कर्मयोगी- कर्मवीर भाऊराव पाटील

आपल्या पंखांखाली रानपाखरांना घेऊन त्यांच्यात आकाशाचे भव्यत्व आणि सूर्याचे तेजत्व पेरणारे.. उजाड माळरानाची रुपांतरे संपन्न ज्ञानमंदिरात करणारे.. आपल्या अलौकिक कर्तव्यातून महाराष्ट्राच्या मातीवर रयत शिक्षण संस्थेच्या’ रूपाने ज्ञानाचे तीर्थ निर्माण करणारे.. कर्मवीर हेच एक ध्यासपर्व.. इतिहासाला लाभलेले स्फुर्तीस्थान.. आधुनिक सुधारणांचे जनक महात्मा फुले, आणि बहुजन समाजाचे कैवारी राजर्षी शाहू महाराजांच्या परंपरेचे पाईक.., कर्मवीर भाऊराव पाटील..

भाऊरावांचा जन्मच अज्ञानाच्या गर्तेत पिचत पडलेल्या बहुजन समाजात झाला.. आणि ते शेवटच्या श्वासापर्यंत अज्ञानाच्या अंधाराशी निर्धाराने लढत राहिले.. भाऊरावांचे मुळ गाव सांगली जिल्ह्यातील ऐतवडे.. जन्म २२ सप्टेंबर १८८७चा.. सुसंस्कृत आणि धार्मिक प्रवृत्तीच्या घराण्यात जन्म.. कणखर शरीरयष्टी, सत्यनिष्ठा आणि निर्भीड वृत्ती हि आई गंगाबाई यांच्या कडून मिळालेली देणगी.. तर, साधी राहणी, सामाजिक कार्याची आवड, सेवाभाव आणि कष्टाळू वृत्ती, हि वडील पायगौंडा यांच्याकडून मिळालेली शिदोरी.. विद्यार्थी-दशेत अभ्यासात त्यांना फारसा रस नव्हता.. बंडखोरी आणि हूडपणा करण्यातच त्यांचा अधिकतर वेळ जात असे.. अस्पृश्यांच्या समारंभातून आल्यानंतर अंघोळीस नकार दिल्याने बोर्डिंग मधून बाहेर काढणे असो.. व अस्पृश्यांना पाणी भरण्यास बंदी घातली म्हणून विहिरीवरचा रहाट मोडून टाकणे असो.. विद्यार्थी-दशेपासूनच अन्याय आणि विषमता याविरुद्ध बंड पुकारणे हा त्यांचा पिंड होता.. वर्णव्यवस्थेविरुद्ध, अस्पृश्यतेविरुद्ध, अंधश्रद्धेविरुद्ध तसेच सामाजिक आणि आर्थिक विषमतेविरुद्ध बंडाचा झेंडा हाती घेणं हा जणू त्यांचा स्थायीभावच..

छत्रपती शाहू महाराजांच्या परीसस्पर्शाने, दलित आणि उपेक्षित समाजाच्या हक्कासाठी.. उद्धारासाठी.. झगडण्याचे विचार भाऊरावांच्या मनात रुजले.. आणि त्यांची दृष्टी विशाल बनली.. भाऊरावांना त्यांच्या वडिलांनी मुंबईला जव्हेरी शेठ पानाचंद यांच्या कडे मोती पारखण्याची कला शिकविण्याचा प्रयत्न केला.. पण त्यात त्यांना रस वाटेना.. निर्जीव मोती पारखण्यापेक्षा सजीव मोत्यांची पारख करण्यासाठी कर्मवीरांचा जन्म झाला होता.. हेच खरं..

काही काळ विमा एजंट तर काही काळ किर्लोस्कर आणि ओगले ग्लास इंडस्ट्रीज मध्ये त्यांनी काम केलं.. पण हा त्यांचा पिंड च नव्हता.. ज्ञानदानाचे महान कार्य त्यांच्याकडून होणे हीच नियतीची इच्छा होती..

द्रष्ट्रेपणा, कृतिशीलता, वेधशक्ती, लोकसंग्रह, प्रबोधन चातुर्य, असे गुण नेतृत्वाजवळ असल्याखेरीज चळवळ उभी राहत नाही.. भाऊरावांजवळ हे गुण बऱ्याच अंशी होते.. काळाच्या प्रवाहाची दिशा त्यांना समजली होती.. शिक्षण हीच बहुजन समाजाच्या उन्नतीची गुरुकिल्ली आहे.. कोणत्याही राष्ट्र-सुधारणेचा आणि खऱ्या लोकशाहीचा पाया सार्वत्रिक शिक्षण प्रसार हाच आहे.. म्हणूनच हा विधायक कार्यक्रम राबवण्यासाठी भाऊरावांनी स्थापन केली.. रयत शिक्षण संस्थासातारा जिल्ह्यातल्या काले या गावी रयत ची पहिली शाळा सुरु झाली.. त्यानंतर सातारा येथे “श्री छत्रपती शाहू बोर्डिंग हाउस”, पुण्यात “युनियन बोर्डिंग हाउस”, बालगुन्हेगारांसाठी वसतिगृह.. अश्या अनेक प्राथमिक शाळा, हायस्कूल, महाविद्यालये, वसतिगृहे, यांच्या रूपाने ज्ञानमंदिरे महाराष्ट्रात उभी राहिली.. वटवृक्ष बोधचिन्ह असणाऱ्या वडाच्या पारंब्या-पारंब्यातून अनेक महाकाय वृक्ष निर्माण झाले.. सध्या महाराष्ट्र-कर्नाटक मध्ये संस्थेच्या ६००हून अधिक शाळा, ४७ प्राथमिक, ४३८ माध्यमिक, २०० महाविद्यालये, ४लाखांहून अधिक विद्यार्थी १७ हजार सेवक, ६०हुन अधिक वसतिगृहं.. असा हा महावृक्ष बनला आहे..

बालशिक्षण, प्रौढशिक्षण, स्त्रीशिक्षण, व्यावसायिक शिक्षण, उच्च शिक्षण, अश्या सर्वांगीण शिक्षणाची ज्ञानगंगा भाऊरावांनी ग्रामीण भागापर्यंत पोहोचवली.. शिक्षण आणि राहण्याची सोय मोफत असल्याने गरीब मुलं शिकली..

संस्था उभारणी साठी भाऊराव आयुष्यभर अनवाणी पायाने आणि उघड्या माथ्याने उन्हा-पावसातून हिंडले.. तर यांच्या पत्नी लक्ष्मीबाईंनी आपले सौभाग्यालंकार विकून रयतेच्या मुलांचे पालन-पोषण केले.. भाऊरावांनी वैयक्तिक संसाराची चिंता कधीच केली नाही.. स्वतःच्या कुटुंबासाठी त्यांनी काहीच केलं नाही.. कौटुंबिक मक्तेदारी होवू नये म्हणून त्यांनी स्वतःच्या मुलाला देखील रयत सोडून दुसरे काम पाहण्यास सांगितले..

देवाची ते खूण | आला ज्याच्या घरा ||

त्याच्या पडे चिरा | संसाराला ||

या पार्श्वभूमीवर आजच्या शिक्षणसम्राटांचा विचार केला तर लक्षात येईल.. की, शिक्षणाची दुर्दशा का होत आहे ते.. केवळ स्वार्थापोटी, भरमसाठ अर्थार्जनासाठी, स्वकीयांचे हितसंबंध सांभाळणाऱ्या शिक्षणसंस्थांकडून गोर-गरीब अन् सामान्य जनतेने तर.. उत्कृष्ट दर्जाचे शिक्षण मिळण्याची अपेक्षाच न केलेली बरी..

परंतु फुले-कर्मवीरांचा वारसा सांगणारे आपण या विषम शिक्षण व्यवस्थेविरुद्ध बंड पुकारायलाही तयार नाही.. याची खंत वाटते.. त्या काळात छत्रपती शाहूंच्या राजाश्रयाने अनेक शिक्षणसंस्था गरीब जनतेला ज्ञानदान करीत होत्या.. आणि आत्ताचा राजाश्रय म्हणजे.. “कुंपणानेच शेत खावे” अशी अवस्था आहे.. म्हणूनच गरज आहे कृतीशील परिवर्तनाची..

समाज घडवण्यासाठी उत्तम दर्जाच्या शिक्षकांची गरज ओळखून भाऊरावांनी त्या काळात शिक्षकांचे ट्रेनिंग महाविद्यालय उभारले.. कमवा व शिका या योजनेतून विद्यार्थ्यांसाठी स्वावलंबी शिक्षणाचे केलेले प्रयोग.. ही भारतीय शिक्षण क्षेत्रातील क्रांतीच म्हणावी लागेल.. स्वकष्टानेच केवळ यशस्वी होता येते हा मंत्र आजच्या पिढीने समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे..

विशेषतः आजच्या पालकांनी आपल्या मुलामुलींना अवाजवी सोयी-सुविधा उपलब्ध करून न देता.. त्यांच्यातील व्यक्तिमत्वाला कष्टातून, संघर्षातून, शिकण्याचे बळ देण्यासाठी विशेष प्रयत्न करायला हवेत.. तेव्हाच मुलांचा सर्वांगीण विकास होयील.. ते केवळ पढिक पंडित उरणार नाहीत, आणि समाजोन्नती घडेल..

रयत शिक्षण संस्थेतून देशभक्ती, सेवा, त्याग, माणुसकी, असे संस्कार असणारे स्वाभिमानी, कार्यक्षम, विवेकशील, नागरिक बाहेर पडतील.. आणि राष्ट्रोद्धार करतील; अश्या प्रकारची शिक्षणव्यवस्था कर्मवीरांनी निर्माण केली.. आजही केवळ शिक्षित नव्हे तर सुशिक्षित आणि प्रगल्भ बनवणाऱ्या शिक्षण व्यवस्थेची गरज प्रकर्षाने जाणवते.. बुद्धिमान, होतकरू पण परिस्थितीने गरीब असणाऱ्या विद्यार्थ्यांना न परवडणाऱ्या शिक्षणामुळे आजचा गरीब विद्यार्थी मागे पडताना दिसतो आहे.. शिक्षणाची ही दयनीय अवस्था भाऊरावांमधल्या शिक्षण तज्ञाने त्या वेळीच ओळखली असावी.. म्हणूनच त्यांच्या उत्तरार्धात बहुजन समाजासाठी वेगळे ग्रामीण विद्यापीठ असावे अशी संकल्पना मांडली असावी.. आज पुन्हा एकदा याचा फेरविचार करण्याची वेळ आली आहे..

वटवृक्षाच्या विशाल छायेखाली नव्या युगाचा माणूस घडविणाऱ्या या महान व्यक्तिमत्वास महाराष्ट्राच्या जनतेने.. कर्मवीर हा किताब दिला.. सरकारने त्यांना पद्मभूषण देऊन गौरवले.. पुणे विद्यापीठाने डी. लिट. हि पदवी देऊन सन्मानित केले.. “श्री भाऊराव पाटील कि सेवा हि उनका कीर्तिस्तंभ है|” असे गौरवोद्गार महात्मा गांधींनी एके ठिकाणी काढले होते..

हे दान सुटे गिराण हि वृत्ती सोडून बहुजनांनी कष्ट करून स्वतःच्या पायावर उभे राहायला पाहिजे.. असे स्पष्ट मत मांडणाऱ्या भाऊरावांची प्राणज्योत ९मे १९५९ रोजी मालवली.. अज्ञानाचा अंधार चीरणाऱ्या या बलदंड ज्ञानभास्कराला; शिक्षणाची गंगोत्री बहुजन समाजापर्यंत पोहोचवणाऱ्या या आधुनिक भगीरथाला यापुढेही सन्मानित ठेवायचे आहे ते त्यांच्याच विचारांची पूजा बांधणाऱ्या रयतेच्या उगवत्या प्रकाशपुत्रांनीच..!! यासाठी स्वावलंबी शिक्षणाचा मंत्र आत्मसात करून, समताधिष्ठीत शिक्षणव्यवस्था निर्माण करायला हवी हाच कर्मवीरांचा संदेश आहे..

 

रयतेमधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे..

वटवृक्षाच्या विशालतेचा मोह नभाला पडतो आहे..

 

-डॉ. वर्षा खोत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *