सामान्य माणसे स्वसुखाची स्वप्ने पाहतात व त्याच्या पूर्तीसाठी आयुष्यभर झगडत राहतात. परंतू असामान्य माणसे मात्र समाजाच्या उन्नतीचे स्वप्ने पाहतात आणि ती त्यागातून, कष्टातून व प्रत्यक्षात कृतीतून सत्यात उतारवितात. अशी काही असामान्य माणसे आपले संपूर्ण आयुष्य समाजासाठी समर्पित करतात याचमुळे समाजाचा डोलारा समतोलपणे उभा आहे. यापैकी जे प्रकाशात आले जगाच्या लेखी मोठे ठरले, परंतु काही झाकोळलेले सूर्य देखील तितकाच प्रकाश आपणास देऊन गेले.. असेच एक त्यागी-निस्वार्थी आदर्श शिक्षक.. प्रा. के. एस. अय्यर सर..
३५वर्षे हॉटेलच्या खोलीत राहून आपला पगार विद्यार्थ्यांसाठी खर्च करणारे.. विद्यार्थ्यांसाठी आपले आयुष्य खर्ची घालणारे.. प्रा. अय्यर सर हे त्यागाचे मूर्तिमंत उदाहरणच.. जाणून घेऊयात त्यांच्या बद्दलच..
अय्यर सरांचा जन्म १९३३ मध्ये केरळ राज्यात झाला. त्यांची कुटुंबव्यवस्था सुखवस्तू होती. वडील सैन्यात नोकरी करायचे. फिरती मुळे अय्यर सरांचे शिक्षण राजस्थान, बंगाल मधे झाले. त्यांची कर्मभूमी मात्र महाराष्ट्र हीच राहिली. सुरुवातीस काही दिवस कराड येथे नोकरी केल्यानंतर त्यांनी तहहयात बारामतीच्या तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात अध्यापनाचा वसा जपला.. मनात समाजसेवेची उर्मी आणि समाजाबद्दलची संवेदना असेल तर भाषा, प्रांत इ.ची सीमा अडथळा ठरू शकत नाही.. “अवघे विश्वची माझे घर” या उक्तीनुसार ज्याप्रमाणे मदर तेरेसा परदेशात येऊन पीडितांची मायमाऊली बनल्या त्याचप्रमाणे अय्यर सर विद्यार्थ्यांचे पालक बनले..
सरांनी बारामतीच्या चतुरचंद महाविद्यालयात अध्यापनाचे काम सुरु केले तेव्हापासून ते तेथील एका रेस्टोरन्ट मध्ये राहत होते.. ३५ वर्षे आठ बाय दहा च्या छोटयाशा खोलीत ते राहिले.. गरीब होते म्हणून नाही किंवा पैसे वाचवावेत म्हणून ही नाही.. आपल्या पगारातील पैसे स्वतःच्या गरजेइतकेच ठेवून बाकी सर्व पैसे ते विद्यार्थ्यांसाठी खर्च करत असत.. विद्यार्थ्यांना हि मदत जास्तीत जास्त करता यावी यासाठी ते नेहमी स्वतःच्या गरजा अत्यल्प ठेवून, आहे त्या परिस्थितीत समाधानी राहिले.. छोट्याशा खोलीत एक कॉट, मोजकेच कपडे, एक कपाट, एक सायकल आणि खूप पुस्तकं हाच काय तो सरांचा संसार.. मनाने शुद्ध आणि वृत्तीने समाधानी माणसे जीवनात अधिक सुखी असतात.. प्राप्त परिस्थितीत समाधानाने जगता येणे हेच सुखी आयुष्याचे गमक आहे.. हाच संदेश सरांच्या जीवनशैलीतून मिळतो..
हे सर्व वाचून नक्कीच आश्चर्य वाटेल, कारण आजच्या काळात वरिष्ठ महाविद्यालयातील एक प्राध्यापक सुखचैनीयुक्त जगता येईल, इतका पगार असताना सुद्धा, सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी अशा प्रकारचे फकिराचे जीवन जगतो आणि शेवटपर्यंत हे व्रत जोपासतो.. “झाले बहू, होतील बहू परंतू या सम हा” असेच व्यक्तिमत्व म्हणावे लागेल..
समाजसेवा हि आंतरिक तळमळ आहे, त्यागाशी तिचे नाते आहे.. निष्कांचन राहून समाजसेवा करण्याची कल्पना सुद्धा सध्याच्या काळात कोणी करू शकत नाही.. अशा वेळी प्रा. अय्यर सरांसारख्या व्यक्ती आपल्या कार्यकर्तृत्वातून आदर्शवत ठरतात.. स्वतःच्या कार्यातच जीवनाची सार्थकता मानतात.. कारण माणसाच्या जीवनाची सार्थकता त्याने जोपासलेल्या जीवनमूल्यांवर अवलंबून असते.. प्रत्यक्ष जीवनव्यवहार आणि जीवनमूल्ये यामध्ये विसंगती न ठेवता अशा व्यक्ती थोरपदाला पोहचतात..
अय्यर सर इंग्रजी विषयाचे प्रभावी प्राध्यापक होते.. इंग्रजी मधील कविता नाटक या साहित्य प्रकारांवरील समीक्षेमध्ये त्यांचे विशेष प्रभुत्व होते.. एक शिक्षक म्हणून त्यांच्याकडून शिकण्यासारख्या खूप गोष्टी होत्या..
बरीच वर्षे नोकरी करून सुद्धा प्रत्येकवेळी वर्गावर शिकवायला जाताना ते अभ्यास.. वाचन करत.. नोट्स तयार करून जात असत.. सलग तीन तीन तास उभे राहून शिकवत.. नोट्स च्या झेरॉक्स मुलांना मोफत वाटत.. विद्यार्थ्यांवर न रागवता समजावून सांगण्यात तर त्यांची हातोटी होती. आजन्म शिक्षक म्हणून ते कार्यरत राहिले.. नेट-सेट च्या विद्यार्थांसाठी त्यांनी मोफत मार्गदर्शन केले.. दोन इंग्लिश पुस्तके आणि अनेक संशोधनपर प्रबंध त्यांच्या नावावर आहेत.. क्रीडाविषयक माहितीचे तर ते स्वतः एक भांडारच होते.. स्वखर्चाइतकी अत्यल्प रक्कम जवळ ठेवून उरलेली सर्व रक्कम विद्यार्थ्यांच्या फी, पुस्तके आणि त्यांच्या शैक्षणिक गरजांसाठी ते देत असत.. अय्यर सरांमुळे शिक्षण पूर्ण करून स्वतःच्या पायावर उभे राहणाऱ्यांची संख्या प्रचंड असावी, ती किती हे नेमकं सांगता येणार नाही कारण सरांनी किती विद्यार्थ्यांना आणि कश्या स्वरूपाची मदत केली हे कधीच उलगडणार नाही.. कारण अय्यर सर खऱ्या अर्थाने दातृत्व जपणारे होते.. उपकाराचे विस्मरण हे दातृत्वाचे मोठे लक्षण त्यांच्या ठायी होते.. जगद्गुरू तुकोबारायांनी दिलेला..
“जोडोनिया धन उत्तम व्यवहारे |”
“उदासे विचारे वेचे करी ||”
हा दातृत्वाचा मंत्र त्यांनी प्रत्यक्षात उतरविला होता.. इतके मोठं कार्य करून देखील ते नेहमी प्रसिद्धी पासून दूर राहिले.. आपण केलेल्या दानाचा आत्मिक आनंद अनुभवत सार्थक जीवन जगले..
अय्यर सरांचे आदर्श महात्मा गांधी होते.. तसंच डॉ. आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, संत गाडगेबाबा या ध्येयवादी व्यक्तिमत्वांचाही त्यांच्यावर प्रभाव होता..
भारताची प्राचीन शिक्षणपद्धती हि गुरु शिष्य परंपरा जपणारी होती.. आजच्या आधुनिक शिक्षणपद्धतीहून ती अगदीच भिन्न.. प्राचीन शिक्षण पद्धतीत गुरूकडून ज्ञानदान केले जायचे, ज्ञानाची खरेदी विक्री गर्हनिय मानली जात असे.. आणि आजच्या शिक्षणपद्धती मध्ये मात्र याउलट परिस्थिती दिसत आहे, जी समाजास घातक आणि निंदनीय आहे.. आजच्या या प्रतिकूल शिक्षण पद्धतीमध्ये सुद्धा अय्यर सरांसारखे गुरुपरंपरा जपणारे, शिक्षणाचे मूल्य आणि पावित्र्य जपणारे शिक्षक, ज्ञानाचा नंदादीप तेवत ठेवत आहेत ही आपणा सर्वांसाठी भाग्याचीच गोष्ट आहे.. परंतु अशी व्यक्ती आतापर्यंत सरकार आणि समाजाकडून दुर्लक्षित राहते हे मात्र नक्कीच शोभनिय नाही.. दान घेणाऱ्याने देणाऱ्याच्या दातृत्वाची जाणीव ठेवणे हीच त्या दानी व्यक्तिविषयीची कृतज्ञता असते.. यासाठी अय्यर सरांच्या व्यक्तिमत्वाचे पैलू त्यांच्या विद्यार्थ्यांनी आणि सहकार्यांनी उलगडावेत, प्रेरणेचा स्रोत म्हणून ते अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचवले पाहिजेत.. शासनाने या आदर्श शिक्षकाचा यथार्थ सन्मान करायला हवा..
सुह्रदयता, शुद्ध कल्याणकारी हेतू आणि व्यवहार कुशलता या गुणांमुळेच अय्यर सरांची महानता अधोरेखित होते. धनाचा लोभ, नावलौकिकाची लालसा आणि सत्तेची हाव यांनी ते अपरिहित होते.. त्यांच्या वागण्याबोलण्यात ऋजुता होती.. त्याग आणि सेवा हे भारतीय आदर्श त्यांच्या ठायी होते.. आणि हेच त्यांच्या विद्यार्थ्यांच्या उत्कर्षाला कारण ठरले.. सर आपल्या अंगभूत तत्वज्ञानापासून कधी ढळले नाहीत.. त्यांची मानवतावादी कृती हजारो उपदेशांपेक्षा श्रेष्ठ ठरली..
शिक्षण हेच परिवर्तनाचे साधन असून त्यामध्ये शिक्षकाची भूमिका मोलाची आहे.. आपल्या शिष्याच्या प्रत्येक अवस्थेपर्यंत अगदी सहजगत्या उतरू शकतो आणि त्याच्या भूमिकेशी झटकन समरस होऊ शकतो तोच खरा शिक्षक.. समाजातील वाईट प्रथांशी, अपप्रवृतींशी, संकटांशी लढण्याचे सामर्थ्य विद्यार्थ्यांना शिक्षकच देऊ शकतात.. म्हणूनच तर कुसुमाग्रजांच्या कवितेतील विद्यार्थी शिक्षकाकडून स्वतःसाठी प्रेरणा मागतो..
“मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा |
सर, पाठीवर हात ठेवून फक्त लढ म्हणा ||”
“Education is the manifestation of perfection already in man.” शिक्षण म्हणजे मनुष्याच्या ठिकाणी जे पूर्णत्व आधीचेच विध्यमान आहे त्याचे प्रकटीकरण.. हि स्वामी विवेकानंदांची भूमिका प्रत्येक शिक्षकाने स्वीकारली तर अय्यर सरांसारखे मुलांच्या आत्मशक्तीचे प्रकटीकरण करणारे निरलस प्राध्यापक अधिकाधिक तयार होतील आणि त्यातून गुणवंत.. कलावंत.. यशवंत.. विद्यार्थी घडतील.. आणि निर्माण होईल एक सामर्थ्यशाली.. महासत्ता भारत राष्ट्र.. ज्याचं नेतृत्व करेल आजची युवा पिढी..
-डॉ. वर्षा खोत