शब्दीप्ता Sept’2016

संपादकीय..!!!

Feel The Content… But Ask For More..!!! हे ब्रीद वाक्य घेऊन, अनेक आघाडीच्या दैनिक, पाक्षिक, तसेच मासिकांच्या स्पर्धेत… आम्ही आपल्या सेवेत हजर झालो आहोत; शब्दीप्ता Magazine च्या माध्यमातून… शब्दीप्ता म्हणजेच… शब्दांना दीप्त करणे.. स्वत:च्या लेखणीने शब्दांना दीप्त करुन साहित्य निर्मिती करणा-या अवलियांचा सन्मान करणे; हा आमचा प्रमुख उद्देश..

शब्दीप्ता हे एक eMagazine आहे.. दर महिन्यातील संकष्टी चतुर्थी च्या दिवशी नवीन अंक प्रकाशित केला जातो.. ज्यात असतं, तुमच्या विचारांना प्रगल्भ करण्याच्या दृष्टिने उपयोगी खाद्य.. आणि’ चिंतनात्मक लेखन, तरुण लेखक-लेखिकांच्या नजरेतून..

पदार्पणातंच आम्ही आपल्या इच्छा, अपेक्षांची पुर्ती करण्याचं उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून आहोत.. या गणपती उत्सवात रोज अनेकानेक पद्धतीच्या पोस्ट्स आम्ही शब्दीप्ता च्या facebook page वरून आणि website वरून टाकत होतो.. या दहा दिवसांच्या कालावधीमध्ये आम्ही सरासरी १५००० हून अधिक लोकांच्या पसंतीस उतरलो आहोत.. मी याचं श्रेय; मला वेळोवेळी मदत करणाऱ्या आणि माझ्यावर विश्वास दाखवलेल्या आपणा सर्व वाचकांना देऊ इच्छितो..

असंख्य दिग्गज लेखक-कवींनी मराठी भाषा आणि आपणा रसिकांच्या दरम्यान सेतू बांधण्याचं मोलाचं काम केलं आहे आणि याच कार्यात आम्हीही अगदी खारीचा वाटा उचलण्याचं व्रत घेऊन आहोत.. प्रतिभावान लेखक-कवीचं साहित्य वाचून, अनुभवून आमच्या शब्दांना उजळवून आपणासमोर सादर करीत आहोत..

या अंकात अमृता पाटील या माझ्या गुणी मैत्रिणीचं “खाण्यासाठी जन्म आपूला..” हे नव्याने सुरु झालेलं सदर.. एक नवा आकार घेतंय..  कोल्हापुरातल्या खाद्यसंस्कृतीबद्दल या अंकात लिहिण्यात आलं आहे.. तशीहि मागल्या अंकात तुमच्या मनात याबद्दलची पार्श्वभूमी तर तयार झालीच असेल.. बघा वाचून.. जुळतायत का संदर्भ..

अश्यातच नव्याने अंतर्भूत केलेलं “चार पावसाळे अधिक..” हे सदर आपल्या पसंतीस उतरल्याचं आपण कळवत आहात.. या अंकात देखील विचार करायला लावणारा एक साधा.. पण महत्वपूर्ण विषय हाताळलाय.. शब्दीप्ताच्या टीम मध्ये आम्हा युवा लेखक-लेखिकांच्या बरोबरीनेच अधिक अनुभवी लेखकांना समाविष्ट करण्यामागचा उद्देश सफल होताना दिसतोय..

संतसाहित्याचा अविरत अभ्यास करणाऱ्या रोहन उपळेकर याने स्मरण या सदरासाठी केलेलं चिंतनात्मक लेखन या अंकात देत आहोत.. आम्ही भारतीय लोक उत्सवप्रिय आहोतच नाहीतरी.. जसे हौसे नवसे तसेच गवसे हि असतातच.. गणेशोत्सव तरी कसा अपवाद ठरणार त्याला, नाही का.. त्याच संदर्भाने आज थोडा विचार करायचा आहे..

अतुल्य त्यागातून समाज उभारणीसाठी शिक्षित पिढी निर्माण करणारे एक आदर्श गुरु.. सुशिक्षित आणि सुसंस्कृत पिढी घडवणारे निरलस प्राध्यापक.. एक प्रसिद्धीपराङमुख व्यक्तिमत्व.. प्रा. के. एस. अय्यर सर या शापित देवदूताला या अंकात श्रद्धांजली वाहण्यात आली आहे..

तसेच हाती टाळ – मृदुंग – चिपळ्या घेत विठूच्या नावाचा गजर करीत मैलन् मैल चालणाऱ्या वारकऱ्यांचं दर्शन आपणा सगळ्यांनाच झालं असेल.. संगीत, नृत्य, गायन, वादन यांचा ‘भक्ती’ शी घातला गेलेला मेळ आगळी – वेगळी अनुभूती देणाराच..!! विठुनामाचा जयघोष करत पंढरी गाठणाऱ्या या माउलींच्या ओठी असणारे अभंग आपल्या सर्वांनाच वेड लावतात..

मंडळी, अशीच काही अवलिया पोरं.. संतांच्या पावलावर पाउल ठेऊ पाहतायत.. त्यांच्या पायात असलेल्या puma.. sparx.. अन् addidas.. च्या Floaters सहित.. जुन्याच अलंकारांना नवा साज चढवून आपल्यासमोर येतात हे अवलिया.. अभंग Repost च्या माध्यमातून.. या अंकात आपल्याला त्यांच्या बद्दल वाचायला मिळेल..

“आपण जे लिहितो त्याचा आपल्या वाचकांच्या मनावर खोलवर परिणाम व्हावा.. आणि उत्कटतेने.. तळमळीने जे सांगतो ते त्याच्या अंतरंगी उतरावं.. हि एकच मनीषा घेऊन साहित्य निर्मिती करणाऱ्या डॉ. सुमति क्षेत्रमाडे..” महाश्वेता.. वादळवीज.. आभास.. युगंधरा.. या त्यांच्या काही गाजलेल्या कादंबऱ्या..
पेशाने डॉक्टर असूनही त्यांनी त्यांची आवड उत्तम जोपासत हि साहित्य निर्मिती केली आहे..

महाश्वेता या कादंबरी ने त्यांना सामान्य जनमानसात एक वेगळी ओळख मिळवून दिली.. त्यांनी इतरही अनेक साहित्य पुष्पं साकारली.. पण आजही त्या ‘महाश्वेता’ च्या लेखिका म्हणून विशेष ओळखल्या जातात.. या अंकाच्या शब्दीप्ता of the issue असतील.. डॉ. सुमति क्षेत्रमाडे

तसंच आपली नेहमीची सदरं आहेतच.. सुरेल वाटचाल या सदरामध्ये गायिका सावनी रवींद्र हिची घेतलेली मुलाखत आहे.. त्याच बरोबर बिपी.. TP.. उर्फी.. या चित्रपटांतून आपल्या भेटीला आलेला.. अभिनेता प्रथमेश परब याची घेतलेली खास मुलाखत अभिनिवेश या सदरामध्ये.. तर वाटेकर्स या सदरामध्ये वेळ हि निराळी या एका नव्या कोऱ्या गाण्याबद्दलची जुजबी माहिती..

या अंकाच्या coverpage साठी पुन्हा एकदा छायाचित्रकार आणि माझा मित्र अभिषेक साटम याने काम पाहिलं आहे.. बाप्पाच्या परतीच्या पार्श्वभूमीवर आधारित असणाऱ्या या अंकाचं coverpageहि तसंच असावं या हट्टापायी साकारलेलं हे छायाचित्र खूप काही सांगून जातं..

२३ जुलै २०१६ रोजी प्रकाशित केलेला शब्दीप्ता Magazineचा सातवा अंक वाचून आपण दिलेल्या काही उत्स्फूर्त प्रतिक्रियांचा देखील समावेश करीत आहोत..

१९ सप्टेंबर.. संकष्टी भाद्रपद, २०१६ रोजी प्रकाशित होणारा शब्दीप्ता Magazineचा हा आठवा अंक.. श्रीनिवास खळे काका आणि वि. स. खांडेकर यांच्या स्मृतीचरणांवर समर्पित करीत आहोत..