अभिनिवेष- सिद्धार्थ चांदेकर

सिद्धार्थ मुलाखतीच्या सुरुवातीला आपण तुझ्या बालपणाबद्दल बोलूत.. तुझं बालपण कसं गेलं.. शाळेत देखील तू सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये वगैरे भाग घ्यायचास.. बालनाट्य वगैरे काही..?

हो.. म्हणजे मी अगदी, पहिली-दुसरीत असताना ‘थरार’ नावाची एक मालिका केली होती.. तेव्हा झी मराठी च्या ऐवजी अल्फा मराठी हे चॅनेल लागायचं.. आणि तेव्हा पासूनच या क्षेत्रात काम करण्याची एक नकळत आवड निर्माण झाली.. मी शाळेमध्ये असताना.. आंतरशालेय एकांकिका स्पर्धांमध्ये वगैरे देखील भाग घायचो.. बालनाट्यांमध्ये काम करायचो.. म्हणजे एकूणच अगदी लहानपणापासून मी या क्षेत्राशी सरावलेला आहे..

तू पुण्याच्या SPचा.. SP म्हंटलं कि नाटकएकांकिका.. पुरुषोत्तमफिरोदिया करंडक या सगळ्या गोष्टी अग्रणी असतात.. कला क्षेत्रात पदार्पणासाठी SP हे खूप प्रभावी माध्यम आहे असं तुला वाटतं का..?

नक्कीच.. आम्ही SPला असताना पुरुषोत्तम-फिरोदिया तर केलंच.. शिवाय सवाई करंडक.. सकाळ करंडक.. पु. ल. देशपांडे करंडक.. अश्या बऱ्याच स्पर्धा केल्या होत्या.. आमची एक एकांकिका होती, ‘पोपटी चौकट’ नावाची.. जी मी आणि मृण्मयी देशपांडे आम्ही दोघांनी केली होती.. त्या एकांकिकेने तर अक्षरशः सगळ्या स्पर्धा आम्हाला जिंकून दिल्या.. म्हणजे आपल्या पुरुषोत्तम पासून ते मुंबईच्या सवाई करंडक पर्यंत.. आणि हे सगळं मी SP द्वारेच करू शकलो होतो..

SP हे असं माध्यम आहे कि जिथे तुमच्यातल्या कलागुणांची नेहमीच कदर होते.. इथल्या Art circle मधेही तुम्ही स्वतःला अनेक निकषांवर पडताळून पाहता आणि माझी कला अजून समृध्द आणि प्रगल्भ कशी होईल या कडे विशेष लक्ष देता.. मला वाटतं यातूनच तुम्हाला अनेक कवाडं खुली होतात.. जी अनेकदा व्यावसायिक तत्वावर तुम्हाला कला क्षेत्रात ओळख मिळवून देतात..

हमने जीना सिख लिया..(2007) या हिंदी सिनेमातून तू पहिल्यांदा पडद्यावर दिसला होतास.. काय भावना होत्या तुझ्या, स्वतःला पहिल्यांदा पडद्यावर पाहताना..?

मस्त वाटलं होतं अगदी.. कारण मला ज्या क्षेत्रात जाण्याची इच्छा होती त्यातलं हे पहिलं पाउल होतं.. हा चित्रपट शाळा या मिलिंद बोकील यांच्या कादंबरीवर आधारित होता.. अनेक हौशी लोकांनी एकत्र येऊन केलेला असा हा चित्रपट.. त्यांनी अक्षरशः जीव ओतला होता त्यात.. जवळपास शंभर एक लोकांनी मिळून त्यात पैसे लावले होते.. कलेची सेवा करणं आणि एक उत्तम कलाकृती निर्माण करणं या पलीकडे त्यात कोणताच हेतू नव्हता.

अग्निहोत्र (२००८) या मालिकेतून तू नील अग्निहोत्री या भुमिकेद्वारे TV क्षेत्रात पदार्पण केलंस.. ती मराठीतली एक multi starrer मालिका होती.. काय दिलं तुला अग्निहोत्र या मालिकेने.. कशी मिळाली होती हि भूमिका..?

अग्निहोत्र ने काय दिलं.. असं शब्दात नाही रे सांगता येणार.. पण हो, अग्निहोत्र ने मला स्वतःची अशी ओळख दिली.. मला तो पर्यंत असं अजिबात वाटलं नव्हतं कि मी TV क्षेत्रात काम करेन.. मी सुदर्शन रंगमंच पुणे यांच्या कडून Grips concept ची नाटकं करायचो.. हि एक जर्मन concept आहे खरंतर.. हि बालनाट्यच असतात पण यातल्या भूमिका मोठ्यांनी साकारलेल्या असतात.. त्यात माझी भूमिका श्रीरंग गोडबोले यांनी पहिली आणि मला audition ला बोलावलं.. ती संपूर्ण प्रोसेस सुरळीत पार पडली.. मला ती भूमिका मिळाली.. आणि माझ्या करियर ला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली..

सिद्धार्थ वयाच्या १९व्या वर्षी तू अवधूत गुप्तेच्या झेंडा (२०१०) या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपट सृष्टि मधे आलास.. काय सांगशील तुझ्या या पहिल्या चित्रपटाबद्दल.. अवधूत दादा बद्दल..?

झेंडा मधली माझ्या वाट्याला आलेली भूमिका.. उमेश जगताप.. त्याचा लूक हा नील अग्निहोत्री शी बऱ्याच अंशी मिळता जुळता होता.. त्याच्यातला firmness.. matureness.. त्याचा स्वभाव.. आणि तसंच character अवधूत दादाला झेंडा साठी अपेक्षित होतं.. त्याने माझी मालिका पहिली होती.. आणि तिथे माझं काम पाहून मला audition ला बोलावलं होतं..

तेव्हा त्याने माझ्या कडून एका गाण्यासाठी improvisation करून घेतलं.. जे त्याला खूपच आवडलं.. ते गाणं होतं.. “सांग ना रे मना..” त्यानंतर आम्ही scriptचं वाचन केलं आणि तो चित्रपट मिळाला मला.. तसं पाहायला गेलं तर तो माझा पहिला चित्रपट होता.. आणि त्यासाठी अवधूत दादाचे आभार मानावे तेवढे थोडे आहेत..

हमने जीना..(२००७) ते लॅास्ट अँड फाऊंड..(२०१६) या दरम्यानच्या काळात तू झेंडा, लग्न पहावे करुन, Online-Binline, बावरे प्रेम हे, क्लासमेट्स यांसारखे अनेक दर्जेदार चित्रपट दिलेस.. सुरुवातीचा तू.. ते आजचा तू.. अनेक स्तित्यंतरं आली असतील.. तुला जाणवतो तो बदल..?

हो अरे नक्कीच जाणवतो बदल.. मी आधी खूप भिरभिरा होतो.. म्हणजे मला एकाच वेळेला १० गोष्टी कराव्याश्या वाटायच्या.. मला मी करत असलेली पहिलीही गोष्ट आवडायची दुसरीही आवडायची.. तिसरीही आवडायची.. पण माझ्या सुदैवाने मी आजतागायत अनेक अप्रतिम अभिनेत्यांबरोबर काम केलंय.. म्हणजे अगदी सुरुवातीपासूनच मोहन जोशी.. विक्रम गोखले.. डॉ. मोहन आगाशे.. शरद पोंक्षे.. अविनाश नारकर यांसारख्या दिग्गजांपासून ते आत्ता आत्ता अंकुश चौधरी.. हेमंत ढोमे.. सई ताम्हणकर.. आणि नाटकांमधून चंद्रकांत कुलकर्णी.. वैभव मांगले.. प्रसाद ओक..

या प्रत्येकाने मला खूप शिकवलंय.. म्हणजे मी वेळोवेळी त्यांच्याकडून शिकत आलोय.. त्यांच्या वागण्यातून मला कळत गेलं कि काय करायला हवंय.. आणि काय नाही.. त्यांच्या मुळे माझ्यामध्ये जरा शांतता आलीये.. stability आलीये.. मला वाचनाची आवड लागली.. मी पुस्तकं वाचायला लागलो.. त्यामुळे माझा अभिनय प्रगल्भ व्हायला मदत झाली.. आता मी माझ्या कामामध्ये जास्त focused असतो.. मला वाटतं हीच ती स्तित्यंतरं..

सिद्धार्थ तू आजतागायत इतक्या भूमिका केल्यास; पण तुला खरी ओळख (किवा प्रसिद्धी) आदित्य सरपोतदार च्या क्लासमेट्स या सिनेमाने दिली.. तुझं काय मत आहे या बद्दल..?

खरी ओळख म्हणण्यापेक्षा एक वेगळी ओळख असं मी म्हणेल.. कारण झेंडा मधल्या उमेश ने मला एक ओळख दिली होती.. अग्निहोत्र मधल्या नील नेही मला एक ओळख दिली होती.. पण क्लासमेट्स मधल्या आन्याने मला एक वेगळीच ओळख दिली.. एक chocolate boy ची ओळख दिली असं मी म्हणेल..

तुझ्या एकुणच अभिनय प्रवासात Milestones ठरलेल्या काही भूमिकांबद्दल ऐकायला आम्हाला आवडेल.. (Movie, एकांकिका, नाटक, मालिका, यातील कोणतीही..)

मला नाही वाटत कि अशी कोणती भूमिका माझ्या वाट्याला अजून आलीये.. म्हणजे मी आजवर अनेक चांगल्या भूमिका केल्या आहेत पण Milestone ठरेल अशी कोणती भूमिका त्यात होती असं मला काही ठरवता आलं नाही कधी.. ते लोकांनी ठरवावं.. त्यांना जी भूमिका आवडेल ती माझ्यासाठी Milestone असेल.. कारण जर मी असा विचार करत राहिलो तर माझी वाढच खुंटेल.. आणि मला अजून असंख्य भूमिका करायच्या आहेत..

तुझी एकुणच अभिनयाबाबतची Growth पाहिली असता.. तू उत्तरोत्तर अतिशय प्रगल्भ आणि प्रतिभावान अभिनेता म्हणून तुझं अढळस्थान निर्माण करत आहेस.. आज मराठी चित्रपट सृष्टितल्या अग्रणी नावांमध्ये तुझं नाव येतंच.. या संपूर्ण यशाचं श्रेय तू कुणाला देतोस..?

माझ्या सगळ्या सह-अभिनेत्यांना.. मी आजतागायत ज्या ज्या अभिनेत्यांसोबत काम केलं आहे त्या सगळ्यांचं हे श्रेय आहे.. त्यांच्या शिवाय हि गोष्ट केवळ अशक्यप्राय होती.. त्यांनी मला वेळोवेळी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे बऱ्याच गोष्टी शिकवल्या आहेत.. आणि आज माझ्या अभिनयामध्ये त्याचीच पावती वेळोवेळी मिळत असते.. पण मुळात हे सगळं यश पचवायला आपण जमिनीवर टिकून असणं खूप गरजेचं असतं.. आपण माणूस म्हणून चांगलं असणं.. संस्कारी असणं गरजेचं असतं.. आणि हे मला माझ्या आईने शिकवलं.. मी जमिनीवर टिकून आहे न याची खातरजमा करून ती माझं यश नेहमी साजरं करायची..

यशासोबतच असुरक्षिततेची जाणीवही येतेच.. आज ज्या पठडीतलं काम तुम्हाला यशस्वी बनवतं; त्याच पद्धतीची भूमिका उद्या देखिल यश देईलच असं नाही.. पुढची भूमिका स्विकारताना कधी असुरक्षितता जाणवते..?

असुरक्षितता तसं पाहायला गेलं तर सगळ्यांच्याच अवतीभवती असते.. कारण आज स्पर्धा खूप वाढलीये.. आणि खरंतर मला काहीच गैर वाटत नाही त्यात; जर तुम्ही insecure feel करत असाल तर.. कारण त्या मुळेच तुम्ही स्वतःला पुन्हा एकदा पारखून पाहू लागता.. स्वतःतल्या कमी शोधायला लागता आणि त्यांना कसं दूर करता येईल यासाठी प्रयत्न करू लागता.. हां पण जर का त्या insecurity ला तुम्ही शरण गेलात तर मग तुम्ही तिथेच संपता.. खरंतर मलाही बऱ्याचदा अशी असुरक्षितता जाणवलीये पण ती माझ्यावर कधी overpower झाली नाहीये..

अजून १० वर्षांनी तू स्वत:ला कुठे पाहतोस..?

अजून १० वर्षांनी मी स्वतःला त्याच लोकांबरोबर पाहतो ज्यांच्यासोबत मी आत्ता आहे.. तुमच्या कामामुळे तुम्ही मोठे वगैरे होऊ शकता.. कारण तुमचं काम तुम्हाला खूप पुढे नेऊ शकतं.. पण तुम्ही तेव्हाही तुम्हाला तिथपर्यंत घेऊन येणाऱ्या त्या प्रत्येक व्यक्तीबरोबर असायला हवंय असं मला तरी वाटतं..

Feel the content.. But ask for more..!! is our Tagline.. ज्या प्रमाणे शब्दीप्ता स्वतःकडून नेहमीच जास्तीची अपेक्षा करतं.. त्या प्रमाणे अभिनेता सिद्धार्थ चांदेकर स्वतःकडून अश्या कुठल्या जास्तीची अपेक्षा करतो..?

मी नेहमीच माझ्या कडून खूप जास्तीची अपेक्षा करतो अरे.. माझं कोणतंही आधीचं काम पाहताना मला असं सतत वाटत असतं कि मी हे अजून चांगलं करू शकलो असतो.. इथं मला सुधारणा करायला तसा scope होता.. आणि खरंतर तुमची स्पर्धा कुणाशी असेल तर ती सगळ्यात जास्त तुमच्या स्वतःशीच असते.. त्यामुळे तुम्ही आज जे आहात त्यापेक्षा उद्या better असणं खूप गरजेचं असतं..

तुझे काही आगामी प्रोजेक्ट्स..?

आगामी प्रोजेक्ट्स मध्ये.. २-४ चित्रपट आहेत.. ज्यात कि सचिन कुंडलकरांचा वजनदार.. समीर जोशी यांचा बस स्टॉप.. आणि राकेश सारंग यांचा वारस हा सिनेमा आहे.. तुम्हाला वेळोवेळी या प्रोजेक्ट्स बद्दल वाचायला ऐकायला नक्कीच मिळेल..

-तुषार पवार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *