सातारा जिल्ह्यातल्या अच्युतराव आणि ताराबाई दाभोळकरांच्या पोटी १ नोव्हेंबर १९४५ला जन्मलेला हा सुपुत्र.. शालेय शिक्षण सातारा आणि महाविद्यालयीन शिक्षण सांगली येथे.. MBBS सरकारी महाविद्यालय मिरज येथून पूर्ण करून काही वर्ष त्यांनी वैद्यकीय व्यवसायही केला.. शिक्षण घेत असतानाच ते उत्कृष्ट कबड्डीपटू होते.. त्या काळी राष्ट्रीय कबड्डी संघाचे नेतृत्व त्यांनी केले होते.. मन, मेंदू आणि मनगटातील शक्ती एकवटत दाभोळकर विजेच्या चपळाईने समोरून चाल करणाऱ्यास घेरत.. ते शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी देखील होते.. निधड्या छातीचा हा खेळ खेळल्यामुळेच वाईट प्रवृत्तींना त्यांना सामोरे जाता आले असे ते स्वतः म्हणत..
अधिक काळ वैद्यकीय व्यवसायात ते रमू शकले नाहीत कारण “बुडता हे जन | देखिवेना डोळा ||” हि सामान्य जनांविषयीची कळवळ त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती.. बाबा आढाव यांची “एक गाव एक पाणवठा” हि मोहीम दाभोळकरांच्या विचारांना आणि कार्यपद्धतीला नेमकी दृष्टी देणारी ठरली.. समाजवादी युवक दलाच्या माध्यमातून दलित, मजूर, स्त्रिया, भूमिहीनांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न त्यांनी केला..
महात्मा जोतिबा फुले प्रतिष्ठान आणि विषमता निर्मुलन समितीचं काम करत असताना त्यांना त्यांचा कल आणि कार्याची दिशा गवसली.. जसजसा विज्ञानाचा.. शिक्षणाचा प्रकाश मानवी जीवनात येईल तस-तसं अंधश्रद्धेच्या अंधःकाराचे निराकरण आपोआप होईल असा आशावाद समोर ठेऊन अंधश्रद्धा निर्मुलन समितीची उभारणी त्यांनी केली..
नरबळी, भूत-प्रेत, भानामती, डाकीणप्रथा, भ्रामक वास्तुशास्त्र, फलज्योतिषी याच बरोबर बुवा-बापू-महाराज यांचा पर्दाफाश करण्याचं कार्य समिती करत राहिली.. वैज्ञानिक धर्मचिकित्सा आणि शोषण करणाऱ्या अंधश्रद्धा या पार्श्वभूमीवर अंधश्रद्धा निर्मुलन समितीने अनेक चळवळी केल्या.. चमत्कार दाखवणाऱ्यांना बक्षीस देण्याचे आवाहन केले.. बाळूमामाची नवसाची मेंढरं असो.. पोटावर हात फिरवून अपत्य प्राप्ती होते म्हणणारी पार्वती माँ असो किंवा हाताच्या बोटांनी केवळ हात फिरवून ऑपरेशन करणारा महाराज असो या सर्वांनाच समितीने मूठमाती दिली..
अंधश्रद्धा निर्मुलन होण्यासाठी कायदा संमत व्हावा यासाठी अनेक वर्षे दाभोळकरांनी रान उठवलं.. पण सरतेशेवटी अंधश्रद्धाविरोधी आणि जादूटोणाविरोधी कायदा त्यांच्या हौतात्म्यानंतरच संमत झाला.. हा विवेकाचा आणि सत्त्याचाच विजय आहे.. जो स्वयंसिद्ध आहे.. शतकानुशतके रूढी, परंपरा, आणि धर्मांधता यात गुरफटून पडलेल्या समाजाला त्या गर्तेतून बाहेर काढणं.. विवेक आणि नितीमत्ता अंगीकारावयास लावणं हे प्रवाहाविरुद्ध पोहण्याचं कठीण कार्य; अनेक अपमान, आरोप, धमक्या यांना भीक न घालता दाभोळकर अखंडपणे लढत राहिले..
कोणत्याही गोष्टीचा बौध्दिकतेच्या अंधत्वातून कार्य-कारणभाव न लावता, आहे तसा स्वीकार करणं म्हणजे अंधश्रद्धा.. आणि चांगली अन् हितकार गोष्ट आपल्या सारासार तर्कबुद्धीच्या जोरावर निवडणं हा विवेक.. या विवेकाच्या जोरावरच अंधश्रद्धा निर्मुलन होऊ शकतं हे त्यांनी जाणलं होतं..
अंधश्रद्धा हे मानवी बुद्धीचे व्यंग आहे हे पटवून देताना ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे तुकोबांच्या अभंगाचा दाखला देतात..
“शुके नळिकेसी गोवियले पाय | विसरोनी जाय पक्ष दोन्ही ||”
पोपटाला माणसानं आधार म्हणून दिलेल्या नळीवर बसण्याची सवय झाली, तर तो आपल्याला दोन पंख आहेत हे हळू-हळू विसरून जातो.. आधाराची नळी कुणी काढली असता चक्क खाली पडतो.. कारण दरम्यानच्या काळात त्यानं पंखांचा वापरच केलेला नसतो त्यामुळे त्याच्या पंखांबाबत तो अनभिज्ञ झालेला असतो.. हा सगळा त्याच्या मनाचा खेळ आणि त्याने स्वीकारलेल्या गुलामगिरीचा परिणाम..
अंधश्रद्धांमध्ये अडकलेल्या व्यक्तींचं मन देखील त्या पोपटाच्या मनासारखंच असतं.. हे व्यक्ती पूर्वीपासून ऋषीमुनी, विद्वान, वडीलधारी माणसं यांनी सांगितलेल्या गोष्टी कोणतीही चिकित्सा न करता आहे तश्याच स्वीकारतात.. स्वतःला बुद्धी असून ती स्वतंत्रपणे वापरण्याचा अधिकार आहे हे हि विसरतात..
या मानसिक गुलामगिरीतून समाजाची मुक्तता व्हावी यासाठी गौतम बुद्ध, ज्ञानेश्वर माऊली, तुकोबा, गाडगेबाबा, संत तुकडोजी महाराज, शाहू फुले आंबेडकर या सगळ्यांनीच प्रस्थापित परंपरांना छेद देऊन प्रवाहाच्या विरुद्ध जाण्याचे मनोबल दाखविले..
आपली ध्येयं, आपल्या इच्छा-अपेक्षांची पूर्ती व्हावी यासाठी कष्ट आणि बुद्धिमत्ता यांचा रास्त वापर करून साध्य मिळविता येतं हे ध्यानात घेतल्यास इच्छापूर्ती साठी माणसाची होणारी अस्थिरता आणि अगतिकता.. आणि त्यामुळे निर्माण होणारी आंधळी विवेकशक्ती टाळता येऊ शकते.. घरातलं सुख-समाधान हे दारं खिडक्यांच्या दिशांवर अवलंबून नसून ते कुटुंबियांच्या सामंजस्यावर अवलंबून असतं.. गणेशमूर्ती विसर्जन न करता दान केल्यास पर्यावरण शुद्धी टिकवता येते.. समतावादी समाजासाठी आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देणे.. अश्या अनेक नित्त्याच्या गोष्टीतून समाज परिवर्तनासाठी युवाशक्तीने सक्रीय होऊन अंधश्रद्धेच्या प्रश्नालाच सुळावर चढवण्याचं धाडस दाखवायला हवं खरंतर.. परंपरा आणि आधुनिकता यांमध्ये अडकलेल्या स्त्रियांनी स्वयंस्फूर्तीने स्वतःला अंधश्रद्धेतून मुक्त करायला हवे..
“वैष्णव ते जग | वैष्णवाचा धर्म || भेदाभेद भ्रम | अमंगळ ||” हि प्रतिज्ञा वारकरी संप्रदायाने सामाजिक समतेचं मन्वंतर घडवण्यासाठी प्रत्यक्षात उतरवायला हवी.. वैज्ञानिक दृष्टीकोन शिक्षणक्षेत्रात रुजवायला हवा.. त्यातूनच उद्याची पिढी बुद्धीने डोळस बनेल.. राजकीय धुरिणींनी या बाबींचा गांभीर्याने विचार आणि कृती करायला हवीये.. मानवकल्याणाच्या विचारांची पेरणी होऊन त्यांचं जतन जर झालं तर आणि तरच ती दाभोळकरांना आदरांजली ठरेल असं मला वाटतं..
साने गुरुजींनी सुरु केलेल्या साधना या साप्ताहिकाच्या समतेच्या विचारांचा पाया कायम ठेऊन दाभोळकरांनी ‘साधने’ला सामाजिक परिवर्तन घडवणारे विचार अभिव्यक्तीचे व्यासपीठ बनवले.. विचारांचे अभिसरण व्हावे आणि संवादाचे एक साधन म्हणून ‘अंधश्रद्धा निर्मूलन’ वार्तापत्र सुरु ठेवले..
‘विचार तर कराल’, ‘तिमिरातुनी तेजाकडे’, ‘विवेकाची पताका घेऊ खांद्यावरी’ यांसारख्या अनेक पुस्तकांच्या माध्यमातून त्यांनी साहित्यनिर्मिती केली आहे.. अनेक सामाजिक संस्थांकडून त्यांचा.. त्यांच्या कार्याचा वेळोवेळी सन्मान झाला आहे.. “दशकातील सर्वोत्तम कार्यकर्ता” म्हणून त्यांचा अमेरिकेत गौरव करण्यात आला.. तसंच भारत सरकारद्वारे त्यांना मरणोत्तर ‘पद्मश्री’ देऊन गौरवण्यात आलं..
२० ऑगस्ट २०१३ रोजी काही समाजविघातक प्रवृत्तींनी दाभोळकरांवर पिस्तुलातून गोळ्या झाडून त्यांची हत्त्या केली.. हि बातमी खरंतर डोकं सुन्न करणारी.. मन विषण्ण करणारी आणि अक्षरशः हेलावून टाकणारी होती.. हा हल्ला डॉ. नरेंद्र दाभोळकर या हाडामासाच्या व्यक्तीवरचा नव्हता.. हा हल्ला विवेकवादावरचा हल्ला होता.. हा हल्ला बुद्धीप्रामाण्यवादावरचा हल्ला होता.. आज त्या घटनेला ३ वर्ष पूर्ण होऊनही संपूर्णपणे निर्णयाप्रत येऊ शकू अशी कोणतीच माहिती पोलिसांच्या हाती लागत नाही हे वास्तव शरमेने मान खाली घालायला लावणारे आहे..
अहिंसक मार्गाने वैचारिक परिवर्तन करू पाहणाऱ्या या व्यक्तीचा विचार आणि विवेक गोळीच्या काडतुसाने कधीच नष्ट होऊ शकणार नाही.. नष्ट झाले ते दाभोळकरांचे कलेवर.. नष्ट झाले ते त्यांचे हाडामासाचे शरीर ज्यात हे सगळे विचार सामावलेले असायचे.. पण दाभोळकरांनी हे विचार अनेकांपर्यंत वेळोवेळी पोहोचवले होतेच.. आणि त्याचाच परिपाक म्हणजे आज त्यांना जाऊन ३ वर्षं झाली तरी त्याचं कार्य कुठेच थांबलं नाही कि कमी झालं नाही.. डॉ. हमीद आणि मुक्ता दोघांनीही, त्यांच्या असंख्य वारसदारांना.. अं.नि.स. च्या कार्यकर्त्यांना.. दाभोळकरांची विचारमाला अधिक समृध्द करण्यासाठी नवनवीन पुष्पं जोडून दिली आहेत.. आणि आजही त्याचं अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यासाठी धन्य होणं तसंच अविरतपणे सुरु आहे..
गोळीने विचार मारता येत नाही.. उलटपक्षी शाश्वत विचारांसाठी झालेल्या बलिदानाने तो विचार अधिक तेजस्वी बनतो.. हे सॉक्रेटिस, मार्टिन ल्यूथर किंग, महात्मा गांधी यांच्या बलिदानाने काळानुरून सिद्ध झालेलं आहेच.. समाजहितासाठी स्वीकारलेल्या तत्वांचं पालन करताना आलेला मृत्यू; हा मृत्यू देणाऱ्याला निंदित अन लज्जित करणारा तर असतोच.. पण तरीही जीवनाचं मृत्युंजय शिखर गाठणाराही असतो हे ध्यानात घ्यायला हवं..
-डॉ. वर्षा खोत