शाहूपुरीतल्या कानठळ्या बसवणा-या हॅार्नच्या आवाजातून मार्ग काढत-काढत सखी Buns n coffee मध्ये घुसली. नेहमी प्रमाणे आपली chocolate pancake ची ऑर्डर दिली आणि तिच्या तिच्या ठरलेल्या खुर्चीवर पायावर पाय टाकून बसली.. खरंतर सखीला Buns n coffees भन्नाट प्रिय होतं.. तिथली table arrangement, romantic lights, cosy environment, interior.. हे सगळंच तिला फार खेचायचं.. आकर्षित करायचं.. बॅगमधून तिने आणलेलं Ravinder Singh चं ‘will you still love me ?’ काढलं, bookmark बाजूला ठेवून ती वाचू लागली..
“Rajveer rang the bell & lavanya opened the door” तेवढयात तिची ऑर्डर आली, तिने ती घेतली आणि पुन्हा वाचु लागली, “Lavanya was very shocked, she didn’t expect rajveer will surprise her in this way”
एवढ्यात तिला पुस्तकामागुन “Hiii” असा आवाज आला.
तिने पुस्तक थोडंसं बाजुला केलं आणि पाहिलं, साधारण 22-23 वर्षाचा मुलगा sky blue t- shirt, black jeans, sports shoes घालुन तिच्या समोर बसला होता. त्याच्या उजव्या पायातली सुटलेली shoelace पाहून तिने मान मुरडली आणि पुन्हा वाचू लागली..
“अगं मी तुलाच hii म्हणतोय काहितरी उत्तर दे, असं youtube ad सारखं दुर्लक्ष का करतीयेस?”
“एवढं कळतंय ना मी दुर्लक्ष करतीये, मग उठ आणि जा ना.. एकतर स्वत: न विचारता येऊन बसला आहेस आणि उगाच बोलण्याचा प्रयत्न ही करतोयस..”
“अगं एवढ काय त्यात, मला काहीच नाही वाटलं.”
“तु पुण्याचा आहेस का रे? ”
“हो अगं तुला कसं कळालं ?” अनुरागने निरागसपणे विचारलं.
“नाही, स्वतःची चुक मान्यच करत नाहीयेस ना त्यावरून समजलं.” सखीने अगदी शब्दांचा वारच केला अनुराग वर.
“तु पण कोल्हापुरचीच दिसतीयेस, नाही फक्त उर्मठच बोलत आहेस आल्यापासून म्हणून म्हण्टलं…” अनुरागने ही सखीचा वार परतवून लावला.
“Btw मी अनुराग आणि तु..?”
सखीने पाहिलं देखील नाही त्याच्याकडे
“अग बघ तरी निदान माझ्याकडे ” अनुराग केविलवाण्या आवाजात म्हणाला.. “का तुझ्याकडे पाहायला तु काय रंकाळा आहेस?”, सखी ने पुन्हा धनुष्याची तार ताणली.
“तसं तुझ्याशी बोलायला तुही काही शनिवारवाडा नाहीयेस.. मी आपलं सहजंच Approach केलं होतं..
” सखी… सखी नाव आहे माझं..”
कसलं वैऱ्यासारख्या आवाजात बोलली ही मुलगी.. अनुराग मनातल्या मनात पुटपुटला..
अनुरागने हळूच मग pancake चा एक bite घेतला.. आणि तोच सखीने त्याला पाहिलं..
” ए निर्लज्ज “, सखी जोरात ओरडली.
” तुला काही लाज नाही का रे वाटंत , असं दुसऱ्याचं खाताना..?”
” अगं लाजायच काय त्यात ? डॉक्टरपुढे आणि अन्नापुढे आपली लाज आणू नये…” अनुराग मिष्किलपणे म्हणाला.
” लाज आणायला लाज असावी लागते ना ती अजिबात नाहीये तुझ्याकडे.. ” सखीने असं म्हणत प्लेट स्वत:कडे सरकवून घेतली..
” अतिथी देवो भव: | अस काही नाही का ग तुमच्या कोल्हापूरकरांकडे ? ”
” हो आहे न.. पण आम्ही फुकट्या पाहुण्यांचा पाहुणचार करत नाही “, सखीचा हा नेम मात्र बरोबर बसला.
” नुसतं नावाला सखी, विचार मात्र सगळे सखाराम सारखे old fashioned ” अनुराग पुटपुटला.
” तु इथे बसला आहेस ?” मागून एका मुलीचा आवाज आला.
आणि सखीच्या कपाळावर आठ्यांचा wi-fi तयार झाला..
“कोण तुम्ही मी नाही ओळखत तुम्हाला”… अनुराग घाबरलेल्या आवाजात बोलला.
” अरे आपली Tinder date आहे आज, असं काय करतोयस? तु अनुराग जोशीच आहेस ना.??” ती मुलगी बोलली.
” नाही मी अनुराग नाही, काय ग सखी सांग ना यांना तुच” असं म्हणत अनुरागने सखी कडे पाहिलं…
” हो अगं.. हा माझा मित्र सखाराम.. याच्याकडे पाहून वाटतंय का तरी याच नाव अनुराग असेल म्हणून…!!” सखीचं हे वाक्य ऐकून अनुराग चे सगळे राग-रंगच उडाले.
“ohh… sorry… माझं चुकलं..” अस म्हणून ती मुलगी निघून गेली.
सखीने एक नजर अनुरागवर टाकली आणि म्हणाली ,
” निर्लज्ज, फुकटा तर तु आहेसच आता खोटारडा ही निघालास..”
“अगं सखी ऐक माझं, ही date माझ्या मित्रांनी fix केली होती.. मला खरंच यायचं नव्हतं.”
” अच्छा मग कशाला बसला आहेस इथे??”
” कारण मला तुझ्याशी बोलायचंय..” अनुराग म्हणाला.
” का माझ्याशी बोलायला मी शनिवारवाडा थोडीच आहे..? सखीने बरोबर पिन मारली, तशी ती कोल्हापूरचा शब्द कसा खाली पडू देईल..?
” हो पण मला रंकाळा नाही आवडत असं मी म्हणालोच नाही.. ”
” काय हवंय तुला अनुराग? नीट सांग..”
” हे बघ सखी, मी आत आलो तेव्हा सगळीकडे नजर फिरवली आणि माझी नजर फक्त तुझ्यावर येऊनच अडखळली.. जेव्हा तु केस मागून पुढे घेतलेस ना तेव्हा मी आपोआपच ओढला गेलो तुझ्याकडे..”
” मला खरंच तुझ्याशी बोलायला, भेटायला, रंकाळा काय अगदी गंगावेश मध्ये जाऊन दुध कट्टयावरचं दुध प्यायला सुद्धा आवडेल..”
” मला निघायचंय अनुराग, Bye. ” अस म्हणत ती पुस्तक bag मधे ठेऊ लागली.
” पुढच्या रविवारी याच टेबलवर भेटूयात मग ? काय विचार आहे ? सखी मला तुझ्या गालावरची खळी दिसतीये, मी ‘ हो ‘ असं समजू का ?”
सखी उठून counter जवळ गेली.. अनुराग ही मागून गेला.
“पण पुढच्यावेळी pancakes चे पैसे तु भर आणि shoe lace बांधून ये” असं म्हणून बाहेर पडू लागली.
अनुरागचा आनंद गगनात मावेना..
तो मागुन ओरडू लागला, “अगं तु सांगशील तर अगदी अनवाणी देखील यायला तयार आहे मी..!!”
सखी हसली आणि बाहेर पडली, अनुरागसुद्धा तिच्या मागुन-मागुन चालु लागला.
“मी सोडु का तुला?” त्याने विचारलं.
“तुला माहिती आहे का मी कुठे राहते ते ? ” सखी केस बांधत बोलत होती..
“नाही मला नाही माहित, पण तु सांगशिल तिथे सोडेन मी तुला.. safely”
चालता – चालता सखी अचानक थांबली, तिची गाडी तिथेच parked होती.
“Better luck next time, माझ्याकडे गाडी आहे माझी.” सखी डोळे बारिक करत हसत म्हणाली.
” ऐक ना सखी…”
“हा बोल ना…”
“तुला मोकळे केस छान दिसतात, का उगाच त्यांना rubber band च्या कचाट्यात अडकवून सौंदर्यात उणीवता आणतीयेस?”
“बंधने सुद्धा गरजेची असतात, त्यांना सुद्धा स्वतःचं सौंदर्य असतं, फक्त पाहणा-याची दृष्टी तिथवर पोहचली पाहिजे.. काय समजलं का पुणेकर ? ”
“नाही समजलं.. सांगशिल समजावून परत एकदा..?”
“पुढची भेट आहेच की तेव्हा सांगेन, चल निघते मी आता.. Bye.. ”
असं म्हणून सखी भुर्रकन निघून गेली.. अनुराग मात्र ती दृष्टीआड होईपर्यंत तिच्याचकडे पाहत राहिला…..
-सृष्टी सावर्डेकर