प्रिय
गण्या,
कालच घेतलेल्या नव्या गाडीचा आनंद मनात घेऊन मी चालत शेताकडे चाललो होतो.. पाऊस झाला म्हणून गाडी नव्हती नेली मी शेताकडे..
डुलत डुलत शेताकडे जाताना आज माझं लक्ष बांधावर असणाऱ्या आंब्यावर गेलं, तर एक 15 फुटाच्या फांदीवर रामुनाना दावं बांधत होते.. ते पाहून अंगावर शहरा आला, थरकाप उडाला अन् मी पळत त्यांना हाका मारत झाडावर चढलो..
त्यांच्या आशांचा झालेला खून आणि तो खून झाल्यावर भळभळणारं रक्त डोळ्यांत पाण्यासोबत डबडबत होतं..
“रामुनाना तुम्हाला काय अक्कल बिक्कल हाय का नाही.. एवढं काय झालंय.. कटाळलाव जीवनाला जो टोकाचा निर्णय घेतायसा..
गुड्डीनं बब्ल्यानं नमुकाकिनं कुणाच्या तोंडाकडं बघून जगायचं?”
असं रागवून त्यांना बोलून त्या दाव्याचा फासा सोडवला.. आन खाली उतरवलं..
गण्या.. त्यांना सोडून जाण्याची परिस्थिती नव्हती रं.. मी त्यांची समजूत घालत जवळ असलेल्या हिरिकाठी निहून पाणी आणून दिलं..
मी:- काय झालंय ते सांगा बरं आधी.?
नाना:- जिथं तिथं कमीच पडतूया.. सवताच्या बापाला निट निटका दवाखान्यात उपचार करू शकलू न्हाई.. जिवाचं रान करून बापानं मह्या कसं पोसलं माझी मला म्हाईती हाई.. तिथं पैक्याचा मेळ न्हाई लागला.. डाक्टर म्हणीत होता… आप्रेशन करावं लागंन.. आप्रेशन केलं अस्त तर आज बा महा जिता असता.. पण शेतकरी की ररर म्या.. कुठून आणायचा एवढा पैका.. डोळ्यादेखत म्हातारं गेलं तडफडत तडफडत..
(जेवढं पाणी पिलं होतं तेवढं सुरकटलेल्या चेहऱ्यावरून आसावत वाहून जात होतं)
मी:- देवाच्या पुढं काय बी चालत नसतंय बगा कुणाचं… 4 महिनं झालं ह्या गोष्टीला.. बरं जेवढं तुमच्याच्यान होत होतं तेवढं तरी केलावं की तुम्ही.. पण यात लेकराबाळाला का शिक्षा देताव..?
नाना शब्द आडवत मध्येच बोलले
नाना:- आरं आता त्याला बी कमीच पडतुया.. १०वी चांगल्या मारकानं पास झालं लेकरू.. मी त्याला म्हणलं हुत, तू चांगलं मार्क घे मी तुला हात फिरवायचा फोन घेतू ( स्क्रीन टच).. ( गण्या पुना धायमोकळून पाणी आलं रं त्या केविलवाण्या डोळ्यात) पण कसला फोन आन काय..
पण गेल्या साली पाऊस झाला न्हाई शेतात तर बी पिकलं न्हाई..
थोडंबहुत पैकं होतं ती आबाच्या(नानाच्या वडिलांच्या) दवाखान्यात गेलं..
पोराचा दाखला घालायचा ते कालेज वाली 40 हजार मागत होती.. कसलं सायनस (सायन्स) शिकायचं म्हणीत होता बब्ल्या..
म्हणलं माझ्याच्यान नाही शिकणं झालं माझं लेकरू तर शिकंल.. सावकाराकडं मागितलं पैकं, पण ते जमीन लिहून दे म्हणलं.. पण आबाचा घाम गळलेलं रान कसं घान ठिऊ म्हणून काळजाला काळीज लाऊन जपलेला ढवळ्या अन पवळ्या इकला..
(नानाच्या हुंदक्याला आवर घालावा इतका माझा ही हात मोठा नव्हता गण्या.. त्याचं दुःख किती मोठं आहे हे माझ्या समजण्या बाहेरच होतं.. पण गण्या त्यांचे हुंदके सांगत होते ते दुःख कुठल्या थराचं आहे)
पेरणी करून आज इसावा दिस हाय..
रोज वर येत येत जळालेला कोंब काळीज जाळून गेला रं.. आता दुबार पेरणी करावी लागंल आता या पेरणीतच ही पीक जातंय.. बाबल्या गाडी घ्या म्हणतोय कालेजात गेल्या पासनं घेऊ म्हणलं होत त्याला पास झाल्यावर.. त्याला 74 टक्कं पडलं बारावीला.. साधं पेढं घ्याया बी पैका नव्हता जवळ..
आज म्हणीत होता.. तुम्हाला कौतुकच न्हाई माझं.. काय पाप केलं ती तुमच्या पोटी जलमाला आलो..
आसं काळीज करपलं काय सांगू..
मी कायच नाही दिऊ शकलो पोरास्नी..
मग मेल्यालाच बरं की..
पोरिनं कधी न्हाई काय मागितलं पण आता ती पण 10विला शिकतिया तिचं लगीन जवळ आलंय..
मी:- तुमि रडू नका बरं नाना.. तुमी असं केल्यानं काय मिटणार हाय का? कोण बघणार हाय लेकरा कडं ?
नाना:- फाशी घेतल्यावर सरकार देतयं पैकं 2इक लाख किमान गुड्डी च लगीन तर थाटात हुईन.. (गालावरून वर्गळनारं पाणी आणखी ही तसंच चालु होतं.. गुडघ्याला हात गुंडाळून बसलेल्या नानांनी मुंडकं गुडघ्यात घालून पुन्हा हुंदके द्यायला सुरवात केली..)
गण्या मी नानासनी समजावून धीर देत घराकडं न्ह्यायचं ठरविलं..
मी :- उठा बरं नाना असलं काय बी खूळ धरून बसू नका पैक येत्याल जात्याल रागाच्या भरात असलं काय बी मनात आणू नका..
तुम्ही कुठंच न्हाई कमी पडलाव लेकराचा विचार करा त्या 2 आडीच लाखानं काय लेकराचं आयुष्य भराचं भागणार हाय का ? ईचार करा.. (गण्या असं बोलत बोलत नानासनी उठवून मी घराकडं निऊ लागलो.. घरापर्यंत जाउस्तवर नानाच्या तोंडून एक पण शब्द बाहेर पडला नाही रं.. हळूहळू घराजवळ पोचलो )
घराजवळ जाताच नानांनी मला मिठी मारली..
नाना :- बोलून मन मोकळं झालं बग रं राजा.. तू जर आज बघितलं नस्त तर काय घोळ घालून ठीवला असता म्या.. तुझं बोलणं खरं हाय रं..
जे झालं ते कुणाला सांगू नगस बरं का, उगाच तान घेत बस्त्याली.. तुला माझी शपथ हाय..
(असं मिठीत घेऊन नाना मला बोलत होतं त्यांच्यात आत काय परिवर्तन झालं कुणास ठाऊक..
नानांनी मिठी सोडली तवा गण्या त्यांच्या चेहऱ्यावरचं हाव-भाव समजण्या पलीकडचं होतं रं.. डोळ्यात पाणी आणि सुरकतल्या गालावर हसू होतं..)
मी गावात होतो. काय झालंय न काय नाही विचार करत मी घराकडे वळालो घरापुढं लावलेल्या गाडीकडं माझं ध्यान गेलं.. काल आणलेल्या गाडीचं सुख जणू गायपच झालं होतं बग आणि ती गाडी घेण्यासाठी दादांनी पैकं कुठून आणलं.. कसं आणलं याची चिंता व्हायला लागली.. मी पाणी पिलो कळत नकळत खिश्यात असलेला 12 हजाराचा मोबाईल काढून टाइम बघितला 1 वाजून 30 मिनिट झाली होती
मी टाइम बघून मोबाईल लॉक केला आणि उगाच विचार आला या मोबाईल ला दादांनी पैकं कुठून आणलं अस्त्यान.. गण्या गेल्या साली पाऊस नव्हता.. माझं बी रान पडिकच होतं की रं.. मग पुन्हा लक्षात आलं गेल्या साली आमची काशी(आमची महीस) दादांनी विकली होती.. मी त्याकडे लक्षच दिलं नव्हतं.. मी विचार करीत करीत शेतापर्यंत कधी गेलो लक्षातच नाही आलं.. मी सहजच विचार करीत बाजावर आडवा झालो.. तेवढ्यात धाप असा आवाज करत गवताचं गठुडं दादांच्या डोक्यावरून माझ्या जवळ येऊन पडलं.. घामेघुम झालेलं दादाचं अंग.. डोक्यावरून वाहत आलेला एक थेंब नाकाच्या शेंड्यावरुन येऊन टपकन खाली पडला.. त्यांच्या चेहऱ्यावर येणाऱ्या सूरकुत्याची जाणीव माझ्या काळजाला टोचू लागली
ल्हाकत ल्हाकत दादा खाली बसले डेरक्यातले तांब्याभर पाणी पिले
पण गण्या मी काहीच बोलत नव्हतो, अन् मनात विचारांचा गोंधळ तर चालु होताच
तेवढ्यात दादांनी ते पेंडकं सोडलं अन मागं फिरले
गण्या तसं तर ते मला कधी काम सांगत नसत आणि मी ही कधि करत नव्हतो पण आज मनात तयार होणाऱ्या विचारांच्या लाजेतून कोण जाणे कसा आवाज बाहेर आला
मी दादांना हाक मारली
मी :- दादा मी पण येऊ का एका खेपेला..?
(दादांनी आश्चर्याने मागारी फिरून बघितलं आणि चेहऱ्यावर गोड हसू आणून म्हणलं )
दादा:- नग नग तू सावलीत बस.. ते आणलेलं गवत तेवढं लक्ष्मीला अन नम्याला टाक.. मी एक राहिलंय तेवढं आलो घेऊन.. ते टाकतो मी नंतर सर्ज्या राज्याला
गण्या त्यांच्या घामेजलेल्या चेहऱ्यावर कुठून स्मित हास्य आलं होतं.. कोण जाणे..
संध्याकाळी घरी आल्यावर मी दादाला न राहून इचारलं
मी:- दादा गाडीला पैकं कुठून आणलं व ?
दादाला हा सवाल कदाचित माझ्याकडून कधीच अपेक्षित नव्हता.. दादा माझ्याकडं बघत हसलं आणि त्यांनी चेष्टेने उत्तर दिलं लॉटरी लागली होती..
मी त्यांना निहाळत होतो..
हातावर कामाने शिरा वर आलेल्या होत्या..
आणि त्या शिरा पाठीमागे मास कुठंच नव्हतं फक्त हाडं दिसत होती.. काळवंडलेला चेहरा.. त्यावर सुरकुत्या.. वाढलेली दाढी.. शर्टाचे धागे ही सारे झिजत आले होते.. पण तरीही ते धागे दादांची लाज राखण्याचा फुका प्रयत्न करीत होते.. कदाचित त्या बापाच्या गरिबीची जान त्या शर्टाच्या धाग्याला होती.. पण गण्या ती मला आजवर नव्हती या गोष्टीचा मनोमन पश्चाताप होत होता रं आणि तो पश्चाताप हळू हळू डोळ्यात उतरत होता.. खिसा फाटलेला होता पण पायजम्याला लावलेल्या ठीगळत खताच्या पोट्याचा निळसर काचीदोरा मात्र ठळक दिसत होता.. पायाच्या नखाला लागलेल्या ठेचंला बांधलेलं चीरगुट आणि टाचंला पडलेल्या भेगंतून बाहेर पडणारी गरिबी मला आतून सुन्न करून गेली.. आणि मी बसल्या ठिकाणीच गुडघ्यात मुंडकं घालून फंदू लागलो..
गण्या मी थोड्या वेळानं उठलो आणि पळत जाऊन दादाच्या गळ्याला मिठी मारली, आन दादा दादा म्हणत धायमोकळून रडू लागलो.. दादाला कळेनासं झालतं बग काय झालंय ते..
पण बापाच्या नात्याचा ओलावा म्हणून त्यांनी माझ्या मिठीला प्रतिउत्तर म्हणून मिठी आवळून धरली.. काय झालंय हे मला सांगणं झालं नाही.. पण दादांनी मला गप केलं..
दादा:- आरं ये येड्या.. पोरी सारखं रडाया काय झालं तुला.. काय झालंय त्ये तरी सांग.. कोणी काय बोललं का..?
मी 🙁 फुंदत )ना..ही
दादा :- काय घ्यायचंय का आणिक.. काय आगव चाळा तर नाही की केला तू.. (जरा उद्गार करून)
मी:- ना…ही
दादा:- काय झालंय ते तर कळणा मला पण एक लक्षात ठीव गणश्या तुझ्याव किती बी मोठं संकट आलं तर त्याला आधी माझ्यापर्यंत यावं लागलं.. तू कश्याची काळजी नगस करू
अस म्हणत गण्या दादांनी कामानं दगडासारख्या झालेल्या हातांनी बांधलेली मिठी जरा भरून आल्यागत आवळली आणि पापणी वली झाली..
गण्या तेंव्हापासून रोज ९ वाजेपर्यंत झोपनारं पोरगं सहाला उठून दादांनी घिऊन दिलेल्या गाडीवर धारा काढून आणतंय बग ..
दादाच्या चेहऱ्यावरचा रुबाब वाढीवतंय..
आण रोज रात्री पंचविस वय झालेल पोरगं बापाला घट्ट मिठी मारून झोपतंय..
गण्या विजय सागर सर म्हणतात तसं..
जोपर्यंत बाप आहे तोपर्यंत मिठी मारून घे रं राजा..
नंतर भास भेटतो स्पर्श भेटत नाही..
येवढे लपाऊनी धन त्यांनी
फाटक्यात ठेवले कुठे होते
सारेच्या सारे सुख माझे,
बापाच्या एका खिश्यात होते..
-गणेश मगर