Home Featured क्षणामृत

क्षणामृत

क्षणामृत

जीवन संजीवनी…

तुम्हाला कोणती फुलं आवडतात.? किती सोपा प्रश्न आहे.. नाही का? आपल्याला कोणता नट.. नेता.. रंग.. सुगंध.. नृत्य.. संगित.. पदार्थ.. पेहराव.. विषय.. आवडतो याचे उत्तर आपल्या अगदी “टिप ऑफ दि टंग” असतं.. असायलाच पाहिजे.. कदाचीत यालाच “principalistic” सुद्धा म्हणता येईल.. म्हणजे तत्ववादी.. परंतू मला माझ्यासाठी हा प्रश्न फार किचकट वाटतो. जे आवडते त्याविषयी शंभर कारणे देत असु तर नावडत्याविषयी किमान दहा कारणे तरी नक्कीच ठोस असावीत.. आणी मग त्या दहा ठोस कारणांच्या शोधात नावडत्याविषयी चिंतन करताना लक्षात येतं की आपण न बघितलेल्या.. अक्षरशः वेडावणाऱ्या.. कितीतरी आकर्षक पैलुंनी नटली आहे ही नावडती बाब.. मला आजपावेतो का याचा साक्षात्कार झाला नाही बरं.. कारण मी स्वःताचे बघण्याचे दृष्टिकोन मर्यादित  संकुचित ठेवले होते. त्यावेळी आणखी एक बाब लक्षात येते की आवडत्या बाबीच्याही नावडत्या सारख्या काही उणीवा आहेतच कि, फक्त मी त्या उणिवांना सढळपणे दुर्लक्षित केले आहे.

मोगरा.. जाई.. जुई.. पारिजात.. सोनचाफा.. गुलाब.. चाफा.. शेवंती.. यांसारख्या, डोळे.. नाक.. स्पर्श.. इंद्रियांना तृप्त करणाऱ्या अशा कैक निसर्ग आविष्कारांवर क्षणात भाळणारे.. कालातीत प्रेम करणारे असंख्य मिळतीत. पण ना रंग.. ना रुप.. ना गंध.. असणारऱ्या साध्या सदाफुलीवरही मोहीत होणारा क्वचितच मिळेल. दोन रंगात फुलणाऱ्या या सदाफुली ल इतरांच्या तुलनेत आपल्यात काय कमी आहे, या स्पर्धात्मक विचाराला वावच नाही. ईश्वराने जे वेगळेपण दिलं तेच भरभरुन जगायला कितीतरी पुरेसं आहे तीला.. आणि म्हणूनच स्वःताच्या आनंदविश्वात दंग असणारी ती, कमी देखभालीत.. कमी पाण्यातही सतत सतत फुलत असते. तिचे फुलणे फक्त तिच्या स्वःतासाठीच.. कुणी तिची दखल घेवो व घेवो; तीच्या फुलण्याच्या विश्वासात तिळभरही फरक पडत नाही. आणि रुप रंग गंधाने लुभावणाऱ्या इतर फुलांच्या या मर्यादा आहेत कि ती विशिष्ट ऋतुतच फुलतात.. म्हणुन ही सदाफुली मला गुरुस्थानी वाटते.

आजच्या स्पर्धेच्या जगात जगताना आपला आनंद किती प्रासंगीक व वस्तुसापेक्ष झाला आहे. मला सुंदर निटनेटके दिसायला आवडते म्हणून मी नटते ही देहवासना व मी नटल्यावर माझ्या सौंदर्याचे कौतुक लोकांनी केले तरच मला आनंद होतो किंवा लोकांनी कौतुक करावे म्हणून मी नटते ही लोकवासना. दोन्ही गोष्टींचा मनावरील परिणाम हा नकारात्मकतेलाच आकर्षीत करतो. आपल्याही नकळत आपण सहजपणे आवडते नावडते विभागल्या जातो. अमावस्या-पौर्णिमे प्रमाणे आयुष्यात येणाऱ्या सुखदुःखांत, दुःख डोंगराप्रमाणे भासायला लागते.. व शेवटी आत्महत्तेसारखे टोकाचे प्रकार घडतात..

विधात्याच्या हरएक कला कृती प्रसंगाकडे जनमानसापेक्षा भिन्न नजरेने बघता आले तर.. विपरीतेतही समरसता आली नाही, तरी अलिप्तपणे न्याहाळायला तरी नक्कीच शिकता येईल.. स्वतःतील बलस्थानं अव्वल ठरण्यासाठी पुरेशी असतात.. केवळ प्रत्येकाने ती जगायला हवीत..

हीच आहे जीवन संजीवनी..

डॉ. सुवर्णा सोनारे-चरपे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here