Home Featured चार पावसाळे अधिक- माझी माय, ‘भातसाई..!!’

चार पावसाळे अधिक- माझी माय, ‘भातसाई..!!’

चार पावसाळे अधिक- माझी माय, ‘भातसाई..!!’

आधुनिक तंत्रज्ञान आलं कि माणसं त्यातले दोषच जास्त बघतात.. पण याच whatsapp, facebook सारख्या social networking sites मुळे कितीतरी चांगल्या गोष्टी आणि फायदेही झालेत..

माझ्या बाबतीतही असंच काहीसं घडलं.. social networking च्या जगतात क्रांती घडवून आणणाऱ्या whatsapp मुळेच आम्ही शाळेची मित्रमंडळी ३०-३२ वर्षांनी एकमेकांना भेटलो आणि आठवायला लागलो.. काहींची नावं अर्धवट आठवली.. काहींचे चेहरे अस्पष्ट दिसले.. पण प्रत्यक्ष जेव्हा ग्रुप बनवला.. तेव्हा सर्वांचे बदललेले रंग-रूप.. आवाज.. कामकाज.. घर-दार.. सगळं काही स्पष्ट झालं.. आणि मग रोजचं बोलणं, मेसेज पाठवणं, विनोद करणं, शुभेच्छा देणं सुरु झालं..

तश्यातच एकाला भन्नाट कल्पना सुचली.. Get-together करण्याची.. मग काय.. सगळ्यांनी ही कल्पना उचलून धरली.. खरंतर आमचा १९८५चा १०वी चा ग्रुप एकत्र येणार होता.. पण संजय वाडीले या आमच्या मित्राने हीच कल्पना विस्तारित स्वरुपात साकार करण्याचं ठरवल्याचं आम्हाला कळलं.. आमच्या आनंदाला मग काही पारावरच उरला नाही.. कारण आम्ही सगळेच भेटणार होतो.. वानखेडे सर-मॅडम.. निमसे सर.. महाडिक काका.. सावित्रीताई.. दुर्गा.. निज्जू.. कासकर काकू.. आणि अजून कित्येक..

१९ फेब्रुवारी शिवजयंतीची तारीख ठरवण्यात आली.. आम्ही सगळे whatsapp वरून एकमेकांना बजावत होतो.. यायचं बरं का.. वेळ काढायचा.. कोण-कोण एकत्र येणार जाणार.. वगैरे.. वगैरे..

आणि अश्यातच या सगळ्या उत्साहाला गालबोट लागलं.. आमचा एक सगळ्यात जवळचा मित्र दत्तू बोऱ्हाडे आम्हाला सोडून गेला.. दत्तू.. जो कार्यक्रमाला येण्या विषयी आम्हाला अगदी निक्षून सांगत होता.. तोच हार्ट अटॅक मुळे आम्हाला हुलकावणी देऊन गेला.. सर्वजण एकाचवेळी भेटण्याच्या आनंदावर दत्तू आमच्यातून अचानक गेल्याने विरजण पडलं..

असो काळ काही कुणासाठी थांबत नाही हेच खरं..

“जन पळभर म्हणतील हाय हाय..

मी जाता राहीन कार्य काय..”

मलाही त्या दिवसाची खूप उत्कंठा लागलेली.. १९ फेब्रुवारी चा दिवस उजाडला.. आज कार्यक्रम आहे हा विचार मनात आल्याबरोबर मी मनाने तर केव्हाच तिथे पोहोचले होते.. कार्यक्रमाच्या स्वरूपाचे मनोरे बांधणं चालू होतं.. भराभर आवरून मी, माझी बहिण आणि आई आम्ही तिघी भातसानगरच्या प्रवासाला लागलो..

जेव्हा भातसानगर ला जाणारा फाटा लागला.. तेव्हा गाडीतून बाहेर बघताना दिसणाऱ्या एकेका झाडागणिक आठवणी ताज्या होत गेल्या.. प्रत्येक जागा.. प्रत्येक ठिकाण काहीना काही ओळखीची खुण सांगत होतं.. जुन्या आठवणीत रमताना अगदी हरवून गेल्यासारखं झालेलं.. अश्यातच शाळेचं प्रवेशद्वार आलं..

“प्रकल्प विद्यालय भातसानगर”

आम्ही गाडीतून उतरलो.. कमानीवर लावलेल्या फलकांनी आमचं स्वागत केलंच होतं.. गेटमधून आत जाताना अनेक ओळखीचे चेहरे समोरून येऊ-जाऊ लागले.. आम्ही नावं नोंदवली तेव्हा एक गुलाब-पुष्प, प्रमाणपत्र आणि श्यामची आई हे पुस्तक देऊन आमचं स्वागत झालं.. आणि मग गतस्मृतींना उजाळा देऊन माणसं आठवून त्यांच्याशी बोलून आठवणींना उजाळा देणं सुरु झालं.. काहींचे चेहरे आठवत.. पण नावं आठवत नव्हती.. तरी सगळ्यांना माझी ओळख सांगत.. त्यांची ओळख पटवत भेटी घेत गेले..

३०-३२ वर्षांनतर वर्गमित्र भेटल्याचा आनंद काही औरच.. आम्ही सगळे एकमेकांना अगदी, अरे तू किती जाड झालास.. झालीस.. केस पिकले की, सुना-जावई आले का..? मुलं काय करतात.. अशी औपचारिक विचारपूस करून एकमेकांची चेष्टामस्करी करणंही सुरूच होतं..

कोण-कोण आलंय.. अन् कोण कोण नाही हे पाहण्यात वेळ कसा गेला कळलंच नाही.. त्यातंच आम्ही क्रीडामंदिर’ला चालत आलो.. रस्त्याच्या त्या ओळखीच्या खुणा.. त्या घटना.. मनात दाटी करत होत्या.. किती आठवू.. किती पाहू.. किती फोटो काढू न किती काय.. असं झालं होतं..

वाटलं होतं तशी मोजकीच माणसं येतील.. आणि जेमतेमच कार्यक्रम होईल.. पण तिथे जणू माणसांची जत्राच भरली होती.. प्रत्येक क्षेत्रात कामं केलेल्या आणि भातसात खऱ्या अर्थाने जगलेल्या.. अश्या सगळ्या व्यक्ती भातसानगर चे ऋण न विसरता तिथे एकत्र जमले होते.. ज्याप्रमाणे पंढरीच्या वारीला नित्य-नेमाने जाणारा वारकरी त्याच्या वैयक्तिक, प्रापंचिक अडचणी सोडून ठरवल्याप्रमाणे वारीला जातोच.. अगदी तसंच एकमेकांच्या भेटीच्या ओढीने आम्ही सगळे आलो होतो.. दुपारचं जेवण झालं.. आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन selfies, photos काढले..

इथं आल्यावर माझा सगळा भूतकाळ माझ्या डोळ्या समोर उभा राहिला.. मला माझ्या आयुष्यातल्या बऱ्याच चांगल्या वाईट घटना आठवल्या.. ज्या क्रीडामंदिरात आम्ही TV पाहायला जमायचो.. सांस्कृतिक कार्यक्रम पाहायचो-करायचो, नाटकं करायचो.. ते सगळं आठवलं.. घरापासूनचा शाळेचा रस्ता.. मधल्या सुट्टीत जेवायला घरी येता-जातानाचे प्रसंग.. शिक्षकांचे खाल्लेले फटके.. त्यांच्या तिथल्या खोल्या.. सरकारी दवाखाना, हनुमानाचं मोठं मंदिर.. ST Stand.. बाजार.. गिरणी.. काबाडीकाकांचं किराणामालाचं दुकान.. तेव्हाचं सारं-काही डोळ्यांसमोर तरळत होतं..

या मंतरलेल्या वातावरणात बरेच ओळखीचे लोक भेटत होते.. अभया कशी आहेस म्हणून आपुलकीने विचारपूस करत होते.. अभया हे माझं माहेरचं नाव.. खरं सांगू, या नावाने कुणी हाक मारली की पुन्हा लहान झाल्यासारखं वाटतं.. आणि मनात घर करून राहिलेल्या लहानपणच्या हजारो आठवणी क्षणात ताज्या होतात..

माझं संपूर्ण शालेय जीवनच भातासात गेलं.. १ली ते १०वी.. त्यामुळे भातसात आल्यानंतरचे सुरुवातीचे आनंदाचे दिवस.. आणि वडील वारल्यानंतरचे कष्टात काढलेले दिवस यामुळे मी घडले.. पुस्तकांत वाचायला या ओळी किती सोप्या वाटतात नाही; कि “यामुळे मी घडले” वगैरे.. पण प्रत्यक्ष सुख-दुःख, हाल-अपेष्टा, कष्ट, तडजोड, मन मारणं, सहन करणं, समजून घेणं.. या सर्व भावना मी जगल्यात.. त्यातल्या जाणीवा मी भोगल्यात.. आणि त्यातून तावून सुलाखून आजची मी घडलेय.. त्यावेळचे ते क्षण मी पुन्हा एकदा पाहत.. अनुभवत होते..

बघता-बघता अंधार पडू लागला होता.. ७च्या सुमारास कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे     “डॉ. प्रकाश बाबा आमटे आणि मंदाताई आमटे” यांचं आगमन झालं.. भव्य स्टेज, ध्वनी व्यवस्था, बैठक व्यवस्था, भोजन व्यवस्था.. वगैरे.. अतिशय सुयोग्य नियोजनात स्नेहसंध्येच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली.. हा सोहळा म्हणजे भातसाच्या सर्व आजी-माजी विद्यार्थी, कर्मचारी, रहिवासी,.. या सगळ्यांचा स्नेहमेळावाच होता.. अनेक आजी-माजी विद्यार्थी, आणि शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.. अनेकांविषयी कौतुकाचे बोल.. प्रकल्प विद्यालयाच्या आत्ताच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला सांस्कृतिक कार्यक्रम.. स्थानिक ऑर्केस्ट्रा.. “भातसाई” या नियतकालिकाचं प्रकाशन.. असा भरगच्च कार्यक्रम ठेवण्यात आला होता..

या कार्यक्रमाला सामाजिक बांधिलकीचंही भान होतं.. या कार्यक्रमात “डॉ. प्रकाश बाबा आमटे” यांच्या संस्थेस रु. ३,००,००० ची स्नेह्भेट.. तसंच दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी भरीव कार्य करणाऱ्या नाम या संस्थेस रु. १,५१,००० ची मदत.. आणि देशासाठी बलिदान देणाऱ्या शहीद कर्नल महाडिकांना श्रद्धांजली, त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत आणि धैर्य देण्यात आलं..

१९ फेब्रुवारीचा तो दिवस रात्री १-२ला संपला.. रात्रीचा मुक्काम मी भातसाईच्या कुशीतच केला.. सकाळी जेव्हा परतीच्या प्रवासाला निघाले.. तेव्हा माहेर सोडून सासरी जाणाऱ्या माहेरवाशीणीसारखे माझे पाय जड आणि डोळे ओले झाले.. अगदी भरून आलं होतं मला.. पण पुन्हा लवकरंच येउयात या गोड समजुतीने मन हलकं करून मी तिथून निघाले..

आजवर अनेक कार्यक्रम पार पडले.. पण हा कार्यक्रम निराळाच होता.. सुख-दुःखाचा मेळ घालणारा.. भेटल्याचा आनंद आणि दुरावल्याचं दुःख अश्या संमिश्र भावना मनात होत्या.. खरंच शब्दात मांडता येणार नाहीत असे भाव मनात दाटून आले होते..

मला घडवण्यात भातासातले माझे शिक्षक, भातासावासीय, मित्रमंडळी, तिथला रम्य परिसर, अध्यात्मिक वातावरण, सांस्कृतिक ठेवा जपणारं क्रीडामंदिर, या सगळ्या गोष्टींचं मोलाचं योगदान आहे.. मी कोणी मोठी.. प्रसिध्द.. व्यक्ती नाहीये.. पण एक सुजाण नागरिक नक्कीच आहे आणि ती माझ्या भातसाई मुळेच..!!

-मनिषा पवार (अभया चव्हाण)

Previous article गीत माझ्या मनातले- येणार साजण माझा
Next article Lockdown Diaries- 1
पेशाने शिक्षिका असणारी.. भातसानगरच्या प्रकल्प विद्यालयाची विद्यार्थिनी असणारी.. चूल आणि मुल या पलीकडेही एका स्त्रीला एक वेगळं अस्तित्व असतं असं मानणारी.. (फावल्या वेळात) भरभरून लिखाण करणारी.. आणि 'शब्दीप्ता Magazine' च्या संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्यात मोलाचा वाटा उचलणारी.. एक हरहुन्नरी लेखिका..

1 COMMENT

  1. लेख खूप सुंदर होता आपण स्वतः सर्व काही तिथे अनुभवत आहे असच वाटत . तुम्ही अशाच लिहित रहा. पुढील लिखानास हार्दिक शुभेच्छा..

Leave a Reply to Sagar Telore Cancel reply

Please enter your comment!
Please enter your name here