Home Featured क्षणामृत- जीवन संजीवनी

क्षणामृत- जीवन संजीवनी

क्षणामृत- जीवन संजीवनी

“सकाळी सकाळी  नोटा काय दाखवता? सुटे घेऊन निघता येत नाही..? सुटे असल्याशिवाय तिकीट नाही.. पुढल्या स्टॉपला उतरा.. व्हा पुढे..” कंडक्टरने राधाला चांगलेच खडसावले. ती आपली अपराधी नजरेने पुढल्या दाराकडून निघाली.. तेवढ्यात पाठीशी उभ्या विशीतल्या गोविंदने पाच रुपये राधेपुढे धरत म्हणाला “मॅडम.. हे घ्या. काढा तिकीट..” हो – नाही म्हणत राधाने तिकीट काढले अन् पुन्हा गोविंद कडे हातातली दोनशेची नोट धरली.. तो उत्तरला.. “सॉरी.. नाहीतर मी पण कंडक्टरचा डायलॉग बोलेन बरं..” आणि भर गर्दीत दोघांचा मुक्त हशा पिकला..

राधेच्या ऑफीसची आणि गोविंदच्या कॉलेजला सोबत जाणारी ती बस आता राधाला हवीहवीशी वाटु लागली. ती गोविंदसाठी कधीतरी मुलांसाठी बनवलेल्या डब्यातील खाऊ.. भाजीपोळी.. स्नॅक्स आणायची. गोविंदचा बोलका मोकळा स्वभाव तिला फार भावला होता. त्यांची शायरीची आवडही एकच असल्याने त्या एक तासाच्या प्रवासात ती दिवसभर उर्जा मिळेल एवढ्याने हसुन घ्यायची.

आई हल्ली एवढी मस्तमौला मुडमधे कशी यापेक्षा ती आपल्याला हवी तशी वागतेय म्हणुन मुले आईवर जाम खुश होती. आज तिने गोविंदला घरी जेवायला बोलावले होते. फार उत्साहाने घर आवरलं. अजिंक्यशी जुजबी परिचय करवुन ती त्याला सरळ किचनमधे घेवुन गेली. अजिंक्य हॉलमधे नेहमीप्रमाणे पेपरमधे आणि नंतर लॅपटॉपवर रुतुन होता. इकडे स्वयंपाकघरात भजी तळताना छान मुशायरा रंगात आला होता. खरे तर दोघांच्या वयातलं अंतर विस वर्षांचं.. पण पुर्वजन्मीचा जिवलग असा राधेला तो भासला. गोविंदला तिची घरातली सजावट.. दारातील रांगोळी.. थोडा धसमुसळा मिश्किल टोन.. अन् भारावून टाकणारी संवेदनशिलता फक्त रुचलीच नव्हती तर तो अजिंक्यसमोर तिच्याविषयी भरभरुन बोलला देखील होता.. अजिंक्यला जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत नॉमिनेटही करुन गेला..

राधा आज फार समाधानाच्या हावभावांनी निजली होती.. अजिंक्यला उगाच आपण कुठेतरी चुकतोय असे वाटुन गेले.. सोळा वर्षांचा हा सुखी संसार रेटतांना राधेच्या या गुणांकडे मी का बघीतले नाही.. तीला मी मॅच्युअर्ड म्हणून गृहीत धरले अन् ती त्यात खरी उतरत गेली. आता त्याला आठवु लागलं. गेली कित्येक वर्षं आम्ही दोघांनी करिअर.. बँकबॅलन्स.. फ्युचरप्लॅन्स.. मुलांचं शिक्षण.. घरातील मोठ्यांची आजारपणं.. नातेवाईकांतील लग्नसराई वगैरे सोडून कसल्याच गप्पा केल्या नाहीत.. तु अजुन कशी? हे जाणण्याची गरजच भासली नाही. तु मला हवी तशी.. यातुनही तु कितीतरी पुरुन उरतेस गं.. विकऐंडला सिनेमा वा हॉटेलिंगमधेही राधा किंवा मी आज एवढा रिलॅक्स वा मजेशिर कधीच वागलो नाही. तीच्या चांगुलपणाचं इतरांनी कौतुक केलं तरी मी कर्तव्य याच नजरेने त्याकडे बघीतलं..

खरंच.. राधेतील ही अल्लड राधा मीच अपेक्षेच्या दाराआड कोंडुन तर ठेवली नाही ना.. तिच्यावर पुर्णतः माझाच हक्क म्हणतो मी.. पण तीच्या मनाच्या ह्या कोपर्‍यात मी कधी शिरलोच नाही. चाळीशीतही किती निरागस अन् निखळ हसत होती ती आज. तिने माझ्यापुढे कधीच कसली खंत बोलुन दाखवली नाही. मी एखादी इच्छा बोलून दाखवावी अन् राधेने समर्थ पणे त्यासाठी चारपावलं जास्त झटावं.. शेवटी घरातल्यांची क्रेडीटमाला माझ्याच गळ्यात.. राधा किचनच्या कोपऱ्यातुन मंदशी हसुन कामात व्यस्त.. एवढीच राधा मी माझ्या वाट्याला वाढुन घेतली होती.. मीच अपुरा पडलो की काय? की जगातील सगळी भौतिक सुखं राधेच्या पुढ्यात ठेवण्याच्या नादात तिचं खरं सुखं कश्यात हेच विचारायचं विसरलो..?

स्त्रीरूपी कळी फुलवण्यासाठीच तर ती पुरूषाच्या गळ्यात; त्याचं आयुष्य सुगंधी करण्यासाठी माळली जाते.. ज्याला आपण विवाहसंस्कार म्हणतो. पुरूषानेही कळीचे फुल होत ते जगताना केवळ जपणेच आवश्यक नाही तर फुलाचा सुगंध रुप स्पर्श टवटवीत राखण्यासाठी कधीतरी अंतःकरणापासुन कौतुकास्पद शब्दतुषारांचे शिंपण करायला हवे. स्त्रीला स्पर्श सुखापेक्षा शब्दसुखाचा मोह असतो. पतीधर्म बाण्याने निभावताना तिला हवाहवासा सखा होता आलं तर.. तिच्या मुक्त मोकळ्या श्वासांचं आभाळ होता आलं तर.. तिच्यातल्या खेळकर मुलीचं अंगण होता आलं तर.. तिच्या घामेजल्या तनामनावर वारा होता आलं तर.. बघा.. प्राणनाथाच्या मोजक्याच कलांनी कसा फुलून येतो मग हा चंद्र प्रत्येक विवाहीत पुरुषाच्या आयुष्यात..!!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here