कर्मयोगी- साने गुरुजी

मातृहृदयी, मातृधर्मी, सानथोरांची माउली, बालकांवर सुसंस्कार करता-करता ईश्वराशी नाते जोडणारे पालक, विद्यार्थ्यांना भूतकाळाची कल्पना देऊन भविष्याच्या दरवाज्यापर्यंत पोहोचवणारे विश्वदर्शी, ‘स्व-तंत्र’ शिक्षक, बलसागर भारताचे स्वप्न पाहणारे, स्वातंत्र्यलढ्यातील एक क्रांतिकारक, ज्यांच्या वाणीतून अन् लेखणीतून अवतरणारे प्रत्येक अक्षर पवित्या आणि मांगल्याने भारावलेले आहे असे साहित्यिक.. भारतीय संस्कृतीचे उत्तुंग आणि भव्य असे अद्वैत दर्शन घडवणारे मार्गदर्शक, लोकसाहित्याचे अनुवादक, संग्राहक, संपादक, किसान-कामगारांचे गोरगरिबांचे कैवारी, समाजसुखासाठी युगधर्म रुजविणारे, प्रेमधर्माची पताका आयुष्यभर फडकविणारे, श्रद्धाशील समर्पण वृत्तीचे नम्र उपासक.. साने गुरुजी..!!!

0
97

सूर्य-चंद्र-तारे आणि प्रकाश यांच्या अतूट नात्याचा अविष्कार महामानव घडवीत असतात.. अखंड मानवजातीच्या उद्धारासाठी, सुखासाठी अंधाराविरुद्ध लढणे हाच त्यांचा ध्यास असतो.. मानवतेच्या उद्धारासाठी सारे आयुष्य फुलांसारखे ज्यांनी उधळून दिले, मातेच्या वात्सल्याची महती मनामनांवर ज्यांनी बिंबवली.. आपल्या साहित्यातून महाराष्ट्राचे सांस्कृतिक जीवन ज्यांनी संपन्न केले, ज्यांच्या वाणीत मंत्रांचे मांगल्य आणि लेखणीत संस्कारांचे सामर्थ्य होते असे संवेदनशील आणि सौजन्यशील वृत्तीने जीवन जगणारे सेवाभावी सेनानी.. परमपूज्य ‘साने गुरुजी’ म्हणजेच ‘पांडुरंग सदाशिव साने’

“अवघाची संसार सुखाचा करीन |

आनंदे भरीन तिन्ही लोक ||”

हि भारतीय संतवाणी खऱ्या अर्थाने जगणारे देवदूत.., निसर्गाचे वरदान लाभलेल्या रम्य कोकणच्या भूभागातील रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड या गावात त्यांचा जन्म झाला.. वडील पारंपारिक खोती पद्धतीचे छोटे जमीनदार.. तरीही भावनाशील आणि उदार मनोवृत्तीचे.. गरिबीचं जीवन आनंदाने जगात होते.. अश्या घरात २४ डिसेंबर १८९९ रोजी मुलगा जन्माला आला.. त्याचे नाव ठेवले महाराष्ट्राच्या आराध्य दैवतावरून.. ‘पांडुरंग’.. परंतू त्यांची आई त्यांना पंढरी म्हणे.. पंढरीची आई म्हणजे तर साक्षात वात्सल्यमुर्ती.. मुला-बाळांवर, गाई-गुरांवर, झाडा-माडांवर निस्वार्थीपणे माया करणारी थोर माउली.. “मातृदेवो भव” असं फक्त म्हणण्यापेक्षा मुलाला मनातून तसं वाटावं यासाठी तिची सारी धडपड चालू असायची.. म्हणूनच हि पंढरीची आई यशोदाबाई.. अवघ्या जगासाठी श्यामची आई झाली.. वडिलांच्या शिस्तीत.. आईच्या मायेत.. शाळेच्या औपचारिक शिक्षणात.. आणि घरातील सहज शिक्षण संस्कारात पंढरीची जडणघडण होत होती..  शिक्षणावाचून तरणोपाय नाही हे ओळखून पंढरीस शालेय शिक्षणासाठी दापोलीस पाठवण्यात आले.. तिथे साहित्याचा संस्कार, कवितालेखन, व्याख्याने, कीर्तनं, देशभक्ती आणि देशप्रेम यांद्वारे पंढरीच्या सर्वांगीण विकासाला हातभार लागला.. अनेक वेळा उपाशी राहून.. प्रसंगी हाताने स्वयंपाक करून.. खडतर परिस्थितीतही न डगमगता कष्टाने शिक्षण पूर्ण केले. ग्रंथालयरूपी ज्ञानमंदिराचा अधिकाधिक लाभ घेऊन मराठी, इंग्रजी, हिंदी, बंगाली, गुजराती, तेलुगू, मल्याळम, भाषांतील उत्तमोत्तम साहित्यांचे ज्ञानार्जन त्यांनी केले.. भाषिक विविधतेतील भावना आणि विचारांच्या एकतेचा प्रवाह बळकट करण्यासाठी आणि विविध भाषांतील प्रेरणादायी साहित्याचे मराठी माणसाला रसग्रहण व्हावे यासाठी त्यांनी अनुवादकाची भूमिका पार पाडली..

कवितेच्या माध्यमातून त्यांच्यातला निसर्गकवी सातत्याने मनुष्याला प्रेरणादायी ठरतो..

“वर वाडे कानांमध्ये, गीत गाईन मुला

ताप हरीन शांती देईन, हस रे माझ्या मुला..”

सभोवतालची सृष्टी हसवायला तयार असता माणसाने दुःखी-कष्टी होवू नये हीच भावना या काव्यातून प्रकट होते..

याच काळात भारतीय स्वातंत्र्यलढा प्रखरपणे चालू होता.. एक सेवाभावी, देशभक्त सेनानी यापासून अलिप्त राहणं केवळ अशक्य होतं.. आपल्या विद्यार्थ्यांसोबत त्यांनी प्रत्यक्ष स्वातंत्र्य चळवळीत सहभाग सहभाग घेतला.. महात्मा गांधींच्या दांडी सत्याग्रहात ते अग्रक्रमाने होते.. अनेकदा कारावास भोगावा लागला परंतु तिथेही त्यांनी विचारांनी चैतन्य निर्माण केले.. लढ्याच्या काळात भारतमातेचे आणि स्वातंत्र्याचे महत्व पटवून देणारी आणि स्वातंत्र्योत्तर काळात सुराज्य निर्माण करणारी दिशादर्शक गीते हजारो तरुणांना प्रेरक ठरली.. “स्वातंत्र्याचे आम्ही शिपाई”, “आता उठवू सारे रान” त्यांची अशी एक ना अनेक गीते जनमानसात दुमदुमली..

ऑगस्ट १९३२ नाशिकच्या तुरुंगात स्फूर्ती, प्रासादिकता आणि तन्मयतेच्या एका दिव्य भावावस्थेत जन्माला आलेले, अतीव माधुर्याने, मांगल्याने ओथंबलेले एक महाकाव्य, मातृप्रेमाचे महामंगल स्त्रोत.. “श्यामची आई”; आपल्या बालपणी आईकडून मिळालेले उदंड प्रेम आणि शुभसंस्कार हीच त्यांची जीवनसत्वे आणि रक्षणकर्ती कवचकुंडले बनली.. या सर्वाचे यथोचित वर्णन करणारी मराठी साहित्यातील एक अजरामर कलाकृती, जीवनातील मुलभूत संस्कारांची शिदोरी साने गुरुजींनी साऱ्या जगातील माय-लेकरांना श्यामच्या आईच्या माध्यमातून खुली केली..

पंढरीला आईने अंघोळ घातली.. मोरीतून बाहेर येताना पंढरी म्हणाला, ”आई, तुझा पदर पसर म्हणजे त्यावर मी तळपाय कोरडे करतो.. म्हणजे त्याला घाण लागणार नाही..!!” आईने पदर पसरला.. पंढरीने त्यावर पाय ठेवताच ती म्हणाली, “पंढरी अरे.. तळपायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, तसेच मनाला घाण लागू नये म्हणूनही जप हो..”

यातूनच मनाची पवित्रता सुंदरता जपण्याचा मोलाचा संदेश श्यामची आई देते.. “कोणत्याही कामाची लाज वाटू देऊ नका” असा उपदेश ती देते.. ‘दुसऱ्याच्या अंगणातील फुले तोडून ती आपल्या देवाला वाहावी’ हे चुकीचं ठरवून स्वकष्टाची जाणीव आणि निस्वार्थीपणाने जगण्याची शिकवण ती देते.. गरीब-दुबळ्यांची मदत करण्यास लाज बाळगू नका असे सांगून सेवावृत्ताचे आणि सर्वधर्मसमभाव पाळण्याचे बाळकडू ती पाजते.. माझी मुले चांगले काम करताना न लाजणारी, निर्भय मनाची, सर्वांशी चांगुलपणाने वागणारी, माणसांवर आणि निसर्गावर माया करणारी असावीत; यासाठी आईवडिलांनी प्रसंगी कठोर व्हायलाही हरकत नाही.. अश्या उदात्त सुसंस्कारी विचारांनी भारावलेली साने गुरुजींची आई आजच्या काळातील आधुनिक मातांसाठी आदर्श आहे.. मार्गदर्शक आहे..

आजच्या काळाचा विचार केला असता.. आई-वडील नोकरी व्यवसायामध्ये व्यस्त असल्यामुळे मुलांशी होणारा संवाद कमी होत चालला आहे.. पाश्चात्य संस्कृतीचा अतिरेक.. प्रसार माध्यमे.. मोबाईल-इंटरनेट च्या अतिप्रगत सुखसाधनांमध्ये आपल्या मुलांना वाढवताना त्यांच्या वैचारिक प्रगतीसाठी विशेष प्रयत्न केले जात नाहीत.. यातूनच मग मुलांमध्ये आत्मविश्वास कमी होणे, न्यूनगंड वाढणे, वाईट सवयी लागणे, व्यसनाधीनता, मानसिक विकार बळावणे अश्या गंभीर समस्या निर्माण होताना दिसतात.. म्हणूनच गरज आहे मुलांना सुसंस्कृत करण्याची.. सुसंस्कृतपणा हा केवळ संस्कारांनीच निर्माण करता येतो.. मुलाचं मोठं होणं.. उन्नत होणं.. हे सभोवतालच्या सृष्टीपेक्षाही आई-वडिलांच्या कृत्यांवर आणि जागृत असण्यावर अवलंबून असतं.. लहानपणापासूनच त्यांच्यावर श्यामच्या आईचे संस्कार रुजवले तर मुलं शारीरिक तसेच मानसिक दृष्ट्या सक्षम बनतील.. मुलांना आयुष्यात यशस्वी पहायचे असेल अत्र त्यांना केवळ सावलीत न वाढवता, ऊन-पावसाचा मारा सुद्धा झेलायला.. संघर्षातून.. स्वकष्टातून.. जगायला शिकवले पाहिजे.. जसे की शेतकरी आपल्या शेताच्या मधोमध मोठी झाडे लावत नाही.. कारण त्याच्या सावलीत बीज रुजत नाही.. आणि रुजले तरी संपूर्णतेने पीक वाढत नाही.. अगदी तसेच मुलांचा संपूर्ण विकास होण्यासाठी त्यांना सर्व जीवनमुल्यांशी सामोरे जायला पाहिजे.. यातूनच प्रत्येकाचे जीवनमान सर्वांगाने उंचावेल, आणि जे समाजोद्धारासाठी क्रमप्राप्त आहे..

साने गुरुजींचे विधायक कार्य तेजस्वी होते.. स्वतंत्र शिक्षकाच्या भूमिकेत शिक्षणाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टीकोन, परमपवित्र, उदात्त आणि निसर्गप्रधान होता.. यालाच शब्दात बांधताना  ते म्हणतात.., “करी मनोरंजन जो मुलांचे, जडेल नाते प्रभुशी तयाचे”

निसर्गनिर्मित विषमता विज्ञानाच्या सहाय्याने आणि मानवनिर्मित विषमता भावना जागवून कमी करत नेणे.. हे गुरुजींना अगत्याचे वाटत होते.. म्हणूनच पंढरपूरच्या पांडुरंगाची विषमतेच्या बेड्यातून मुक्तता करून ‘सानेंच्या पांडुरंगाने’ अस्पृश्यता निवरणाला नवसंजीवनी दिली.. त्यांनी एक समताधिष्ठीत सामाजिक क्रांती घडवली.. ‘सेवा दल’ हा गुरुजींचा प्राणवायू होता.. ‘साधना’ नावाच्या साप्ताहिकातून हि जीवनसेवा अखंड चालू राहिली..

‘मी समाजासाठी, समाज माझ्यासाठी’ हा त्यांचा जीवनमंत्र होता.. ‘बलसागर भारत होवो, विश्वात शोभूनी राहो’ ही त्यांची जीवनाकांक्षा होती.. तर ‘खरा तो एकाची धर्म, जगाला प्रेम अर्पावे’ ही त्यांची जीवनदृष्टी होती.. सेवेचे प्रचंड काम करूनही आपल्या हातून काहीच सेवा होत नाही, असं त्यांना नेहमी वाटत असे.. स्वतःविषयी अत्यंत लघुत्वाची, नगण्यतेची भावना त्यांच्या मनी वसत होती.. स्वातंत्र्यसुर्योदयानंतरही विषमतेचा.. दारिद्र्याचा.. अंधार दूर करू शकत नाही, या निराशेने ते ग्रासले.. आणि एका उद्विग्न अवस्थेत त्यांनी आपली जीवनज्योत मालवली..

 दीनांचा कळवळा असणारा, त्याग.. सेवा.. प्रेम.. शांती.. अक्षरांना.. न्याय देणारा, अथांग करुणादायी अमृतपुत्र, संस्कारदीप आज हि आपल्या साहित्याद्वारे आपणा सर्वांना प्रकाशपथ दाखवत आहे.. उद्याच्या चैतन्यदायी जीवनासाठी प्रत्येकाने हा संस्कारदीप मनाच्या गाभाऱ्यात सदैव तेवत ठेवला पाहिजे..

Previous articleसुरेल वाटचाल- धवल चांदवडकर
Next articleगगण ठेंगणे- आशिष तांबे
Healer by proffesion.. represents as a social activist.. works for rural health.. especially for women health by medical camps and health care talks.. Also taking interest in writing about various social issues.. expecting transformation in society by means of love, honesty and strong moral values..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here