उर्दूतलं प्रचंड शब्दभांडार ज्यांच्या प्रतिभेने आपल्या सारख्या सामान्य जणांसाठी खुलं झालं त्या गुलजार साहेबांची प्रगल्भता आणि अल्प शब्दांमधून गहन अर्थ सांगण्याची अनोखी शैलीच त्यांच्या कवितांची शान आहे.. खरंतर त्यांच्या लेखन साहित्याला कुठलंही विशेषण देणं मूर्खपणाचं ठरेल.. पण ‘अद्भुत’ हा शब्द वापरून हा मूर्खपणा मी करू इच्छितो..!!
जन्माने शीख.. पत्नी हिंदू.. पण लिहितात उर्दूतून.. आणि नाव गुलजार.. त्यांच्या नावामुळे काही लोक त्यांना मुस्लिम समजतात.. त्यांना हि ओळख आजीबात खटकत नाही.. तसं पाहिलं तर ते बऱ्याच अंशी practicing muslim आहेतही..
प्रसिद्ध अभिनेत्री मीनाकुमारी आणि त्यांची तर अनोखी मैत्री.. एकदा रमजानचा मास सुरु असताना मीनाकुमारी आजारी पडल्या.. त्यांना गोळ्या घेणं तर गरजेचंच होतं.. आणि त्यासाठी पाणी पिणं देखील.. पण त्या तर पडल्या कट्टर मुस्लिम.. रोजा तोडून औषध घ्यायला त्या काही तयार होईनात.. तेव्हा गुलजार साहेबांनी त्यांना सांगितलं.. तुझ्या वाटेचे रोजे मी ठेवतो.. मिळणारं पुण्य आपण दोघं वाटून घेऊयात.. आणि त्या दिवसापासून त्यांनी रोजे ठेवायला सुरुवात केली ती आजतागायत.. आजही रमजानच्या मासात किमान १५-२० रोजे तरी ते करतातच..
गुलजार साहेबांच्या कवितांची अन्य भाषांमध्ये भाषांतरे झाली.. मराठीतले प्रसिद्ध लेखक-कवि रवींद्रजीं नी त्यांच्या बऱ्याच कविता मराठीत भाषांतरित केल्या.. रवींद्रजींना त्यांच्या कवितांमधली मेख नेमकी जाणवली होती.. कविता शब्दबद्ध होण्याआधी तिची अमूर्त प्रतिमा गुलजार साहेबांच्या विचारांमध्ये तयार होत असते.. आणि त्यानंतर शब्दांच्या सहाय्याने त्या अमूर्त भावनांना मूर्त स्वरुपात कागदावर उतरवताना त्यांचं ‘पेन’ आणि ‘शील’ कारणी लागत असतं..
गुलजार साहेबांनी कुसुमाग्रजांच्या काही निवडक मराठी कवितांचं हिंदीत भाषांतर केलंय.. आणि त्या कविता एका कंपनीसाठी त्यांनी स्वतःच्या आवाजात ध्वनिमुद्रीतही केल्या आहेत.. शिरवाडकरांच्या प्रतिभेला साजेश्या अश्या व्यक्तीने हे भाषांतर केल्याने त्यांतली प्रगल्भता शतपटीने उंचावली आहे.. शिरवाडकरांची ‘गाभारा’ हि कविता तर त्यांच्या खास शैलीत ऐकणं म्हणणे कानांना मेजवानीच.. मूर्तीपूजा आणि त्याचा डाम-डौल.. आणि एकूणच जातीयव्यवस्था.. यांवर थेट भाष्य केलं होतं शिरवाडकरांनी त्यात..
गुलजार साहेबांनी अनेक चित्रपटही दिग्दर्शित केले आहेत.. त्यांनी अनेकांसाठी गाण्यांसोबतच पटकथाहि लिहिल्या आहेत.. ७०-८० ची दोन्ही दशकं त्यांनी त्यांच्या दिग्दर्शनाच्या अनोख्या शैलीने गाजवली होती.. गुलजारांचे चित्रपट पाहणारा एक खास चाहता वर्ग होता.. पण तरीही समाजातल्या एका विशिष्ट गटासाठीच त्यांचा सिनेमा कधीही मर्यादित राहिला नाही.. त्यांनी ७५साली आंधी केला.. ज्याने त्याकाळी त्यांना बऱ्याच टीकांना सामोरं जावं लागलं होतं.. तो चित्रपट तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी आणि त्यांच्या पतीवर अवलंबून आहे असं बोललं जात होतं.. वास्तविक पाहता त्यातल्या नायिकेचा लूक तारकेश्वरी सिंन्हा, आणि इंदिरा गांधी यांच्याशी मिळता-जुळता ठेवण्यात आला होता..
चित्रपटासाठी गाणी लिहिणारे कवि गुलजार फक्त रोमँटिक कविताच करतात असं नाही.. त्यांच्या सामाजिक विषयावरच्या कविताही तितक्याच खोल गर्तेत घेऊन जाणाऱ्या असतात याची प्रचीती त्यांच्या नित्य वाचकाला येतेच.. फक्त कल्पनाच ज्याच्या अस्तित्वाचा पुरावा आहे त्या ईश्वराच्या नावाने दंगे-फसाद कसे बरे केले जातात असा सिधा सवाल ते करतात..
पण त्यांचे वैर श्रद्धेशी नाही.. कधीच नसते.. ना धर्माशी.. ते वैयक्तिक आयुष्यातही तितकेच perticular आहेत.. जितके त्यांच्या व्यावसायिक क्षेत्रात.. आजही त्यांचा दिवस पहाटे ४लाच सुरु होतो.. ते आजही नियमितपणे टेनिस खेळायला जातात.. मागल्या वर्षी तर त्यांच्या टेनिस क्लबमधील वरिष्ठ गटाची चॅम्पियनशिप त्यांनी जिंकली होती.. आणि हि गोष्ट तर त्यांना ऑस्करहून काही कमी महत्वाची वाटत नाही..
असा हा अवलिया माणूस.. ज्याला ‘जय हो’ या गीतासाठी ऑस्कर जाहीर झाल्यावर त्या सोहळ्याला एक विशिष्ट ड्रेस कोड असतो आणि माझा पेहराव मी अमेरिकेतल्या कोण्या पुरस्कारासाठी का म्हणून बदलावा या साध्या विचारादाखल तिकडे गेला नाही.. बरं आणि या गोष्टीचा कुठे गवगवा देखील केला नाही.. काळ बदलला.. गाण्यांच्या.. संगीताच्या परिसीमा बदलल्या पण गुलजार साहेब कालही तितक्याच ताकदीची गाणी लिहायचे आणि आजही.. त्यांनी नेहमीच काळानुरून त्यांच्या लिखाणात.. शब्दभांडारात बदल केले आहेत.. आणि आजहि काय हवंय हे जाणून घेऊन.. त्यातला अभिजातपणा टिकवून ठेऊन ते काव्यनिर्मिती करतात..
-टीम शब्दीप्ता