अवीट आचमन १..!!

7
5737

स्वरसागर सांस्कृतिक महोत्सव


अर्घ्य पहिले

दूर देशी जाण्याच्या तयारित असलेले सुरांचे ढग.. घुटमळू लागतात जेव्हा, पुन्हा पुन्हा तिथेच..
तेव्हाच खरंतर जाऊन बघावं त्यांच्या आजुबाजूला.. कारण स्वर सूर्याच्या अस्तानंतरही काही अतृप्त स्वर जेव्हा राहतात मागेच काहीतरी कारण काढून.. तेव्हा पाहून यावं तिथे एकदा.. काय सांगावं एखादा शब्द-सुरांच्या भेटीगाठीचा सोहळा चालू असेल..

पिंपरी चिंचवड सोशल ट्रस्ट यांच्या मार्फतीने दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या स्वरसागर सांस्कृतिक महोत्सवाला आज सुरुवात झाली.. निगडी प्राधिकरण परिसरात होत असलेला हा महोत्सव दि. २८ फेब्रुवारी १ व २ मार्च असा एकूण तीन दिवस चालेल..

त्याचाच आजचा हा पहिला दिवस..

महोत्सवाची नांदी २००४ सालचा संगीत नाटक अकादमी अवॉर्ड ज्यांच्या मानाच्या तुऱ्यांमधे मिरवत आहे.. अश्या पंडित भवानी शंकर जींच्या पखावज वादनाने झाली..

नमामि समीशा निर्वाण रुपम् या शंकर स्तवनाने श्री. उमा शंकर यांनी स्वर्य सुरुवात केली.. पंडितजींनी सादर केलेलं रुद्राष्टकम् आणि त्यांना मिळालेली पं. संगीत मिश्रा यांच्या सारंगीची जोड.. आहाहा.. असं संजयाच्या डोळ्यांनी पाहून कळणार थोडीच आहे ते..

रामायण-महाभारता सारख्या महाकाव्यांमधे उल्लेख आलेलं मृदुंग/पखावज सारखं वाद्य, पंडितजींनी अगदी सातासमुद्रापार Guinness Book अन् Limca Book of Records पर्यंत नेलं..

पंडितजींच्या घरात गेल्या सात पिढ्यांपासून संगीताचं नीरांजन अखंड तेवत आहे.. आणि आज देखील त्यांची पुढची पिढी, त्यांचे चिरंजीव श्री. उमा शंकर हे आपल्या संगीत साधनेच्या माध्यमातून त्याची ज्योत वेळोवेळी प्रखर करत आहेत..

पंडितजी ज्या ज्या वेळेस मृदुंगावर थाप मारत होते.. त्या प्रत्येक थापेगणिक उमटणारे तरंग रंगमंचासमोरचं ते तमाचं आवरण भेदून हर एक कानांना तृप्त करत होते..

पंडित भवानी शंकरजींनी मूर्तातल्या पखावजासोबतच माझ्या मन-मृदुंगाला दिलेली दोलायमान गती अजूनही तशीच आहे..


दुसरं सत्र सुरु होण्याआधी दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करून औपचारिक पद्धतीने स्वरसागर सांस्कृतिक महोत्सवाचं उदघाटन झालं..

आजन्म केलेल्या संगीत सेवेचा गौरव म्हणून दरवर्षी देण्यात येणारा स्वरसागर पुरस्कार या वर्षी ग्वाल्हेर, जयपूर-आग्रा घराण्याचे ज्येष्ठ गायक पद्मश्री पं. उल्हास कशाळकर यांना प्रदान करण्यात आला.. या पुरस्काराची रोख-रक्कम त्यांनी पुलवामा हल्ल्यात शहिद झालेल्या जवानांच्या प्रति सादर अर्पण केली, तर पं. पद्माकर कुलकर्णी स्मृती गौरव पुरस्काराचे मानकरी ठरले तबलावादक श्री. मंदार प्रभुणे.


सूर नवा ध्यास नवा छोटे सूरवीर


“शब्द सुरांच्या हिंदोळ्यावर,

फुलले कळीतून गीत नवे..

सूरवीर जरी छोटे आम्ही,

तरी शास्त्रीय-सुगमचे जणू दुवे..!”

पुरस्कार वितरणानंतर सुरु झाली छोट्या सूरविरांची सुरांची शाळा.. दाता तू गणपती गजानन.. या गणेश वंदनेने उत्कर्षने बहारदार सुरुवात केली.. तर चुईमुई सईने आज सगळीकडे गाजत असलेल्या आनंदी गोपाळ मधल्या वाटा वाटा वाटा गं.. या गाण्यावर रसिकांना ताल धरायला लावला..

सूर नवा ध्यास नवाच्या या पर्वाची राजगायिका ठरलेल्या स्वरालीने गायलेलं दमादम मस्त कलंदर हे गाणं अव्वल ठरलं.. तर चैतन्यने बोबड्या बोलांमधे गायलेल्या गवळणीने डोळ्यांच्या कडा अलगद पाणावल्या..

सृष्टिसेनाचं एका तळ्यात होती हे गाणं असेल.. अंशिकाने काहिश्या western अंगाने गायलेलं शारद सुंदर चंदेरी राती हे भावगीत असेल.. किंवा स्वरालीचं लंबी जुदाई.. यातून निदर्शनास येत होती, वयाच्या मानाने या चिमुरड्यांना असलेली उत्तम तालासुराची जाण आणि त्यांचं संगीताप्रती असलेलं निरलस प्रेम..

इतक्या लहान वयात, शेकडो रसिकांसमोर live गाणी सादर करणं हे तसं पाहिलं तर अवघडच.. पण त्यांच्या स्पृहाताई मुळे त्यांचं अवघडलेपण कुठच्या कुठे पळून गेलं होतं.. आणि त्यामुळेच एक से एक हिट गाणी सादर होतच राहिली..

कार्यक्रमाचा शेवट तीन अत्यंत वेगळ्या धाटणीच्या गाण्यांच्या medley ने झाला.. संपूर्ण कार्यक्रमभर अंगावर आलेले शहारे हे बोचणाऱ्या थंडीपेक्षा, ह्या चिमुकल्या पण बाणेदार आवाजांनीच आणले होते, हे नक्की..


मंडळी मी तर म्हणतो.. या स्वरसागरात चिंब भिजून घ्या.. अगदी नखशिखांत भिजता नाही आलं, तरी निदान चार-दोन शिंतोडे तरी उडवून घ्याच पाण्याचे.. काय सांगावं कानापर्यंत येता येता.. या स्वरसागरातील जलाचं अत्तरही झालं असेल..

उद्या भेटुयातच..

पुढचं आचमन घ्यायला..

तयार आहात ना..!

-डॉ. तुषार

Previous articleसुरेल वाटचाल- महेश काळे भाग २
Next articleअवीट आचमन २..!!
Crammed of Spirituality... Loved to be surrounded by Positive Vibes... पाडगावकर, खांडेकर, दवणे, मतकरी, पुलं, वपु, चंगो; आणि अजून कित्येक... या व्यक्तिंनी जे दर्जेदार लिहिलं.. ते साहित्य वाचून, अनुभवून झपाटून गेला; 'शुभॠष्' या टोपण नावाने लिहीणारा एक स्वैर-लेखक... डॉ. तुषार प्रशांत पवार आणि जेव्हा त्याच्या सोबतीनं, त्याच्याच सारखे साहित्यवेडे जमले तेव्हा प्रत्यक्षात आली 'शब्दीप्ता Magazine' ची संकल्पना...

7 COMMENTS

  1. खूप सुरेख वर्णन केलंय.प्रत्यक्ष सुरानुभव न घेताही सूर सागरात चिंब भिजण्याचा आनंद मिळाला.

    • धन्यवाद.. संजयाच्या डोळ्यांनी मी आपल्याला महोत्सव दाखवू शकलो.. यातच धन्यता वाटते..

  2. अप्रतिम ! सूर आणि शब्दं रुंजी घालत , बागडत आणि खुलवून अधीर रसिक मनांची परिमिति आधिकधिक तरल व गहरी करतात …! शब्दंफुले स्वरांत भिजताना गंध मिसळतो अपूर्वाईचा ! धन्यवाद !

    • मनापासून धन्यवाद.. आपली प्रतिक्रिया मला नेहमीच प्रोत्साहित करत आली आहे.. आशिर्वाद असावेत..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here