Home मुलाखती गगन ठेंगणे गगन ठेंगणे- रोहन उपळेकर भाग २

गगन ठेंगणे- रोहन उपळेकर भाग २

गगन ठेंगणे- रोहन उपळेकर भाग २

शनी-शिंगणापूर सारख्या प्रकारामुळे स्त्रियांना परमार्थात दुय्यम दर्जा आहे अशी ओरड केली जाते ही गोष्ट कितपत खरी आहे..?

यात अजिबात तथ्य नाही. सातशे वर्षांपूर्वी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या भगिनी मुक्ताबाई यांनी चांगदेवांना अनुग्रह दिला होता.. त्यांचे साहित्य पाहिले की त्यांच्या कार्याची भव्यता तुमच्या लक्षात येईल. चांगदेवांनी ज्ञानेश्वरांना गुरुस्थानी मानून अनुग्रहाची विनंती केली होती, तरीसुद्धा त्यांना अनुग्रह मुक्ताबाईंचा झाला ही गोष्ट पुरेशी बोलकी नव्हे काय ? त्यामुळे आमच्या सर्व संप्रदायांमध्ये समानता आधीपासूनच होती. आता जी समानतेची आरडा-ओरड केली जात आहे, ती राजकीय हेतूने प्रेरित आहे.. यांना अध्यात्म आणि धर्माशी काहीही देणं-घेणं नाही.. “जोड्यानं मारा पण पाटलीण म्हणा ” या स्तरावर जाऊन निव्वळ प्रसिद्धीचा

तो सोस आहे. अध्यात्म हा वैयक्तिक स्तरावरचा विषय आहे आणि त्यामध्ये स्त्री-पुरुष हा भेद कधीच नव्हता.. हा भेद स्त्री-पुरुष शरीराच्या ठिकाणी आहे आणि पर्यायाने व्यवहाराच्या ठिकाणी आहे.. मी पुरुष असूनही मातृत्वाची अनुभूती घेण्याची इच्छा व्यक्त केली तर मला निसर्गच तशी मान्यता देत नाही. त्यामुळे निसर्गानेच केलेला भेद आम्ही समान स्तरावर आणण्याचा प्रयत्न का करत आहोत? कितीही म्हटले तरी समानता सापेक्षच राहणार आहे ना..!

परमार्थात मात्र असा भेद नाही. जो अनुभव मुक्ताबाईंनी घेतला तो अनुभव तुकाराम महाराजांनी घेतला, ज्ञानेश्वरमाउलींनी घेतला आणि तोच अनुभव चोखामेळ्यांच्या काहीही न शिकलेल्या सोयराबाईंनी देखील घेतला.. त्यामुळे अध्यात्मात समानता आणायची वेगळी गरजच नाही. अध्यात्मात ती आधीपासूनच आहे. व्यवहारात मात्र असमानता आहे आणि ती निसर्गनिर्मित आहे जी आपण समान स्तरावर कधीच आणू शकणार नाही. जिथे निसर्गच भेद निर्माण करतोय, तिथे आम्ही य:कश्चित मानव काय बदल करू शकणार?

आताची जी आंदोलने होत आहेत ती स्त्रियांच्या हितासाठी मुळीच नाहीत. त्यांचा स्त्रियांच्या उन्नतीत काहीही सहभाग नाहीये. अशी आंदोलने करणाऱ्यांनी महिलांवर होणाऱ्या अत्याचारांवर काय काम केले आहे..? त्यापेक्षा पालकांनी आपल्या मुलांना स्त्रियांशी चांगले वागण्याची शिकवण देणे जास्त गरजेचे आहे, असे मला वाटते.

शनी शिंगणापूरच्या चौथऱ्यावर पुरुषांनाही जायला बंदी होतीच. आता जे आंदोलन करत आहेत ते आंदोलक दगडाला देवच मानत नाहीत, देव या संकल्पनेशी जर तुम्हाला काही देणे-घेणे नसेल तर तिथे जाण्याचा अट्टाहास का? समाजाच्या संधारणेसाठी असलेले नियम हे तुम्ही आम्ही केलेले नाहीत तर ते प्राचीन काळापासून चालत आलेले आहेत, त्यामुळे ते नियम तसेच पालन करणे गरजेचे आहे असे मला वाटते. कारण नसताना त्यांना वादाचा मुद्दा बनवू नये. त्यापेक्षा तुम्ही तिथे जाऊ नका , तुम्हाला जे पटत नाही ते करू नका, संविधानाने तेवढे व्यक्तीस्वातंत्र्य दिलेले आहे आणि कोणतेही देव वा देवस्थाने लोकांना जाहिरात करून बोलवत नाहीयेत. त्यामुळे जे पटत नाही ते करू नका व ज्याला जे पटते ते करू द्या..

वारकरी संप्रदायात, वारीमध्ये जितके पुरुष येतात तितक्याच स्त्रियाही येतात. त्यांना पंढरीला किंवा आळंदीला जाऊन दर्शन घ्यायचा विरोध नाही मग तेथे जायचे ना दर्शनाला..! जिथे परवानगी नाही तिथे जाऊन, वाद उकरून काढून.. आहे त्या वातावरणाला गढूळ करण्याची गरजच काय..? समाजात तेढ निर्माण करण्यापेक्षा आहे त्यात सलोखा टिकवणे जास्त चांगले नाही का? या आंदोलकांचे उद्देश धार्मिक नसून पूर्णपणे राजकीय आहेत असे माझे स्पष्ट मत आहे. समाजात असलेला एकोपा घालवण्याचे काम करणारी, कारण नसताना तेढ निर्माण करणारी विघ्नसंतोषी मंडळी आहेत ही..!

आध्यात्मिक साहित्य हे कालबाह्य आहे, ते आधुनिक काळाशी सुसंगत नाही असा आरोप नेहमी केला जातो, यात कितपत तथ्य आहे ? संतांच्या शिकवणुकीची आधुनिक काळाशी सांगड कशी घालावी ?

गोंदवलेकर महाराज सांगतात त्याप्रमाणे संतांचे सांगणे निरपेक्ष असते, ते आतून, तळमळीतून आलेले असल्यामुळे सर्वांना पटते. आज परिस्थिती अशी आहे की, घरात कधी पती-पत्नी एकमेकांचे ऐकत नाहीत की आई-मुलाचे प्रत्येकवेळी पटतेच असे नाही. एकाच विषयावरच्या दोन तज्ज्ञांचे सुद्धा एकमत होत नाही. पण संतांचे सांगणे मात्र जगभर मान्यता पावते. कारण ते तर Universal Truth आहे, म्हणजे काळाच्या सापेक्ष त्याची सत्यता बदलत नाही.

मी लहानपणापासून ख-या वारकरी लोकांना खूप जवळून पहिले आहे. त्यांच्यावर लहानपणापासून झालेले संस्कार हे मरेपर्यंत त्यांच्या उपयोगी पडतात. ते नेहमी चांगुलपणानेच वागतात. “चांगले वागणे ” हे त्यांना शिकवावे लागत नाही. चांगुलपणा हा तर माणुसकीचा धर्म आहे, मनुष्यधर्म आहे तो ! नाहीतर आपल्यात आणि प्राण्यांत काय फरक राहिला. याचा पाठपुरावा संतांनी करून जो प्रभाव निर्माण केला आहे, तेवढा प्रभाव इतर सामाजिक कार्य करणाऱ्या कोणाही महापुरुषाला निर्माण करता आला नाही. संतसाहित्यात असे अनेक विषय आहेत ज्यांची सत्यता तुम्ही बदलत्या काळानुरूप सहज सिद्ध करू शकता. पण त्या गोष्टीवर कुणी अभ्यास करण्याचा प्रयत्न तरी करीत नाहीत किंवा आमचे पूर्वग्रह तरी मधे आडवे येतात.

मेकॉलेच्या दुर्दैवी शिक्षणपद्धतीमुळे आपलेच प्राचीन वैभव आपल्याला तुच्छ वाटू लागले आणि एक प्रकारचा “बौद्धिक वसाहतवाद” निर्माण झाला. त्यामुळे जे जे परके ते ते उत्तम, अशीच आमची धारणा निर्माण केली गेली. याउलट मी म्हणेन की, विज्ञानाचे सर्वात जास्त शोध हे आम्ही भारतीयांनी फार पूर्वीच लावलेले आहेत आणि  पाश्चात्य लोक आम्ही “ इन्वेंट ” केलेल्या विषयांची “ डिस्कवरी ” करून मोठेपणा मिरवीत आहेत. आमच्या शोधांचे डॉक्युमेंटेशन आमच्याकडे नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. मधल्या काळातील प्राचीन भारतीय वैदिक साहित्य नष्ट करण्याचे आणि आम्ही गौण अशी मानसिकता निर्माण करण्याचे जे प्रयत्न झाले तेच धोकादायक ठरलेले आहेत. आता प्रयत्नपूर्वक हे दृष्य आपल्याला बदलायला हवे.

श्रीमद्भगवद्गीता, श्रीज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, एकनाथी भागवत सारख्या ग्रंथांचा आजच्या तरुण पिढीने अभ्यास का करावा ? आजच्या तरुण पिढीमध्ये मानसिक आजार, अस्थैर्य, व्यसनांच्या आहारी जाण्याची वृत्ती वाढल्याच्या पार्श्वभूमीवर काय उपाय सांगाल ? शरीरसंपदा कमावण्याचे उपयोजन संतांच्या मतानुसार काय आहे?

जन्माला आलेल्या प्रत्येकाचे ध्येय काहीतरी करून आनंद मिळवणे हेच असते. आज लोकांना महिन्याकाठी लाखो रुपयांचे उत्पन्न आहे पण त्यांच्या एकाच्या तरी तोंडावर आनंद दिसतो का तुम्हाला ? नाही दिसत, कारण त्यांच्या आनंदाला कायम दु:खाची किनार आहे. आम्हाला झोपेसाठी गोळ्या द्याव्या लागतात, घ्याव्या लागतात. आजच्या तरुण पिढीला मन:शांतीची फार गरज आहे कारण Undue stress भयंकर वाढला आहे. तसे म्हटले तर आजचा समाज म्हणजे ताणलेला रबरासारखा झालाय, कधी कशाने तुटेल सांगता येत नाही. आयुष्यात कसलेही नियम राहिलेले नाहीत, जगण्यात सार असे काही उरलेलेच नाही. सगळं इतकं धावपळीचं झालं आहे की, ज्या आनंदासाठी आपण हा सगळा आटापिटा करतोय तो आनंद उपभोगण्यासाठी जे स्थैर्य हवे, तेच कुणाकडे राहिलेले नाही.. ना मानसिक ना शारीरिक..! माझा तर एक मित्र म्हणतो, “मी जेवढा पगार घेतो त्यातला ऐंशी टक्के डॉक्टर वर खर्च करतो”.  आता काय बोलणार यावर? हे काय सुखी जीवन आहे का?

संतानी सांगितलेलं तत्वज्ञान आणि उपासना या दोनच गोष्टी तुम्हाला आयुष्यात स्थैर्य आणि शांती देऊ शकतात. आज जगभर आमच्याच सनातन वैदिक धर्माने दिलेल्या योग, ध्यान, नामस्मरण, उपासना इत्यादी प्रक्रियांचा अवलंब करून लोक शांती मिळवत आहेत. ” पश्चिमेने कितीही प्रगती केली तरी आत्मिक आनंदासाठी, मन:शांतीसाठी त्यांना भारतातच यावे लागेल,” असे स्वामी विवेकानंदांनी त्याकाळात सांगून ठेवले आहे, तेच आजही अतिशय सत्य आहे.

मला जर आनंद उपभोगायचा असेल तर त्यासाठी स्थैर्य लागते. शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आर्थिक अशा चारही स्तरांवर स्थैर्य आवश्यक असते. त्यातले शारीरिक स्थैर्य हे बलाशिवाय शक्य नाही. माझ्या अंगात जर ताकदच नसेल तर मी तो आनंद उपभोगणार कसा? माझं शरीरच कमकुवत असेल तर मी मनाला कोणत्या आधारावर ताकदवान ठेवणार? शरीरात ताकद नसेल तर मानसिक नैराश्य येण्यास वेळ लागत नाही. याकारणानेच सध्या तरुण वयातील विविध आजार व आत्महत्यांचे प्रमाण खूप वाढलेले दिसून येते. अध्यात्म आणि सुखी जीवनाचा पाया म्हणजे शारीरिक बल आहे. उत्तम शरीरात उत्तम मन राहते, असे म्हटले जाते. आमच्याकडे सूर्यनमस्काराची उपासना आहे, सूर्य तेज देतो; मानसिक, शारीरिक, बौद्धिक अशा सगळ्या तेजाचा स्वामी तोच आहे. एकाच सूर्यनमस्कारामध्ये अनेक प्रकारची आसने देखील आपोआप होतात. समर्थ रामदास स्वामी स्वत: रोज बाराशे सूर्यनमस्कार घालत होते. आपण नियमाने बारा तरी नको का घालायला? बुद्धीला बळाची जोड असेल तरच खरा विकास होतो, हे विसरता कामा नये.

“ नायमात्मा बलहीनेन लभ्य । ” असे उपनिषदांचे वचन आहे. म्हणजे ज्याच्या ठिकाणी शारीरिक बळ नाही त्याला आत्मस्वरूपाची प्राप्ती देखील होणार नाही. सद्गुरु श्रीज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, एकनाथ महाराज आणि समर्थ रामदास स्वामी हे आपल्या मराठी संत मांदियाळीचे प्रमुख ग्रंथकार आहेत. तशी सर्वच संतांनी काही ना काही ग्रंथरचना केलेली आहे, पण या चार संतांचे साहित्य मोठ्या प्रमाणात असल्याने यांना प्रमुख ग्रंथकार म्हटले जाते. हे सगळं साहित्य अभ्यासण्याची खूप गरज आहे. आमच्या श्रीगुरुपरंपरेतील संत मामा महाराज देशपांडे यांचे एक फार महत्त्वाचे स्वप्न होते. ते म्हणजे जगातील सर्व भाषांमध्ये ज्ञानेश्वरी भाषांतरित करून जगभर प्रत्येक घरात त्या त्या भाषेतील ज्ञानेश्वरीची प्रत पोहोचवायची. त्यांनी स्वत: या दृष्टीने प्रयत्न करून श्रीवामनराज प्रकाशन या नावाची संस्था काढली. आजमितीस ना नफा तत्त्वावर सव्वादोनशे पुस्तके या प्रकाशनामार्फत मराठी, कानडी, हिंदी आणि इंग्लिश या भाषांतून प्रकाशित झालेली आहेत. माझ्या बाबतीत बोलायचे झाले तर, गेली सतरा-अठरा वर्षे मुख्यत्वे संतांच्या मूळ ग्रंथांचा आणि श्रीवामनराज प्रकाशन संस्थेच्या साहित्याचा अभ्यास मी केला आहे. श्रीवामनराज प्रकाशनाच्या साहित्याची वैशिष्ट्ये म्हणजे मुद्देसूद, विज्ञाननिष्ठ व आजच्या काळाला अतिशय लागू होणारे तत्त्वज्ञान त्यांत मांडलेले आहे. शिवाय समाजाच्या सर्व स्तरांच्या, वेगवेगळ्या वयोगटांच्या सर्व प्रश्नांचे समाधान करू शकतील अशी  ग्रंथनिर्मिती या प्रकाशन संस्थेमार्फत करण्यात आली आहे.  सर्व संतांचे साहित्य हे वेगवेगळ्या स्तरावरून अतिशय प्रतिकूल परिस्थितीतही निर्माण झालेले आहे. त्यामुळे ते प्रत्येकाला आयुष्यातील विविध टप्प्यांवर मार्गदर्शक ठरेल. उदाहरणादाखल बोलायचे झाले तर आमच्या पू. मामा महाराजांच्या मातु:श्रींचे, पू. पार्वतीदेवी देशपांडे यांचे चरित्र. ते इतके आदर्शवत् आहे की, सुरुवातीला अतिशय श्रीमंतीच्या, नंतर नियतीने आलेल्या अतिशय हलाखीच्या, मानसिक आंदोलनांच्या परिस्थितीतही निष्ठेने त्यांनी आपले साधन प्राणपणाने केले. आमच्यावर सुद्धा आयुष्यात फिरून-फिरून अशीच परिस्थिती येत असते कधी मानसिक स्थैर्य नसते तर कधी शारीरिक स्थैर्य नसते आणि कधी याच्या उलट म्हणजे चांगली परिस्थिती सुद्धा असते. मात्र अशावेळीही “उतू नकोस, मातू नकोस” असा संदेशही आमच्या संतांनी दिलेला आहे. गाठीशी काही नाही म्हणून हिंमत हरून रडू नकोस, मनगटात बळ असताना प्रयत्न सोडू नकोस आणि बरेच काही आहे म्हणून त्याचा माजसुद्धा करू नकोस, मर्यादेत रहा, हेच आमच्या प्रगल्भ धर्माने सुयोग्य प्रकारे सांगून ठेवलेले आहे. हे सर्व वेळीच समजून घेण्याची आजच्या तरुणांना फार फार आवश्यकता आहे आणि इथेच संतसाहित्याच्या अभ्यासाचे खरे उपयोजन आजच्याही काळात किती सुसंगत आहे, ते समजून येईल.

आपण रूढार्थाने विज्ञान शाखेचे शिक्षण घेतले आहे. विज्ञान आणि अध्यात्माचे नाते काय आहे? विसंगती, विरोध की दोन्ही परस्परांना पूरक आणि पोषक आहेत? की दोघांची तुलना अप्रासंगिक आहे ?

वस्तुतः या जगात जे काही आहे ते सगळे एकमेकांच्या आधारानेच आहे. विज्ञान आणि अध्यात्मात विरोध पूर्वीही नव्हता, आताही नाही आणि पुढेही नसेल. दोन्ही एकमेकांना पूरक आहेत फक्त त्यांच्या मर्यादांची जाणीव आपल्याला असली पाहिजे. मी विज्ञानाचा अभिमानी विद्यार्थी असलो तरी त्याच्या मर्यादांची मला परिपूर्ण जाणीव आहे. विज्ञान अमर्याद नाही, याचमुळे मला विज्ञानाचा आणि अध्यात्माचा संबंध जोडावासा वाटतो.

माणसाकडे खूप सामर्थ्य आले की त्या तुलनेत अहंकार व पर्यायाने अनाचार पण वाढतो. जर माझ्यापाशी दोन अणू बॉम्ब असतील तर मी या बळावर कुणालाही जिंकू शकतो असाच विचार मी करीन. पण मी अनैतिक वागायचे नाही, हा विचार मात्र ते विज्ञान देत नाही. ही नैतिकता अध्यात्माच देते. जेव्हा जेव्हा विज्ञानाने अध्यात्माची कास सोडली तेव्हा तेव्हा समाज विघातक गोष्टी निर्माण झाल्या. याउलट जेव्हा दोन्ही शाखा परस्परांच्या हातात हात घालून गेल्या तेव्हा समाजात, मानवी जीवनमूल्यांमध्ये संरचनात्मक अशीच भर पडलेली आहे. इतिहास याला साक्ष आहे.

विज्ञानाला मर्यादा आहेत आणि या मर्यादांमधून पुढे जाण्यासाठी आपल्याला अध्यात्माची गरज आहे. विज्ञानाच्या कक्षा जसजश्या वाढत आहेत तसतसे आपण सुखी होत आहोत, मात्र त्यामुळे आपण शाश्वत सुखी होऊ शकत नाही. परिपूर्ण सुखासाठी वेगळ्याच गोष्टीची आवश्यकता आहे ती म्हणजे अध्यात्म. आजच्या प्रगत विज्ञानाचे नैतिक व सात्त्विक परिणत स्वरूप म्हणजे अध्यात्म. ख-या सुखाचा प्रवास कायमच विज्ञानातून अध्यात्माकडे होत आलेला आहे. म्हणून मी म्हणू इच्छितो की, विज्ञान ही सुखी जीवनाची सुरुवात आहे तर अध्यात्म हा त्याचा मनोहर शेवट होय!

राजकीय फायद्यांसाठी धर्माचा वापर केला गेल्याचे संकेत जगभर चालू असलेल्या घडामोडी स्पष्टपणे देत आहेत. अशा परिस्थितीत धर्म आणि राजकारण एकमेकांपासून वेगळे ठेवण्याची आवश्यकता आहे का ?

आम्हाला धर्म आणि राजकारण एकमेकांपासून वेगळे ठेवण्याची गरज नाही, खरेतर आम्हाला तथाकथित धार्मिक नेते आणि तथाकथित राजकीय नेते यांच्यापासून दूर राहण्याची आवश्यकता आहे. पुराणकालातील जनक राजापासून शिवाजी राजांपर्यंत राजसत्ता धर्मसत्तेच्या सोबत जात होती तर समाजाचे खरेच भले होत होते. हिंदुपदपादशहा छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याला हिंदवी स्वराज्य म्हणत होते, हजारोंच्या संख्येने मुस्लिम सैन्य त्यांच्या पदरी होते.  इतकेच काय तर त्यांचे अंगरक्षकही मुस्लिम होते तरीसुद्धा ते प्रामाणिक राहतील याची राजांना खात्री होती. कारण धर्मसत्ता आणि राजसत्ता त्यावेळी एकत्र सोबत वाटचाल करीत होत्या आणि त्या एकत्र जाव्या एवढी प्रगल्भता त्या राजांची आणि धर्माचार्यांचीसुद्धा होती. आज जो कोणी उठतो तो स्वत:ला धर्माचार्य म्हणवून घेतो, गल्लीतला कुणीही स्वत: पंतप्रधान असल्यासारखे वागतो आणि आपल्याला हवं ते चार लोकांकडून वदवून घेतो. त्यामुळे आता चालू असलेले राजकारण आणि धर्मकारण समाजाचे कधीही भले करणार नाही. राजकारण आणि धर्मकारण या दोन्ही बाबतीत संतांच्या शिकवणुकीनुसार आचरण ठेवले तरच रामराज्य येईल यात काही शंका नाही.

अखिल विश्वात शांतता नांदावी यासाठी कोणत्या संस्थात्मक उपाययोजना कराव्या लागतील ? तसेच व्यक्तिगत आचरण कसे ठेवावे लागेल ?

माझ्या दृष्टीने संस्थात्मक स्तरावर काहीही उपाययोजना करणे शक्य नाही. व्यक्तिगत स्तरावर सुधारणा होण्याला बराचसा वाव आहे. संतांचे बोल लक्षात घेऊन त्याप्रमाणे आचरण केले तर शंभर टक्के जगात शांतता नांदेल. आम्हाला लोकांच्या चुका दिसतात पण आमच्या स्वत:च्या चुका कधी दिसत नाहीत. शेवटी समाज हा व्यक्तींचाच समूह आहे ना ? म्हणून जेव्हा आमच्या चुका आम्ही व्यक्तिश: सुधारू तेव्हा तेवढ्या प्रमाणात समाज आपोआपच सुधारणार नाही का ? कायदा करून समाजात ख-या सुधारणा होतीत, यावर माझा अजिबात विश्वास नाही. कारण कायदा तयार होण्याच्या आधीच त्याची पळवाटही तयार झालेली असते. किंबहुना तो कायदाच ती पळवाट निर्माण करून ठेवत असतो. म्हणून प्रेमाने व निर्धाराने झालेली व्यक्तिगत स्तरावरील सुधारणा, हाच शांतता नांदण्यासाठी हुकमाचा मार्ग आहे, आणि यात संत वाङ्मयाचा अभ्यास फार मोलाची भूमिका बजावत आहे, यात तीळमात्र शंका नाही.

या आधीचा भाग येथे वाचा

-नितीन कळंबे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here