शाश्वत-अटळ, – उंबरठा

जन्म, त्या दाराचं पहिलं पाऊल जिथे आपण त्या अटळ सत्याच्या दिशेने पुढे सरकतो. हा जन्म त्या वाटेवरचा वाटसरू, जिथे अनेक स्वप्नांशी, परिस्थितीशी, भिन्न गोष्टींशी तो सोबत करून, हातात-हात घालून त्या दिशेने चालतो. हा जन्म चालता-चालता आपली शारीरिक अन मानसिक अवस्था बदलतो "वेळेप्रमाणे".. जसं ते बालपण! त्या अटळ सत्याच्या दारापर्यंत त्याला सोबत करतं. ती अवस्था त्याला रांगत, पळत, पडत का होईना त्या दारापर्यंत घेऊन जातं..

ही अवस्था त्या जन्माला घडवते. पण हा जन्म दडलेला असतो खूप अशा गोष्टींपासून, त्याला माहितीच नसतं त्या दारपलिकडचं जग.. स्वप्न फक्त डोळ्यांत साठवून, आहे त्यात भागवून घेत असतो. पण या दाराच्या पलीकडे त्या उंबरठ्याच्या आत नक्की कुठलं जग आहे यापासून तो अनभिज्ञ असतो. ते दार खुलं करून देत, बालपण त्या जन्माला अन तो जन्म त्या दाराच्या उंबरठ्याशी येऊन उभा असतो. जिथे या उंबऱ्यावर तो जन्म पाऊल ठेवतो.. तेव्हा त्याला जाणीव होते की, ती डोळ्यांत साठवलेली स्वप्नं फक्त डोळ्यांतच नाही ठेवायचीयेत, तो पाहिलेला चंद्र फक्त बघून हसण्यातच नाही घालवायचा. त्या आकांक्षा फक्त त्या क्षितिजावर नाही रेखाटायच्या. तर ,ते आता जगायचं.! मिळवायचं, अन जपायचं! हा उंबरठा त्याला त्या बालपणाच्या जमिनीवरून एक पाउल वर उचलून धरतो. फक्त त्या उंबरठ्याची उंची वाढलेली नसते, तर वाढलेलं असतं जगण्याचं साध्य, ते ध्येय, तो उंबरठा त्या जन्माला खूप गोष्टींशी अवगत करून देतो.. की, जी स्वप्नं आहेत ती पूर्ण होतात. ती वाट आहे ती लांब कुठेतरी जाते. जिथे त्या उंबरठ्यापासून सुरुवात होते नव्याने उडण्याची. त्या जन्माला आता माहिती असतं कुठे हिंडायचं! कसं बागडायचं!! तो जन्म आता पंख पसरतो बिनधास्त, त्या शरीराच्या अन मनाच्या ताकदीवर.

जिथे त्या जन्माची भेट होते त्या आयुष्याशी, जो नेहमी त्याला एका काजव्याच्या डोळ्यांतून बघत असतो, स्वतःची तुलना त्या “सूर्याशी” करत असतो अगदी निर्भीड. हा जन्म आता खूप गोष्टींशी सोबत करतो.. ती स्वप्नं जी त्याने पाहिली, ज्यासाठी त्याने प्रयत्न केले “ती” त्याने पूर्ण केली. हा जन्म ओलांडतो तो उंबरठा जिथे त्याच्या महत्वकांक्षाना, स्वप्नांना नवी उंची मिळते. तो जन्म आता सोबत करतो आता त्या मित्रांची, प्रेमाची “ती” वाट सर करण्यात. हा जन्म झुंझतो, झुकतो आपल्या लोकांसाठी, जगतो आपल्या प्रेमासाठी. सारं जग तेव्हा ठेंगणं वाटतं पण त्याला दुःख नसतं की, आपण आता उंबरठा ओलांडून अर्धी वाट मागे लोटली ते! तो जन्म सतत चालत राहतो..  दुःखी पण होतो जेव्हा अहंकाराने ग्रासला जातो. कारण जशी वाट वळण घेईल तसं मन ही वळण घेतंच ना! मग एखादी गोष्ट हाती आली नाही तर शोक करतो कधी-कधी. पण चालायचं थांबत नाही.

ही उंबरठ्यापासून सुरू झालेली वाट त्याला खूप ठिकाणांना घेऊन जाते, जिथे कधी-कधी ओझं असतं आपल्या अपेक्षांसहित दुसऱ्यांच्या अपेक्षांचं. जिथे घर असतं आपल्या सुखात सुख मानणारं अन आपल्या दुःखात आपल्याला कुशीत घेणारं. एक वळण असतं जिथे तो जन्म त्या प्रेमासाठी सतत फेऱ्या मारत असतो. जिथे तो अभंग प्रेमाची स्वप्नं रचत असतो. जन्म कधी-कधी तिथेही जातो जिथे दुसऱ्यांचे डोळे काही औरच सांगत असतात त्यांच्या बोलण्यापेक्षा अशा जाणीवहीन लोकांकडे. हा जन्म त्या वाऱ्याच्या लहरी सोबत खेळतो, फिरतो. कधी त्या संकटाच्या वावटळीत अडकतो. कधी त्या प्रेमसागरात बुडतो तर कधी मनाचा सल सोसतो. हाच जन्म मनाच्या प्रत्येक अवस्थेत दंगतो, गुरफटतो, कधी ठेच लागून शहाणा होतो तर कधी अनुभवातून शिकतो. हाच जन्म वेंधळ्यासारखा पडतो, दुसऱ्यासाठी जगतो तसंच प्रेम ही वाटतो. या सगळ्या प्रवासात तो दोन पाऊलं थांबतो त्या वाटेवर पण एक मोठा श्वास घेऊन परत त्याच दिशेने निरंतर चालण्यासाठी सज्ज असतो, जिथे त्या उंबऱ्याच्या पलीकडे असतं एक सत्य शेवटचं.. अन् ते ही “अटळ”.

-ऋतुजा

Previous articleचार पावसाळे अधिक- B+ve विचारगट
Next articleब्रह्मानंद- मीराँ गिरधर प्रेम दिवाँणी

4 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here