Televisionया क्षेत्रात तुम्ही अपघाताने आलात असं तर चित्र दिसत नाहीये.. जर कला क्षेत्राची इतकीच आवड होती तर मग B.A.M.S. का..?
Television क्षेत्रात काय.. किंवा एकूणच कला क्षेत्रात काय.. एक अनिश्चिततेचं वलय पसरलेलं असतं.. त्यासाठी तुम्ही आधी स्वतःच्या पायावर उभं राहणं महत्वाचं असतं..
तसं पहायला गेलं तर लहानपणापासूनच मला वैद्यकीय पेशाची आवड आणि आकर्षण होतं.. म्हणजे लहानपणी आपण, “मी मोठा होऊन काय होणार..” असं ठरवलेलं असतं ना.. तसं मला डॉक्टर व्हायचं होतं.. पण मी जसजसा मोठा होत गेलो.. आणि मला सभोवताली ज्या पद्धतीचं वातावरण मिळालं.. त्यामुळे माझं गोष्टींचं प्राधान्य बदलत गेलं..
आवड तीच राहिली, पण निवड बदलली..! मी Television क्षेत्रात अपघाताने तर नक्कीच आलो नाही.. पण B.A.M.S. कडे देखील अपघाताने वळलो नाही इतकं नक्की.. हवं तर असं म्हणता येईल की.. शास्त्र शाखेतून कला क्षेत्रात जायचं इतकं नक्की होतं..
पालकांच्या अपेक्षा आणि तुमची स्वतःची इच्छा या दोहोंची सांगड कशी घातलीत..?
मुळात मी मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगा.. त्यात या क्षेत्रात माझं असं कुणीच वरिष्ठ नव्हतं.. आणि या अनिश्चित क्षेत्रात जाण्याची माझी इच्छा.. अश्या बऱ्यापैकी प्रतिकुल वातावरणामुळे सुरुवातीला घरच्यांची तितकीशी साथ नव्हती.. परंतु मी करत असलेल्या इतर गोष्टींचा माझ्या आभ्यासावर मुळीच परिणाम होत नाहीये.. असं दिसून आल्यावर त्यांचा देखील मला पूर्ण पाठींबा मिळाला.. खरंतर तिथून माझा खरा प्रवास सुरु झाला..
एकदा का तुम्ही स्वतःला सिध्द केलंत ना.. बास..!! तिथून पुढे तुमच्या प्रयत्नांना नशिबाची देखील साथ मिळते.. आणि जेव्हा तुमच्याबरोबर तुमचे आई-वडील खंबीरपणे उभे असतात.. तेव्हा तर मागे वळून बघायलाच नको..
B.A.M.S.चा अभ्यास करताना देखील Television क्षेत्रातच पूर्णवेळ काम करायचंय.. असं कुठेतरी मनात होतं..?
हो.. खरंतर तेव्हा असं अगदी छातीठोकपणे म्हणता येत नव्हतं.. परंतु माझा स्वतःवर पूर्ण विश्वास होता.. आणि तुमच्यात जर दर्जेदार देण्याची क्षमता असेल.. तर तुम्हाला ध्येय गाठण्यापासून कुणीही रोखू शकत नाही.. हे मला पक्कं ठाऊक होतं.. पण तरीही मी माझ्या B.A.M.S. करिअर कडे कधीही दुर्लक्ष होऊ दिलं नाही.. आणि त्यासाठी मला माझ्या सहकारी मित्र-मैत्रिणींची आणि घरच्यांची विशेष मदत झाली..
वैद्यकीय अभ्यासक्रम आणि कामाचं स्वरूप या दोन्ही गोष्टींचा आवाका खूप मोठा आहे.. Television क्षेत्रात काम करताना वैद्यकीय क्षेत्रातील काही गोष्टींचा फायदा झाला का..?
खूप छान प्रश्न विचारलास तुषार..
Television क्षेत्रात काम करताना शब्दांच्या उच्चारांवर विशेष भर द्यावा लागतो.. आणि त्यासाठी मला B.A.M.S. करताना केलेल्या संस्कृत वाचन-पाठांतराचा खूप फायदा झाला.. संस्कृत वाचनाने तुमची मराठी वाचनाची आणि समजून घेण्याची कुवतही वाढते.. प्रत्येक शब्दातला भाव सापडू लागतो.. आणि मुख्यत्वेकरून उच्चार शुध्द आणि स्पष्ट होण्यास मदत होते..
तसेच वैद्यकीय क्षेत्रात तुम्ही रोज अनेकविध नवीन रुग्णांना भेटत असता.. त्यांचं प्रांतिक राहणीमान.. भाषेचा लहेजा.. चालण्या-बोलण्याची पद्धती.. या गोष्टींची मी नकळत दखल घेत असे.. आणि माझ्या तत्कालीन कार्यक्रमांमध्ये त्याचा प्रयोग देखील करत असे.. एकूणच काय की.. आज संपूर्ण भारतभरातील मराठी प्रेक्षकांच्या मनात माझं जे आपुलकीचं स्थान आहे, त्यासाठी मला वैद्यकीय क्षेत्रातील अनुभवाचा नक्कीच फायदा झाला..
Communication skill आणि Social aspect या वैद्यकीय क्षेत्रातील जमेच्या बाजू.. Television क्षेत्रात काम करताना त्यांचा फायदा होतो का..?
हो नक्कीच..!! पण माझ्या बाबतीत जरा उलटं आहे.. लहानपणापासून मी छोट्या-मोठ्या कार्यक्रमांतून कामं करत असल्याने स्टेज डेअरिंग, वक्तृत्व कौशल्य, सामाजिक बांधिलकी या गोष्टींचा श्रीगणेशा तेव्हापासूनच झाला.. आणि मला B.A.M.S. करताना रुग्ण पाहताना त्या गोष्टीचा फायदा झाला.. तसेच रुग्णांबरोबरच्या प्रत्यक्ष सहवासातून आपण या समाजाचं काहीतरी देणं लागतो ही भावना नव्याने निर्माण झाली..
आणि माझ्यात मुळातच असणाऱ्या Communication skill आणि Social aspect या या गोष्टींच्या दृढीकरणाला सुरुवात झाली.. खरंतर B.A.M.S. करताना निर्माण झालेल्या या दृष्टीकोनाला Television क्षेत्राने न्याय दिला असं म्हणता येईल..
तुमच्या स्वतःला सिद्ध करण्याच्या संघर्षाबद्दल काय सांगाल..?
या क्षेत्रात यायचं असेल तर.. चांगल्या संधी मिळवण्यासाठी ४-५ वर्ष तरी झगडावं लागतं.. मलाही तो काळ चुकला नाही.. संघर्ष म्हणण्यापेक्षा मी कष्ट घेतलेत असं म्हणेन.. मी खरंच मनापासून कष्ट केलेत.. आणि त्याचं फळ म्हणून आज मी एक यशस्वी निवेदक-अभिनेता आहे..
सुरुवातीच्या काळात तर.. मी अभ्यास सांभाळून कार्यक्रम करत असल्याने खूप ओढाताण व्हायची.. पण नंतर मी जे करत होतो त्याला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळतोय म्हणल्यावर माझा आत्मविश्वास आणखीनच वाढला.. आणि मी अधिक जोमाने सगळ्या गोष्टी करु लागलो..
नंतरच्या काळात तर मी.. ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये.. लोखंडी खाटेवर उभे राहून कार्यक्रम केले आहेत.. कधीच कुठल्याही गोष्टीचा कमीपणा वाटला नाही.. आजही मी झगडतोय काहीतरी मिळवायचंय म्हणून.. कष्टाला पर्याय नाही इतकं नक्की..!! तर कष्टाला फळ आहे हे त्रिकालाबाधित सत्य..!!
सध्या तुम्ही Television क्षेत्रात कार्यरत आहात.. परंतु भविष्यात कधी पूर्णवेळ वैद्यकीय क्षेत्रात काम करण्याचा मानस आहे का..?
नाही..!! “तुम्ही एकाचवेळी दोन दगडांवर पाय ठेवला तर त्यातलं कुठलंच नीट होत नाही..” हे तत्व मी आजवर पाळत आलोय.. त्यामुळे सध्या तरी वैद्यकीय क्षेत्र जरासं बाजूलाच ठेवण्याचा विचार आहे.. आणि कला क्षेत्रातच पूर्णवेळ काम करण्याचा मानस आहे.. पण तरीही काही कारणाने विचार बदलला.. तर तू म्हणतोयस तसं.. वैद्यकीय क्षेत्रात झोकून देण्यासही मी मागेपुढे पाहणार नाही.. धर-सोड होवू देणार नाही इतकं नक्की..!! पण जर ही पृथ्वीच सतत फिरतेय तर मग मी माझ्या धोरणांमध्ये थोडीशी लवचिकता का ठेऊ नये..!!
Television क्षेत्राने तुम्हाला अमाप प्रसिध्दी मिळवून दिली.. या प्रसिद्धीचा वैद्यकीय व्यवसायात काही फायदा होईल असं वाटतं का..?
हो नक्कीच..!! पण मी करणार नाही.. एखादा व्यक्ती अगदी उत्तम चित्र काढतो यावरून तो तितकंच छान गाऊ शकतो असं धाडसी विधान करणं कितपत योग्य आहे..? तुझा प्रश्नही असाच धाडसी आहे.. फायदा नक्कीच होईल तुषार.. पण जर माझ्या वैद्यकीय ज्ञानाला अनुभवांची जोड नसेल तर मी प्रसिध्द व्यक्ती असूनही यशस्वी डॉक्टर नाही ना होऊ शकणार.. आणि खरं सांगायचं तर.. प्रसिध्दी ही मृगजळासारखी असते रे.. तुम्ही जितकं तिच्या मागे पळता.. तितकी ती दूर जाते..!! त्यामुळे मला जर वैद्यकीय क्षेत्रात उतरायचं असेल तर Television वरची प्रसिध्दी काहीही उपयोगाची नाही..
हां पण क्षेत्र कुठलंही असो डॉ. निलेश साबळे हे नाव मात्र कायम राहील न.. आणि प्रसिध्दी देखील नावालाच मिळते..
अगदी बरोबर आहे तुझं.. पण मी सध्या Television क्षेत्रात एक निवेदक-अभिनेता म्हणून स्वतःला सिध्द केलंय.. तसंच वैद्यकीय क्षेत्रात एक यशस्वी डॉक्टर म्हणून निलेश साबळे हे नाव सिध्द करून दाखवावं लागेल.. तरंच मी या पेशात यशस्वी होईल असं मला तरी वाटतं..
डॉ. निलेश साबळे या नावानंतर ज्यांना या क्षेत्रात आपलं नशीब आजमावण्याची इच्छा आहे अश्या डॉक्टर मित्र-मैत्रिणींना काय सांगाल..
Television आणि एकूणच कला क्षेत्रातल्या प्रसिद्धीला आजकालची तरुण पिढी भुलते आहे.. तुम्हाला जर या क्षेत्राची खरंच मनापासून आवड असेल तर आणि तरच या क्षेत्राचा विचार करावा.. अन्यथा नाही.. कारण तुम्ही वैद्यकीय व्यवसायाच्या अभ्यासासाठी तारुण्यातली ५-६ वर्ष घालवलेली असतात.. आणि अश्यावेळी त्यात गुंतवलेल्या पैश्यांचा देखील विचार न करता.. निव्वळ प्रसिद्धीसाठी कला क्षेत्र निवडणं, याला काहीही अर्थ नाही.. हां, पण जर तुमच्यामध्ये तितकी धमक असेल आणि आवड-इच्छा असेल तर तुम्ही नक्की येऊ शकता.. तुमच्यातील दर्जेदार गुणवत्तेला न्याय देण्यासाठी कला क्षेत्रातील संधी तुमची वाट पाहतायत..!! (आणि ‘मी’ही..!!)
– तुषार पवार