अवीट आचमन –अर्घ्य तीसरे
क्षितिजाच्या ओढीने सुरु झालेला हा स्वरसागराचा प्रवास.. अनेक स्थित्यन्तरं.. दूरदूर पर्यंत फक्त खळाळतं पाणी.. जसजसं आत जाल तसतसं खोलवर पोहोचलेलं.. निळ्याशार पाण्याचा डोह.. तसं पाहायला गेलं तर.. आयुष्याचं पण असंच काहीसं असतं नाही.. ओढ.. स्थित्यन्तरं.. खळाळता डोह.. सगळं तसंच.. पण विचार केला तरंच बरं का.. कारण त्या अथांगतेकडे नुसतं बघायला सुद्धा आपल्या आतल्या पाण्याची पातळी समतल असावी लागते.. नाहीतर मग भरती ओहोटी आलीच म्हणून समजा..
शाहिरी महाराष्ट्राचा लोकरंग
रामानंद उगले या नव्या दमाच्या शाहिरांच्या खणखणीत आवाजातल्या मानाच्या मुजऱ्याने स्वरसागर सांस्कृतिक महोत्सवाच्या आजच्या शेवटच्या दिवसाच्या पहिल्या सत्राची दमदार सुरुवात झाली.. शाहीर रामानंद उगले यांच्या घरात पहिल्या पासूनच ही शाहिरी कला नांदत आहे.. वडील आप्पासो उगले, पांडुरंग गोटकर, देवानंद माळी यांच्या कडून या कलेचा अभिजात ठेवा रामानंद उगले यांना मिळाला आहे.. संगीत सम्राट, एकदम कडक, जय जय महाराष्ट्र माझा अश्या टेलिव्हिजन वरील अनेक कार्यक्रमात देखील उगले जींच्या या चमूने मजल मारली आहे..
तसेच शाहिरी शिवदर्शन, जागर कुलस्वामिनीचा अश्या कार्यक्रमांचं सादरीकरण देखील अनेकविध ठिकाणी केलं जातं..
“करतो वंदना गौरीनंदना..” म्हणत श्रीगणेशाच्या चरणी या कार्यक्रमाची नांदी अर्पण करून सुरू झालेलं हे सादरीकरण उत्तरोत्तर रंगतच गेलं..
महाराष्ट्राचं मानवी दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांच्या.. आचारांच्या अभावाची प्रखर जाणीव करून देणारा “या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे” हा पोवाडा असेल..
वासुदेवाने दान पावलं म्हणत निरक्षर मातेच्या डोळ्यांत घातलेलं झणझणीत अंजन असेल..
“संबळ वाजितो आई तुझा महिमा सांगतो..” असं म्हणत घातलेला आईचा गोंधळ असेल..
शाहिरांनी आजच्या आध्यात्मिक ह्रासाबद्दल सांगताना “काय सांगू भाविकांनो नवलंच झालं, देवळात देवाजीनं उपोषण केलं..” या शब्दात देवाच्या उपोषणाची कथा सांगून श्रोत्यांना मारलेली शाब्दिक चपराक असेल..
लोकसंगीताच्या या लोकरंगातल्या गिता-गितात गीता भरलेली अनुभवायला मिळत होती..
या कार्यक्रमात “एका जनार्दनी समरस झाले सद्गुरू चरणी लीन झाले..” असा शेवट केलेलं “दादला नको ग बाई” या पारंपारिक बोलांवर सादर केलेलं भारुड तर विशेष रंगलं..त्यानंतर सादर केलेलं “त्याने whatsapp वर प्रपोज पहिला केला” या आजच्या काळातल्या भारुडास देखील प्रेक्षकांची पसंती मिळाली..
कार्यक्रमात सर्वात शेवटी सादर केलेला प्रतापगडाच्या पायथ्याशी घडलेल्या रणसंग्रामाचा थरार “होता जिवा म्हणून वाचला शिवा” या उक्तीची आठवण करून देणारा ठरला..
एकूणच हा शाहिरी महाराष्ट्राचा लोकरंग रसिकांच्या पसंतीस पडलेला दिसत होता..
स्वर आनंद
श्लाघ्य वाणी तुझी , आर्तता अंतरी..
सूर गंधाळले , सख्य ते ईश्वरी..
तीन दिवस उगाचच घुटमळणाऱ्या सुरांना आज मिळाली मुभा.. चंद्र होण्याची.. आणि मग ते बरसत राहिले चांदणचुरा होऊन.. मैफलभर..
महोत्सवाच्या शेवटच्या सत्रात या महोत्सवाचे प्रमुख सल्लागार, श्री महेश काळे यांनी गायन सेवा सादर केली.. महेशजी पूरिया-कल्याण नावाच्या अनवट प्रदेशात शास्त्रीय संगिताशी संपूर्णपणे अनभिज्ञ असलेल्या हर एक पांथस्थाला देखील ‘बहुत दिन बिते’ असं म्हणत सुरामृत पाजत होते..
मारवा थाटातल्या या रागात महेशजीचं षड्जं न लावता निषादाशी खेळणं रसिकांना खिळवून ठेवत होतं.. प्रसंगी तो षड्जं स्वतः लावण्यासाठी भाग पाडत होतं..
मंडळी, आजकाल रंगानुसार प्रत्येक फुलाचा वार आणि देव ठरलेला असतो.. खरंतर कोणतं फुल कोणाच्या चरणांवर वाहिलं जावं याला कसली आलियेत बंधनं.. ईश्वराची हर एक कलाकृती अंतिमतः त्याच्याच पायी समर्पण्यासाठी आसुसलेली असते.. तसंच काहीसं संगीता बद्दलही आहे.. उत्तम असणारी कोणतीही संगीत कलाकृती, अंतिमतः ईश्वराच्याच पायी समर्पण्यासाठी जन्म घेत असते.. आणि महेशजीं च्या आजच्या या अभिजात संगीत अभिनवाच्या सोबतीने पोहोचवण्याच्या प्रयोगाने हेच साध्य केल्याचं दिसून येतं..
तराणा गाताना त्यात एकेका पाश्चिमात्य धाटणीच्या वाद्याचं जे infusion होत होतं ते खरोखरंच अवर्णनीय..
कार्यक्रमाने नंतर वळण घेतलं ते सुगम संगीताकडे महेश जींनी सादर केली “मन लोभले.. मनमोहने.. गीतात न्हाली तुजमुळे, साधीसुधी संभाषणे.. ही सुधीर मोघेंची कविता, जी राम फाटक यांनी चाल बद्ध केली आहे.. आणि महेश जींचे गुरू पं. जितेंद्र अभिषेकी बुवा यांच्या स्वरसाजाने नटली आहे..
महेश जी जणू त्यांच्या गान प्रतिभेला संबोधून गात होते.. “कळले मला दिसताच तू माझीच तू.. माझे तुझे नाते जुने” या गाण्यास लाभलेली जॉर्ज ब्रूक्स यांची सॅक्सोफोन साथ चार चांद लावत होती..
त्यानंतरच्या सालग वरहाळी रागातल्या घेई छंद मकरंद या नाट्यगीतानंतर साश्रू नयनांनी झालेला टाळ्यांचा गुंजारव.. आणि हळू हळू एकेका वाद्याचं infusion झाल्यानंतर we will rock you म्हणत निनादून गेलेला आसमंत.. दोन्ही नोंदणीयच..
Infusion हा एक आगळा वेगळा प्रयोग.. हिन्दुस्तानी अभिजात शास्त्रीय संगीतात वापरल्या जाणाऱ्या वाद्यांचा, काहिश्या पाश्चात्य बनावटीच्या वाद्यांशी झालेला सुंदर मिलाफ यामध्ये अनुभवयला मिळतो.. महेशजीं च्या कार्यक्रमाची खासियत म्हणजे त्यांचं प्रेक्षकांना गाण्यात प्रत्यक्ष सामावून घेणं.. शास्त्रीयची सुरावट अतिशय तन्मयतेने गाणारे रसिक प्रेक्षक त्या नंतरच्या infusion मधे देखील ताल मिसळताना दिसत होते..
स्वरगंगेच्या काठावर ‘स्व’ अर्पण करून.. देहभान विसरून गाणारी महेशजीं ची मूर्ती पाहिली की त्यांचे गुरू पं अभिषेकी बुवांची आठवण आल्याशिवाय राहत नाही.. मन्मग्न.. ध्यानस्थ.. स्थितप्रज्ञ.. जिणे गंगौघाचे पाणी हे ज्यांनी पुरतं ओळखलं होतं असे अभिषेकी बुवा.. प्रकाश किंवा तिमीर असुदे.. वाट दिसो अथवा न दिसू दे.. गात पुढे मज जाणे.. इतक्या साध्या तत्त्वज्ञानाने चालणारे असे अभिषेकी बुवा..
“सुखाच्या क्षणात, व्यथांच्या घनात.. उभा पाठीशी एक अदृश्य हात..” महेशजीं च्या गाण्यातून पं. अभिषेकी बुवांचा तो अदृश्य हात.. तो वरदहस्त.. जाणवत होता.. महेश जी आज ज्या काही शिखरावर आहेत त्याचा पाया बुवांनी त्यांच्याकडून पक्का करवून घेतला आणि आज हा त्याचाच परिपाक.. तसं पाहायला गेलं तर त्यांना कुठेच पोहोचायचं नाहीये.. त्यांना आपलं हे अभिजात संगीत लोकांपर्यंत पोहोचवायचंय..
कार्यक्रमात शेवटी महेश काळेंनी सादर केला राग देश.. आपल्या भारत देशाप्रती आपलं असलेलं सुरांचं देणं त्याच्या प्रति सादर अर्पण करण्यासाठी २६/११ ला महेशजींना गेट वे ऑफ इंडियाला गायन सेवा सादर करण्यासाठी बोलावण्यात आलं होतं.. त्याची आठवण करून देऊन त्यांनी त्याच देस रागातली काही गाणी medley च्या स्वरूपात सादर केली..
आणि शेवटी साश्रु नयनांनी सादर झालं, वंदे मातरम..
मंडळी, स्वरसागराच्या या प्रवासात मी तुमच्या पर्यंत काय पोहोचवू शकलो माहित नाही.. पण मला मात्र बरंच काही गवसलं.. निसटून चाललेलं असं.. सोडवून घेत असलेलं असं.. सुटलेलं असं..
स्वरसागरातल्या एकूण प्रवासातला हा एकविसावा महोत्सव खऱ्या अर्थी एक शाश्वत विसावा देऊन गेला.. महेश काळेंच्या स्वर आनंद या अनोख्या प्रयोगाने तर हर एक रज-तमाचा रखवाला शुद्ध सत्वाच्या ओढीने गाठीशी असलेल्या अभिनवाच्या सोबतच पुन्हा एकदा शास्त्रीयच्या, अभिजात संगिताच्या शोधात निघेल यात शंकाच नाही..
आपण पुन्हा भेटुयात पुढच्या महोत्सवात अश्याच एखाद्या संगीत-स्वरसागरात मनसोक्त डुंबायला अथवा काही शिंतोडे उडवून घ्यायला.. तोपर्यंत ही दोलायनं टिकवून ठेवा.. अभिजात शास्त्रीय संगिताची कास सोडू नका.. आणि संगितावर असंच अखंड प्रेम करत रहा..
PC Anurag Godase , Prathamesh Apte