B+ हे स्टेटस म्हणून टाकण्यापेक्षा प्रत्यक्ष असणं किती महत्वाचं आहे.. B+ हा जसा रक्तगट आहे तसाच तो एक विचारगट हि आहे असं मला वाटतं.. आयुष्यावर आत्तापर्यंत अनेक दिग्गजांनी वेगवेगळी मतं, भाष्य, काव्य, चारोळ्या, गजल केलेल्या आहेत. त्यात आयुष्याच्या विविध छटा, रंग व्यक्त केले आहेत. आयुष्यातील सुख-दु:ख, प्रसिद्धी, नैराश्य, क्रोध, क्रूरता, दडपण, भीती, आनंद, उत्साह, कीर्ती, कारुण्य, दारिद्र, रसिकता, उध्वस्तपणा, गुन्हेगारीपणा, द्वेष, लालसा, हव्यास, लोभ, अहंकार, सोशिकता, प्रतिकार, हतबलता, घृणा इतर आणखी कितीतरी मानवी स्वभावांची वर्णनं आपण वाचली, पहिली, काही अनुभवलीही.. या सर्वांचे फायदे कमी आणि तोटेच जास्त लक्षात आले.. ज्यामुळे मानवी आयुष्य गुतागुंतीचे वाटत आहे.
माझ्या मते आयुष्य जर सुटसुटीत आणि सहज सुलभ असे जगायचे असेल तर ‘B+_विचारगट’ खूप महत्वाचा आहे.. मला परीक्षेत ९०% पडले आपण माझ्या मैत्रिणीला ९५% पडले.. निश्चितच तिचे लिखाण मुद्देसूद असेल, योग्य उत्तराचे लेखन केलेले असेल, हस्ताक्षर सुरेख असेल, बौद्धिक क्षमता जास्तच आहे हे सर्व मान्य करून विचार केला तर ही गोष्ट सहज स्वीकारली आणि पचवलीही जाते पण त्यासाठी ‘B+_विचारगट’ असणे महत्वाचे.. आणि नसेल तर किती विरुद्ध परिणाम होतात मैत्रिणीबद्दल मनात द्वेष निर्माण होतो.. स्वतःबद्दल नैराश्य येऊन आयुष्यातला जिवंतपणा हरवून वाईट विचारांनी भविष्याचे नुकसान होते..
माझ्या आयुष्याचा जोडीदार माझ्या सर्व अपेक्षांमधे बसणारा असा मिळावा.. अगदी कथा-कादंबऱ्यांमध्ये असतो तसा सर्वगुणसंपन्न असावा.. मात्र प्रत्येक मानव हा चांगल्या वाईट गोष्टींनी, गुण-दुर्गुणांनी युक्त असतो.. चेहरा, रंग, राहणीमान, विचार, गुण, यांनी प्रत्येक व्यक्ती ईश्वराने भिन्न भिन्न बनवली आहे.. हे जर मान्य झाले तरच पुढे काही गोष्टींत तडजोड केली जाते.. आणि “तडजोड म्हणजेच आयुष्य” हे जीवनाचं तत्वही समजून घेतलं जातं.. इथेही ‘B+_विचारगट’ असेल तर काही बाबतीत तडजोड करून वर-वधू आपापला जोडीदार निवडून नवीन आयुष्य आनंदाने सुरुवात करू शकतात.. आणि नसे तर.. ५० मुलं मुली पहिली.. आता वय उलटून गेलं.. आयुष्य एकाकी राहिलं.. एकटेपणा, नैराश्य, व्यसनाधीनता, गुन्हेगारी, हतबलता अश्या अनेक दुर्गुणांनी ग्रस्त एक आयुष्य संपुष्टात येतं..
आता इथेही ‘B+_विचारगट’ म्हणेल, मीच खूप अपेक्षा ठेवल्या, कुठेतरी तडजोड केली असती तर सर्वसाधारण वैवाहिक व पूर्ण कौटुंबिक आयुष्य मी जगू शकलो/शकले असते.. आता आयुष्य विधायक कार्यात घालवू.. अनेक चांगले मार्ग आहेत पैकी एक निवडून समाजात स्थान, प्रसिद्धी, मान-मरातब, कीर्ती मिळवून आयुष्याचे सार्थक होवू शकते..
नोकरीतील संधी ‘B+_विचारगट’- माझ्या शैक्षणिक पात्रतेत थोडी कमतरता राहिली, माझे प्रयत्न कमी पडले, ठीक आहे पुढची संधी मी गमावणार नाही.. चांगले प्रयत्न करीन.. नाहीच झालं तर छोट्या व्यवसायापासून सुरुवात करीन.. मेहनतीनं पुढं जाईन.. अश्या व्यक्तींना विचारांती अनेक चांगले मार्ग दिसतात.. याउलट माझं नशीबच फुटकं, मागल्याजन्मी काय पाप केलं होतं कोण जाणे.. मी पुढं जाऊच शकत नाही..
न्युनगंड, नैराश्य, भीती, दडपण, व्यसनाधिनता, एकटेपणा, अनेक वाईट सवयी आयुष्यात पदार्पण करून ऐन तारुण्यातले एखादे आयुष्य उध्वस्त करून टाकतात.. मी माझ्या कुटुंबाला सुखी ठेऊ शकत नाही, त्यांच्या सर्व इच्छा, अपेक्षा, गरजा पूर्ण करू शकत नाही.. ‘B+_विचारगट’ या बाबतीत अन्न-वस्त्र-निवारा या मुलभूत गरजा तर पूर्ण आहेत.. मग काय चैनीच्या वस्तू, गाडी, मोठा बंगला, सोने-नाणे, हॉटेलिंग या सर्व अनावश्यक गरजा आहेत.. ठीक, यातही वर्षातून एक छोटीशी ट्रीप कुटुंबाबरोबर झाली.. सौभाग्याचं लेणं म्हणून महत्वाचे मंगळसूत्र, कानातले एकजोड.. एक अंगठी इतके आवश्यक दागिने आहेत.. कुटुंबातील मुलांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वर्षातून एक-दोन वेळा हॉटेलिंग.. बास कि.. छान मजेत चाललंय आयुष्य माझं..
पण याउलट मी माझ्या बायकोला सोन्यानं मढवू शकत नाही.. माझ्या कडे आणखी एखादा मोठा बंगला हवा होता.. मित्र-मंडळींमध्ये मी ही तोरा मिरवला असता, माझ्याकडे महागातली चारचाकी पाहिजे होती.. बँक-बॅलेन्स लाखात पाहिजे होता.. मला हे का मिळू शकत नाही.. मला हे मिळालंच पाहिजे.. माझा तो हक्क आहे.. मी ही टेबलाखालून लाच घेतो.. लबाडी करतो, फसवणूक करतो.. लालसा, हव्यास, लोभीपणा यामुळे गुन्हेगारी, व्यसनाधीनता, विचारांनी मानसिक आजार, शारीरिक व्याधी यासर्व गोष्टींना सुरुवात होते.. आणि बघता बघता एक आयुष्य B.P. शुगर च्या जाळ्यात अडकून चालती फिरती लाश कधी बनते तेही कळत नाही..
मला आयुष्य चांगल्या प्रकारे जगायचंय.. माझ्या गरजा मी माझ्या मिळकतीत पूर्ण करू शकत नाही.. म्हणून मी कर्ज घेतो ‘B+_विचारगट’ म्हणेल मी कर्ज स्वखुशीने घेतेले आहे.. माझ्या गरजांसाठी घेतले आहे.. मी ते फेडू शकतो इतक्याच प्रमाणात घेतले आहे.. ज्या कामासाठी घेतलंय ते; म्हणजे धंद्याला भांडवल, राहायला घर, मुलांचे उच्चशिक्षण, शेतीत सुधारणा, मुलीचे लग्न, आईवडिलांचे आजारपण या विधायक कामांसाठीच खर्च केले जाईल.. याउलट मी इतके कर्ज घेतले आहे आता ते कसे फेडू, याचं सुरुवातीलाच टेंशन घेणे.. घेतलेलं कर्ज दुसऱ्याच कुठल्या विघातक कार्यासाठी खर्च करणे.. मनमानी खर्च करणे.. त्या पैशांचा वापर उत्पन्न मिळवण्यात न केल्या कारणाने कर्ज फेडू शकत नाही.. आणि मग काय.. पुन्हा कर्ज.!!
कर्जाचा डोंगर उभा राहिला की मग आता बँकेचे हप्ते थकले.. वसुलीसाठी माणसं घरी.. समाजात नाचक्की.. घरच्यांचे टोमणे.. स्वतःची दुर्बलता.. हतबलता.. याची परिणाम म्हणजे.. आत्महत्या.. आणि असं एक आयुष्य उध्वस्त.. घरातली कमावती-कर्ती व्यक्ती गेली की.. पूर्ण घरच कोसळतं.. त्यावर अवलंबून सर्व व्यक्तींची घरं उध्वस्त होतात..
असे एक न अनेक यात आणखी एक महत्वाचं म्हणजे.. एकतर्फी प्रेम.. यातही B+_विचारगट’ म्हणेल, मला तिच्या/त्याच्याबद्दल आकर्षण वाटतंय खरं.. पण तिला/त्यालाही वाटेलंच असं नाही, प्रेम हे लादता येत नाही ते सहज निर्माण व्हावं लागतं हे स्वीकारणं.. मी वाट पाहीन.. नंतर व्यक्त करीन.. तरीही तिच्या/त्याच्या कडून नकार आल्यास.. “तू नही तो और सही.. और नाही तो औरही सही..” अशी मनाची समजूत घालीन.. पण या उलट मी तिच्यासाठी काय काय केलं.. पण तरी ती मला भाव देत नाही.. माझ्यावर प्रेम करत नाही.. तिचं तर दुसऱ्यावर प्रेम आहे.. तर ठीक आहे.. ती जर माझी झाली नाही तर मी तिला इतर कुणाचीही होवू देणार नाही.. मनात राग, द्वेष, घृणा, निर्माण होते.. नैराश्य, व्यसनाधीनता, अपेक्षाभंगाचे शल्य, या सर्व मनात निर्माण झालेल्या भावनारूपी वादळाचा उद्रेक संबंधित व्यक्तीचा खून करण्याच्या गुन्हेगारी वृत्तीत होतो.. परिणामी ती व्यक्ती गुन्हेगार बनते.. समाजात तिची नाचक्की होते.. बदनामी होते.. त्यातूनच आणखी गुन्हे घडतात.. आणि अखेर कायद्याच्या कचाट्यात सापडून बंदिस्त आयुष्य जगणे वा फाशीचा फंदा मानेभोवती आवळून एक आयुष्य असंच संपून जातं..
अहो हे तर काहीच नाही असे अनेक लहान-मोठे प्रसंग, घटना, अनुभव, व्यवहार, दिवस आणि रात्र यांनी आयुष्य बनले आहे.. हे आयुष्य कसे जगायचे हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे.. पण माझ्या मते ‘B+_विचारगट’ असलेल्या व्यक्तींचे प्रमाण जर संपूर्ण विश्वात (समाज हा छोटा गट झाला) ८०% खरंतर जरा जास्तच म्हणतीये मी.. चला ७०% जरी असेल तरी रामराज्य व्हायला काहीच वेळ लागणार नाही..
B+_विचारगटामुळे हिंसा, स्पर्धा, युध्द, नैतिक मूल्यांचे अधःपतन, राग, द्वेष, क्रूरता, फसवणूक, गुन्हेगारीता, अनेक वाईट विचार नष्ट होऊन सकारात्मकता समाजात निर्माण होईल.. पर्यायाने अनेक अनिष्ट गोष्टी, घटना घडणारच नाहीत, अनिष्ट गोष्टी न घडल्यामुळे त्याचे होणारे दुष्परिणामही संपूर्णपणे नष्ट होतील.. पर्यायाने एक निकोप सहजसुंदर जीवनशैली निर्माण होईल, सर्व नैतिक मुल्ये जोपासणारा सुदृढ समाज निर्माण होईल आणि सम सर्व विघातक संपून सर्व विधायक होत राहिलं तर आपोआपच आपल्या सर्वांच्या कल्पनेतलं रामराज्य याची देही याची डोळा आपण पाहू अन् अनुभवू शकू..
चला तर मग B+_विचारांची लागण करू.. पावसाला सुरुवात झालीच आहे.. चांगलं पेरलं की चांगलंच उगवतं.. सर्वांनी स्वतःपासून सकारात्मक विचारशैली जगायला सुरुवात करू.. आपल्या सानिध्यातल्या प्रत्येक व्यक्तीला सकारात्मक बनवू.. सुजाण नागरिक हा दुसरा-तिसरा कोणी नसून B+_विचारशैली असलेला एक व्यक्ती असतो..
घर समाज गाव तालुका जिल्हा राज्य आणि अर्थातच देश.. भारत एक B+_विचारगटाचा, सुजाण नागरिकत्वाचा देश बनण्यास आपला वाटा उचलुयात..
अहो., यामुळं खूप काही घडणार आहे.. चांगली विचारशैली चांगले आयुष्य घडवते.. आणि प्रत्येक चांगले आयुष्य चांगली पिढी निर्माण करते.. बस..!! आणखी काय हवंय आपल्याला.. अनेक छोट्या-छोट्या गोष्टी मिळूनच एक मोठी गोष्ट बनत असते..
“थेंबे-थेंबे तळे साचे..” या म्हणीप्रमाणेच प्रत्येक B+ विचारथेंबाचे मोठे तळे साठवायला सुरुवात करू.. विश्वास नांगरे-पाटील म्हणतात त्या-प्रमाणे सोडायला शिकलं की आपण आपोआपच B+ बनणार आहोत.. काय काय सोडणार मग.. अहंकार सोडा.. राग-रुसवा सोडा.. मीपणा सोडा.. हव्यास सोडा.. द्वेष सोडा.. निंदा करणं सोडा.. व्यसनं सोडा.. ईर्षा सोडा.. तिरस्कार सोडा.. जे जे वाईट ते ते सोडा.. बघा झालात की तुम्ही पण B+ विचारगटातले..