हे अगदी खरं आहे! मला अजुनही आठवतं, शिशिर ऋतू चे दिवस होते, दिवसभर कंटाळून यायचो, रात्री जेवणासाठी पुन्हा खानावळीत चालत जावं लागायचं. चालत जाताना खोलीपासून जवळच एका घराच्या भिंती पलीकडून एक मनमोहक सुगंध यायचा आणि मी हरवून जायचो. मी क्षणभर थांबायचो आणि त्या सुगंधाचा आस्वाद घ्यायचो. हे रोज घडायचं! हा येणारा सुगंध नक्की कशाचा आहे याचं फार औत्स्युक्य होतं मला.. एक दिवस न राहून मी भिंतीपलीकडे डोकावलं तर बहरलेल्या रातराणी ने माझं स्वागत केलं. तो सुगंध,आणि ती रात्र माझ्या अजूनही लक्षात आहे!
कस्तुरीमृगच्या नाभीमध्ये कस्तुरी आहे हे त्याला शेवटपर्यंत कळत नसतं! पण त्या सुगंधाच्या शोधार्थ तो आयुष्य पणाला लावतो. एकूणच कोणत्याही पद्य साहित्याबद्दल नेमकं हेच झालं आहे.. इतर प्रांतातील, इतर भाषेतील काव्य वाचल्यावर आम्हाला जाणवतं की हे तर आमच्या मराठी किंवा हिंदी मध्ये कितीतरी चांगल्या पद्धतीने सांगितलं आहे. संत ज्ञानेश्वरांपासून ते एकविसाव्या शतकातील नवकवींपर्यंत प्रत्येकाने आपापल्या परीने आपापल्या भाषेला समृद्ध केले आहे. प्रत्येक कवितेला प्रत्येक कविच्या भावनेचा व विचाराचा स्पर्श असतो. अश्या कित्येक थोर कवींनी साहित्य सुगंधित केलं आहे. जो जो या सुगंधाच्या सानिध्यात येतो तो तो ‘मनमोहित’ होतो पण या सुगंधाचा आस्वाद घेणारे मात्र अल्प प्रमाणात असतात आणि या सुगंधाचा उगम शोधणारे अत्यल्प!
ज्यांनी आपलं आयुष्य पणाला लावून कविता लिहिल्या, कविता जगल्या, आपल्या आयुष्याला प्रेरित केलं, आपल्याला व्यक्त व्हायला शिकवलं त्या थोर कवींची सुरुवात नेमकी कशी झाली? त्यांच्या कवितेला नक्की कोणता सुगंध आहे? आज इतक्या वर्षानंतरही तो सुगंध तसाच दरवळत आहे का? या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न आणि कविता बहरण्या पासून ते आपल्या मस्तिष्का पर्यंत पोहोचणाऱ्या सुगंधाच्या शोधाचा प्रवास म्हणजे,
“अत्तरबीज!”
ही “अत्तरबीजं” वाचूया, वेचुया आणि भविष्यासाठी पेरूया!!!
आज पासून सुरु होतंय एक नवीन पाक्षिक सदर..
नक्की वाचा..
दर महिन्याच्या २ आणि १७ तारखेला..
-गौरीहर सरकाळे