Home Featured मुसाफिर अभि- चिंता – काळजी

मुसाफिर अभि- चिंता – काळजी

मुसाफिर अभि- चिंता – काळजी

चिंता – काळजी आणि मुसाफिर_अभि..

नमस्कार, राम राम मंडळी.. तुम्ही हा लेख वाचताय म्हणजे सध्या तरी काही चिंता नसावी आणि असल्यास हा लेख वाचल्यावर तुम्हाला नक्की बरं वाटेल..

तर मी मुसाफिर_अभि.. मनुष्य जीवन मिळालेला तुमच्या सारखाच एक माणूस आणि माणूस म्हंटलं कि भावना आपोआप आल्याच कि राव..

तर गेली ४ महिने आपण चिंता आणि काळजीच्या आहारी गेलोय असं म्हंटलं तरी वावगं ठरणार नाही..

लॉकडाउन, मास्क-सॅनिटायझर, नियम-अटी, वर्क फ्रॉम होम या सगळ्या धाग्यांनी आपण आपल्याला बांधून ठेवलंय अक्षरशः अहो धागेच आहेत फक्त.. आयुष्य ह्याहून फार मोठं आहे.. या सगळ्यात मुळात आपण जगणंच सोडलंय असं नाही वाटत.. हां पण या काळात चिंता आणि काळजी मधला फरक मात्र मला चांगलाच उमगलाय..

हे दोन्ही शब्द जरी समानार्थी वाटत असले तरी काळजीशी, आपुलकीची सकारात्मकता जोडली आहे आणि चिंतेशी, भीतीची नकारात्मकता जोडली आहे..

गेल्या ४ महिन्यांत मी स्वतःची आणि घरच्यांची काळजी घेत होतो, आणि स्वतःच्या भविष्याची चिंता करत होतो.. थोडक्यात आपण काळजी घेतो, आणि चिंता करतो..

मुळात वाचतानाच तुम्हाला यातील वजन जाणवलं असेल.. उदा, डॉक्टर आपली काळजी घेतात आणि मीडिया चिंता वाढवतेय,  असं हि हळू हळू जाणवत होतं..

अगदी काही दिवसांपूर्वीच माझ्या आयुष्यात घडलेली एक घटना सांगतो..

मी पेशाने लेखक दिग्दर्शक असल्या कारणाने.. लॉकडाउन मध्ये फार काम नव्हतं.. पण अनलॉक झाल्या नंतर काही काळात.. एका कोविड सेंटरच्या विडिओचं दिग्दर्शन आणि संकलनाचं काम मिळालं.. म्हणजे आता तुम्हीच विचार करा ज्या गोष्टीपासून काळजी घेत ४ महिने घरी राहिलो थेट तिथेच कामासाठी बोलावणं आलं.. आर्थिक रित्या खचल्यामुळे नकार देता आला नाही.. त्यांनी PPE किट्स समवेत आमच्या काळजीची हमी दिल्या मुळे तशी फार चिंता नव्हती.. दिवस उजाडला २४ जुन २०२० त्यांनी पाठवलेल्या गाडीत बसून कोविड सेंटरला पोहोचलो, मनात थोडीशी चिंता घेऊन.. श्वास सुरवातीला जरा जड होता.. बहुतांश रुग्ण Asymptomatic Positive होते.. कोविड सेंटरच्या आजुबाजूचं शूट करून झालं आणि आता वेळ होती ती थेट सेंटर मध्ये शूट करण्याची.. पहिल्यांदाच कोणता तरी कोविड positive  रुग्ण पाहिला आणि चिंता मिटली कारण जेवढं समाधान आणि शांतता गेले चार महिने मी कोणत्याच व्यक्तीच्या चेहऱ्यावर पाहिलं न्हवतं.. ते त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर होतं..

४ दिवसा आधी ऍडमिट झालेली हि व्यक्ती आपण लवकरच यातून बाहेर पडू या भावनेने सकारात्मक ऊर्जा देऊन गेली.. तिथल्या डॉक्टर्स व इतर कर्मचाऱ्यांना भेटल्यानंतर माझ्यात आणखी सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली.. कारण ४ महिन्यांत त्या पोलिसांसाठी असणाऱ्या कोविड सेंटर मध्ये एकही रुग्ण दगावलेला नव्हता.. ५००हुन अधिक पोलीस आणि पोलीस कुटुंबातील व्यक्ती तिथून बरे होऊन घरी गेले आहेत तर इतर पोलीस पुन्हा कार्यरत झाले आहेत, त्यात काही ६-८ महिन्यांच्या गरोदर महिला, BP चा आजार असणाऱ्या महिला-पुरुष, ५ वर्षाची लहानगी मुलगीसुद्धा होती.. खरंच माझ्या मेंदूंत जबरदस्तीने भरलेल्या चिंतेचं निरसन झालं..  हां पण काळजी मात्र नक्कीच घेत होतो.. दिवसभर शूट केल्यानंतर स्वतःला सॅनिटाईज करून तिथला आयुष मंत्रालयाद्वारा सांगितलेला काढा प्यायलो आणि शरीरात तरतरी आली.. डॉक्टरांनी जाता जाता “घरी गेल्यावर सगळे कपडे गरम पाण्याने धुवायला आणि गरम पाण्याची अंघोळ करायला सांगितले”.. पुन्हा त्यांच्या गाडीतून घराकडे मार्गस्थ झालो पण या वेळेस गेल्या ४ महिन्यांचा शीण उतरलेला आणि मन काहीसं शांत झालेलं.. त्या कोविड सेंटर मधील पोलीस कर्मचारी, डॉक्टर्स आणि इतर स्टाफ देखील आजही अहोरात्र पोलिसांची सेवा करत आहेत.. पोलिसांनी पोलिस आणि त्यांच्या कुटुंबासाठी निर्माण केलेलं “कोविड केअर सेंटर, ”

खरंच असं म्हणतात कि आपण आयुष्यात भीतीला सामोरं गेलो कि चिंता दूर होते.. मी तुम्हाला corona रुग्णाच्या जवळ जा असं अजिबात सांगत नाहीये.. पण मी जे अनुभवलंय त्यावरून नक्कीच इतकं सांगू शकतो कि चिंता करू नका फक्त स्वतःची काळजी घ्या..!! तुम्ही सामान्य आयुष्य जगू शकता..!!

-मुसाफिर_अभि

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here