे जगतो? काय जगतो? का जगतो? याची पोचपावती देणारं.. हेच बालपण प्रवास सुरु करतं त्या अटळ सत्याच्या दिशेने अगदी हसत. ही झाली शरीराची, मनाची अवस्था जिथे जडण-घडणीचं जातं फिरण्याची सुरुवात होते. कधी-कधी आपण सापडतो या प्रक्रियेत जिथे जणू शिल्पकार जसं त्या दगडाला कोरत असतो मूर्ती बनवण्यासाठी त्या छन्नी अन हतोड्याने, तसंच काहीसं हे बालपण आपलं स्वतःच एक वळण घेत असतं “मूर्ती” बनण्यासाठी पण अगदी हसत.. हेच हास्य, आनंद, निस्वार्थ भाव, प्रेम या बालपणाला रम्य बनवतात, अगम्य बनवतात अन मग ते आत्म्याची चिरंतर चेतना बनतं निरंतर प्रवासासाठी..

– ऋतुजा लाहिगुडे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here