Home मराठी सुरेल वाटचाल- महेश काळे भाग १

सुरेल वाटचाल- महेश काळे भाग १

सुरेल वाटचाल- महेश काळे भाग १

महेश दादाचं बालपण..

दादा तुझ्या अगदी लहानपणीचा एक किस्सा आहे.. तू अगदी तीन एक वर्षांचा होतास बघ.. तेव्हा काहीतरी ४-५ हजारांच्या जमावासमोर गायला होतास ना.. ए दादा काय होता रे तो किस्सा.. सांग ना..!!

अरे.. काय झालं होतं कि, गोंदवल्याला माझ्या बाबांची सेवा होती.. आणि त्यानिमित्ताने आम्ही तिथे गेलो होतो.. तेव्हा एका पहाटे ४:३० वाजता बाबांनी मला उठवलं.. आंघोळ घातली.. आणि छान तयार केलं.. आम्ही तिथल्या ‘आईसाहेब मंडप’ मध्ये गेलो.. मी त्या व्यासपीठावर जाऊन बसलो.. माझ्या गळ्यात टाळ आले.. वरून एक माईक खाली आला.. आणि मी महाराजांचाच “देवपूजा माझी देवपूजा..” हा अभंग गायलो.. आणि कसं असतं ना अरे, त्या वयात ना खरंतर आपल्याला काही फरक पडत नाही.. कुठे गात आहात.. किती लोकं आहेत.. या गोष्टींचं भानच नसतं मुळी.. तुम्ही आपले गाता.. आणि जेव्हा आपण एखादी गोष्ट करताना.. त्यात रमतो.. तेव्हा त्याचा खरा उद्देश काय आहे याच्याशी आपल्याला काही देणं-घेणं नसतंच मुळी.. आपल्याला फक्त आनंद मिळत असतो.. आणि तेव्हा मलाही तो तसा मिळत होता.. मला नंतर काही लोक म्हणाले कि, अरे वा.. काय भारी गायलास.. ५ हजार लोकांसमोर गायलास वगैरे.. तेव्हा मला वाटलं कि, मी काहीतरी भारी केलंय.. पण मला खरंच तेव्हा तिथे जमाव कितीचा होता.. आणि मी किती छान गायलो या पेक्षाही तिथे लोकांनी मला जे लाडू-पेढे दिले.. अकरा रुपये दिले.. माझे गालगुच्चे घेतले गेले.. त्यातच धन्यता वाटली होती..

महेश दादा.. तुझी आई मीनल काळे या गाण्याच्या सच्च्या उपासक.. आणि प्रख्यात गायिका श्रीमती वीणाताई सहस्त्रबुद्धे यांच्या शिष्या.. वयाच्या अवघ्या ५-६ वर्षापासून तू आईकडे गाण्याचं शिक्षण घ्यायला सुरुवात केली होतीस.. शास्त्रीय शिक्षणाची नांदी घरातच झाली असेल ना रे..?

हो जसं तू म्हणालास.. नांदी घरातच झाली.. माझी आई गाण्याचे क्लास घ्यायची.. तेव्हा तिने शिकवलेल्या बंदिशी माझ्याही कानावर अनेकदा पडायच्या.. मी त्या अश्याच बडबडगीतांसारख्या गुणगुणायचो.. एकदा आई तीच्या शिष्यांना एक बंदिश शिकवत होती.. कुकरची शिट्टी झाली म्हणून ती किचन मध्ये कुकर बंद करायला गेली होती.. तेव्हा मी ती बंदिश म्हणत असलेली तिने ऐकली.. तेव्हा तिला वाटलं कि, हा नुसताच म्हणत नाहीये तर ताला-सुराचं देखील अंग याला आहे.. आपण याला रीतसर शिकवायला हवं.. आणि मग तेव्हा पासून गाण्याचं व्याकरण माझ्या आईने माझ्याकडून घोटवून घेतलं..

गुरुकुल पद्धतीतलं शिक्षण..

महेश दादा तुझे गुरु पं. जितेंद्र अभिषेकी बुवा.. अभिषेकी बुवांना घराण्यांची बंधनं कधीच अडवू शकली नाहीत.. त्यांची गायकी एका विशिष्ट घराण्याचं प्रतिनिधित्व करणारी नव्हतीच मुळी; आज तुझ्याही गायकी मध्ये हि गोष्ट पाहायला मिळते.. हे संस्कार बुवांकडून झाले..? काय सांगशील..?

अर्थातच.. कारण त्यांची गायकी त्यांनी वेगवेगळ्या घराण्यांच्या बलस्थानातून निर्माण केलेली होती.. आणि तीच गायकी त्यांनी मला शिकवली.. आणि जशी गायकी शिकवली.. तसंच त्यांनी हे हि शिकवलं कि.. स्वतंत्र विचार करून तुम्ही तुमचे विचार मांडा.. कसं आहे बघ.. आपल्याला जसं आपले वडील एखादी philosophy शिकवतात.. आणि आपण ती आपल्या आयुष्यात कशी लागू होईल याचा विचार करून ती तशी अंमलात आणत असतो.. तसंच अभिषेकी बुवांनी मला जी गाण्याची philosophy शिकवली ती मी माझ्या गाण्यावरती कसं apply करता येईल असा विचार करून गातो..

दादा पंडितजींनंतर आज शौनकजींचं मार्गदर्शन तुला लाभत आहे.. शौनक दादा बरोबरच तुलाही गायनाचे धडे मिळाले आहेत.. म्हणजे तुम्ही एका बैठकीत ते धडे घेतले आहेत.. आज तू शौनक दादाला तुझ्या गुरुस्थानी पाहू शकतोस का..?

of course.. अरे.. मुळात तो गाण्यामध्ये फार सिनियर आहे मला.. आणि मी जेव्हा अभिषेकी बुवांकडे शिकत होतो.. तेव्हाही मी त्याच्या कडे खूप शिकलोय.. आणि अरे त्याच्याचकडे काय तर मी बुवांकडे येणाऱ्या प्रत्येक शिष्याकडून शिकायचो.. मी बुवांचा सर्वात लहान शिष्य होतो.. यामुळे मला अगदी राजा भाऊंपासून ते पेंडसे काकांपर्यंत सगळ्यांकडून शिकायला मिळालं.. मी त्यांच्या समोर बसून रियाज करायचो.. माझ्या चुका त्यांनी वेळोवेळी मला दाखवून दिल्या आहेत आणि मी त्यात आवश्यक त्या सुधारणा करायचो.. आणि पुन्हा त्यांना ऐकवायचो.. बुवांना ऐकवायचो.. त्यामुळे अर्थातच मी या सगळ्यांना आणि शौनक दादालाही गुरुस्थानी पाहू शकतो..

कट्यार आणि दादा..

दादा.. आज “कट्यार काळजात घुसली” या संगीत नाटकाला तुम्ही पुन्हा एकदा एवढ्या मोठ्या स्तरावर.. व्यावसायिक रंगभूमीवर आणलंत.. हा शास्त्रीयचा ठेवा पुढच्या पिढीकडे सोपवण्याचा प्रयत्न होता..? आणि तो आज कितपत यशस्वी झाल्याचं जाणवतं..?

खूप यशस्वी झाला.. कारण बघ ना.. अनेक mainstream प्रसारमाध्यमांनी याची दखल घेतली.. झी मराठी सारख्या वाहिनीवर ते एकदा नाही तर अनेकदा दाखवलं गेलं.. आणि जेव्हा अश्या एखाद्या प्रसारमाध्यमावरून ते प्रसारित होतं तेव्हा त्याचा unleash खूप मोठ्या पद्धतीने होतो.. कारण आम्ही १०० प्रयोग केले.. सगळे हाऊसफुल झाले तरी आम्ही सरासरी एक लाखभर लोकांपर्यंत पोहोचलो.. पण जेव्हा ते TV वर दाखवलं गेलं.. तेव्हा ते लाखो करोडो लोकांच्यापर्यंत जाऊन पोहोचलं.. त्यांच्या घरात जाऊन वाजलं ते.. आणि त्यातनं आता आम्हाला.. परिणामी मला जे प्रेम मिळतंय.. fan following मिळतंय.. त्या आकड्यावरून लक्षात येतं कि किती यशस्वी झालंय ते.. अगदी अश्यातच ऑगस्टमध्ये कल्याणला माझा एक कार्यक्रम होता.. तिथे एक मुलगी मला भेटायला आली होती.. तिचा जन्म साउथ आफ्रिकेचा.. पण तिचे बाबा मराठी आहेत.. त्यांनी तिला कट्यार ची DVD दिली होती.. ती पाहून.. त्यातलं अरुणी-किरणी तिला आवडल्याचं ती सांगत होती.. आणि म्हणून खास भेटायला आली होती.. म्हणजे बघ कुठे कुठे पोहोचलंय कट्यार..

आंतरराष्ट्रीय ओळख..

दादा तू किती ताकदीचा आणि अभिजात शास्त्रीय गायक आहेस हे आम्हाला माहित आहेच.. पण तू तितक्याच ताकदीने western songs हि गातोस.. तू nobal आहेसच.. आणि तुझ्यातला हा nobalness च तुला आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून देण्यात कारणीभूत ठरला आहे.. काय सांगशील..?

सगळ्यात महत्वाचं म्हणजे.. मी किती ताकदीचा किंवा अभिजात गायक आहे किंवा nobal आहे यातल्या कुठल्याच गोष्टीला माझं स्वतःचं असं काहीच क्रेडीट नाहीये ना.. ताकद जी दिलीये, ती परमेश्वराने मला जन्माला घालतानाच दिलीये ना.. आणि त्यानंतर त्याची जी मशागत करायची होती ती माझ्या आई-वडिलांनी त्यांच्या संस्कारांतून आणि मग नंतर अभिषेकी बुवांनी संगीताच्या संस्कारांतून केली.. माझ्या गाण्यात तुला जी ताकद दिसत असेल ती त्यामुळे आहे.. आणि तू म्हणालास ना.. कि शास्त्रीय आणि western मी equal ताकदीने गातो.. तर मी दोन्हीमध्ये equally रमतो.. कारण तू मला खेळ खेळताना जरी बघितलंस ना.. तरी तो मी तितक्याच तन्मयतेने खेळतो.. मुळातच मला असं वाटतं कि एकच आयुष्य आहे आपलं.. तर त्या आयुष्यामध्ये तेवढ्याच गोष्टी कराव्यात ज्या आपल्याला खूप आवडतात.. आणि मला खूपच गोष्टी अश्या खूप आवडण्यासारख्या आहेत.. मला travel करायला खूप आवडतं.. मला स्पोर्ट्स खूप आवडतात.. मला nature मध्ये राहायला आवडतं.. hiking करायला आवडतं.. मला जगभरातलं संगीत ऐकायला खुप आवडतं.. वेगवेगळ्या museums मध्ये जायला आवडतं.. आता हे आवडतं मला.. त्यामुळे मी त्यात रमतो.. आणि एकदा का तुम्ही त्यात रमलात.. कि तुम्हाला त्यात आनंद मिळायला लागतो.. आणि तुम्हाला येत असलेला आनंद लोकांनाही आनंद देऊन जातो.. इतकं सोप्पं आहे ते..!!

दादा तू classical प्रमाणेच fusion concert हि केल्या आहेस.. तुझं काय मत आहे.. शास्त्रीय आणि western यांचं fusion करण्याबाबत..

मला असं वाटतं.. कि fusion हा ट्रेंड कुणी कितीही नाकारला तरी तो न टाळता येण्यासारखा आहे.. म्हणजे जसं चायनीज प्रोडक्ट्स भारतात येऊ नयेत असं कुणीही कितीही म्हंटलं तरी ते येत राहतात.. तसं आहे ते.. कारण जग आज छोटं झालंय.. आणि मुळात ना fusion चा खरा अर्थ काय आहे हे आपण लक्षात घ्यायला हवंय.. दोन वेगवेगळे संगीत प्रवाह त्यातील दोन व्यक्ती एकत्र येऊन एक vocabulary तयार करतात.. आणि ती दोघांच्या संमिश्र भावनांमधून तयार झालेली असते.. तसं बघायला गेलात तर मग तबला.. आणि सुरांची भाषा वेगवेगळी आहे.. तबल्याची भाषा धा-धीन्-धीन्-धा आहे आणि सुरांची भाषा सा-रे-ग-म-प-ध-नी आहे तरीही ते सुद्धा एकत्र नांदतातच ना.. तर अशी एखादी vocabulary आपण शोधली कि, ज्याच्यातनं एकत्र नैसर्गिकरीत्या नांदता येईल.. आणि मग तेव्हा त्याला अशी बंधनं नसावीत कि हे शास्त्रीय संगीत आहे.. हे western आहे आणि त्यामुळे याचं fusion आपण करू नये.. हे कुणी ठरवावं.. हे खूप subjective आहे नाही का.. मला कुठली भाजी आवडते.. आवडत नाही हे मी ठरवणार ना.. आणि आत्ता ना आपलं आयुष्य ज्या ठिकाणी येऊन पोहोचलंय.. त्या ठिकाणावर येऊन तर असा विचार करणं अजिबात योग्य नाहीये.. आत्ता आपण मंगळावर जाण्याच्या तयारीत आहोत.. आणि जर का तिकडच्या जीवसृष्टीतल्या संगीतासोबत आपलं संगीत एकत्र केलं तर ते fusion असेल.. कारण आपलं आणि तिकडचं communication च साधन वेगळं आहे.. आणि पृथ्वीवरती जी सगळी लोकं राहतात.. त्यांच्या भावना तर सारख्याच असतात ना.. मग ती indian असोत वा western.. आनंद झाला तर सगळे हसतातच.. दुखः झालं तर रडतातच.. मग भेदभाव कशाला बघायचे आपण.. जे आपले emotions आहेत.. त्या emotions करता एकत्र मिळणारे धागे शोधावेत आपण.. आणि त्या धाग्यांमधून काही चांगलं आलं तर काय हरकत आहे.. जरूर करायला हवंय.. फक्त ते कुणीतरी fusionची concert ठेवलीये म्हणून जाऊन.. पैश्यासाठी गाण्यात काय अर्थ आहे.. त्यामुळे त्याचा मूळ उद्देश लक्षात घेऊन नि:खळ आनंदासाठी गायला काहीच हरकत नाही.. नाहीतर मग शास्त्रीयची मैफल पण तितकीच वाईट होईल जितकी fusion concert..!!

अगदी अश्यातच तुझ्या “मल्हार” या कार्यक्रमात तू कर्नाटकी धाटणीचा अमृतवर्षिनी राग गायला होतास.. वास्तविक पाहता तू हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गाणारा गायक आहेस मग तरीही कर्नाटकी धाटणीचा राग..? म्हणजे अशी काही बंधनं असतात.. नसतात..

अरे आपण कर्नाटकी डोसा खातोच ना.. मग कशाला ठेवायची बंधनं..? इडली-डोसा खातो आपण.. पनीर टिक्का खातो.. खातो कि नाही.. मग पंजाबी भांगडा किंवा गीद्दा हे संगीत का गाऊ नये..? त्यातूनही आनंदच मिळतो ना.. गाणाऱ्याला आणि ऐकणाऱ्यालाही.. आणि हे बघ एखादी गोष्ट आवडती.. तर तिची जात, पात, धर्म, वर्ण हे सगळं बघून आवडत नसते ना.. आतमध्ये काहीतरी वाटतं ना.. म्हणून आवडते.. आणि तसं जेव्हा-जेव्हा मला आतून वाटतं तेव्हा-तेव्हा मी ते गातो.. हे बघ.. हेच गावं.. किंवा हे गाऊ नये हा ‘कूप मंडूक न्याय’ आहे आणि मला तो मान्य नाही.. आता आहे मी असा.. काय करायचं..

-तुषार

क्रमशः

पुढील भाग येथे वाचा..

Previous article सुरेल वाटचाल- सावनी रवींद्र
Next article सुरेल वाटचाल- महेश काळे भाग २
Crammed of Spirituality... Loved to be surrounded by Positive Vibes... पाडगावकर, खांडेकर, दवणे, मतकरी, पुलं, वपु, चंगो; आणि अजून कित्येक... या व्यक्तिंनी जे दर्जेदार लिहिलं.. ते साहित्य वाचून, अनुभवून झपाटून गेला; 'शुभॠष्' या टोपण नावाने लिहीणारा एक स्वैर-लेखक... डॉ. तुषार प्रशांत पवार आणि जेव्हा त्याच्या सोबतीनं, त्याच्याच सारखे साहित्यवेडे जमले तेव्हा प्रत्यक्षात आली 'शब्दीप्ता Magazine' ची संकल्पना...

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here