८०-९०च्या दशकात पुढे आलेल्या व्यक्तींमध्ये श्री. प्रवीण अनंत दवणे हे नाव अग्रणी होतं.. मराठी रसिकांना केवळ परिचित नाही तर प्रिय असणारे दवणे.. म्हणजे अतिशय तरल अशी संवेदना.. लालित्यपूर्ण शैली.. आणि जीवनाच्या मुलभूत मुल्यांवरील अभेद्य निष्ठा.. यांचा त्रिवेणी संगमच जणू.. त्यांच्या काव्यात आणि काव्यात्म लेखनात याचा प्रत्यय वेळोवेळी येतोच..
कुसुमाग्रज म्हणतात.. “काव्य हा त्यांचा व्यवसाय नसून जीवनधर्म आहे.. आणि अश्या वृत्तीचे लेखकच साहित्यात लक्षणीय आणि मोलाची भर टाकू शकतात..” गीतकार म्हणून आपली एक वेगळी जागा निर्माण केल्यावर दवणें मधला लेखक काही त्यांना स्वस्थ बसू देईना..
तारुण्याच्या विशिष्ट उमाळ्यानंतर आयुष्याचे प्रश्न त्या पुढे जातात.. वेगळी आव्हाने खुणावू लागतात.. पूर्वी जीवाच्या आकांताने केलेले संघर्ष सामान्य भासू लागतात.. मुलाच्या अंतर्बाह्य विकासाकडे आई-वडिलांची उर्जा धावू लागते.. पती-पत्नींचे मतभेद, मुलाच्या नव्या महोत्सवात विरून जातात.. कितीही अमीर.. प्रसिद्धीच्या शिखरावरील तुम्ही कुणीही असा.. आपल्या श्वासात एकमेकांना गुंफून जगणं असेल.. तरंच आपलं यश आपण साजरं करू शकाल.. दुराग्रहाने, कायम दरी ठेवणारे ‘जगत’ राहतील, पण ‘फुलत’ राहतील का..? ‘कमवत’ राहूनही ‘रिते’ पणाची शक्यता वेळीच टाळायला हवी.. परस्पर सामंजस्यानं नात्याची वीण घट्ट करायला हवी.. साऱ्या घरासाठी..
हा विचार दवणेंना सतावू लागला, आणि मग प्रत्यक्षात आली ‘सावर रे..’ लेखमाला.. तत्कालीन आघाडीच्या दैनिकाच्या द्वारे दवणे आपले विचार मांडू लागले आणि समाजाप्रती असलेलं आपलं नातं आणखी घट्ट करत गेले.. दर आठवड्याला त्यांचं हे सदर प्रसिध्द होवू लागलं.. आणि वाचकांच्या पसंतीस देखील उतरू लागलं.. या लेखमालेमुळे दवणे खऱ्या अर्थाने आबालवृद्धांना माहिती झाले.. अतिशय परखडपणे बोलत.. स्पष्टवक्तेपणा थोडासा बाजूला ठेऊन.. शालजोडीतले टोले मारण्यात दवणेंचा हातखंडा होता..
पेशाने मराठीचे प्राध्यापक असल्याने दवणेंचा.. युवकांशी जास्त संपर्क आला.. त्यांच्या अडचणी त्यांचे विचार जाणून घेऊन त्यावर चपखल नुस्खा सांगत दवणे चार समजुतीचे शब्दही ऐकवायचे.. आई-वडील आणि मुलांमधली दरी कमी करण्याचं काम करायचे.. प्रसंगी घरातल्या कर्त्या पुरुषाची जागा घ्यायचे.. आणि सगळ्यांनाच समज देवून पुन्हा एकत्र आणायचे.. त्यांच्या महाविद्यालयातल्या मुलांना तर दवणे सर म्हणजे त्यांच्या घरातलेच वाटायचे..
कोणताही problem कधीही सांगता येईल असे वाटायचे.. आणि दवणे सुद्धा त्यांना तितक्याच आपुलकीने मदत करायचे.. जनमानसात वावरताना त्यांना आलेले अनुभव आणि त्यावर त्यांनी केलेल्या उपाययोजना.. यांचा खुमासदार नजराणा म्हणजे ‘सावर रे..’
शासनाने जेव्हा मराठी भाषेला पर्याय म्हणून तंत्रज्ञान हा विषय ठेवण्याचा निर्णय घेतला होता तेव्हा “स्वतःची आई वृध्द झाली आहे; आता तिच्या जागी थोडी तरुण बाई आई म्हणून घरात आणण्याचा कपाळकरंटेपणा एखाद्या ‘कुलदीपकाने’ करावा, तसा नतद्रष्टपणा शासन करीत आहे..” अश्या शब्दांत त्यांनी तत्कालीन शासनकर्त्यांच्या कार्यावर मुक्त ताशेरे ओढले होते..
मराठी असणे-नसणे एवढाच प्रश्न नव्हता.. तो नव्या पिढीचा जीवनावश्यक दृष्टीकोन निर्माण करण्याचा प्रश्न होता.. भाषा नेमकं माणसाला काय देते हे कळण्याची संवेदनाच शासन बोथट करू पाहत होतं.. ते म्हणत.. “शासन ही अखंड समाजाचं पालकत्व स्वीकारणारी एक जबाबदार संस्था असते.. या समाजपालकाला आपल्या राज्यातील पुढील पिढ्या फक्त ‘उपयोगी यंत्र’च करावयाच्या आहेत कि एक ‘संवेदनशील माणूस’, हाच खरा प्रश्न आहे..”
समाजातले.. घराघरातले.. हजारो प्रश्न निर्माण होण्यामागे एकमेव कारण हे आहे की, जीवनमूल्यांचा पायाच ढासळला आहे.. कोणतीही भाषा, त्या भाषेतील साहित्य.. माणसांना जगवायचा मुल्यसंस्कार देते.. पण लक्षात कोण घेतो.. मराठीला पर्याय शोधण्याचा केविलवाणा प्रयत्न करणाऱ्या शासनाने उत्तरादाखल केलेल्या युक्तिवादात म्हंटलं होतं.. “हा पर्याय आहे.. आम्ही थोडंच मराठी रद्द करत आहोत..?” यावर दवणे म्हणतात,.. “कोर्टात जिंकायला हा सवाल योग्य आहे.. तुम्ही जिंकालही.. पण एकीकडे शंभराची नोट ठेवलीत आणि एकीकडे ज्ञानेश्वरी.. तर समाज नोटेकडेच वळेल.. अमूल्य ज्ञानेश्वरीकडे नाही.. कारण सर्वत्र एकच शिकवण दिली जातेय.. “जगवतो तो पैसा”
अश्याप्रकारे लोकसत्तेतल्या चतुरंग पुरवणीत वाचकांनी उदंड प्रेम दिलेलं.. ‘सावर रे..’ तिथंच थांबलं नाही.. पुस्तकांच्या पानांतून पुन्हा हाती आलं.. आणि ‘सावर रे..’चं आणखी एक निमित्त धन्य झालं..!!
दवणेंच्या कविता, लेख, लेखमाला आहेतच.. पण त्याही पेक्षा एक सामाजिक जाणीव असलेला माणूस म्हणून ते जास्त प्रसिध्द आहेत.. मराठी भाषेच्या अस्मितेसाठी.. त्यातील अगाढ साहित्यासाठी आणि त्याच्या जपणुकीसाठी सातत्याने झटणारा.. आपल्या लिखाणातून समाजातील अनेक ज्वलंत विषयांवर पोटतिडकीने लिहिणारा.. एक स्वैर लेखक म्हणून मराठी भाषिकांमध्ये प्रेमाची जागा मिळवून असलेले श्री. प्रवीण अनंत दवणे उत्तरोत्तर बहारदार लिहितील.. आणि माझ्या सारख्या नवलेखकांना सदैव प्रेरणा देतील यात शंकाच नाही..