शब्दीप्ता of the issue- सुधा मूर्ती

मानवी जीवनातील दुःखाचा क्षणभर का होईना विसर पाडून वाचक रसिकांना एका अनोख्या विश्वाचा नागरिक बनवण्याचे सामर्थ्य प्रतिभावंतांकडे असतं.. अश्याच प्रतिभावान साहित्यिकांपैकी एक म्हणजे सुधा मूर्ती.. त्यांनी आपल्या साहित्यातून कल्पक आणि अर्थगर्भ शब्दफुलांची वेल रुजवली.. या वेलीवर आजतागायत १५०हून अधिक पुष्पं बहरली आहेत.. त्यांच्या पुस्तकांच्या काही लाखांमध्ये प्रती खपल्या आहेत.. मराठी, कानडी आणि इंग्रजी सारख्या अनेक भाषांमधून त्यांनी केलेलं लिखाण हे आबालवृद्धांना आजही जगण्याचं सार देऊन जातं..      अत्यंत भावस्पर्शी लेखन.. वाचकाच्या मनाचा अलगत ठाव घेणारी लेखनशैली.. आणि भाषेच्या बंधनापल्याड डोकाऊ पाहणारी वर्णनं.. यांचा सुरेख संगम त्यांच्या साहित्यात आपल्याला पाहायला मिळतो.. सुधाताई एक लेखिका म्हणून प्रतिभावान आहेतच पण एक व्यक्ती म्हणून.. एक माणूस म्हणूनही त्या संपन्न आहेत.. त्यांच्या Philanthropy करण्यामागची.. infosys foundationच्या स्थापनेमागची भावना त्या अगदी प्रांजळपणे कबूल करतात..

वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांची मुलगी आनंद शर्मा या अंध मुलासाठी हेल्परचं काम करायची.. त्याचे पेपर लिहिणं.. त्याला पुस्तकं वाचून दाखवणं.. असं सगळं.. त्याचं प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याला स्टीफन्स महाविद्यालयात प्रवेश हवा होता.. त्यांच्या मुलीने जेव्हा त्याबद्दल त्यांना विचारलं तेव्हा त्यांनी फारच उडत उडत उत्तर दिलं.. आणि तू त्याला sponser करायला हवंस असं अगदी रुक्षपणे म्हणाल्या.. त्यांची ती चिमुरडी त्यांना म्हणाली..

“अम्मा तू आत्ता ४५ वर्षांची झाली आहेस.. तुला आयुष्यात काय हवं आहे.. fame.. नाव.. पैसा.. प्रसिद्धी..?? आणि हो जर तुला कुणाला मदत करायची नसेल.. तर तुला त्याबद्दल बोलण्याचा काही एक अधिकार नाही पोहोचत..” सुधा ताई तेव्हा घाईत होत्या.. पण थोडं निवांत झाल्यावर त्यांनी त्यावर विचार केला.. खरंच होतं ते.. वयाची पहिली २० वर्ष सुधाताईंनी त्यांच्या अभ्यासावर केंद्रित केली होती.. आणि त्यानंतरची २० वर्ष infosys साठी वेचली होती.. आज त्या ४५ वर्षांच्या होत्या.. पुढचे ८ दिवस ताईंनी विचार केला.. एखादा व्यक्ती का खूप श्रीमंत आणि एखादा खूप गरीब असतो.. हि दरी का निर्माण होते.. देवदयेने त्यांची प्रकृती तेव्हा उत्तम होती.. त्यांनी ठरवलं.. अश्या व्यक्तींना आपण मदत करायची.. आपण Philanthropy करायची.. आणि तश्यातच infosys foundation ची स्थापना झाली..

infosys foundation समाजातल्या बऱ्याच घटकांसाठी काम करतं.. घरून पळून आलेली मुलं.. सेक्स वर्कर्स.. कुष्ठरोगी.. वृध्द लोक.. भटके लोक.. आणि अजून कित्येक.. सुधाताईंनी आजवर कितीतरी पळून आलेल्या मुलांना त्यांच्या घरी परत आणलं आहे.. कित्येक रोग्यांची मदत केली आहे.. कित्येकांना त्यांचे अधिकार मिळवून दिले आहेत.. आणि त्यांच्या infosys foundationचं इतर काम तर आपल्या सगळ्यांना ठाऊक आहेच..

आजच्या काळाची गरज ओळखून संगणक आणि ग्रंथालय यांनी परिपूर्ण शालेय शिक्षण व्हावे यांसाठी उभारलेली चळवळ.. पूरग्रस्तांसाठी केलेली घरबांधणी.. ग्रामीण आणि शहरी भागांत दहा हजारांहून अधिक स्वच्छतागृह.. अशी अनेक विधायक कामं.. infosys foundationच्या माध्यमातून त्या करत आहेत.. आरोग्य, स्वच्छता, शिक्षण, स्त्रियांची बेरोजगारी, दारिद्र्य निर्मुलन, कला, संस्कृती या विविध क्षेत्रांत तळागाळातील लोकांच्या कल्याणासाठी समाजसेवेचे व्रत जोपासत आहेत..

समाजाची वैचारिकता उंचावण्यासाठी सामाजिक भान नजरेसमोर ठेऊन त्यांनी केलेले लेखन सुद्धा तितकेच प्रेरणादायी आहे.. स्वतःच्या मातृभाषेत लिहिता-लिहिता त्यांना एक धागा गवसला.. आणि त्याचाच मागोवा घेत त्या खोलवर बुडून गेल्या साहित्याच्या भवसागरात.. ज्यातून त्या कित्येकदा किनाऱ्यावर येतात आणि एक उत्कृष्ट मौक्तिक आपल्या हातांत सोपवतात..

त्यांच्या प्रादेशिक भाषेमधील अनेक पुस्तकांचं मराठी भाषांतरही उपलब्ध आहे.. लीना सोहोनी या त्यांच्या आवडत्या भाषांतरकार.. त्या म्हणतात.. मला काय म्हणायचं असतं ते लीना ला बरोबर कळतं.. आणि ती त्यागोष्टीचं मराठीत उत्कृष्ट वर्णन करते.. ज्यामुळे मला म्हणायचं असतं ते अगदी योग्य पद्धतीने माझ्या मराठी वाचकांपर्यंत पोहोचतं..

‘गोष्टी माणसांच्या’ या त्यांच्या सत्यघटनांवर आधारित पुस्तकात त्यांनी त्यांच्या आयुष्यातल्या काही व्यक्तींबाबत लिहिलं आहे.. त्यांनी त्यांना शिकवलेली जगण्याची तत्वं त्या अतिशय मुक्तपणे आपणा वाचकांना देतात.. आपल्या आयुष्यात आपल्याला पडणाऱ्या साध्या सोप्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला त्यांच्या या कथांमधून मिळतात.. अनेक नवनवीन संकल्पना माहित होतात.. त्यांचं बहुतकरून आयुष्य कानडी लोकांमध्ये गेल्याने त्यांच्या संदर्भातल्या बऱ्याच कानडी संस्कृतीतल्या गोष्टी आपल्याला नव्याने माहित होतात..

एकदा एका गावात त्यांची गाडी बंद पडल्याने त्यांना एका मंदिरात काही काळ आसरा घ्यावा लागला होता.. त्यामंदिरात एक अंध वृध्द मनुष्य होता.. ८० वगैरे वय असेल त्या बाबांचं.. सुधाताईंनी त्यांची थोडी बहुत विचारपूस केली.. आणि त्यांच्या औषधपाण्यासाठी काही ठराविक रक्कम देण्याचं कबुल केलं.. त्या वेळी तर त्या infosys foundationच्या सर्वेसर्वा होत्या.. पण त्या म्हाताऱ्या बाबांनी सुधाताईंना जीवनाचं सार सांगितलं.. ते म्हणाले.. बाई मला माहित नाही तुम्ही कोण आहात.. आणि मला ही रक्कम का देत आहात.. पण मला तुमचे पैसे नकोत.. मला माहितीये मला किती हवंय.. आणि तितकं मला माझ्या दिवसभराच्या कामातून मिळतंय.. मी जितकं काम करतो त्याचा मोबदला मला मिळतो.. त्यामुळे तुम्ही मला काही रक्कम वगैरे देऊन माझ्या आयुष्याचं संतुलन बिघडवू नका.. ही गोष्ट तशी खूप साधी.. पण सुधाताईंना त्यात सारंच सामावल्याचं जाणवलं.. त्या म्हणतात.. “In life somewhere you should say enough.. and draw a line.. saying, Enough is enough..!!”

त्या जेव्हा कुष्ठरोग्यांच्या आश्रमात गेल्या होत्या तेव्हा गणती चालू असताना एक बाई समोर येत नव्हती.. तिला देखील गणनेमध्ये घेण्याची विनंती इतर लोक करू लागले.. ताईंनी विचार केला ही बाई बाहेर येऊ शकत नाही पण मी तरी आत जाऊन शहानिशा करूच शकते.. त्या आत गेल्या आणि त्या बाईची परिस्थिती पाहून थक्कच झाल्या.. त्या बाईला अंगावर घालायला एकही कपडा नव्हता.. अश्या स्वातंत्र्याचा त्या बाईला काय उपयोग जे तिला एक जोड कपडे देखील देऊ शकत नाही.. त्यांनी विचार केला तिला कपडे देणं हे माझं कर्तव्य आहे..

भारतीय कुटुंबव्यवस्था, भारतीय कुटुंबाची मानसिकता.. आणि परदेश गमनानंतर, तिथल्या संस्कृतीमुळे मानसिकतेमध्ये झालेले बदल.. या सर्वातून निर्माण झालेली भावनिक नात्यांची गुंतागुंत मांडणारी ‘डॉलर बहू’ ही कादंबरी वाचताना तर त्यांच्या प्रतिभेला सलाम करावासा वाटतो.. मानवाच्या आस-पासच्या वातावरणाचा त्याच्या जडणघडणीवर कितपत परिणाम होऊ शकतो याची सहज कल्पना ही कादंबरी वाचताना येते.. त्यांच्या गाजलेल्या अनेक पुस्तकांपैकी ही देखील एक..

तसंच ‘वाईज अँड अदरवाईज’ या पुस्तकात त्यांना भटकंती करताना आलेले त्यांचे सच्चे अनुभव त्यांनी मांडले आहेत.. मानवी जीवनपैलुंचे अतिशय उत्कट दर्शन त्यांच्या लेखनातून जाणवतं.. सुधाताई अनेक प्रदेश फिरल्या आहेत.. त्यांना रेल्वेने प्रवास करायला आवडायचा असं त्या स्वतः सांगतात.. तिथे अनेक वेग-वेगळ्या संस्कृती आणि विचारांची लोकं भेटतात असं त्याचं मत आहे..

त्या म्हणतात.. गरिबातला गरीब व्यक्ती मला आयुष्यातला सगळ्यात अवघड धडा शिकवून जातो.. बऱ्याचदा त्यांना समोरच्याची भाषा येत नसे.. पण मनाद्वारे केलेला संवाद तेव्हा महत्वाचा ठरत असे.. आणि मग कुठलंच बंधन तेव्हा राहत नसे.. अगदी भाषेचंही नाही..

सुधाताई आपल्या वैयक्तिक आयुष्यात खूपच धेय्यवादी राहिलेल्या आहेत.. टाटा कंपनी मध्ये महिलांना घेत नाहीत हे कळल्यावर त्यांनी स्वत्तः जे. आर. डी टाटांना पत्र लिहून या गोष्टीचा जाब मागितला होता.. आणि त्याचा पडसाद म्हणजे त्यांना तिथून interview चा call आला होता.. काही वर्ष त्यांनी तिथे नोकरी देखील केली..

नंतरच्या काळात नारायण मुर्तींशी लग्न झाल्यावर त्यांनी infosysच्या उभारणी मध्ये मुर्तींना खूप मदत केली.. त्या नेहमीच त्यांच्या बरोबर असत.. infosys सुरु करताना देखील सुरुवातीचे १०,००० सुधाताईंनीच दिले होते.. इथे ती रक्कम महत्वाची ठरत नाही.. तर त्यांचा मुर्तींवरचा विश्वास महत्वाचा ठरतो.. आणि आज याच विश्वासाच्या जोरावर त्यांची अखंड वाटचाल चालू आहे..

गोल्ड मेडलिस्ट अभियंता.. संगणक शास्त्रज्ञ.. उद्योजिका.. infosys foundationच्या सर्वेसर्वा.. समाजसेविका आणि प्रतिभाशाली लेखिका.. या विविध अंगांनी बहरलेले सुधा मूर्तींचे व्यक्तिमत्व हेच सिद्ध करते की.. यशशिखरावर पोहोचण्यासाठी स्त्री’त्व हे बंधन असूच शकत नाही.. सामान्य कुटुंबात जन्माला आलेल्या मुलीने आपल्या बुद्धीचातुर्याच्या जोरावर घेतलेली ही गगनभरारी आजच्या तरुणींना आदर्शवत आणि प्रेरित करणारी आहे..

-टीम शब्दीप्ता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *