“अरे देशपांडे मास्तरांनी काल लेक्चर घेतलं राव”, गण्या म्हणाला..
आमच्या gang च्या एका सदस्याने आपलं मत मांडायला चालू केलं..
“हो! ना इतका वेळ कोणी कसं बोलू शकतं..?”, सगळ्यात जास्त बडबड करणाऱ्या निशा मॅडम बोलल्या..
तितक्यात कॅंटीनच्या छोटूने मधेच बोलत विचारलं, ” दादा, सहा कप चहा आणि तीन कप कॉफी ना ?” सगळ्यांनी मान हलवत होकार दर्शवला.. त्यालाही आम्ही सगळ्यांच्या आवडी-निवडी लक्षात आल्या होत्या..
आता या गप्पा रंगायचं कारण काही वेगळं असं नव्हतं.. लेक्चर संपवून आम्ही ठरल्याप्रमाणे कॅन्टीनला जायचो आणि निवांत, कडक चहा आणि strong कॉफी घेत, काही काम किंवा दिवसभरातील गप्पा मारायचो.. हे आमचं ठरलेलं routine असं म्हटलं तरी काही हरकत नाही..
अशाच लेक्चर वरून गप्पा त्या कोरोना वर आल्या.. अर्थातच आपली युवापिढी चर्चा तरी करणारच !!
“यार !! त्या नवीन रोगाबाबत काही ऐकलं का?? ” सुरेश ने प्रश्न मांडला. ” हो रे, आजच सकाळी ऐकलं खूप घातक आहे म्हणे.. म्हणजे त्यावर काही औषध पाणी नाही अजून..” राधी उत्तरली.
” हा ना, त्याच्या पेशंटची संख्या झपाट्याने वाढत आहे.. त्यात भारतात पण एका पेशंटची तपासणी करण्यात आली आहे म्हणे.. ” सावीने ठरल्याप्रमाणे यावर ही अभ्यास केला होता..
“अरे, हो म्हणे.. आता देशात येणाऱ्या प्रत्येकाची तपासणी होणार आहे आणि देशात बाकीच्या देशांसारखे चित्र उभारायला नको, म्हणून कदाचित सगळीकडे बंद होऊ शकतो “, मी काहीशा काळजीने म्हणाले..
” काय अरे !! बाकीच्या देशांमध्ये पेशंटची संख्या पाहून अंगावर काटा येतो.. तरी आपल्या देशाने पण सुरक्षा चालू केली आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळांवर बाहेरून येणाऱ्या प्रवाशांच्या तपासणी चालू केल्यात.. मग च त्यांना आत येण्याची परवानगी देत आहे आणि तेवढेच नाही तर काही काही लक्षणे दिसल्यास त्यांना तिथे एअरपोर्टवर थांबवण्यात येत आहे.. तेही 14 दिवस.. कारण हा व्हायरस 14 दिवसांसाठी active असतो.. पण आपल्या देशात बाहेरून आलेल्या लोकांची संख्या जास्त आहे.. या आधी काही दिवसांपूर्वी आलेले लोक त्यांचं काय?? खूप च गंभीर प्रश्न निर्माण होईल.. ” gang च अगदी हुशार व्यक्तिमत्व रोहन ने आपलं मत मांडलं..
” कदाचित आता सगळं बंद होतंय असं वाटतंय, काही बातम्यांमध्ये तसेच लोकांमध्ये चर्चा सुरू आहे आणि लोकांमध्ये भीतीचे वातावरण नाही आहे..” मी म्हणाले.”काय माहित, जर बंद झाले तर सगळं कठीण होईल नाही का?? म्हणजे बघ ना,, आपण तर बाहेर न येणे म्हणजे !! बापरे नुसतं इमॅजीन जरी केलं तरी..धस्स होतं !!”, पुढचा चहाचा घोट सुरकन पीत शालूने भीती आणि चहाच्या घोटाला आतंच गटकलं..
या सगळ्या गप्पा गोष्टी मधे कधी घरी जायची वेळ झाली काही कळालंच नाही.. खरंच !! मित्र-मैत्रिणींसोबत कधी आणि कशी वेळ जाते काही कळतंच नाही.. या आनंदीमय क्षणांची अशीच माळा रचत पुढे जाणं.. काय असतं ना.. ते फक्त ते क्षण जगत मोती माळत जगणाऱ्याला च ठाऊक !! कुटुंब होऊन राहणं आणि फक्त ओळख असणे यात बराच मोठा फरक आहे.. आणि जेव्हा मैत्री कुटुंबासारखी होते तेव्हा त्यातील प्रत्येक सदस्याला नवीन ओळख तर मिळतेच.. पण स्वतःला स्वतःसाठी काय करायला हवं आणि स्वतःला मांडण्याची संधी सुद्धा मिळते.. तोंडावर शिव्या देणाऱ्या पण नेहमी साथ देणाऱ्या मंडळीं सोबतचे किस्से सांगायला बसले तर खरंच.. वेळ अपुरा पडेल..
कडक चहा आणि स्ट्रॉंग कॉफीचे मजे घेत.. शिक्षकांना जरा जास्तच मान देऊन.. एकमेकांची उडवत.. आजही त्या माळेत काही मोती विणत.. आजचाही दिवस असाच त्यांच्यासोबत गेला..
आता पुढे नेहमीचा प्रवास.. राजाराम कॉलेज ते शिवाजी पुतळा आणि मग ‘घर ‘.. दिवसभर कितीही फिरलं, काम केलं, बाहेर वेळ घालवला.. तरी ती हक्काची जागा हवीच की.. दिवसभरातील सर्व गोष्टींचा विचार एकत्र मांडण्याची.. त्यांचा विचार करण्याची जागा.. या विचारात लागणाऱ्या अनुभवांची जोड देणाऱ्या वरिष्ठांची जागा.. आईच्या काळजीतल्या प्रेमाची आणि वडिलांच्या रागामागच्या प्रेमाची जागा.. दमलेल्या शरीराला मायेच्या पदरात घेणारी ती जागा.. म्हणजे घर !!
प्रवासानंतर घरी येऊन गरमागरम चहा आणि कॉफी तर तयारच असते.. नेहमीप्रमाणे.. आजी-आजोबा आणि आई.. जणू काही घरातलं पाखरू परत येण्याची आतुरतेने वाटंच बघत आहेत.. किती छान ना.. म्हणजे आपली कितीही आतुरता असली तरी त्यांच्या आतुरते पुढे काहीच नाही !!
आता बाबांची वाट पाहणं, अभ्यास आणि बाकीची कामं चालू होतात.. थोड्या assignments उरकल्या.. इतक्यात बाबा आले..
ते आले की, सगळ्यांचे लक्ष त्यांच्यावर.. स्पेशली आईचं.. त्यांना काय हवं काय नको.. यातच बाबांच्या चेहर्यावरचं समाधानी हसू.. आई च्या सकाळपासूनच्या घाईला, कामाला पावती देऊन जातं..
बाबा फ्रेश होईपर्यंत, मी आणि आईने ताट वाढून घेतले. आजी-आजोबा आणि आमचे लहान बंधू राज सगळेच एकत्र जेवायला बसलो. दिवसभर केलेली काम..मस्ती.. काही शंका आणि त्यांचे निरसन या सगळ्यांची एकत्र मेजवानीच.. मग या मेजवानीत आजचा विषय.. आजोबांची ‘करूणा ‘.. आता त्याचं वार असं काही पसरलंय, की या वाऱ्याची सुद्धा लोकांना भीती वाटायला लागेल.. अशी शंका येते..
” अरे, तुम्ही आज आपापल्या कामात असाल.. पण त्या कोरोना बाबत ऐकलं ना !! अचानक सगळं काही बंद व्हायची शंका येते. त्यामुळे बाहेर जाताना मास्क वापरण्याचे विसरू नका.. प्रत्येकाला स्वतःची काळजी घ्यावी लागेल आणि तेच आता गरजेचं आहे.. ” बाबांनी आपलं मत मांडताना आम्हाला काळजी घेण्याचं सांगितलं.. या गप्पा होत सगळ्यांचं जेवण झालं.. सगळी मंडळी आपापल्या कामाकडे वळली.. मी अंगणात शतपावली च्या निमित्ताने बाहेर पडले. हे रोजचं routine च.. बऱ्याच गोष्टींचा उलगडा स्वतःसोबत करण्याची सुवर्णसंधीच !!
कधी घरात बसावे लागेल, असा विचार सुद्धा केला नव्हता.. आणि खरंच परिस्थिती इतकी घातक आहे का?? भविष्यात होईल का?? खरंच आपल्यासारखी मंडळी जी फक्त विसाव्यासाठी घरी येतात.. ती अशी कैद केल्यासारखी घरी बसतील?? आपल्याच घरी जेल मध्ये राहणे, जमेल का आपल्याला?? खरंच सगळं बंद झालं तर त्या सामान्य जनतेचं काय?? रोज पेपर विकणारे दादा.. रस्त्यांचे काम करणारे लोक.. रोजंदारीवर ज्यांच्या घरी जेवण बनतं अशा लोकांचं काय?? ही तर फक्त काही उदाहरणं आहेत पण खरंच समाजात वावरताना अशा अनेक लोकांचं आयुष्य समोर दिसतं..
बापरे!!! किती प्रश्न.. त्यांची उत्तरं कशी शोधावित.. याचंच उत्तर आपल्याला ठाऊक नाही..
आता फक्त काळजी करणं त्या पेक्षा काळजी घेणं आणि आलेल्या परिस्थितीला सामोरं जाणं याच्या पलीकडे आपल्या हातात काहीच नाही.. आजोबांची ‘करूना’ खरंच आपल्यावर ‘करूणा’ दाखवेल का???