रात्रीचे जवळपास नऊ वाजून गेले होते.. धो धो पडणारा पाऊस जरासा विसावला होता.. काळे ढग दाटून आले होते, मात्र वातावरणात थंडावा होता.. त्या काळ्या ढगांमधून चंद्र काही दिसायला मागत नव्हता.. खिडकीत बसलेली पौर्णिमा अजूनही तशीच बाहेर बघत बसली होती..
“सापडणार नाही तो.. श्रुती म्हणाली.. काळे ढग जे आहेत ना ते तुझ्या विचारांसारखेच आहेत.. मग कसं शोधणार आहेस चंद्राला..? केवळ रहस्य बनून राहिला आहे तो..!”
श्रुती आणि पौर्णिमा गेल्या चार साडेचार वर्षांपासून एकत्र होत्या.. त्या दोघी खूप जवळच्या मैत्रिणी असल्याने एक-मेकींना चांगल्याच ओळखत होत्या.
“पौर्णिमा.. स्पष्ट बोलून मोकळी तरी हो नाहीतर…..
सोडून तरी दे विषय.. असा स्वतःला त्रास करून घेत बसू नकोस” श्रुती म्हणाली.. तिला पौर्णिमाची मनस्थिती कळत होती.. पौर्णिमाला बोलताना तिच्या मनात असं काही नव्हतं.. पण तिला बोलतं करायला असं बोलणं भाग होतं तिला..
“सोडून द्यायचा असता विषय तर त्यात इतकं गुंतले असते का मी..? खिडकी मधून बाहेर बघत पौर्णिमा बोलत होती.. आणि हो चंद्राची हतबलता देखील समजू शकते मी.. आता ढगच दाटून आले असतील तर त्यात तो तरी काय करणार ना..?”
श्रुतीला तिच्या मनात काय चाललंय याची चांगलीच कल्पना होती.. पण तिला हे हि समजत होतं कि शशांकची परिस्थिती काही वेगळी नसणार आहे.. “हे बघ पौर्णिमा मी समजू शकते तुझ्या भावना.. पण असं एकटंच कुढत बसण्यात काय अर्थ आहे..? आणि ज्या गोष्टी आहेत त्यावर तुम्ही दोघांनी स्पष्टपणे बोलायला हवंय..” असं म्हणून श्रुती झोपायला गेली.
पौर्णिमा मात्र तिथेच बसून होती बराच वेळ.. तशीच.. शशांकचाच विचार करत..!! उशिरा केव्हातरी ती झोपी गेली..
वाचा संपूर्ण कथा.. उद्याच्या भागात..