Home Featured साधना विवेकाची- आषाढी एकादशी

साधना विवेकाची- आषाढी एकादशी

साधना विवेकाची- आषाढी एकादशी

विठ्ठलाच्या चरणी..

आज आषाढी एकादशीच्या भक्तीपूर्ण मंगलमय दिनी, महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विट्ठल रखुमाई चरणी भावभरीत नमन करून, साहित्यनिर्मितीतुन समाजोपयोगी जागर करण्याचा मानस प्रत्यक्षात उतरवण्यासाठी, शब्दीप्ता eMagazine चा नव्याने शुभारंभ करीत आहोत. हा भाव श्री विठ्ठल चरणी समर्पित करून, मॅगझीनचे लोकार्पण करीत असताना अत्यन्त आनंद होत आहे. आपणा सर्वांनी या सत्कार्यात सहभागी व्हावे, ही मनापासून विनंती.

पृथ्वीवरील भूवैकुंठ पावन क्षेत्र पंढरपूर , जिथे या विश्वनिर्मात्या कृपावंत ईश्वराचे सगुण रूप श्री विठ्ठल, अनेक युगे भक्तांच्या भावाला आशीर्वादित करीत विटेवरी उभे आहे. त्या विठुरायाच्या सुखमय दर्शनाचा आज आनंदमय सोहळा.. आषाढी एकादशी!!
विठ्ठलाच्या दर्शनासाठी ‘भेटीलागी जीवा, लागलेसी आस’ या आर्त ओढीने लाखों भाविक दरवर्षी मैलांचा पायी प्रवास करीत पंढरपूरला जातात. आपल्या देवाप्रती असणाऱ्या भावाची जोपासना करणारी ही येरझार म्हणजेच वारी होय. भक्तीची ही साधना करणारे मोक्षाचे अधिकारी ते वारकरी. वैदिक ज्ञानाची उपासना करणारा हा वैष्णवांचा भक्ती संप्रदाय म्हणजेच वारकरी संप्रदाय. या भक्तीचे मंदिर उभारले संत मांदियाळीने. भक्त पुंडलिकाच्या भावाने देव भूवरी अवतरले,त्यांनतर अनेक संत श्रेष्ठींनी भागवत धर्माचे आचरण व प्रसार करून त्यांस वैश्विक रूप दिले. ज्ञानयोगी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माउलींनी या मंदिराचा पाया रचला, संत नामदेवांनी त्याचा विस्तार केला, संत एकनाथ महाराजानी भक्कम खांब होऊन आधार दिला आणि जगद्गुरू तुकोबारायांनी यावर कळस चढवला. संतांनी निर्माण केलेली ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, नामदेव गाथा, तुकाराम गाथा ही ग्रंथसंपदा आयुष्य जगायला शिकवणारी आहे. या संतांच्या मार्गावरून चालणे म्हणजेच आयुष्य परिपूर्णतेने जगणे आहे. अवघ्यांचे आयुष्य सुखी व्हावे याकरिता ईश्वराशी एकरूप होण्यासाठी, भक्तीचा-नामस्मरणाचा अत्यन्त सोपा मार्ग या संप्रदायाने सांगितला.
पंढरीची वारी हा भाविकांचा दरवर्षी आनंददायी सोहळा असतो. परंतु यावर्षी कोरोना विषाणू साथीमुळे हा सोहळा अनुभवता आला नाही. शरीराने प्रत्यक्ष जाऊन दर्शन नाही घेता आले. विज्ञान तंत्रज्ञानाच्या साह्याने दर्शन घडू शकले हे खरे असले तरी, त्याहीपेक्षा मनाने व वाणीने जपलेला भाव विठ्ठलापर्यंत नक्कीच पाहोचणारा आहे. मन व वाणी द्वारे ‘ठायीच बैसोनि करा एक चित्त ‘ या तुकोबारायांच्या उक्तीप्रमाणे केलेली साधना पांडुरंगापर्यंत पोहचणारी आहे. आजच्या या एकादशीला शुद्ध चित्ताने – आचरणाने विठ्ठलाच्या चरणी समर्पित होऊया. सध्या निर्माण झालेले कोरोनासाथीचे संकट लवकर संपू दे आणि अवघ्यांचे जीवन आनंदी होऊ दे याकरिता प्रार्थना करूया!!
।। राम कृष्ण हरि।।

– डॉ. वर्षा खोत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here