“अगं, आई तू डबा दे लवकर.. किती उशीर झालाय बघ ना.. आज मंगळवार अकरा वाजताचं लेक्चर चालू होतं ना.. आणि आज तर आमची सबमिशन्स पण आहेत..”
“आसावरी अगं, पण मग झोपू नये ना इतका उशीर पलंगावरी..”,
असं म्हणत थोडयाशा थट्टेने आणि टोचून आईने माझ्या गडबडीचं उत्तर माझ्याच पद्धतीने मलाच सुनावलं..
“अगं सुवर्णा, ज्यांची स्वप्न मोठी असतात ना.. त्यांचीच झोप इतकी मोठी असते, मग ती पूर्ण करायला सकाळी आठला जरी उठलं तरी ती पूर्ण होण्याची त्यांना गॅरंटी नसते ना”, असं म्हणत आजीनं चांगला सिक्सरच मारला आणि याने माझी विकेटच उडाली..
आमचे नववीतले लहान बंधूराज.. त्यांनी सकाळपासून टीव्ही, लॅपटॉप याच्याशिवाय नाष्टा केला तर सूर्य पश्चिमेलाच उजाडेल..
या सगळ्या घाईत कानावर एक बातमी आली.. त्या बातमीचं वैशिष्ट्य असं की, ही बातमी वुहान नावाच्या शहराची, जे की चायना मध्ये स्थित आहे.. काहीतरी ‘कोरोना’ नावाचं कानावर पडलं होतं आज नवीन..
तितक्यात कमी ऐकायला येणाऱ्या आमच्या घरातील सर्वात मोठ्या सदस्याने एक वक्तव्य दिलं.. आजोबा म्हणाले “या करूना चं काय.. काय करायचं आता.. करूना लयं आगाव दिसते.. म्हणे आजार रोग असलं काही तरी घेऊन येतेय.. देवा.. कसं होणार रे.. निसर्गाला होणाऱ्या माणसाच्या त्रासानेच त्याने मानवाला अद्दल घडवण्यासाठी सुचवलेलं दिसतंय..”
आजोबांच्या या वक्तव्यात फक्त नाव विचित्र होतं नाहीतर त्यांनी म्हटलेला शब्द अन् शब्द हा खराचं होता की..
झाले घड्याळात साडे आठ वाजले आणि मी घराबाहेर पडले.. ठरल्याप्रमाणे हा ही दिवस घरातल्यांच्या सहवासातच चालू झाला..
अशा गडबडीतच 8:45 ची सिटी बस पकडली, राजाराम कॉलेजला जायचं म्हणजे आमच्या घरापासून पहिलं शिवाजी पुतळ्याला आणि मग तिथून राजाराम कॉलेजला जाणारी बस.. एकाच भागात असून सुद्धा आमच्या कोल्हापुरातील बसेस मस्त फिरून जातात.. अगदी कोल्हापूर दर्शन करतात ना तसंच..
आता ठरलेली बस आणि ठरलेला प्रवास..!! तशी दोन वर्ष हेच रुटीन चालू आहे ना.. मग आज काय नवीन.. आज पण ठरलेली मागून पाचव्या नंबरची सीट तेही खिडकीजवळची, मस्त एअरफोन घातले अन गाणी चालू झाली.. पण आज त्या गाण्यांकडे लक्षच नव्हतं.. डोक्यात अजूनही आजोबांनी केलेल्या ‘करुना’चं वक्तव्य फिरत होतं.. खरंच आपण निसर्गासाठी काय करतो आणि निसर्ग आपल्यासाठी काय करतो.. याचं गणित बसवायला लागलो तर कुठेच गणितीय सूत्रांची सांगड बसायची नाही.. तसं बघायला गेलं तर आपण निसर्गाचा एक भाग नसून, अत्यंत सामान्य आणि लहान अंश आहोत.. पण निसर्ग आपल्या इतक्या लहानश्या जीवाला सुद्धा जगवण्यासाठी किती काय काय करतो.. ज्याच्यात आपल्या पहिल्या श्वासापासून ते श्वास थांबण्यापर्यंत लागणार्या प्रत्येक लहानसहान गोष्टींची पुरेपूर पूरकता दिलेली आहे..
निसर्गातील प्रत्येक गोष्ट लहान किंवा मोठी ही अत्यंत मौल्यवान आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे, मग ते संथपणे वाहणारे नदीतील पाणी असो किंवा समुद्रातील उसळणाऱ्या लाटा.. दगडांच्या इतक्याशा फटीतून येणारी ती पाण्याची धारा, जणू काही आकाशातून भेटायला येणाऱ्या आभाळाच्या प्रेमाचं आनंदाने स्वागतचं करत आहे.. त्या प्रत्येक दुपारच्या उन्हाचा पुरावा होणाऱ्या त्या घनदाट आणि गारवा देणार्या झाडच्या सावलीचं महत्त्व तर.. आहाहा..!! या गर्दीचा देखील जीवनात मोकळेपणानेही संचार करता येतो याची जाणीव करून देणार्या त्या किलबिलाटाचा मधुर आवाज जणू काही कानांमध्ये निसर्गाच्या बोलकेपणाची सादच देत आहे.. वाऱ्याच्या झोक्यातील संदेश पोहोचवण्याचं काम करत शेतातील प्रत्येक रोप एकमेकांचा हात हातात धरून, मग ते शेत याचे असो किंवा त्याचे.. त्या बांधाची बंधने तोडून एकरूप होऊन वाऱ्याची साथ देतात.. खरंच किती मोठे उदाहरण हे एकीचं..!! इकडे तिकडे डोलणारे, कानात इयरफोन किंवा लॅपटॉपवर गाणी लावून जसे आपण डोलतो ना.. तसेच ते गवत त्या वाऱ्याच्या संदेश पोहोचवणाऱ्या एकीच्या गाण्यात डोलत आणि आपल्यालाही साथीचा इशारा करत डोलतात.. डोळे बंद करून या सर्वांचा इंद्रियातून फक्त स्पर्श करून घेणेही, इतकी सुंदर अनुभूती ना कि बासच..! डोक्यातले so called, stress, workload, assignment, etc., etc.. या सर्वांवर एकच रामबाण उपाय…
” ट्रिंग ट्रिंग”, शिवाजी पुतळा, शिवाजी पुतळा.. चला येथे उतरणारे उतरा”, असं ओरडत कंडक्टर साहेबांनी परत वास्तवात आणलं..
मी पटकन उतरले, तसा या सगळ्यात अर्धा तास गेला होता आणि आता पुढचा बसचा प्रवास तो म्हणजे शिवाजी पुतळा ते राजाराम कॉलेज.. ती बस नेहमी वेळेत येणार नऊ वाजून वीस मिनिटांनी, आज पण ती आली..
आज जरा खिडकीच्या बाहेर बघत आणि ठरलेले इयरफोन घालून आधीच्या सुंदर अनुभूतीच्या विरुद्ध चित्र अनुभवत होते.. आता गाडी शहरातून जाते ना.. जागोजागी भाजीवाले, भल्यामोठ्या दुकानांची सोसायटी, रस्त्यावरचे गाडे, फळफुलविक्रेते आणि यांच्यासोबत लहान का असेनात पण त्यांची स्वतःची जागा घेऊन बसलेले कचऱ्यांचे ढीग.. यांच्या गर्दीत कुठेतरी एखादे भलेमोठे झाड उभे असायचे.. तसे एकटे असूनही त्याने त्या सगळ्यांची जबाबदारी उत्तम रित्या पेलली होती..
एकाच कानात इयरफोन घातल्याने बाजूला बसलेल्या दोघांच्या गप्पा कानावर पडत होत्या.. त्यांच्या बोलण्यातही आजोबांच्या ‘करूने’वरच गप्पा चालू होत्या.. म्हणे, “काहीतरी वायरस आहे. ज्याचं औषध अजून सापडत नाहीये.. अजूनही शोधतायेत.. एकमेकांच्या थुंकीतून वगैरे पसरते.. तरी बरं बाबा, आपल्याकडे असलं काही नाही.. नाहीतर आपण कुठले रे तोंड बांधून फिरणारे..?”
हे ऐकून मीही थोडी विचारातच पडले.. काय असेल हे नक्की.!! खरंच निसर्गाने बदला घ्यायचे ठरवले असेल का?? आणि आपण निसर्गाला दिलेल्या गोष्टींची यादी तर राहिली की मगाशी.. आपण दिले ना.. झाडांच्या मित्राला त्यांच्यापासून दूर करून.. त्यांची तोड करून.. त्यांची साथ मोडली.. त्यांचे furniture तयार केले.. मस्त वेळ वाचवायच्या कारणाने मोठ्या मोठ्या गाड्या, रिक्षा, बसेस, दुचाकी गाड्या, यांच्या धुराने निसर्गाच्या श्वासात अडथळा निर्माण केला.. फॅक्टरीतून निघणाऱ्या धुराने तर निसर्गाच्या lungs पर्यंत शिरकाव केला असेल.. एव्हाना.!! जागोजागी शहरीकरणाच्या नावाखाली म्हणा किंवा त्या शब्दाचा आधार घेऊन म्हणा, झाडांची तोड करून, उंच बिल्डिंग्स, मॉल्स बांधले.. डोंगरातील हिरवळीच्या अंताचे कारण होणाऱ्या फार्महाऊस नामक शब्दाला मागणी घातली आणि फार्महाऊसमध्ये 40 ते 50 नावाला झाडे लावली, ज्यांची किती वाढ होणार ते त्याचा मालक असलेला मनुष्य ठरवणार.. म्हणजे ज्यांच्यामुळे आपण मोकळेपणाने जगतोय त्यांच्या जगण्याला बंधन घालणारे आपण कोण?? जरा विजा चमकल्या, त्स्यूनामीने घरं मोडली, लाटांची उसळती वाढली की त्यांचा आवाज नकोसा होणारे आपण.. आणि बुलेट चा सायलेन्सर काढून, वरातीत डीजे लावून धिंगाणा घालणारे आपण.. म्हणजे आपल्याला झालेला त्रास हा त्रास आणि आपण गेली कित्येक वर्ष निसर्गाच्या, पृथ्वीच्या कानात ओरडतोय त्याचं काय??
जरा पोटात दुखलं की, डॉक्टरांकडे धाव घेणारे आपण.. ‘आई गं, सुरी कापली’ साधं चार थेंब रक्त जाऊ न देणारे, निसर्गाच्या कुशीतून येणाऱ्या हळकुंडापासून तयार केलेल्या हळदीत आपलं बोट भरवणारे आपण.. त्या धरणीत कन्स्ट्रक्शन साठी खोदकाम करणारे, चांगली डोंगराच्या पोटात बोगदा तयार करून, ‘डोंगर वाचवला’, असे नारे देणारे आपण.. नेमकं करतोय काय..?
स्वतः विज्ञानाची पाठपुरवण करून, स्वतःला ज्ञानी म्हणुन, स्वतःच्याच आयुष्याशी खेळ असा.. so called ‘कोरोना’ बनवणारे आपण.. खरंच हीच का हुशारी?? आता हा कोरोना.. याआधी किती आले.. प्लेग, स्वाइन फ्लू यांनी अद्दल घडवण्याचा प्रयत्न केला, पण आपण सुधारलो का?? आता बघूयात, आजोबांनी नामकरण केलेल्या करूणेचं, काय होतंय.. मी विचार करत होते.. तोच
“राजाराम कॉलेजचे मंडळी, उतरून घ्या”, असे म्हणत, कंडक्टरांनी परत माझी विचारांची माळा गुंफणं थांबवलं..
So true thoughts❤️ perfectly expressed in beautiful words keep it up
Great article
You are going good dear
Keep it up
so nice
Nisrgakate manaane pat firavli tyamule honare parinam ajun distahet.
Nisarga mansachi ichcha puri karu shkto pan hav nahi.
Khupch chan lekh ahe.