तू भेटशी नव्याने- चांदणे तुझ्या स्मरणाचे

तो बोल मंद हळवासा आयुष्य स्पर्शुनी गेला,

सीतेच्या वनवासातील, जणू अंगी राघवशेला,

भय इथले संपत नाही..

“नाना.. ओss.. नाना.. आधी बंद करा पाहू तो मोबाईल.. काय आपलं ते सारखं किंचाळणारं ऐकत बसायचं..?”

“किंचाळयेस तु सुधा, लता तर किती सुरेल गातिए बिचारी.. आणि तुझ्या ओम नम: शिवाय पेक्षा तरी सुरेलच आहे बरं तिझा गळा..”

“नाना माझ्या चुका काय तुम्ही घरी पण काढल्या असत्या की, त्याच्यासाठी एवढ्या लांब येण्याची काय गरज होती?”

“हां हे असं असतं बघा तुम्हा बायकांचं, नवऱ्याने बाहेर नेलं नाही म्हणून आधी तक्रार करता; आणि नंतर बाहेर नेलं तरी कशाला बाहेर नेलं म्हणून तक्रार करता.. करावं तरी काय आम्हा बिचाऱ्या नवऱ्यांनी..?”

“नाना आता उगाचच काहीही बोलू नका हं तुम्ही.. मी कधी तक्रार केलीये ओ तुमची.?”

“कधी केली? अगं आज सकाळंचच उदाहरण घे कि, अंघोळ करून नुकताच मोरीतून बाहेर पडलेलो मी तर लगेच तुझं पांढरा नको लाल सदरा घाला, आहो ते पिवळ्या काठाच घोतर नेसा ना, एवढं पण कळत नाही का तुम्हाला.. असं चालू झालेलंच की..”

“आहो मग यात तक्रार कसली, तुम्हाला शोभतो तो सदरा आणि धोतर..”

“बरं मग त्यानंतर म्हणालीस.. पुजेसाठी बेल आणा परसातून, आणि जाताना परडी घेवून जा, नाहीतर धोतरातून गोळा करून आणावा लागेल बेल..”

“हो मग खरंच आहे ते नाना.. तुमच्या सवयी काही माहित नाहीत का मला..”

“अगं काय खरं सुधा.. मी शिक्षक होतो शिक्षक.. मला कळतं सगळं..”

नाना म्हणजे जगन्नाथ शेटे यांचा आणि सुधा यांचा विवाह ६० वर्षांपुर्वी झाला होता, नानांचं वय तेव्हा १८ होतं आणि सुधा चं १२, तसं पुर्वीच्या काळी बालपणीच बंधनात बांधलं जायचं, आणि नाना आणि सुधाच्या जोडप्याने  ते बंधन लिलया सांभाळलं देखील होतं.. कोणताही तडा न गेलेलं असं.. अगदी स्वच्छ पुसून ठेवलेल्या काचेच्या भांड्याप्रमाणे त्यांचं नातं होतं.. अगदी आरपार, सदृश्य, निर्मळ आणि पवित्र.

आयुष्य फक्त जगण्यासाठी नसतं, त्याचा मोहोत्सव करायचा असतो, असं म्हणत-म्हणत नाना आणि सुधाने संसाराचा सुवर्णमहोत्सव गाठला होता..

“बरं ठिक आहे नाना माझंच चुकलं, झालं तुमचं समाधान..? यासाठी आपण इथे बाहेर पारावर फिरायला आलोय का? मला वाटलं मला बरं वाटावं म्हणून आणलंय तुम्ही मला इथे..”

“असं नाही गं सुधा, तुझ्या रागात मला प्रेम शोधायला आवडतं..”

“हो का..?”

“हो ना.. आणि काय गं सुधा ही साडी तुझ्या मागच्या वाढदिवसाची ना गं..?”

“अय्या.. नाना तुमच्या लक्षात आहे अजून..?”

“अगं म्हणजे काय..! माझी एकुलती एक बायको तु.. आता या वयात तुझा नाहीतर आणखी कोणाचा हिशेब ठेवणार मी..”

“नाना इश्श..!! तुमचं आपलं काहीतरीच हं..”

“अगं लाजतेस काय, हे बघ तुझ्यासाठी सोनचाफा पण आणलाय मी परसातून.. इकडे ये वेणीत माळतो तुझ्या..”

“हा कुठून आणलात आत्ता तुम्ही.?”

“तु बेल आणायला जी परडी दिली होतीस न त्यातूनच आणला होता..

“नको ना नाना, लोक काय म्हणतील.. ऐन म्हातारपणात काय सुचतंय हिला नटायचं.. राहू देत न ती फुलं बाजूला..”

“सुधा आपल्या बायकोला जे आवडतं ते करू देण्याचा हक्क तिच्याकडेच असावा, इतरांना तो देऊ नये असं माझ्या आईने म्हणजे तुझ्या सासुने मला सांगितलं होतं.. आता तु तुझ्या सासुचा शब्द मोडणार आहेस का?”

“तसं नाही ओ नाना, पण….”

“पण बीण काही नाही.. माझ्यासाठी माळ, छान वाटतं मला तुझ्या वेणीत फुलं पाहिली की, त्या फुलांना न्याय दिल्यासारखं वाटतं..”

“तुम्ही कधी ऐकलंय का कोणाचं.. बरं माळा.. पण माझी केसं नका बरें खराब करू..”

“झालं देखील माळून.. सुधा ६० वर्षांपुर्वी पाहिलेली तु आणि आत्ताची तु, फक्त वयाचाच फरक आहे गं.. अजूनही तेवढीच सुंदर आहेस तु..”

नाना आणि सुधा दोघांनीही वयाची सत्तरी पार केली होती.. त्यामुळे नाना एका हातात काठी घेऊनच सगळीकडे जात असत.. नाना आणि सुधाला ३ अपत्य- २ मुलगे आणि १ मुलगी..

थोरला मुलगा अभियांत्रिकी शिक्षण घेऊन अमेरिकेला स्थायिक झाला होता, मधल्या मुलीचं लग्न त्यांनी एका वकिलाशी लावून दिलं होतं, तिचीही तशी काहीच तक्रार नव्हती आणि धाकटा मुलगा आपल्या परिवारासह मुंबईत रहात होता. त्याचा स्वतःचा व्यवसाय होता..

चिमणीने पिल्लाला उडायला शिकवावं, आणि पिल्लू उडून घरटं सोडून कायमचं निघूनच जावं अशी गत नाना आणि सुधाची झाली होती.. पोरं त्यांच्या-त्यांच्या आयुष्यात एवढी रमली होती की, सावंतवाडीला आपले म्हातारे आई-बाप राहतात यांचा त्यांना जरा कमी, विसरंच पडला होता जणू.. त्यामुळे नियतीने नानांसाठी सुधा आणि सुधासाठी नाना अशा समीकरणाच्या बाजू बरोबर केल्या होत्या..

अंधुक दृष्टि, वाकलेले कणे, लटपटते पाय, सुरूकुत्या पडलेलं शरीर.. गुलमोहराने सजलेल्या रस्त्यावरून त्यांनी संसाराची ६० वर्षे पूर्ण केली होती.. ‘काय नाना मंदिरात का?’ ‘काय नाना कसे आहात?’ ‘नाना कुठं चाललाय मी सोडू का?’ ‘नाना तब्येत काय म्हणतीये?’ ‘अरे वा!..जोडीने दर्शनाला का?’ अशा अनेक प्रश्नांना उत्तरं देत नाना आणि सुधाचं जोडपं त्या पारावर पोहचंलं होतं.

“सुधा, एक विचारू का गं तुला.?”

“अहो नाना, परवानगी कसली मागताय, विचारा ना..”

“का केलास गं माझ्याबरोबर ६० वर्षाचा संसार..?”

“असला कसला हो नाना तुमचा हा अभद्र प्रश्न.?”

“नाही अगं खरंच.. सांग ना, का काढलीस ६० वर्ष माझ्यासोबत? काय दिलं मी तुला? काहीच तर नाही.. आयुष्यभर फक्त माझी कामंच करवून घेतली तुझ्याकडून.. आत्ता पण बघ ना तुझ्या हाताशिवाय मला चालवत देखील नाही साधं.. तुला स्वतःचं असं काहीच देऊ शकलो नाही मी, आणि तु पण आपली वनवासातल्या सीतेसारखी माझ्यासोबत निरपेक्ष भावनेनं काढलीस ती सगळी वर्ष, सांग ना.. का माझे अन्याय सहन केलेस तु.?”

“नाना आकाशातुन समुद्रात पडणाऱ्या थेंबांना किंमत नसते, किंमत फक्त शिंपल्यात पडणाऱ्या थेंबांना असते, कारण त्यांचा मोती होतो.. नाना तुम्ही मला किंमत दिलीए.. आणि मी वनवासातली सीता कधीच नव्हते कारण सीतेच्या पतीने तिला अग्नीपरीक्षा द्यायला लावली होती.. नाना तुम्ही माझ्यावर कधी साधं ओरडलाही नाहीत कधी.. मला सोन्यासारखी पोरं दिलीत.. समाजात मला किंमत मिळवून दिलीत.. तुमच्या कर्तुत्वामुळे समाजात नेहमी मी नानांची पत्नी म्हणून मिरवलं.. माझ्या दुखणाऱ्या पायांना तेल लावून दिलंत तुम्ही.. ज्या समाजात बायकांनी नेहमी नवऱ्याच्या पायाशी असावं असं शिकवलं जातं, त्या समाजात वावरणारे तुम्ही.. मला कधीच दुय्यम दर्जाची वागणुक दिली नाहीत.. नेहमी माझ्याशी प्रामाणिक राहिलात, शाळेत काही माझ्यापेक्षा जास्त शिकलेल्या, चांगल्या दिसणाऱ्या, नटणाऱ्या-मुरडणाऱ्या बायका नव्हत्या का.. होत्याच कि पण तुम्ही त्यांच्याकडे कधी वर मान करून पाहिलं देखील नाही.. वर्षानुवर्षे मी विणलेली स्वेटरं घालुन फिरलात, मला सोनचाफा आवडतो म्हणून परसात माझ्यासाठी त्याचं झाड लावून रोज त्याला पाणी घातलंत.. भाजीत कधी मीठ कमी-जास्त पडलं तरी विनातक्रार खाल्लंत तुम्ही.. कधीच माझ्यावर पुरूषार्थ गाजवला नाहीत.. एका स्त्रीसाठी या सगळ्यापेक्षा अजून काय गरजेचं असणार आहे नाना..? तुम्ही मला माझं सर्वस्व दिलंयत नाना.. पूर्णत्व दिलंयत..”

“सुधा किती सालस आहेस गं तु.!! एवढी वर्षं तु माझ्यात स्वतःला शोधत राहिलीस, स्वतःच्या अस्तित्वाची पणतीच विझवलीस तु.. सरळ वाटेवर तर सगळेच असतात, पण तु माझी सोबत पायवाटेवर दिलीस.. माहित नसलेल्या वाटेवर सुद्धा डोळे झाकून माझ्यासोबत चालत राहिलीस..”

“नाना पुरे झालं आता तुमचं.. चला बघु मंदिरात पण पोहचायचंय ना..”

“सुधा तुझ्या डोळ्यांत पाणी पण चमकतं अगं.. असं वाटतंय जमिनीवर पडलं तर आत्ता त्याची प्राजक्ताची फुलं होतील.. माझ्या प्रामाणिकपणाचं कारणही तुच आहेस सुधा.. माझ्या सगळ्या व्यथा तु समजून घेतल्यास.. अत्तर नाही तर बकुळीच्या फुलाच्या सुगंधासारखं माझं आयुष्य तुझ्या सहवासाने दरवळून टाकलंस तु.. आजपर्यंत कधी विचारलं नाही म्हणून आज विचारतो; खरं खरं सांग सुधा, तुला माझ्याकडून उरलेल्या आयुष्यात काय हवं आहे.?”

“सांगते.. तुम्ही पहिल्या पायऱ्या नीट पाहून चढा बघु.. आपण गाभाऱ्यात बसुन बोलुयात यावर..

नाना मला सांगा गाभारा काय आहे?”

“काय म्हणजे? देवळाचा एक भाग आहे..”

“नाही नाना, गाभारा आपलं आयुष्य आहे, आणि याच्यापुढे देवाची शक्ती आहे..”

“म्हणजे गं सुधा?”

“नाना माणसाचं अस्तित्व गाभाऱ्यापर्यंतच असतं.. गाभाऱ्याच्या पुढे देवाचं अस्तित्व सुरु होतं.. आत्तापर्यंत जसं तुम्ही एक-एक पायरी चढून माझ्यासोबत वर आलात.. आता तसंच गाभाऱ्यात बसून रहा, आत्तापर्यंत प्रत्येक टप्प्यावर माझी साथ दिली आता देव वर बोलवू पर्यंत फक्त माझ्यासोबत रहा.. एवढी एकच इच्छा आहे माझी.. मी अशीच बसून राहीन तोवर गाभाऱ्यात.. तुम्ही सोबत करायची फक्त.. आजन्म.. ठरलं..?”

“ठरलं..!!”

One thought on “तू भेटशी नव्याने- चांदणे तुझ्या स्मरणाचे”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *