प्रिय, गण्या- देश माझा

प्रिय,
गण्या

सकाळची वेळ होती मस्त आईच्या हातचा चहा पिऊन मी वेशिकडे निघालो होतो..

वाटेत असणाऱ्या घरात जेथे महादेव भय्या राहायचे सहज त्यांच्या घराकडे  वळलो.. त्यांच्या चिमुरडीची गाठ घ्यायला.. चींकी वयाने लहान आणि विचाराने मोठी गोड.. सुंदर, मनमिळाऊ, तिची ओढ गल्लीतील प्रत्येकाला होती.. घरात एक आई आज्जी आणि ती चिमुरडी राहायची.. महादेव भय्या तर सरहद्दीवर देश सांभाळत असायचे.. जम्मू काश्मीर मध्ये तर फोन ही लावायला यायचा नाही.. रेंज नसायची आणि तिथे टॉवर ही नव्हता जवळपास.. त्यामुळे त्यांचा हाल-हवाला ते चिठ्ठी मधून कळवत असत..

काळजाचा तुकडा असणाऱ्या स्वतःच्या मुलीचा, घरदार सोडून आलेल्या काळजाच्या ठोक्यासारख्या सुख दुखःत साथ देणाऱ्या पत्नीचा, आणि आजन्म घामाचं पाणी करून जपणाऱ्या आईचा आवाज देखील ते वर्ष-वर्ष भर ऐकू शकत नव्हते.. चिट्टी पाठवायचे प्रत्येक महिन्याला.. मी जिवंत आहे हे घरच्यांना कळावं म्हणून.. आणि ती चिमुरडी महिन्याच्या त्या ७ तारखेला बरोबर पोस्टमन काकाच्या घरी जाऊन ती चिट्टी हसत हसत आणायची.. सगळ्या गल्लीला सांगायची,

“माझ्या बाबांची चिठ्ठी आली” ती वाचायची हसऱ्या गालांनी आणि आईला आजीला वाचून दाखवायची

आपल्या ऑनलाईन जगापेक्षा काहीसं वेगळंच होतं रे ते.. जानू, सोनू, लाईक्स, कमेंट, इव्हेंट, व्हिडिओ कॉल, यापलीकडचं जग ती चिमुरडी  जगत होती.. ८ वर्षाची..

काल झालेल्या पाकिस्तानी हमल्याची बातमी टीव्हीवर आली त्यात 10 शिपाई शहीद झाले अशी बातमी दाखवत होते न्यूज वाले.. आणि ती बातमी पाहून ती चिमुरडी रडू लागली तिने टिव्ही मध्ये सिनेमा मध्ये पाहिलं होतं की शहीद म्हणजे काय..? बॉम्स्फोट होतो.. अंगाच्या चिथड्या होतात.. ओळखताही येत नाही, कोण ते..

हे सारं ती लक्षात ठेवून बाबांना लिहून पाठवायची.. चिठ्ठी मध्ये बाबा काळजी घ्या.. बॉम्ब वर पाय ठेवू नका.. असं सगळं.. निरागस बोलणं आणि त्या बोलण्या आड लपलेलं प्रेम.. पण कालच्या हल्ल्याच्याया बातमीने ती हिरमुसली होती तिला इतकंच माहित होतं की तिचे बाबा तिथे आहेत.. तिने ती बातमी ऐकली आणि धाय मोकलून रडायला लागली.. बाबा.. बाबा म्हणत.. डोळ्यांतून येणारं ते पाणी; वर्षातून एकदा आयुष्यातलं सारं सुख घेऊन येणाऱ्या तिच्या बापावरचं तिचं प्रेम सांगून जात होतं..

तिने पळत जाऊन आईला मिठी मारली ढसाढसा रडणं चालूच होतं.. आईने प्रेमाने काळजावर दगड ठेवून तिला घट्ट मिठी मारली अन् म्हणू लागली

“रडायचं नसतं.. बाबा म्हणाले होते ना जाताना, रडायचं नाही त्यांना काही नाही झालं तू रडू नकोस बाळा”

असं म्हणत असताना वहिनींच्या पापणी भोवताली डबडबणारं पाणी त्यांच्या जीवाची घालमेल प्रखरपणे सांगून जात होतं पण स्वतःच्या लेकराची समजूत घालत त्यांनी त्या मुलीला जेवू घालून झोपवण्याचा प्रयत्न करत होत्या.. पण जेवतानाही मुलीच्या डोळ्यातलं पाणी वहिनींना धीर सोडण्यास भाग पाडत होतं तरीही एका बॉर्डर सिक्युरिटी फोर्स ऑफसरच्या पत्नी असल्याचं कर्तव्य त्या पूर्ण हिंमतीने बजावत होत्या..

सासू ची ही समजूत घालत होत्या मुलीला गप्प करून अहो.. आत्या.. ते नाहीत त्या साइडला.. दुसरीकडे आहे त्यांची पोस्टिंग.. तुम्ही रडू नका उगाच.. पोरगी झोपत नाहीये आधीच.. असं समजावत सासूला जेवणाचं ताट वाढलं

“आणि तुला का गं घेतलं नाहीस जेवायला” सासूबाईंनी विचारलं, तर म्हणाल्या,

“मला भूक नाई हो आत्या” या उत्तराबरोबर महादेव भय्यांच्या आईंनी ओळखलं.. त्यांचेही डोळे भरून आले आणि त्यांनी सुनेला कुशीत घेऊन घट्ट मिठी मारत म्हणाल्या, “अगं.. बाये.. किती साठवून ठेवशील आत..? मोकळी हो जराशी.. तुझी घालमेल कळली गं.. काय पुण्य केलं असावं माझ्या लेकरानं अन म्या बी, जी तू सून म्हणून घरात आलीस..”

वहिनींच्या पापणी भोवती फिरणाऱ्या साऱ्या आसवांचा बांध फुटला, अन् त्या धाय मोकळून रडू लागल्या..

“काय व्हायचं नाही ना व आत्या त्यासनी..?” अन् दोघींनी एकमेकींना घट्ट मिठी मारून रडणं सुरू केलं मनाला विस्तवासारखी टोचणारी रात्र सासू सूनेनी कुस बदलून काढली..

त्यांच्या घराजवळून जात असताना मला त्यांच्या रडण्याचा आवाज येत होता.. मी सकाळी जाताना विचारपूस करण्यासाठी वाट बदलली..

“का हो वैनी काही झालंय का..? काल रात्री आवाज आला घरातून रडण्याचा.. काही अडचण आहे का..?”

“नाही हो भावजी, ती पोरगी जरा येड्यासारखं करत होती काल.. पप्पा ला गोळी लागली गोळी लागली म्हणून रडत होती.. काल तो हल्ला झाला ना जम्मू-काश्मीर मध्ये ती बातमी पाहिली वाटतं तिने पण..”
ही बातमी मी पण ऐकली होती.. त्यांच्या जीवाची घालमेल कळणं माझ्यासारख्या थोटकळ माणसाच्या समजण्याच्या बाहेरचंच.. बर्थडे पोस्ट टाकण्यासाठी सोशल मिडीयाचा वापर करणारे.. काही सिनेमा वेबसिरिज बघणारे.. चार राजकारण्यांना टोले मारनारे.. घरी बसून हे राजकारण चूक हे बरोबर बोलणारे.. असं थोटकळ मत मांडून मतदान करण्या वेळी पैसे घेऊन मतदान करणारे आपण थोटकळच नाही का..?

माझ्यासारख्या थोटकळ माणसाला त्या वहिनीच्या जीवाची घालमेल नाही समजली.. पण डोळ्यांभोवतीचा काळवंडलेपणा त्यांच्या त्या रात्रीच्या रडण्याची कहाणी सांगून गेला होता.. मी चींकी ला हाक मारली

“काय झालं रं वागा रडायला..”

चिठ्ठी येऊन तीनच दिवस झाले होते पुढच्या चिठ्ठी ची वाट पाहत असलेली आई चिमुरडी आणि वैनी.. बघता बघता महिना गेला आणि महिन्याच्या त्या तारखेला आलेली चिठ्ठी चींकी पळत घरी घेऊन आली.. येताना ती चिमुरडी एकच गोष्ट ओरडत ओरडत सांगत होती..

माझे बाबा मेले नाहीत.. माझे बाबा मेले नाहीत..

त्या आवाजा सोबत प्रत्येक जण त्या चिमुरडीला वेड्यासारखे पाहत होते.. ती हसत होती.. उड्या मारत होती.. तिला कधी इतकं शहाणपण आलं देव जाणे.. ती चिठ्ठी घेऊन माझ्याकडे आली..

“चाचा बाबाची चिठ्ठी आली बघ.. माझं बाबा मेलं नाहीत..”

अन् चिट्टी दाखवून दारातून पळत होती तोवर मी तिला पकडलं आणि घट्ट मिठी मारली.. ती हसत होती पण कोण जाणे माझ्या डोळ्यातून येणारं पाणी थांबलंच नाही.. इतकंच काय ते आयुष्य एका शिपायाचं.. इतकं आणि इतकंच..

एक सांगावसं वाटतं गण्या.. मी एका ग्रुप मध्ये होतो.. कवीचा ग्रुप.. कवितांचा ग्रुप.. जिथे रोज रात्री मैफिल चालायची.. अशीच एकदा मैफिल चालू होती.. भारत चीन बॉर्डर वर झालेल्या हल्यात आपले जवान शहीद झाले त्या ग्रुप मध्ये एक भरतीची तयारी करणारा तरुण अॅड होता.. त्याने त्या ग्रुप मध्ये फोटो टाकले आणि विनंती केली, की शहीद जवणांसाठी काही चारोळ्या करूयात.. तेंव्हा त्या ग्रुपचा अॅड्मिन म्हणाला, आत्ता मैफिलीला विषय दिलेला आहे त्यावर चालू राहील मैफिल विषय बदलता येणार नाही आपण उद्याचा संपूर्ण दिवस त्यांना श्रद्धांजली साठी ठेवूयात.. मग त्या विषयावर चारोळ्या कविता होतील..

इतकं थोटकळ वागणं आपल्या समाजात आहे गण्या.. आपण देश वेगळा करतोय आतून.. आणि त्याला समतेनं बांधण्याचं काम माझे फौजी करतात.. गण्या आपल्या थोटकळ विचारांना दिसताना दिसतं पठानाचं पोरगं फौजी झालं.. पाटलाचं पोरगं फौजी झालं.. कांबळ्याचं पोरगं फौजी झालं.. पण ते मरताना जेंव्हा मरतात.. तेव्हा भारतीय म्हणून मरतात.. आपलं राजकारण आपल्याला विचारांची शैली बदलुच देत नाही रे.. कुठेतरी समानता आली की लगेच फूट पाडली जाते.. म्हणून म्हणतो गण्या आपला वापर स्वार्थी लोकांना नको करू देऊस.. देशावर प्रेम कर.. समाजावर प्रेम कर.. भारतीय म्हणून मरणाऱ्यांना मान सन्मान द्यायला शिक.. स्वतःला समजून घे.. जगण्याला समजून घे.. माणूसपण समजून घे..

आज पासून सुरु होतंय एक नवीन पाक्षिक सदर.. गणेश मगर याच्या लेखणीतून साकारलेली.. गण्याला लिहिलेली पत्र..

 “प्रिय, गण्या” नक्की वाचा.. दर महिन्याच्या ८ आणि २२ तारखेला..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *