गुरु नाही नाशिवंत गुरु सत्य तो अनंत..
आज श्रीगुरुपौर्णिमा !!!
स्वत:ला अज्ञानी, अपूर्ण समजणा-या जीवाचे ते ” जीवपण ” फेडून मूळचे शिवपण पुन्हा प्रकट करणा-या, एकमेवाद्वितीय अलौकिक, चालते बोलते परब्रह्म, करुणावरुणालय मायमाउली श्रीगुरु भगवंतांचा हा विशेष स्मरणदिन. अतीव प्रेमादराने, कृतज्ञतेने करुणा भाकण्याचा शिष्यांचा हक्काचा दिवस !!
श्रीगुरु हे तत्त्व आहे. गुरु म्हणजे कोणी व्यक्ती नव्हेत. ते तर साक्षात् परब्रह्माचे परम कोमल परम दयाळू असे विलक्षण स्वरूप आहे. श्रीभगवंतांची अनुग्रहशक्ती म्हणजेच श्रीगुरु. ज्या रूपाच्या दयाकृपेला अंत ना पार त्यांनाच शास्त्रांमध्ये श्रीगुरु असे म्हणतात. हेच जीवाचे खरे सोयरे होत.
शास्त्रांनी गुरुतत्त्वाचे फार सुरेख वर्णन करून ठेवलेले आहे. संतांनी देखील याविषयीचा आपला स्वानुभव भावपूर्ण शब्दांमध्ये सांगून ठेवलेला आहे. त्यांचा सर्वांगीण विचार करणे कोणालाच शक्य नसले तरी, आजच्या या पावन पर्वावर आपण श्रीगुरुतत्त्वाची ही यथाशक्य ‘ अक्षरपूजा ‘ बांधून आपलाही प्रेमभाव त्यांच्या श्रीचरणीं अर्पून धन्य होऊया.
आपल्या ” दीक्षारहस्य ” या पुस्तकात प. पू. श्री. शिरीषदादा कवडे यांनी गुरुतत्त्वाचे फार मार्मिकपणे शास्त्रशुद्ध विवेचन केलेले आहे. त्यातील काही भाग आपण समजून घेऊया. गुरुतत्त्वाचे कार्यपरत्वे तीन भेद होतात. यांनाच १. गुरु, २. श्रीगुरु आणि ३. सद्गुरु असे म्हणतात. भगवंतांची केवळ सदिच्छाशक्ती, मार्गदर्शक शक्ती ( लौकिक, पारलौकिक) कार्य करते, पण उद्धारक शक्ती सुप्त असते, तेव्हा ते तत्त्व ‘ गुरु ‘ असते. म्हणजे आपण कोणलाही काही विचारले आणि त्यांनी ते सांगून मार्गदर्शन केले, तर तो ‘ गुरू’च होय. भगवान श्रीदत्तात्रेयांनी असे चोवीस लौकिक गुरु मानून, त्यांच्यापासून एकेक गुण घेतल्याची आख्यायिका श्रीमद् भागवतात आहे.
श्रीगुरु मधील ‘ श्री ‘ ही श्रीभगवंतांची कृपाशक्ती, उद्धारक शक्ती. ही शक्ती साधनेच्या युक्तिसहित श्रीभगवंत ज्यांच्या माध्यमातून प्रेरित करतात, त्यांना ‘ श्रीगुरु ‘ म्हणतात. श्रीगुरूंकडून जीवाला शक्तियुक्त ज्ञान प्राप्त होते. शिवाय लौकिक पारलौकिक मार्गदर्शनांचीही प्राप्ती होतेच. हे ‘ श्रीगुरु ‘ जेव्हा शक्तिस्वरूप होऊन ठाकतात, पूर्णत: शक्तिलीन होतात, तेव्हाच ते ‘ सद्गुरु ‘ या संज्ञेला प्राप्त होतात. शास्त्रांनी श्रीगुरु व सद्गुरूंना साक्षात् शिवस्वरूप मानूनच त्यांची उपासना करण्याची आज्ञा करून ठेवलेली आहे. श्रीगुरूंची कृपा झाल्याशिवाय कोणालाच कधीही मोक्ष लाभत नाही.
श्रीगुरूंच्याच ठायी यच्चयावत् सर्व देव-देवतांचा निवास असतो. प्रत्येक शिष्यासाठी त्याचे श्रीगुरूच सर्वदेवस्वरूप असतात. म्हणूनच भगवान श्रीज्ञानेश्वर माउली स्पष्ट सांगतात, ” गुरुवीण देव दुजा पाहतां नाही त्रिलोकी ॥ “
प. पू. श्री. गोविंदकाका उपळेकर महाराजांनी आपल्या ” विभूती ” ग्रंथात सद्गुरुतत्त्वाची चौदा लक्षणे सांगितली आहेत. या स्वानुभूत अशा चौदा व्याख्याच आहेत. अर्थात् प. पू. काकांच्या गूढरम्य भाषेत असल्याने त्या व्याख्या तशा सहज आकलन होतील अशा नाहीत. त्यातील शेवटच्या मार्मिक व्याख्येत पू. काका म्हणतात, ” ज्यांचे चरण म्हणजे मूर्तिमंत ‘ श्री ‘ ! ” या वाक्यातून पू. काकांनी फार महत्त्वाचे संदर्भ सांगून ठेवलेले आहेत. नाथ संप्रदायातील अत्यंत गुप्त राखलेल्या ” श्रीचरणसंप्राप्तियोग ” या विशेष योगाचा सूचक उल्लेख पू. काका येथे करीत आहेत. श्रीगुरूंच्या श्रीचरणांतूनच भगवत्कृपेचा झरा वाहत असतो. म्हणून श्रीगुरूंचे श्रीचरणच शक्तीचे साक्षात् प्रतीक मानले जातात व त्याच श्रीचरणांची, श्रीचरणपादुकांची पूजा करण्याची पद्धत पूर्वीपासून संतांनी घालून दिलेली आहे. श्रीज्ञानेश्वरीतून प्रकट होणा-या या श्रीचरणसंप्राप्तियोगावर प. पू. श्री. शिरीषदादा कवडे यांनीच सर्वप्रथम ” निगूढ योगपंचक ” ग्रंथात सविस्तर लिहिलेले आहे.
श्रीगुरूंचे, त्यांच्या स्वरूपाचे आणि कार्याचे यथार्थ वर्णन करणारा एक नितांतसुंदर अभंग प. पू. श्री. शिरीषदादा कवडे यांनी रचलेला आहे. आज व उद्या याच अर्थगर्भ अभंगाचा आपण आस्वाद घेणार आहोत. श्रीगुरुगौरव गायनाच्या या महोत्सवात सहभागी होऊन सर्वांनी श्रीगुरुप्रसादाचा लाभ घ्यावा ही विनंती.
प. पू. श्री. शिरीषदादा आपल्या अभंगात म्हणतात,
गुरु नाही नाशिवंत ।
गुरु सत्य तो अनंत ॥१॥
गुरु शांतिबोध गुंफा ।
सिद्ध चैतन्याची प्रपा ॥२॥
गुरु प्राणांचाही प्राण ।
शिष्यालागी आत्मदान ॥३॥
गुरु निराकारा अंग ।
नि:संगासी नित्यसंग ॥४॥
गुरु सगुण निर्गुण ।
अमृतेचे देहभान ॥५॥
श्रीगुरुतत्त्व नाशिवंत तर नाहीच, पण सत्य व अनंत आहे. शांती व बोधाची खाण असणारे सद्गुरुतत्त्व हे नित्यसिद्ध अशा चैतन्याची सतत वाहणारी पाणपोईच आहेत. गुरूच खरे प्राणांनाही संजीवन देणारे मुख्यप्राण आहेत. तेच शिष्यावर कृपा करून त्याला स्वत:चेच दान देऊन टाकतात. निराकार असे परब्रह्मच गुरुरूपाने आकारलेले असून नि:संग असे महात्मेही सतत त्याच तत्त्वाचा संग करीत असतात. गुरूच सगुण व निर्गुण असे उभयरूप असून तेच आता अमृतेचे ( प. पू. श्री. दादांची नाममुद्रा) देहभानही व्यापून उरलेले आहेत.
या गुरुतत्त्वाचे मनोहर वर्णन करणा-या अभंगाचे सविस्तर आस्वादन आपण उद्याच्या लेखात करणार आहोत.
श्रीगुरुतत्त्व हे नित्यसिद्ध व अविनाशी असते. प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात की, गुरुतत्त्वाचे साकार रूप असणारे भगवान श्रीदत्तप्रभू हे जगद्गुरु आहेत. त्यांचा अवतार हा नित्य अवतार आहे. इतर सर्व अवतार कार्य संपल्यावर स्वधामी परत निघून गेले, पण जगातील अज्ञान नष्ट करण्याचे श्रीगुरूंचे कार्य असल्याने श्रीदत्तप्रभू मात्र अज्ञान संपेपर्यंत कार्यरत राहणारच आहेत. जग आहे म्हणजे कुठे ना कुठे अज्ञान आहेच, त्यामुळे श्रीगुरुतत्त्वाचे मूळस्रोत असणारे श्रीदत्तप्रभू व त्यांचेच अंश असणारे श्रीगुरु अखंड कार्यरत आहेतच.
आज परब्रह्माच्या या नित्य अवताराच्या विशेष पूजनाचा दिवस आहे. हा शिष्यांसाठी सर्व सणांहून मोठा सण आहे. श्रीगुरुतत्त्व नित्य असल्यानेच श्रीगुरुकृपारूपी चंद्रमा देखील अखंड आहे. लौकिक चंद्राप्रमाणे त्याला क्षय-वृद्धी नाही. म्हणूनच पूर्ण कलांनी उगवलेल्या या श्रीगुरुकृपाचंद्राची पौर्णिमाही अखंडच आहे. म्हणजे श्रीगुरुपौर्णिमा हा वर्षातून साजरा करण्याचा एक दिवस नाही. शिष्याच्या हृदयात सतत जागृत असणा-या आपल्या परमदयाळू श्रीगुरूंचे त्याला प्रेमपडिभराने ज्या ज्या वेळी स्मरण होईल, तो तो प्रत्येक क्षण हा श्रीगुरुपौर्णिमा महोत्सवच आहे. असा श्रीगुरुपौर्णिमेचा निरंतर सोहळा आपल्या हृदयात साजरा होण्यासाठी प्रेमाने व नेमाने श्रीगुरूंनी कृपावंत होऊन दिलेले साधन करीत राहिले पाहिजे. साधनाच साध्य मानून हातून सतत घडली की मग श्रीगुरुकृपारूपी महामेघ अविरत वर्षाव करून आपले सर्वांग अंतर्बाह्य पुनीत करतो. त्यानंतरच खरी अ-खंडित श्रीगुरुपौर्णिमा साजरी होत असते, असे संत सांगतात. हाच अमृतयोग सर्व गुरुभक्तांच्या जीवनात लवकरात लवकर येवो या सदिच्छेसह आजच्या पावन प्रसंगी श्रीगुरु भगवंतांच्या अम्लान, सर्वतीर्थास्पद व सर्वार्थद श्रीचरणीं कोट्यनुकोटी दंडवत घालून सादर सप्रेम श्रीगुरुस्मरणात तूर्त रजा घेतो.
क्रमश: –
लेखाचा उत्तरार्ध इथे वाचा
लेखक – रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष – 8888904481