मनुष्य शरीरामध्ये प्राणांची फुंकर घालून ईश्वर जीव निर्मिती करतो.. सर्वांना सुंदर आयुष्य देतो.. आणि या जीवांचं रक्षण करण्याचं आणि मिळालेलं आयुष्य तितकंच सुंदर ठेवण्याचं कार्य डॉक्टर्स करत असतात.. दुःखितांचे दुःख दूर करण्याची इच्छा जरी आपण ईश्वराकडून ठेवत असलो तरी तशीच अपेक्षा प्रत्येक रुग्णाची डॉक्टरकडूनही असते.. जन्म आणि मृत्यू.. विज्ञान आणि प्राण यामधील दुव्याचे काम डॉक्टर करत असतो..
पूर्वीच्या काळी डॉक्टरला भेटल्यावर “आजि म्या ब्रम्ह पहिला” असा आनंद आणि समाधान वाटायचं.. डॉक्टर आणि रुग्ण यांच्या नात्याला कर्तव्य आणि कृतज्ञता यांचा स्पर्श असायचा.. आज बऱ्याच अंशी हे अर्थार्जनाचं साधन.. “एवं पोट भरावयाची विद्या” इतपतच वैद्यकीय शिक्षणाचा उपयोग अनेकजण करताना दिसून येते आहे.
डॉक्टरांनी आत्मपरीक्षण करून आत्मप्रतिमा सुधारण्याचा, जपण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करणं गरजेचं आहे.. कारण काही डॉक्टरांच्या अयोग्य मार्गांच्या अवलंबनामुळे डॉक्टरांची प्रतिमा मलीन होताना दिसते. अनावश्यक तपासण्यांचा भुर्दंड रुग्णांवर लादणे.. अनावश्यक औषधी देऊन औषधी कंपन्यांकडून दलाली मिळवणे.. रुग्णांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन भरमसाठ पैसा उकळवणे.. कळी उमलण्याआधीच तिला मातेच्या उदरात संपवणे.. अशा अनेक वाम मार्गांनी पैसा मिळवताना काहीजण दिसतात.. परंतू यामुळे ते स्वतःला आणि समाजाला नैतिक अधःपतनाकडे घेऊन जात आहेत हे त्यांच्या लक्षात येत नसेल का..? खरंतर संपत्ती मिळवताना आणि ती मिळवल्यानंतर सुद्धा जो स्वतःचे शील निर्दोष ठेवतो त्यास लाभणारी शांती आणि समाधान अजोड असते.. जीवनाचे हे गमक उमगले तर, आयुष्याच्या उत्तरार्धात पश्चात्तापाची वेळ येणार नाही, म्हणूनच संत तुकारामांच्या उक्तीप्रमाणे जगावे..
“जोडोनिया धन उत्तम वेव्हारे | उदास विचारें वेच करी || उत्तमचि गति तो एक पावेल | उत्तम भोगील जीवखाणी ||”
डॉक्टरांच्या बाजूने पूर्वग्रहरहित विचार केला तर काही गोष्टी समोर येतात.. वैद्यकीय शिक्षण घेताना निर्माण होणाऱ्या अडचणी.. खाजगी शिक्षणसंस्थांतील फी ची भरमसाठ वाढ.. प्रॅक्टिस–हॉस्पिटल स्थिर करताना वाढणारा आर्थिक बोजा.. यातून प्रत्येक डॉक्टर आर्थिक तणावाखाली राहतो.. शिक्षणासाठी खर्च केलेली आठ-दहा वर्ष.. त्यामुळे वाढतं वय.. शिक्षण घेताना अभ्यासाचा ताण या सर्व बाबींमुळे डॉक्टर देखील तणावपूर्ण आयुष्य जगताना दिसतात..यासाठी वैद्यकीय शिक्षण आणि वैद्यकीय व्यवसाय याबाबतचे धोरणात्मक निर्णय सर्वांगीण विचारांती घेणे गरजेचे आहे..
रुग्णाचा विश्वास.. रुग्णाची श्रद्धा.. हाच आरोग्य व्यवस्थेचा पाया आहे.. औषधोपचार रुग्णास बरे होण्यास मदत करतातच.. परंतू रुग्णाची श्रद्धाच रुग्णाला लवकर बरं करीत असते.. ‘आमच्या डॉक्टरांचा हातगुण फार चांगला आहे’, हे वाक्यच त्याची प्रचिती देते.. श्रद्धा-विश्वास या अभावी रुग्णसेवा हा फक्त व्यवहार होतो.. ज्याप्रमाणे रुग्णाच्या मानसिकतेचा विचार डॉक्टरांकडून झाला पाहिजे.. त्याचप्रमाणे तो डॉक्टरांबाबतही झाला पाहिजे.. रुग्णालयांमध्ये असणारे आंतररुग्ण विभाग.. अत्यायिक-अतिदक्षता विभाग.. शस्त्रक्रिया विभाग.. बाह्य रुग्णविभाग… या सर्वच स्तरांवर डॉक्टरांना काम करावं लागतं..काही रुग्णालयांमध्ये तर अनेकदा साधनांचा.. औषधींचा अभाव जाणवतो.. अशा परिस्थितीमध्ये देखील रुग्णाला उत्तमोत्तम सेवा देण्याचा डॉक्टरांचा प्रयत्न असतो.. परंतू या गोष्टींचा विचार न करता.. कोणतेतरी पूर्वग्रह मनात ठेवून.. रुग्ण अथवा त्यांच्या नातेवाईकांनी अपुऱ्या वैद्यकीय सेवेबद्दल डॉक्टरांवर जीवघेणा हल्ला केल्याच्या बातम्या आपण वाचतो-पाहतो..हे निषेधार्ह आहे.
प्रत्येक डॉक्टर जेव्हा वैद्यकीय शिक्षणाची सुरुवात करतो.. तेव्हा तो हिप्पोक्रेटीक ओथ किंवा चरक प्रतिज्ञेद्वारे समाजाची सेवा करण्याची शपथ घेत असतो.. आपण घेतलेल्या वैद्यकीय शिक्षणाचा उपयोग निःस्वार्थी भावनेने समाजासाठी करणे हि डॉक्टरांची केवळ सामाजिक बांधिलकी नसून मुख्य कर्तव्य बनायला हवे.. रुग्णांवर उपचार सुरु असताना त्यांस आदरयुक्त आपुलकीची वागणूक मिळायला हवी.. रुग्णासोबतचे नाते सहानुभूतीचे विवेकीपणाचे असायला हवे.. डॉक्टरांनी रुग्णांस प्रसन्न मुद्रेने सामोरे जाण्याने.. आत्मीयतेने विचारपूस करण्याने रुग्णाच्या मानसिक आणि शारीरिक व्याधींत सकारात्मक बदल घडताना दिसून येतात.. यातून डॉक्टरांना सुद्धा एक प्रकारचा आत्मिक आनंद मिळतो.. आणि हे उच्च नितीमत्ता असण्याचं एक लक्षण आहे.. आरोग्यसेवा हा डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील एक करार असला तरी तो परस्पर विश्वास आणि नितीमत्तेवर अवलंबून आहे.. डॉक्टरांनी हि वैद्यकीय नितीमत्तेची बंधने पाळली तर समाजाचा त्यांच्यावरील विश्वास अधिक दृढ होईल यात तिळमात्रही शंका नाही..
आज ग्रामीण भागात आधुनिक तंत्रज्ञान गरजेपुरतेच वापरून वैद्यकशास्त्राच्या आधारावर रोगनिदान करून आणि उपचारांमध्ये वैयक्तिक कौशल्य वापरून उत्तम आरोग्यसेवा कमीत-कमी खर्चात देता यावी यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.. ग्रामीण भागातील समाजघटकांच्या आरोग्याचा दर्जा सुधारण्यासाठी पुढाकार घायला हवा.. त्यासाठी प्राथमिक आरोग्यसेवा पुरविणाऱ्या डॉक्टरांची कमतरता भरून काढण्यासाठी चिकित्सा प्रणालींचा विचार बाजूला ठेऊन योग्य ते प्रयत्न करायला हवेत..
डॉक्टरांनी रुग्णांचे अचूक निदान आणि अचूक चिकित्सा करणे जितके महत्वाचे आहे तितकेच आरोग्य संवर्धन आणि रक्षण देखील.. रक्तदान.. नेत्रदान.. देहदान.. या सामाजिक गरजांची पूर्तता करण्याकरता जनजागृती करून उत्स्फूर्ततेने कार्यक्रम राबवणे.. शासकीय आरोग्य सुविधांचा लाभ गरीबातील-गरीब रुग्णांपर्यंत पोहोचवणे.. आरोग्य जागृती विषयक व्याख्याने आयोजित करणे.. प्रसारमाध्यमांतून लेखन.. तसेच चर्चासत्रांद्वारे प्रबोधन करणे.. गरजेचे आहे.
अर्थातच या सर्वांसाठी राजकीय तसेच प्रशासकीय इच्छाशक्तीची दुर्बलता नाहीशी होणंही तितकंच आवश्यक आहे.. याचबरोबर वैद्यकीय शिक्षणाची दिशा बदलून, सामाजिक जाणिवेचे धडे देणारी, कार्यकुशल आणि उत्तम दर्जाचे डॉक्टर घडविणारी शिक्षण व्यवस्था निर्माण करणं अत्यंत आवश्यक आहे.. अशा प्रकारच्या शिक्षण व्यवस्थेतूनच डॉ. आमटे, डॉ. बंग, डॉ. कोल्हे, डॉ. दाभोळकर यांसारखी असामान्य जीवन जगणारी समाजोपयोगी व्यक्तिमत्वं निर्माण होतील.. आणि भावी पिढीला प्रेरणादायी ठरतील..
खरंतर असामान्यत्व मनुष्याला त्याच्या परोपकारी वृत्तीमुळे.. कृतीमुळे प्राप्त होते.. इतरांच्या व्यथेला.. वेदनेला जाणून शरीर आणि मनाने पिडीत लोकांसाठी प्रेमरूपी.. वात्सल्यरूपी छाया देणारं झाड जरूर बनावं.. हि भावना केवळ संवेदनशील व्यक्तीच्या हृदयातच उत्पन्न होते.. आणि त्यातून जी सेवा घडते ते म्हणजे दानाचे उत्कट रूपच जणू..!! आरोग्यदान हे सर्वश्रेष्ठ दान ठरतं.. आणि जे “डॉक्टरांच्या समाजाभिमुखतेतूनच” प्रकट होणं अभिप्रेत आहे..!!
“ न त्वं कामये राज्यं, न स्वर्गं न पुनर्भवम् | कामये दुःखतप्तानां प्राणिनामार्तिनाशनम् ||”
हे ईश्वरा, मी तुझ्याकडे राज्याची इच्छा करत नाही.. ना स्वर्गाची, ना पुनर्जन्माची.. मला दुःखाने ग्रस्त झालेल्या आजारी प्राणीमात्रांची वेदना नष्ट करण्याचे सामर्थ्य दे..!!
हीच प्रार्थना !!
-डॉ. वर्षा स. खोत
-डॉ. तुषार प्र. पवार
सुंदर लेख ! डॉक्टर-रुग्ण हे नातं अबाधित आणि निरोगी राहो हीच प्रार्थना !