आयुष्य जगण्याचा हा मार्ग जो सद्य जगाच्या परिप्रेक्ष्यातून “प्रवाहाच्या विरुद्ध”च म्हणावा लागेल, या मार्गावर चालण्याची प्रेरणा आपणास कुठून मिळाली ? या निर्णयप्रक्रियेवर प्रभाव पाडणारे साहित्य, व्यक्ती, घटक कोणते ?
प्रवाहाची कल्पना ही सामान्यत: आपणच तयार केलेली असते. त्यामुळे “प्रवाहाच्या विरुद्ध” असे काही वेगळे अस्तित्व असेल असे मला तरी वाटत नाही. आज मी ज्या क्षेत्रात आहे त्या क्षेत्रात इतरही अनेक लोक मी तुम्हाला दाखवू शकतो. त्यामुळे एखादी गोष्ट प्रवाहाच्या विरुद्ध हे मला Generalized Statement वाटतं. प्रत्येकाचा आधार हा ज्याचा त्याचा आनंद असतो. त्यामुळे माझा आनंद ज्यात आहे ती गोष्ट माझ्या दृष्टीने प्रवाहच आहे. माझा मार्ग हा प्रवाहाच्या विरुद्ध आहे, असे तुम्ही म्हणत असलात तरी त्यातच मला निखळ आनंद मिळत आहे.
मुळात माझ्या उद्दिष्टांचा मी कळता झाल्यापासून सातत्याने विचार करीत होतो. या उद्दिष्टपूर्तीचा आनंद ज्या संतसाहित्यातून मिळत गेला त्या साहित्याचा अभ्यास करणे मी ध्येयाच्या दृष्टिकोनातून आवश्यक मानले. फलटण मधील माझे पणजोबा प.पू. उपळेकर काका यांच्या समाधी मंदिराच्या सततच्या सहवासाने माझा आध्यात्माचा विचार अधिक दृढ होऊ लागला. मी घेतलेल्या निर्णयाला माझ्या आई वडिलांनी सुद्धा मोकळेपणाने साथ दिली. माझ्या या निर्णयाच्या बऱ्या वाईट परिणामांची सविस्तर चर्चा मी माझे सद्गुरु प. पू. श्री. शिरीषदादा कवडे यांच्याशी करून तो निर्णय घेतला आहे आणि मी त्याबद्दल पूर्णतया समाधानी आहे.
सध्याच्या युगात शिक्षण घेणे, पैसा कमवून विवाह करणे अशाप्रकारे जगणे स्थिरस्थावर झाले म्हणजे आयुष्याचे सार्थक मानले जाते या पार्श्वभूमीवर आपल्या या.. संतसेवेला आयुष्य वाहून घ्यायच्या निर्णयावर आपल्या कुटुंबियांची, मित्रांची, हितचिंतकांची काय मते होती ?
तुम्ही पहिल्याच प्रश्नात हे “प्रवाहाच्या विरुद्ध” असण्याचा उल्लेख केला आहेच. त्यामुळे त्यावर उमटणाऱ्या प्रतिक्रियाही विरुद्ध असणारच ना..! माझा निर्णय कसा योग्य आहे हे कालांतराने त्यांना सगळ्यांना पटलेले आहे. माझे संबंधितच उलट मला आता म्हणतात की, जे मी केले तेच योग्य केले आहे. मी एम.एस.सी. करत असताना एका नावाजलेल्या संस्थेने मला एक रिसर्च प्रोजेक्ट मध्ये काम करण्याची संधी देऊ केली होती, ज्यामुळे मी पुरेसे पैसे कमवून, पी. एचडी. करून मान-मरातबाने व्यवस्थित जीवन जगू शकलो असतो. ज्या प्राध्यापिकेने ही संधी देऊ केली होती त्यांना मी माझ्या निर्णयाबद्दल सांगितले, तेव्हा माझ्या पाठीवर हात फिरवत त्या म्हणाल्या, “तुझाच निर्णय योग्य आहे..!”
आपली गुरुपरंपरा कोणती ? आपल्या साधनेचे स्वरूप काय ?
खरेतर उत्तर खूप मोठे आहे. तरीसुद्धा मी ते थोडक्यात देण्याचा प्रयत्न करतो. आजवरच्या सगळ्या संतांनी जो मार्ग चोखाळलेला आहे तोच हा मार्ग आहे. मुळात आज वेगवेगळे गणले जाणारे वारकरी, नाथ, दत्त संप्रदाय हे सगळे मूळचे एकच आहेत, उपासनेच्या प्रक्रियेच्या दृष्टीने जरी ते फरक दाखवत असले तरी मूलत: त्याचे तत्त्वज्ञान एकच आहे. उदाहरणच द्यायचे झाले तर, बंगाली आणि मराठी खाद्यपदार्थ नाव व पाककृतीच्या दृष्टीने भिन्न असले तरी त्यांच्या ग्रहणाने येणारी तृप्ती मात्र सारखीच असते. असेच या संप्रदायाच्या बाबतीत सुद्धा आहे. त्यांचे भेद हे परिस्थितीजन्य आणि कालपरत्वे झाले आहेत. माझे संशोधनाचे काही कामही मी या “संप्रदाय समन्वयाच्या सिद्धांतावर” केलेले आहे आणि यावर माझे काही लेखही प्रकाशित झाले आहेत. या सिद्धांताची सर्वात पहिल्यांदा मांडणी प्रख्यात स्वातंत्र्यसैनिक आणि थोर संत प. पू. मामा महाराज देशपांडे यांनी केलेली आहे. त्यामुळे त्यांच्या दत्तसांप्रदायिक परंपरेमध्ये सर्व संप्रदायांचा समन्वय दिसून येतो.
याखेरीज त्यांना संत ज्ञानेश्वर महाराजांचा सुद्धा अनुग्रह असल्याने वारकरी संप्रदायही या परंपरेत समाविष्ट आहे. वारकरी, दत्त आणि नाथ संप्रदायांचा सुरेख समन्वय झालेल्या या प्रणालीला महायोग प्रणाली म्हणतात आणि आमची गुरुपरंपरा याच प्रणालीनुसार आहे. या संप्रदायाचा मूळ प्रमाणग्रंथ श्रीज्ञानेश्वरी हा आहे. प. पू. मामा महाराजांनंतर आता प. पू. श्री. शिरीषदादा कवडे हे धर्मकार्य निरपेक्षपणे पुढे चालवत आहेत. त्यांनी इंजिनिअरिंग मध्ये मास्टर्स केलेले असून ते एका इंजिनिअरिंग कॉलेजचे प्रिन्सिपॉल देखील होते. आता त्यांनी आपले आयुष्य पूर्णवेळ या संप्रदायासाठी वाहिलेले आहे. मला तत्त्वज्ञान आणि वैयक्तिक साधना या दोन्हीच्या बाबतीत त्यांचेच मार्गदर्शन लाभत आहे.
सध्या देवाच्या नावाने सर्वत्र काही प्रमाणात का होईना अनाचार पसरला आहे; भाविक-भक्तांची लुबाडणूक, देवदरबारात पैशाला असलेला अवाजवी मान, संस्थानांचे राजकारण या सर्वांकडे तुम्ही कसे पाहता ?
यात दोन भाग आहेत; समर्थ रामदास स्वामींनी एक फार छान पंक्ती लिहिली आहे की, “अज्ञानाचेनी देवाधिदेव पाविजेत नाही..।” ज्यावेळी असे लोक सामान्यांना फसवतात त्यावेळी त्याचा दोष सामान्यांकडे सुद्धा येतोच. आपल्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन हे लोक आपल्याला फसवत असतात, हा पहिला भाग.
दुसरा भाग म्हणजे, संतांनी प्रपंचाचा परमार्थ करावा अशी शिकवण दिली आहे. मात्र अशा लुबाडणूक करणाऱ्या लोकांनी आता परमार्थाचाच प्रपंच केला आहे. आपल्यासारख्या सर्व सामान्यांमध्ये नेटाने अभ्यास करायची वृत्ती नसल्यामुळे व काहीतरी झटपट मिळेल या आशेने आपण अशा बाजाराला पटकन भुलतो. मुळात धर्म म्हणजे समाजाच्या संधारणेसाठी, माणसांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी निर्माण केल्या गेलेल्या नियमांचा संच आहे आणि त्याला प्रत्येक ठिकाणी काही सामाजिक संदर्भही आहेत. पण अध्यात्म हा वैयक्तिक साधनेचा भाग आहे. संतांनी धर्म आणि अध्यात्म या दोन्हींविषयी मार्गदर्शन करून ठेवले आहे, पण दुर्दैवाची गोष्ट अशी की आज दोन्हींमध्येही अनाचार बघायला मिळतो.
याला कारणीभूत देखील आपणच आहोत. जसे सामान्यत: तीन दिवस तरी राहणाऱ्या सर्दीसाठी डॉक्टरकडे जाऊन एका दिवसातच झटपट बरे होण्यासाठी आपण औषधोपचार मागतो. मग तो डॉक्टर ती सर्दी दाबून टाकणारी औषधे देऊन मोकळा होतो. आता हा व्यवहार डॉक्टरी पेशाला योग्य आहे.. का रुग्णाच्या प्रकृतीसाठी..? दोन्हीसाठी नाही, पण आपणच तो व्यवहार करायला भाग पाडतो ना? आपणही असेच कमी कष्टात मोठा लाभ झटपट साध्य करण्याच्या आपल्या वृत्तीमुळे अशा प्रवृत्ती समाजात निर्माण करण्याला खतपाणीच घालत असतो.
राजकारण आणि अध्यात्माचा कधीच संबंध नव्हता आणि तो नसायलाच पाहिजे या मताचा मी आहे. पूर्वापार धर्मसत्ता व राजसत्ता एकत्र कार्य करीत आलेल्या आहेत, पण अध्यात्माचा त्यात संबंध नव्हता. आजमितीस पैसा बघितला की राजकारण्यांचा शिरकाव होऊन ते त्या संस्थानांचे वाटोळे करून टाकतात. याचे ढळढळीत उदाहरण म्हणजे राजकीय कार्यकर्त्यांनी अतिक्रमण केलेले शिर्डीचे श्रीसाईबाबांचे संस्थान. या संस्थानाच्या पूर्व पदाधिका-यांवर न्यायालयांमध्ये अजूनही खटले चालू आहेत. याउलट उदाहरण म्हणजे शेगावचे श्रीगजानन महाराज संस्थान. शेगाव संस्थानात राजकारण्यांना प्रवेश नसल्यामुळे आज त्यांचे कार्य प्रचंड वाढलेले असून, इंजिनीअरिंग कॉलेजेस, मेडिकल कॉलेजेस इ. च्या रूपाने उभे राहिलेलं मोठे समाजकार्य देखील आपण पाहत आहोत. अशा संस्थांमध्ये होणारा राजकीय हस्तक्षेप भक्तांनी वेळीच ओळखून त्याला विरोध करायला हवा.
आमच्या प्रतिष्ठानच्या वतीने आषाढी वारीत नऊ वर्षात आम्ही जवळ जवळ साडेचार लाख पेशंट्स वर उपचार केले. पण आम्ही कधीही राजकारण्यांचा पाठींबा घेतला नाही की त्यांना आमच्या सेवेत शिरकाव करू दिला नाही. समाजाचे काम हे त्याच साजातील सर्व थरांतील लोकांच्या मदतीनेच उभारले गेले पाहिजे. भक्तीच्या प्रवाहात राजकारण आले की त्यातले भक्ती आणि प्रेम संपून जाते आणि उरतो तो केवळ अनाकलनीय व्यवहार !
क्रमशः
-नितीन कळंबे
खूप सुंदर मुलाखत