रोहित सुरुवातीला आपण तुझ्या बालपणाबद्दल बोलूयात.. अगदी लहानपणापासूनच गाण्याची आवड होती..? कसं गेलं एकूणच बालपण..?
माझं जवळजवळ सगळंच बालपण लातूरला गेलंय.. माझा जन्म अकोल्याचा.. खरंतर आम्ही मुळचे नागपूरचे.. पण बाबांच्या कामामुळे आम्ही लातूरला आलो ते इकडेच सेटल झालोत.. गाण्याच्या आवडीबद्दल बोलायचं तर.. हो, आवड अशी लहानपणापासून होतीच.. माझ्या आजीला पहिल्यांदा वाटलं होतं.. कि मी गाऊ शकेन.. आणि त्यामुळेच तिने मला गाण्याच्या क्लास ला वगैरे घातलं.. आणि तेव्हापासून till date गाणं कधी सुटलंच नाही..
तू हिंदी सारेगमप मध्ये होतास.. आणि झीमराठी च्या लिटील चॅम्प्सच देखील एक पर्व गाजवलंयस.. तुला काय वाटतं, सगळ्यात चांगलं exposure तुला कुठे मिळालं..?
दोन्ही अनुभव माझ्यासाठी एकदम वेगळेच आणि खूप काही देऊन जाणारे होते.. दोन्ही स्पर्धांचं exposure वेग-वेगळ्या levelचं होतं.. खरंतर हिंदी सारेगमप लिटील चॅम्प्सच्या वेळी माझी तयारी तितकीशी नव्हती.. आणि त्यामुळेच मी त्यातून लवकर (top6 लाच) बाहेर पडलो होतो.. त्यामुळे तिथे मला मिळालेलं exposure जास्त प्रमाणात नसलं.. तरी ते globally ओळख मिळवून देणारं होतं.. आजही बाहेरच्या देशात असणारे माझे fans मला हिंदी सारेगमप लिटील चॅम्प्स मुळेच ओळखतात.. आणि मराठी लिटील चॅम्प्सने मला काय दिलं हे कदाचित सांगायची देखील गरज भासणार नाही.. कारण त्यानंतर मी मराठी मना-मनामध्ये जाऊन पोहोचलो.. आणि मला आपण सर्व रसिक जनांनी आपल्या हृदयात जागा दिलीत.. आजही आपण माझ्या प्रत्येक कृतीला.. माझ्या गाण्यांना.. माझ्या सुरांना.. अपार प्रेम देता..
तू आत्ता पर्यंत संगीतबद्ध केलेल्या गाण्यांतून तुझी versatility दिसून आली.. मग ‘विठ्ठल’ असो वा ‘बाप्पा मीट्स मेटल’.. गाणी संगीतबद्ध करताना काय असतं तुझ्या डोक्यात..?
असं ठोकळ सांगता नाही येणार.. पण जेव्हा आम्ही म्हणजे ‘रोहित-श्रीधर’ एखाद्या गाण्याला संगीत देतो तेव्हा ते आबालवृद्धांना आवडेल याची खबरदारी घेतो.. युवा वर्गासोबतच समाजातील इतर घटकांनाही ते गाणं आपलसं कसं वाटेल हा आमचा प्रयत्न असतो.. आम्हाला मुळात आमच्या एकमेकांच्या क्षमतांवर पूर्ण विश्वास आहे आणि आम्ही आत्ता ज्या levelच संगीत देतोय ती levelहि आम्हाला उंचावायची आहे.. त्यामुळे आम्ही सतत नव-नवीन प्रयोग करत असतो.. आणि त्यातूनच आत्ताच्या गाण्यांची निर्मिती होते..
या इंडस्ट्री मध्ये तुझी एन्ट्री कशी झाली..? तुला पहिली ऑफर कशी मिळाली..?
रियालिटी शोज मधून बाहेर आलेल्या प्रत्येकाला एक प्रश्न नेहमी पडतो.. कि पुढे काय.. हा प्रश्न मलाही पडला.. आणि त्याच प्रश्नाच्या उत्तराच्या शोधात मी सुरेश वाडकरजीं कडे गेलो आणि गाणं शिकायला लागलो.. तिथे खालीच आजीवासन स्टुडीओ मध्ये मी जायचो.. माईक वर गाणं कसं गायचं.. गाताना माईक पासून अंतर किती असावं.. अश्या सर्वच गोष्टींची तांत्रिकदृष्ट्या माहिती मला मिळाली.. तश्यातच काही दिवसांनी मी माझ्या अल्बम साठी प्रयत्न करायला सुरुवात केली.. आता माझं काहीतरी असावं अशी भावना माझ्या मनात फेर धरू लागली.. आणि त्यासाठी मी बऱ्याच जणांना भेटलो.. सुदैवाने तो अल्बम झाला नाही.. सुदैवाने मी अश्यासाठी म्हणालो कि.. माझी ज्या-ज्या लोकांशी भेट झाली त्यांचे माझे बंध अगदी कायमचे जोडले गेले.. आणि त्यातच एक नाव म्हणजे.. पंकज पडघन.. त्या अल्बम च्या प्रोग्रामिंग साठी मी पंकज पडघन ना भेटलो होतो.. पंकज दादाने मला माझं पहिलं गाणं दिलं.. आणि ते होतं.. ‘दुनियादारी’ साठीचं ‘यारा..यारा..’
‘का रे दुरावा’ या मालिकेचं टायटल तू गायलायस.. जेव्हा तुम्ही मालिकेचं टायटल गाता तेव्हा रोज घराघरात तुमचा आवाज पोहोचतो.. किती महत्वपूर्ण होतं ते गाणं तुझ्यासाठी..?
खरंतर मला नाही असं वाटत.. कारण तुम्ही फिल्म्स साठी वगैरे जी गाणी गायलेली असतात ती गाणी देखील लोक सतत ऐकत असतातच.. पण त्यातही reach चा विचार केला तर मग मालिकेचं गाणं खचितच जास्त पटकन आणि जास्त लोकांपर्यंत पोहोचतं.. कारण ते गाणं एका ठराविक वेळी लागतंच.. आणि जर का ते अगदी सहज गुणगुणण्यासारखं असेल तर मग प्रश्नच नाही.. आणि का रे दुरावा या गाण्याने मला.. माझ्या आवाजाला तो reach मिळवून दिला..
तुझ्या करियर च्या सुरुवातीलाच तुला यारा-यारा सारखं गाणं मिळालं.. तू खरोखरंच सोनं केलंस त्या संधीचं.. काय सांगशील..?
यारा..यारा.. हे गाणं खरोखरंच माझ्या साठी खूप महत्वपूर्ण होतं.. त्या गाण्याने माझ्यावरचा लिटील चॅम्पचा ठप्पा थोडा पुसट होण्याला मदत झाली.. आणि एक नवीन रोहित राऊत लोकांना पाहायला, ऐकायला मिळाला.. लिटील चॅम्प रोहित आता एक पार्श्वगायक म्हणून स्वतःच्या क्षमतांना आव्हान देण्यासाठी सज्ज झाला आहे याची लोकांना खात्री पटली.. इतका मोठा चित्रपट.. त्यात एक सोलो गाणं.. आणि हिरो साठीचा आवाज.. असा त्रिवेणी संगम जुळून आला होता तेव्हा.. सोन्यासारखीच संधी होती ती.. ही संधी मला मिळाली हे मी माझं भाग्य समजतो.. खरंच सांगतो तुषार.. ते गाणं गाण्यासाठी मी अगदी प्राण पणाला लावले होते..
अजून ५ वर्षांनी तू स्वतःला कुठे पाहतोस..?
अजून ५ वर्षांनी मला स्वतःला.. एक उत्तम गायक-संगीतकार म्हणून पाहायला आवडेल.. आणि कदाचित एक सहृदय माणूस म्हणून जास्त.. आज मी ज्या पद्धतीने काम करतोय.. ज्या प्रमाणात काम करतोय.. लोकांना आर्थिक-सामाजिक मदत करतोय.. ते प्रमाण वाढावं.. आणि मी उत्तमातलं उत्तम आपणा रसिकांना बहाल करावं.. अश्या पदी मी अजून ५ वर्षांनी जाऊन पोहोचावं असं मला वाटतं.. खरंतर अजून लवकर हि वेळ यावी असं वाटतं.. पण ठीके.. happens.. योग्य वेळी योग्य गोष्टी तुम्हाला मिळतात यावर माझा विश्वास आहे.. आणि मी त्या दृष्टीने नेहमीच प्रयत्नशील राहत असतो..
शास्त्रीय संगीताचं शास्त्रशुद्ध शिक्षण घेणं एका गायकाच्या दृष्टीने कितपत महत्वाचं आहे..?
एका हिंदुस्तानी बाजाच्या गायकाला तर शास्त्रीय संगीताची जाण असणं अगदीच आवश्यक आहे.. कारण जेव्हा तुमची मुळं मजबूत असतात.. तेव्हा आणि तेव्हाच पुढचा उभा राहणारा सगळा डोलारा तुम्ही पेलू शकता.. तुम्ही एक परिपूर्ण गायक म्हणून स्वतःचं स्थान निर्माण करू शकता.. आणि नव-नवीन जोखमींना स्वीकारून तुमची गायकी प्रगल्भ करू शकता..
मराठी संगीताच्या सीमा बदलत चालल्या आहेत.. आणि आता तर सैराट च्या माध्यमातून सातासमुद्रापार मराठी संगीताने झेंडा फडकवलेला आहे.. तुझं काय मत आहे या वर..?
बदल हि नेहमीच काळाची गरज राहिली आहे.. म्हणजे आपण 80’s मधली गाणी ऐकलीत.. एका दशकाने त्यात बदल घडवला.. आणि मग आपल्याला 90’s मधली गाणी ऐकायला मिळालीत.. त्यात काळाने स्वतःच बरेच बदल घडवले होते.. ते रास्तही होते.. पण याचा अर्थ कोणत्याच दशकातलं संगीत आधीच्या दशकातली जागा घेत नाही.. तर ते स्वतः काळानुरूप आपली जागा बनवतं.. आणि हेच झालं सैराट च्या बाबतीत, असं मी म्हणेल.. मराठी संगीत तेव्हाच आपल्या नवीन सीमा प्रस्थापित करत होतं.. जेव्हा अजय-अतुल.. अवधूत गुप्ते यांसारखी मंडळी या क्षेत्रात आली आणि मराठी संगीताचा नव्याने उदय झाला.. कालच्या संगीताने स्वतःच्या ज्या सीमा प्रस्थापित केल्या होत्या त्याच आज नव्याने पडताळून पाहून त्याला upgrade करण्याचे प्रयत्न होत आहेत.. आणि उदाहरणांदाखल सैराट.. एक तारा.. हे सिनेमे तर आहेतच..
रोहित “Feel the content but ask for more” ही आमची Tagline.. ज्याप्रमाणे ‘शब्दीप्ता Magazine’ नेहमीच जास्तिची अपेक्षा करतं.. त्याप्रमाणे तू स्वत:कडून अश्या कोणत्या जास्तिची अपेक्षा करतोस..?
वा.. nice concept.. तुला खरं सांगू तुषार.. मला खरंतर माझ्यातला content feelच करायचा नाहीये.. म्हणजे मी किती छान गातो.. किंवा मी कसा चांगला performer आहे.. असं काहीही.. कारण जेव्हा एखादा कलाकार स्वतःच्या कलेच्या प्रेमात पडतो ना तेव्हा त्याची वाढच खुंटते.. आणि मला माझ्या बाबतीत हे होऊन द्यायचं नाहीये.. माझा नेहमीच प्रयत्न राहिलेला आहे कि मी माझ्या स्वतःच्या अपेक्षांना नेहमी खरं उतरायला हवंय.. कारण जर तुम्ही तुमच्या स्वतःच्या अपेक्षांना न्याय देऊ शकलात तर आणि तरंच इतरांच्या अपेक्षा पूर्ण करू शकता.. आणि त्यांना जे हवंय ते तितक्याच ताकदीने त्यांच्या पर्यंत पोहोचवू शकता.. आणि मला माझ्या स्वतःकडून असलेल्या याच अपेक्षांच्या मागणीमध्ये वाढ झालेली पाहायला हवीये.. आणि त्यासाठी स्वतःला तितकं परिपूर्ण करायचे प्रयत्न असेच अविरत चालू असायला हवे आहेत..