सुरेल वाटचाल- सावनी रवींद्र

सावनी सुरुवातीला आपण तुझ्या बालपणाबद्दल बोलूयात.. तशी तू मुळची कोकणातली.. काय सांगशील कसं गेलं बालपण..? गाणं लहाणपणापासुन होतं का?

हो.. माझा जन्म कोकणातलाच.. मी रत्नागिरीत जन्मलेय.. पण माझं संपूर्ण बालपण पुणे परिसरात गेलंय.. आम्ही पुण्याजवळच्या चिंचवड इथे राहायचो.. त्यामुळे शालेय शिक्षण सगळं इथेच झालं.. आणि महाविद्यालयीन शिक्षण मी फर्ग्यूसन कॉलेज मधून पूर्ण केलंय.. मी BA संस्कृत आणि MA मराठी केलंय.. आणि हो गाणं अगदी लहानपणापासूनच होतं.. कारण basically मला घरातूनच गाण्याची पार्श्वभूमी लाभलेली असल्याने एकूणच संगीतमय वातावरणात माझी जडणघडण झाली.. माझे आई-वडील डॉ. वंदना आणि’ डॉ. रवींद्र घांगुर्डे हे दोघेही प्रसिध्द शास्त्रीय गायक आहेत.. त्यांच्यामुळेच मला शास्त्रीय संगीत.. ख्याल गायकी आणि नाट्य संगीतही गाण्याची आवड निर्माण झाली.. आणि अनेक दिग्गज व्यक्तींचा सहवास मला लहानपणीच लाभला.. ज्यात संगीतकार पं. यशवंत देव.. पं. हृदयनाथजी मंगेशकर.. श्रीनिवास खळे काका.. होते.. त्याचबरोबर मंगेश पाडगावकर काका.. गंगाधर महांबरे.. सुरेशजी वाडकर होते.. त्यामुळे माझी जडणघडण अश्या वेगळ्याच पद्धतीने झालीये.. दरम्यानच्या काळात मी सातवी पासून पं. यशवंत देव यांच्या कडे.. मुंबईला गाणं शिकायला येऊ लागले.. आणि त्यांनतर साधारण दहावीत असल्यापासून पं. हृदयनाथजी मंगेशकर यांच्या सोबत त्यांच्या भावसरगम या कार्यक्रमात सहगायिका म्हणून गाऊ लागले.. माझ्यासाठी ते सुगम संगीत म्हणजे संगीतातलं एक वेगळंच जग होतं..

तुझ्या नावातच सप्तसूर समावलेत.. लहानपणी याची एखादी चुणूक दाखवलेलीस का..? काही किस्सा आठवतोय पहिल्या गाण्याचा..?

मुळात लहानपणापासूनच मी तानपुऱ्यासोबतच वाढलीये.. तानपुरा हे माझं एकमेव खेळणं होतं.. आणि त्यावर गायल्या जाणाऱ्या बंदिशी हीच माझी बडबडगीतं.. बाबा त्यांच्या शिष्यांना शिकवायचे तेव्हा माझ्या कानांवर त्या बंदिशींचे संस्कार व्हायचे.. एकदा गोंदवल्याला माझ्या आई-बाबांची संगीत सेवा होती.. मी अगदीच दोन अडीच वर्षांची होते तेव्हा तिथे मी गायले होते.. आणि आई सांगते कि तेव्हा मी अगदी तालासुरात गायले होते..

सावनी तू पुण्याच्या फर्ग्यूसन कॉलेजची विद्यार्थिनी.. तिथेहि तू आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांमध्ये वगैरे भाग घ्यायचीस..?

मला फारसा कधी कुठल्या स्पर्धेत भाग घेता नाही आला.. कारण तो पर्यंत माझं professional करियर सुरु झालं होतं.. आणि professional कलाकारांना अश्या कुठल्या स्पर्धेत भाग घेता येत नसतो.. खरंतर आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांची एक वेगळीच धुंदी असते.. सगळेजण एकत्र त्यासाठी दिवसरात्र काम करत असतात.. आपलं एकूणच काम कसं दर्जेदार होईल याकडे लक्ष देत असतात.. दुर्दैवाने मला अशी संधी जास्त मिळाली नाही.. पण मी एका वर्षी फिरोदिया करंडक केलं होतं.. आणि ज्यात मला सर्वोत्कृष्ट गायिकेचं पारितोषिकही मिळालं होतं.. मी BA संस्कृत करताना आम्ही संस्कृत दिनही साजरा करायचो.. तेव्हा आम्ही प्रसिद्ध हिंदी-मराठी गाणी घेऊन त्यांचं संस्कृत मधे भाषांतर करून गायचो.. तेव्हाही आम्हाला खूप काही शिकायला मिळायचं.. तो अनुभवच अवर्णनीय असायचा..

सारेगमप मराठी चा तुझा संपूर्ण प्रवास कसा होता.. आणि आज मागे वळून पाहताना तिथे शिकलेल्या गोष्टी आठवतात का..?

सारेगमप चा एकूणच प्रवास खूप काही शिकवून जाणारा होता.. कारण reality शो मध्ये तुमच्या क्षमतांचा सर्वांगीण कस लागणार असतो.. इथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची गाणी गाऊन तुमची versatility सिध्द करायची असते.. बर आणि हे एका performance करता नसतं.. तर त्याच्यावरून परीक्षक आपली पारख करणार असतात.. आणि episode telecast झाल्यानंतर.. प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया आणि कॉमेंट्स यांचा विचार करून पुढच्या गाण्याची तयारी करावी लागते.. आणि ते एक एक पायरी वर चढत जाऊन अंतिम पल्ला गाठणं.. हे खरंच खूप अवघड असतं.. इकडून TV वर पाहायला हे सगळं खूप सोपं वाटतं.. म्हणजे आपण खूप सहज बोलून जातो.. कि अरेरे हा खूप वाईट गायला किंवा हा चांगलं नाही गायला.. पण शुटींगच्या दिवशी तो स्पर्धक सकाळी सातला वगैरे आलेला असतो.. आणि हे शुटींग अगदी रात्री उशिरापर्यंत चाललेलं असतं.. म्हणजे आमच्या वेळी तर पहाटे ४-५ ला शुटींग संपायचं.. तोपर्यंत तो आवाज तसाच टिकवून ठेवणं फ्रेश ठेवणं.. आणि मग त्या ३ मिनटांत तुमचं बेस्ट तुम्हाला द्यायचं असतं.. हे सगळं खूप अवघड आहे.. आणि अर्थातच हे सगळं खूप काही शिकवून जाणारं आहे.. आणि आमच्या सिझनला तर अजय-अतुल परीक्षक म्हणून होते.. त्यामुळे आम्हाला खूप काही गोष्टी शिकायला मिळाल्या.. ज्या आज मागे वळून पाहताना नक्कीच आठवतात..

सावनी तुझ्या आई-बाबांकडे गाण्याचे धडे घेत असतानाच तू इतर कोणा गुरूंकडे शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेतलंयस का..?

हो.. जसं तू म्हणालास तुषार.. माझ्या आई-बाबांकडे तर मी शिकत होतेच पण मी अजूनही अनेक गुरूंकडे शास्त्रीय मधल्या वेगवेगळ्या गोष्टी शिकले.. माझे बाबा म्हणतात तसं.. अनेक मोठमोठ्या व्यक्तींकडून आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी या शिकण्यासारख्या असतात.. आणि मी हि त्या तश्याच अविरतपणे शिकत आले.. त्यातले प्रत्येक जण हे greatच होते.. अजूनही मी त्यांच्या कडे जाऊन शिकत असते.. पंढरीनाथ कोल्हापुरे हे माझे त्यानंतरचे शास्त्रीय मधले गुरु.. जे कुमार गंधर्वांच्या शिष्य परंपरेतले आहेत.. त्यामुळे त्या गायकीचे हि संस्कार माझ्या आवाजावर झाले..

एका सुगम गायकाला शास्त्रीयचं शिक्षण घेणं कितपत महत्वाचं आहे असं तुला वाटतं..?

नक्कीच महत्वाचं आहे अरे.. म्हणजे मी आत्ता जे काही playback करतीये त्यात मला त्याचा खूप उपयोग होतो.. आणि शास्त्रीयची आपली जी मूळ बैठक असते त्याने आपल्या गळ्यावर विशिष्ट संस्कार होत असतात.. कि ज्याचा कुठल्याही प्रकारची गाणी गाण्यासाठी.. त्यातली सुरेलता जपण्यासाठी.. उपयोग हा होतच असतो.. आणि ताना.. मुरक्या.. हरकती हे सगळंच तर सुगम संगीतात आहे.. फक्त त्याला नाव वेगळं दिलं गेलंय.. संगीत आणि सूर तर तेच आहेत.. त्यांची साधना करणं हे मला गरजेचं वाटतं.. आणि या १२ सुरांमध्येच तर आपलं गायकांचं विश्व सामावलेलं असतं ना रे.. त्यामुळे सुगम गायकालाही शास्त्रीय संगीत शिकणं तितकंच गरजेचं आहे.. आणि जी आपली परंपरा आहे.. आपलं मूळ आहे ते नेहमीच जपायला हवं.. मी जसं शास्त्रीय चं शिक्षण घेतलंय.. घेतीये.. तसंच श्री. रवी दाते यांच्याकडे गझल गायकीचंही शिक्षण घेतलंय.. त्यामुळे या अश्या पूरक गायन पद्धतींचाही आपल्याला गाताना उपयोग होतो..

सावनी unplugged बद्दल काय सांगशील.. कशी सुचली संकल्पना..?

सध्या unplugged चा जमाना आहे.. आणि मराठी मध्ये एक-दोन अपवाद सोडले तर अशी गाणी कुणी केली नव्हती.. आणि मला असं फार मनापासून वाटलं कि ती पहिली व्यक्ती मी बनावं.. आणि माझी अशी एक सिरीज सुरु करावी.. मी माझ्या fb page वर दर weekendला एक गाणं पोस्ट करायचे.. सौरभ भालेराव ने मला त्यात उत्तम साथ दिली.. त्याच्याबरोबर चा माझा Season1 होता कि ज्यामध्ये मी मला आवडणारी.. माझी.. आणि जुनी-नवी हिंदी-मराठी गाणी गायले.. mashups गायले.. unplugged हा असा form आहे कि ज्यात कोणत्याही plug केलेल्या इलेक्ट्रॉनिक वाद्याशिवाय गाणं गायचं असतं.. म्हणजे फक्त acostic guitar.. किंवा piyano अश्या वाद्यांसोबत.. मी ती वेगवेगळी गाणी सादर केली.. त्याचबरोबर Coversची concept.. Covers म्हणजे आपली जी जुनी हिंदी-मराठी अजरामर गाणी आहेत ती एका नव्या गायक-गायिकेने आपल्या स्वतःच्या भावना.. आपल्या सुरांतून.. आणि आपल्या style ने व्यक्त करणं.. with all due respect to that original song.. त्यामुळे Covers ची निर्मिती झाली असं मला तरी वाटतं.. आणि खरंच हे व्हावं अश्याही मताची मी आहे.. कारण जुनी गाणी नवीन पिढी पर्यंत पोहोचवण्याचं या पेक्षा प्रभावी मध्यम दुसरं कुठलं असू शकतं असं मला वाटत नाही.. कारण आपली पिढी हि खूप भाग्यवान आहे कि आपल्याला आशाताई, लतादीदी, किशोरदा, रफी साहेब, हि मंडळी माहिती आहेत.. त्यांनी केलेली गाणी माहिती आहेत.. पण पुढच्या पिढीची त्यांच्याशी तोंड ओळखही असेल कि नाही माहित नाही.. त्यामुळे मला खरंच खूप मनापासून या Covers आणि Unplugged versions ची निर्मिती करावीशी वाटली.. आणि मराठीमध्ये एक वेगळा प्रयोग करून मराठी संगीतसृष्टीची.. आणि या दिग्गजांची सेवा करता आली..

सावनी गणपती बाप्पा आणि तुझं कसं नातं आहे.. आणि हे गजवदन या बाप्पाच्या प्रोजेक्ट मध्ये तू होतीस.. कसा होता एकूणच अनुभव.. काय सांगशील..?

गणपती बाप्पा हा माझ्यासाठी खूप स्पेशल आहे.. आणि तो मलाहि माझ्या मित्रासारखाच वाटतो.. बाप्पा हा ६४ कलांचा अधिपती आहे.. आणि माझ्यात असणारी हि जी काही ‘गान’कला आहे ती देखील बाप्पाच्याच आशीर्वादाने मला प्राप्त झालीये.. यावर माझा दृढ विश्वास आहे.. आता त्यातच हे गजवदन  हे सलील दादाने उचललेलं बाप्पाचं शिवधनुष्य आहे, असं म्हणल्यास काही वावगं ठरणार नाही.. कारण ९० कलाकारांना एकत्र एका प्रोजेक्ट साठी बांधून ठेवणं हि काही साधी गोष्ट नाहीये.. आम्ही सगळे कलाकार लोक शोज च्या निमित्ताने भेटतंच असतो.. पण एक टीम म्हणून जेव्हा तुम्ही काम करत असता तेव्हाचा आनंद आणि तो अनुभव काही वेगळाच असतो.. यात सर्व पिढ्यांचं प्रतिनिधित्व करणारे कलाकार आहेत.. या गाण्याला खूप उत्तम प्रतिसाद मिळतोय.. बऱ्याच सिनेमागृहांमध्ये देखील आज हे गाणं वाजवलं जातंय.. या एकूणच अनुभवामुळे मी स्वतःला खूप भाग्यवान समजते कि मला हे गजवदन या टीमचा एक भाग होता आलं..

सावनी “Feel the content but ask for more” ही आमची Tagline.. ज्याप्रमाणेशब्दीप्ता Magazine’ नेहमीच जास्तिची अपेक्षा करतं.. त्याप्रमाणे तू स्वत:कडून अश्या कोणत्या जास्तिची अपेक्षा करतेस..?

खरंच खूप मस्त Tagline आहे हि.. कारण आपणच स्वतः आपल्या सगळ्या गोष्टींना जबाबदार असतो.. बऱ्याचदा आपण स्वतःच एखाद्या गोष्टीबद्दल हार मानतो.. आणि आता सगळंच संपलं असं वाटून घेतो.. आयुष्यातल्या अनेक स्पर्धांमधून तुम्ही बाहेर पडत असता.. तेव्हा सगळं तसंच अर्ध्यावर सोडून चालत नसतं.. तर तिथून पुन्हा नव्या स्पर्धेला सुरुवात होते.. माझ्याबाबतीतही असं घडतं बऱ्याचदा.. पण मी तेव्हा अजून नव्या जोमाने काम करायला लागते.. जसं मी सावनी unplugged बद्दल म्हणाले.. मला तेव्हा वाटलंहि नव्हतं कि हि concept इतकी जादू करून जाईल.. कारण सुरुवातीला असं वाटलं कि , अरे बापरे यात रिस्क आहे.. लोकांना खरंच हे आवडेल का.. कि लोक नावं ठेवतील.. आपल्याकडे असंही एक बोललं जातं कि.. आपल्याकडे पारंपारिक गाणी जास्त प्रमाणात ऐकली जातात.. म्हणजे भावगीतं भक्तीगीतं.. ती आपली संस्कृती आहे.. प्रश्नच नाही.. आहेच.. पण काळानुसार त्यात थोडेसे बदल करावेत एक वेगळा ट्रेंड आणावा असं मला वाटलं.. आणि मग तोच क्षण होता कि मी तेव्हा स्वतःला push केलं.. आणि विश्वास दिला कि तू आत्ता जे करतीयेस ते चांगलंच आहे.. पण अजून काहीतरी वेगळं.. नवीन.. करून बघायला काय हरकत आहे.. आणि हे तूच करू शकतेस.. तुझ्या कडून inspire होऊन अनेक जण हा Covers आणि Unplugged versions चा form अजमावून पाहायला लागतील.. Just Go for it..!! आणि तसं झालंही.. अनेक लोकांनी अशी गाणी केली.. आणि मला याचं समाधान वाटलं कि, हा form मी अजून popular करतीये..!!

-तुषार पवार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *