Home मुलाखती अभिनिवेष अभिनिवेष- आदिश वैद्य

अभिनिवेष- आदिश वैद्य

अभिनिवेष- आदिश वैद्य

आदिश मुलाखतीच्या सुरुवातीला आपण तुझ्या बालपणाबद्दल बोलूत.. तुझं बालपण कसं गेलं.. शाळेत देखील तू सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये वगैरे भाग घ्यायचास..?

माझं बालपण सगळं मुंबईतच गेलं.. धमाल मजा मस्ती जसं typical असतं अगदी तसंच.. आणि basically आमच्या घरात अभिनयाचं तसं काही background नव्हतं.. त्यामुळे अगदी लहानपणापासून वगैरे मी अभिनयात नव्हतोच मुळी.. म्हणजे मुलं जसं बालनाट्य वगैरे करतात तसं काही मला करता आलं नाही.. शाळेत असताना तर सांस्कृतिक कार्यक्रमांपेक्षा क्रीडामहोत्सवात भाग घेण्याकडे माझा जास्त कल असायचा.. मला तेव्हा क्रिकेट जाम आवडायचं.. आदिश तू पोद्दार कॉलेजचा विद्यार्थी आहेस.. कॉलेजात असताना कधी एकांकिका वगैरे केल्या..

नाही.. मला खरंतर youthfest वगैरे सांस्कृतिक कार्यक्रम आवडायचे.. आणि भाग घ्यायची इच्छा देखील असायची.. पण माझा कल क्रिकेट खेळण्याकडेच जास्त असायचा.. म्हणजे मी नेहमीच इतर काहीही आणि क्रिकेट यांमध्ये क्रिकेटच निवडायचो.. पुरुषोत्तम, फिरोदिया यांसारख्या स्पर्धांमधेही कधी भाग घेता आला नाही.. पण मी त्यांच्या तालमी, त्यांचे प्रयोग पाहायला नक्कीच जायचो.. मला आवड होतीच पण माझी निवड तेव्हा वेगळी होती..

स्टार प्रवाह वाहिनी वरच्या “तुमचं आमचं सेम असतं” या मालिकेत तू ‘परीक्षित’ नावाची भूमिका केली होतीस.. या भूमिकेने आणि परिणामी मालिकेने तुला काय दिलं..?

तुमचं आमचं सेम असतं हि श्रेयस तळपदेंच्या affluanceची पहिलीच मराठी मालिका होती.. आणि अश्या या मालिकेचा मला भाग होता आलं हे मी माझं भाग्य समजतो.. ती फक्त एक मालिका नव्हती.. तो एक प्रवास होता.. आणि त्या प्रवासात आम्हाला मार्गदर्शन करायला होते अनेक दिग्गज लोक.. ज्यात स्वतः ‘श्रेयस तळपदे’, ‘प्रतिमाताई कुलकर्णी’, ‘आनंद इंगळे’, ‘कविताताई’, ‘स्वाती चिटणीस’, आणि अजून कित्येक.. त्यांच्या कडून जितकं शिकता येईल तितकं मी घेत आलोय.. आणि तिथे शिकलेली प्रत्येक गोष्ट आजही मला काम करताना उपयोगी पडत आहे..

“तुमचं आमचं सेम असतं” नंतर लगेचच “झी मराठी” सारख्या चॅनेल वर मालिका मिळणं.. काय सांगशील.. तुझ्या production हाउस आणि “रात्रीस खेळ चाले” च्या एकूणच अनुभवा बद्दल..

“तुमचं आमचं सेम असतं” हि मालिका संपत आली असतानाच मी “रात्रीस खेळ चाले” या मालिकेसाठी ऑडिशन दिली होती.. आणि काही दिवसांतच मला हि भूमिका मिळाल्याचं कळलं.. खरंतर तेव्हा मला माहित नव्हतं कि ही मालिका झी मराठी साठी केली जातीये.. पण जेव्हा कळालं तेव्हाच ठरवलं या भूमिकेत जीव ओतून काम करायचं.. या मालिकेच्या सेट वर अनेक अनुभवी मंडळी असतात आणि त्यांच्या सोबत काम करताना तर अनेक गोष्टी शिकायला मिळतात.. मी तर अधाश्यासारखं सगळं साठवून घेण्याचा प्रयत्न करत असतो.. आणि खरंतर आमचं production house देखील नवीनच आहे.. TV मालिका म्हणून त्यांचा हा पहिलाच प्रोजेक्ट आहे.. पण याची जाणीव कधीच होत नाही.. आम्ही बऱ्याच प्रतिकूल परिस्थितीत राहतो.. सलग ४०-५० दिवस घरापासून लांब, सावंतवाडी सारख्या ठिकाणी आम्ही सगळे एकत्र राहतो.. इतक्या सगळ्या लोकांची व्यवस्था करणं.. काही हवं नको ते पाहणं.. तसं अवघडच आहे.. पण सगळ्या टीमने देखील तिथली परिस्थिती accept केली.. आणि प्रत्येक बाबतीत खूप समजूतदारपणा दाखवला.. या सगळ्यासाठी संतोष अयाचित आणि सुनील भोसले यांचे आभार मानावे तितके थोडे आहेत..

अभिनय क्षेत्रात आणि एकूणच कलाक्षेत्रात अनिश्चिततेचं सावट पसरलेलं असतं.. आज जे काम हातात आहे त्यानंतर पुढे काय.. असा प्रश्न कधी पडतो का?

मला वाटतं असा प्रश्न प्रत्येकाला पडायला हवाच खरंतर.. त्याशिवाय तुमची growth होणार नाही.. कारण अभिनय क्षेत्रात आणि एकूणच कला क्षेत्रात जर तुम्हाला नेहमी काम मिळवत राहायचं असेल तर तुम्हाला स्वतःला तितकं प्रगल्भ करावंच लागेल.. कारण हा असा, महिन्याच्या शेवटी एक ठराविक रक्कम हातात सोपवणारा sure shot जॉब नाहीये.. यासाठी तुम्हाला स्वतःला नेहमी presentable आणि गरजेनुसार upgrade करत राहिलंच पाहिजे.. आणि या गोष्टींचं भान ठेवलं तर असा प्रश्न खूप कमी वेळा पडेल, असं मला वाटतं..

 तुझ्या आत्ता पर्यंतच्या प्रवासामधे तुझ्या सोबत नेहमी असणारी व्यक्ती कोण होती..? तुझ्या लेखी त्यांचं महत्व काय आहे..?

मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो कि माझ्या बरोबर माझे आई-वडील नेहमीच होते.. मग ते माझं शिक्षण असो क्रिकेट असो वा अभिनय.. त्यांनी माझ्या पंखात नेहमीच बळ भरलंय आणि मला मुक्तपणे संचारू दिलंय.. आणि कदाचित त्या सगळ्याचाच परिपाक म्हणजे आजचा मी.. माझ्या काही मित्रांनी सुद्धा मला बरीच मदत केलीये.. म्हणजे माझ्यातल्या अभिनयाच्या spark ला ओळखून मला नेहमीच त्यात प्रोत्साहन देत आलेत..

आदिश “रात्रीस खेळ चाले” या तुझ्या मालिकेबद्दल बरीच controversy झाली.. मुळात तुमचा हेतू कधीच चुकीच्या गोष्टीचं समर्थन करणं हा नव्हता.. पण तुम्हाला बऱ्याच टीकेला सामोरं जावं लागलं.. शब्दीप्ताच्या माध्यमातून तू प्रेक्षकांना काही संदेश देऊ इच्छितोस का..?

हो.. जसं तू म्हणालास तुषार, आमचा हेतू समाजातल्या अनिष्ट रूढी, परंपरा आणि प्रथांचं समर्थन करणं हा कधीच नव्हता.. यातूनही ज्या काही controversies निर्माण झाल्या होत्या त्याला आमची संपूर्ण टीम अगदी धीराने सामोरी गेली.. आणि काय असतं ना जेव्हा एखाद्या कार्या मागचा तुमचा भाव शुध्द असतो तेव्हा ते कार्य तडीस जातंच.. आणि तसंच झालं.. दरम्यानच्या काळातही तुम्ही प्रेक्षकांनी आमच्यावर जो विश्वास दाखवला तो खूप महत्वाचा होता.. तुम्ही आमच्या पाठीशी उभे होतात म्हणूनच आम्ही पुन्हा एकदा तुम्हाला उत्तमातलं उत्तम देण्यासाठी उभारी घेतली..

श्रद्धा-अंधश्रद्धा या वर तुझं नेमकं काय मत आहे..

श्रद्धा-अंधश्रद्धा ही तशी बऱ्याच अंशी व्यक्तिगत बाब आहे.. म्हणजे त्यावर एकच universal मत द्यावं अशी नाही.. पण या बाबतीत प्रत्येकाचं वैयक्तिक मत असतं.. माझंही आहे.. माझा अंधश्रद्धेवर आजिबात विश्वास नाही.. पण एखाद्याला एखादी गोष्ट केल्याने मानसिक, आत्मिक समाधान मिळत असेल तर त्याने खुशाल ती गोष्ट करावी..

एका अभिनेत्याच्या दृष्टीने गुड लुक्स सोबतच वेल फिजीक हि गोष्ट देखील तितकीच महत्वाची आहे असं तुला वाटतं का..?

हो नक्कीच.. एका अभिनेत्यासाठी अभिनयासोबतच गुड लुक्स आणि वेल फिजीक या गोष्टी हातात हात घालूनच येतात खरंतर.. आणि गुड लुक्स म्हणजे फक्त तुमचं दिसणं नाही.. तर तुम्ही स्वतःला presentable कसं करता हे हि तितकंच महत्वाचं ठरतं.. तुमचे hand gestures.. तुमचा आवाज, तुमचे केस, स्कीन आणि एकूणच body language या सगळ्या गोष्टी गुड लुक्स मध्ये अंतर्भूत होतात.. आणि याच बरोबर वेल फिजीक असेल तर आणखी काय हवं.. आणि या क्षेत्रात तुम्हाला पुढे जायचं असेल तर या गोष्टी असणं खरंच खूप महत्वाचं आहे..

आदिश, Feel The Content.. But Ask For More..!! ही आमची शब्दीप्ता Magazine ची tagline.. तू स्वतः कडून अश्या कुठल्या जास्तीची अपेक्षा करतोस..

मी प्रत्येक दुसऱ्या दिवशी जेव्हा झोपेतून उठतो तेव्हा माझ्या plus points मध्ये कोणती नवीन गोष्ट add झालीये हे पाहण्याची मला उत्सुकता असते.. मी आज जसा आहे त्यात उद्या हमखास काहीतरी भर पडली पाहिजे असं माझं ठाम मत आहे.. आणि त्याच दृष्टीने माझे प्रयत्न नेहमी चालू असतात.. so मी माझ्यातला आत्ताचा अभिनेता feel करत करत एका अजून प्रगल्भ, प्रतिभावान आणि सर्वगुणसंपन्न कलाकाराची अपेक्षा करतोय..

दुष्काळाच्या विळख्यातून महाराष्ट्राला सोडवण्यासाठी एक कलाकार म्हणून तू तुझं योगदान कश्या पद्धतीने देऊ इच्छितोस..

मी एक कलाकार असण्या आधी सामान्य माणूस आहे.. आणि एका सामान्य माणसाला अगदी सहज करता येईल अशी गोष्ट म्हणजे पाण्याची बचत.. सुदैवाने महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी मुबलक प्रमाणात पाऊस झालाय पण आता तिथे जमा झालेलं पाणी योग्य पद्धतीने साठवणं देखील महत्वाचं आहे.. आणि पाण्याच्या वापराबद्दल जागरुकता निर्माण होणं देखील.. आज शब्दीप्ता च्या माधमातून मी माझ्या चाहत्यांना आवाहन करू इच्छितो.. कि पाण्याचा वापर जपून करुयात.. आणि मिळालेल्या पाण्याची साठवणूक देखील योग्य पद्धतीने करून पाण्याची बचत करूयात आणि या दुष्काळरुपी विळख्यातून महाराष्ट्र मुक्त करण्याचा विडा उचलुयात..

धन्यवाद आदिश..

हा होता,

एका अभिनेत्यासाठी अभिनयासोबतच गुड लुक्स आणि वेल फिजीक या गोष्टी हातात हात घालूनच येतात असं सांगणारा.. त्याच्यातला आत्ताचा अभिनेता feel करत करत एका अजून प्रगल्भ, प्रतिभावान आणि सर्वगुणसंपन्न कलाकाराची अपेक्षा करणारा.. आणि “रात्रीस खेळ चाले” मालिकेच्या सेट वर अनेक अनुभवी मंडळींकडून मिळणारं मार्गदर्शन मी अधाश्यासारखं साठवून घेण्याचा प्रयत्न करत असतो असं अगदी प्रांजळपणे कबूल करणारा.. एक गुणी अभिनेता..

आदिश अरविंद वैद्य

-तुषार पवार

Previous article कर्मयोगी- निळू फुले
Next article सुरेल वाटचाल- हर्षवर्धन वावरे
Crammed of Spirituality... Loved to be surrounded by Positive Vibes... पाडगावकर, खांडेकर, दवणे, मतकरी, पुलं, वपु, चंगो; आणि अजून कित्येक... या व्यक्तिंनी जे दर्जेदार लिहिलं.. ते साहित्य वाचून, अनुभवून झपाटून गेला; 'शुभॠष्' या टोपण नावाने लिहीणारा एक स्वैर-लेखक... डॉ. तुषार प्रशांत पवार आणि जेव्हा त्याच्या सोबतीनं, त्याच्याच सारखे साहित्यवेडे जमले तेव्हा प्रत्यक्षात आली 'शब्दीप्ता Magazine' ची संकल्पना...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here